हेमा होनवाड
तिबेटमधील अर्धभटक्या जमातीत जन्मलेला येशी भारतात कायम ‘तिबेटी निर्वासित’ म्हणून जगला, परंतु त्याने स्वत:ला संगणक विज्ञानात पारंगत केलं आणि आपल्यासारख्या अनेक मुलांमध्ये संगणक शिक्षणाची उत्तम तांत्रिक कौशल्ये विकसित व्हावीत म्हणून संस्कृतीशी नाळ जोडून देणारी संगणकीय शिक्षण पद्धती विकसित केली. आज तो अमेरिकेत अभ्यासक्रम कसा शिकावा आणि शिकवावा यावर पीएच. डी. करतो आहे. त्याचं सारं लक्ष अभ्यास आणि त्यातून होणारा विकास याकडे आहे. अर्थात तिबेटला एकदा तरी जाण्याची इच्छा आहेच. ‘माणसं जोडणारं शिक्षण’ या येशीच्या आयुष्यावरच्या लेखाचा उर्वरित भाग.
‘‘आईचं प्रेम मी अनुभवलंच नाही. चिनी डॉक्टरांच्या चुकीच्या उपचारामुळे माझे पाय अधू राहिले आणि माझ्या आईला प्राण गमावावे लागले.’’ येशी आपले अनुभव सांगत होता. ‘‘बाबांनीच आम्हाला सांभाळलं परंतु आम्हा भावंडांना शिक्षणासाठी परदेशात, भारतात पाठवण्याच्या निर्णयाचं मला आश्चर्य वाटत राहतं. त्यांनी हा निर्णय का घेतला असावा, याची वयाच्या सातव्या वर्षी मला सुतराम कल्पना येणं शक्य नव्हतं. पण आज मागे वळून पाहताना मी विचार करतो, तेव्हा त्या निर्णयामागचं प्रेम आणि चांगलं काहीतरी घडण्याची आशा मला जाणवते. काय वाटलं असेल त्यांना आपल्या काळजाच्या दोन तुकड्यांना एकापाठोपाठ एक, घरापासून दूर, एका अनिश्चित वातावरणात पाठवताना? त्यांना नक्कीच कल्पना होती की, आपल्या मुलांना पावला-पावलाला संकटांना तोंड द्यावं लागणार आहे. अनिश्चित भविष्याकडे आम्हाला पाठवून त्यांनी आमचा वियोग कसा सहन केला असेल? केवळ आमच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांनी स्वत:च्या हृदयावर दगड ठेवला. एखाद्याला कल्पनेतही जी गोष्ट असह्य वाटेल ती त्यांना प्रत्यक्ष अनुभवावी लागली.’’ येशीच्या शब्दांत वडिलांविषयी कृतज्ञता दाटून आली होती.
जगातील असंख्य देशांप्रमाणे मुलगी म्हणून जन्माला येणं हा येशीच्या दोघी बहिणींच्या प्रगतीच्या मार्गातील मोठ्ठा अडथळा ठरला. त्यांना तिबेटमध्येच राहावं लागलं. त्या शाळा-महाविद्यालयामध्ये जाऊ शकल्या नाहीत. त्या जे मिळेल आणि जमेल ते काम करतात. उपाहारगृहामध्ये वेटरचं काम करणं किंवा घरी टेम्पा (तिबेटमधील लोकांचा रोजचा आहार) बनवून बाजारात विकणं आणि त्यावर मिळालेल्या रकमेत कसंतरी भागवणं, वडिलांनी येशी आणि त्याच्या भावाला जेव्हा एकापाठोपाठ एक सीमेपार पाठवलं तेव्हा त्याच्या मोठ्या बहिणीला चिनी शासनानं पकडून तुरुंगात टाकलं आणि काही काळानं सोडलं. पण तिच्या नवऱ्याला ठोस कारण नसताना दहा वर्षं तुरुंगात डांबलं. सध्या तिच्या कुटुंबाची स्थिती जरा बरी आहे. मुलगी म्हणून जन्माला आलात, तर आजही असंख्य ठिकाणी स्वत:चं जीवन कसं जगायचं ते तुम्ही स्वत: ठरवू शकत नाही. जीवनाकडून छोट्या छोट्या अपेक्षाही करू शकत नाही. ‘मुलगा’ असल्यानं येशीला आणि त्याच्या भावाला स्वत:चं भविष्य घडवण्याची संधी तरी मिळाली.
