‘गुलाबी फित अन् पलीकडे…’ या (२५ ऑक्टोबर) डॉ. श्रेयसी घाटकर यांच्या लेखात कर्करोगाच्या उपचारांमध्ये फिजिओथेरपी किती मोलाची भूमिका बजावते, हे अगदी प्रकर्षाने अधोरेखित केले आहे. फक्त माहितीच नसून उदाहरणे (case studies) दिल्यामुळे लेख समजायला खूपच सोपा वाटतो. ‘कर्करोग आणि त्यावरील उपचार’ अशा प्रकारच्या किचकट आणि गंभीर विषयावर अशी महत्त्वपूर्ण माहिती साध्या, सोप्या भाषेत देणारे लेख लेखिकेने लिहावेत यासाठी शुभेच्छा. कर्करोग रुग्णांच्या उपचारासाठी निष्ठेने झटणाऱ्या सर्व तज्ज्ञ डॉक्टरांना आमचे विनम्र अभिवादन!-अश्विनी नाटे, ठाणे

कर्करोगाशी लढणाऱ्या रुग्णाला आधार

डॉ. श्रेयसी घाटकर यांनी ‘गुलाबी फीत अन् पलीकडे…’ या लेखातून स्तन कर्करोगाच्या उपचारांच्या एका अत्यंत महत्त्वाच्या पैलूवर प्रकाश टाकला आहे. कर्करोगाशी यशस्वीपणे सामना केल्यानंतर शारीरिक क्षमता आणि आत्मविश्वास पुन्हा मिळवण्यासाठी ‘ऑन्कोलॉजी फिजिओथेरपी’ किती आवश्यक आहे, हे त्यांनी सोप्या भाषेत समजावून सांगितले. केवळ वैद्याकीय उपचार नव्हे, तर शस्त्रक्रियेपूर्वीचे ‘प्रीहॅबिलिटेशन’ आणि उपचारानंतर येणारा थकवा, वेदना किंवा ‘लिम्फीडेमा’ (हाताची सूज) यांसारख्या दीर्घकालीन दुष्परिणामांवर नियंत्रण मिळवण्यासाठी फिजिओथेरपीची गरज असते, हे वाचून अनेक गैरसमज दूर झाले. या उपचार पद्धतीमुळे रुग्ण पुन्हा पूर्वीसारखे दैनंदिन जीवन आत्मविश्वासाने जगू शकतात. शारीरिक प्रगतीसोबतच नवी उमेद आणि जीवन जगण्याचा आनंद मिळवण्याच्या या प्रवासात ‘ऑन्कोलॉजी फिजिओथेरपिस्ट’ची भूमिका किती महत्त्वाची असते, हे या लेखातून प्रभावीपणे सिद्ध होते. हा लेख कर्करोगाशी लढणाऱ्या प्रत्येक रुग्णाला आणि त्यांच्या कुटुंबीयांना खूप मोठा आधार देणारा आहे.- अजित सावंत, चेंबूर

‘अंड्याच्या शिरा’ आठवला

‘स्थलांतरातील खाद्यासंस्कृती’ या सदरातील डॉ. मंजूषा देशपांडे यांचा ‘हलव्यापासून शिऱ्यापर्यंत’ (२५ ऑक्टोबर)च्या अंकातला लेख अतिशय आवडला. आणि आमची आई ‘अंड्याचा शिरा’ करायची. त्