येशीला जिव्हाळ्याची मित्रमंडळी खूप भेटली. आणि एक ‘आपलं माणूस’ही सुदैवानं भेटलं. त्याची पत्नी तेन्झीन. तिच्या आई-वडिलांनी मणिपत या छत्तीसगडमधील गावातील तिबेटी निर्वासित छावणीत आश्रय घेतला होता. तिचा जन्म तिथेच झाला. तिला तिथल्या निवासी शाळेत प्रवेश मिळाला आणि त्यामुळे तिचा विकास छान झाला. ‘भारतीय सेना’ आणि ‘तिबेटी रेजिमेंट’च्या संयुक्त प्रयत्नांनी ही शाळा तिबेटी मुलांसाठी चालवली जात होती. तिचे वडील त्या ‘रेजिमेंट’मध्ये काम करत होते. तेन्झीन आठ वर्षांची असताना ते हे जग सोडून गेले. तिनं तिबेटी मुलांसाठी चालवल्या जाणाऱ्या शाळांमध्ये दहा वर्षं शिक्षिका म्हणून काम केलं. येशीनं नवीन आलेल्या मुलांना भारतात सामावून जाण्यासाठी मदतगट तयार केले होते. या शाळांमध्ये त्याचे मदतगट काम करायचे. तिथेच तेन्झीन आणि येशी एकमेकांना भेटले. आईनं एकटीच्या बळावर मोठ्या हिमतीनं या सहा भावंडांना सक्षम केलं. आज त्या ८० वर्षांच्या आहेत. आजही तेन्झीनची मोठी बहीण आणि आई स्वेटर विणून त्यांची विक्री करतात. भाऊ तिबेटी मुलांच्या शाळेत शिक्षक आहे.
येशीला नेहमीच अभ्यास करण्याची तीव्र ओढ होती. ‘तंत्रज्ञानाला संदर्भाची जोड असली, तरच दर्जेदार काम होऊ शकतं’ हा महत्त्वाचा निष्कर्ष येशीनं काढला होता. तंत्रज्ञानाचा उपयोग जी माणसं करतात, त्यांच्या जगण्याशी ते सुसंगत असायला पाहिजे. ‘सॉफ्टवेअर डिझाइन’ला शिक्षण आणि सामाजिक कार्याशी जोडण्यासाठी खोलवर अभ्यास करण्याची आवश्यकता आहे, असं त्याला वाटत होतं. येशीनं शांतपणे आणि चिकाटीनं त्याचा पाठपुरावा केला आणि मोठ्या जिद्दीनं तिबेटी विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेली ‘अमेरिकी शासना’ची शिष्यवृत्ती मिळवली. या शिष्यवृत्तीमुळे येशीला अमेरिकेतील ‘बफेलो विद्यापीठा’त पदव्युत्तर अभ्यास आणि संशोधनासाठी दारं उघडली गेली.
येशीचं लक्ष्य केवळ स्वत:चं ज्ञान आणि कौशल्य वाढवणं हे कधीच नव्हतं. त्याला नवीन पद्धती आणि साधनं स्वत: तयार करायची होती आणि त्यांचा आपल्या सामाजिक कामामध्ये वापर करायचा होता. ‘बफेलो विद्यापीठा’तून त्यानं अभ्यास आणि संशोधन करून २०२२मध्ये ‘संगणक विज्ञान’ आणि ‘अभियांत्रिकी’मध्ये पदव्युत्तर पदवी मिळवली. सहकाऱ्यांच्या मदतीनं येशीनं ‘पर्मिएबल मीडिया’ (अशी एक सॉफ्टवेअर रचना जिथे माहिती, विचार आणि संवाद मुक्तपणे प्रवाहित होऊ शकतात.) या संकल्पनेचा प्रयोग करून काही वेगळी ‘सॉफ्टवेअर्स’ निर्माण केली आहेत. ही ‘सॉफ्टवेअर्स’, उपजत कुतूहल वापरून, निरीक्षण करून, त्यावर प्रयोग करून, त्यातून नवनिर्मिती करणं या गोष्टी सहजपणे करण्याचं स्वातंत्र्य शिकणाऱ्याला देतात. त्यामुळे विद्यार्थी नवनिर्मितीकडे स्वाभाविकपणे वळतात. आपल्या भूमीशी आणि सांस्कृतिक वारशाशी मजबूत धाग्यानं जोडणारा दुवा, देशांतर कराव्या लागलेल्या विदेशी तरुण-तरुणींना मिळावा आणि संगणक शिक्षणाची उत्तम तांत्रिक कौशल्ये विकसित व्हावीत म्हणून ‘समुदाय-आधारित संगणक-शिक्षण उपक्रमाची’ कशी मदत होईल, याचा येशीनं अभ्यास केला आहे आणि यापुढेही तो चालू राहील. त्याचे हे प्रकल्प आंतरराष्ट्रीय परिषदेतही सादर होऊन प्रकाशित झाले आहेत. तिबेटी आणि विदेशात राहणाऱ्या इतर युवक-युवतींसाठी, ‘संस्कृतीशी नाळ जोडून देणारी संगणकीय शिक्षण पद्धती’ या विषयावर, ‘इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑफ लर्निंग सायन्सेस’ या परिषदेत या वर्षी त्याचा लेख प्रकाशित झाला आहे.
तसंच ‘कन्स्ट्रक्शनिझम कॉन्फरन्स’ या परिषदेतही याच ‘कन्स्ट्रक्शनिस्ट सॉफ्टवेअरमध्ये पर्मिएबल मीडिया’ या विषयावर लेख प्रकाशित झाला. योग्य साधनं वापरली की, आव्हानांचं स्वरूप स्पष्ट होतं, मग चपखल प्रश्न पडून, त्यातून शिकायला मिळतं, हा येशीचा विश्वास आहे. आणि या प्रकल्पांमुळे तो दृढ झाला आहे. स्वत:च्या अनुभवातून आणि पेललेल्या आव्हानातून येशीच्या प्रबंधाचा विषय विकसित होत गेला. ‘स्थलांतरित समुदायांसाठी सुरक्षित आणि समुदाय आधारित रचनात्मक संगणनाच्या प्रक्रियेतून शिक्षण!’ माणसाच्या दैनंदिन वास्तवाशी जोडलेल्या प्रक्रियांतून संगणन सुरक्षितपणे वापरण्याचं कौशल्य कसं शिकवता येईल याचा शोध येशीला घ्यायचा होता. २०२३मध्ये येशीनं प्रबंध सादर केला आणि त्याच्या प्रबंधाची ‘पट्रीशिया एबर्लेईन’ या सन्माननीय सर्वोत्कृष्ट पुरस्कारासाठी निवड केली गेली.
त्याच वर्षी त्यानं ‘लर्निंग’ आणि ‘इन्स्ट्रक्शन’ या विभागात ‘प्रेसिडेन्शिअल फेलोशिप’ही मिळवली. फेलोशिपमुळे पीएच.डी.साठी येशीला त्या विषयातील अभ्यास अधिक सखोल आणि विस्तृतपणे करण्याची संधी मिळाली. आज येशी ‘बफेलो विद्यापीठा’त ‘अभ्यासक्रम, शिकवण्याच्या पद्धती आणि शिकण्याचं शास्त्र’ या विषयांचा पीएच.डी.साठी अभ्यास करतो आहे. ‘शिक्षणाचं सपाटीकरण न करता, विद्यार्थ्यांना स्व-ओळख करून घेत, आपल्या वेगवेगळ्या संस्कृतींची जपणूक करत, ‘संगणन आणि शैक्षणिक तंत्रज्ञान’ कसं शिकवता-शिकता येईल याचा अभ्यास आणि त्याला संलग्न उपक्रम’ हे उद्दिष्ट येशीनं अभ्यासाच्या केंद्रस्थानी ठेवलं आहे.
आज तो जे ‘प्रोग्राम्स’ निर्माण करतो त्यांच्या मदतीनं विद्यार्थ्यांना स्वत: वेबसाइट तयार करता येते, परस्पर संवाद साधता येईल अशा कथा आणि साधे खेळ तयार करता येतात, त्यांच्या समुदायाबद्दल आणि त्यांच्या आवडीच्या इतर गोष्टींबद्दल मिळवलेल्या माहितीचं विश्लेषण करता येतं. हा अभ्यास करताना निवडलेल्या उपक्रमांतून विद्यार्थ्यांना हळूहळू स्वत:ची ओळख होत जाते आणि मग संगणन तितकासा अवघड विषय उरत नाही. संगणनाची भाषा इतिहास, आपलं कुटुंब, आणि पुढील आशा यांसारख्या भावनिक विषयांशीपण संवाद साधू शकते.
मला येशीचा सगळ्यात जास्त भावलेला गुण म्हणजे त्याच्या मनातील कृतज्ञता! या भावनेमुळे त्याची कोणत्याही गोष्टीबद्दल तक्रारच नाही. त्याला दिलेलं गीत त्यानं आपलं म्हणून आवडीने गायलं. त्याला प्रेम-जिव्हाळा देणारे त्याचे गृहपालक, मोठ्या आस्थेनं पाठिंबा देणारे बेंगळूरुमधील वर्गमित्र, ‘संशोधन, शिकवण आणि आपल्या समाजाची काळजी घेणं,’ या तिन्ही गोष्टींचा समन्वय कसा साधता येतो, हे ज्यांनी आपल्या उदाहरणानं दाखवून दिलं ते ‘बफेलो विद्यापीठा’तील मार्गदर्शक या सगळ्यांचा तो ऋणी आहे. ‘कृतज्ञते’ची येशीची व्याख्या मोठी विलक्षण आहे – ‘कृतज्ञता क्रियाशील असावी. जे करू ते संपूर्ण लक्ष देऊन करावं, सतत शिकत राहावं आणि जे देणं शक्य आहे ते समाजाला देत राहावं.’
एक स्वप्न जपलं आहे त्यानं हृदयात. त्याला त्याच्या तिबेटमधील कुटुंबीयांना भेटायचं आहे. ती आशा त्याच्या हृदयात तेवत असल्यानं, तो दूषणं न देता, समन्वयावर भर देतो, कठीण समस्याही अत्यंत शांतपणे साध्या, वास्तव भाषेत मांडतो. सगळ्यांना स्वत:चे भविष्यातील मार्ग स्वत: तयार करता यावेत या उद्दिष्टानं काम करतो. विद्यार्थ्यांना अर्थपूर्ण वाटतील असे ‘संगणक प्रोग्राम्स’ तयार करतो. या ‘प्रोग्राम्स’मध्ये स्व-ओळख, स्व-भाषा आणि समुदायाशी बांधिलकी तर राहतेच, आणि संगणनाची कौशल्य शिकण्यासाठी कठोर मेहनतही करावी लागते. याच ध्येयापोटी येशी लिहितो आणि दूर राहूनही परस्परांच्या संपर्कात राहता येईल असे ‘संगणक प्रोग्राम्स’ निर्माण करतो.
घर सोडून आज २८ वर्षं झाली. आपण कधी घरी जाऊ शकू? हा विचार रात्रंदिवस त्याच्या मनात असतो. त्याच्या वडिलांचे पारपत्र आणि इतर कागदपत्रं तिबेटमध्ये जप्त करण्यात आली आहेत. वडिलांचं वय आता ऐंशीच्या पुढे आहे. ‘‘मला कसंही करून एकदा तरी त्यांना भेटायचं आहे.’’ असं येशी म्हणतो तेव्हा, डोळ्यात पाणी आल्यावाचून राहात नाही.
शुभ्रोसारखा हाही एक सेतू बांधणारा अवलियाच आहे. आधुनिकता आणि प्राचीन वारसा, हद्दपारी आणि आपुलकीची भावना, वैयक्तिक ध्येय, प्रयत्न, आणि समूहाचं कल्याण यांना जोडणारे धागे नेहमी मजबूत राहावेत यासाठी धडपड करत राहणं हेच आता त्याच्या जीवनाचं मूल्य आहे.
येशी ज्या शाळेत लहानाचा मोठा झाला, तिथे तो फक्त अभ्यास आणि स्वत:पुरतं नव्हे तर स्वत:पलीकडच्या व्यापक जगाकडे पाहायला शिकला. ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या निर्माण करण्यावर पूर्ण विश्वास ठेवणाऱ्या मित्र आणि सहकाऱ्यांचा त्याच्या विचारांवर प्रभाव आहे. ‘‘वडिलांचा निर्णय आणि मी अनुभवलेलं समाजाचं औदार्य हे मला मार्गदर्शन करणारे ध्रुवतारे आहेत. शिक्षक, संशोधक आणि रचनाकार म्हणून आता मी जे काम करतो ते या सगळ्यांना माझ्या कृतज्ञतेचं अर्घ्य देतो आहे आणि माझ्या पुढच्या पिढ्यांना त्यांचा पुढचा मार्ग शोधण्यासाठी मदत करतो आहे. खूप काळजीपूर्वक एक एक पाऊल पुढे टाकतो आहे.’’
hemahonwad@gmail.com
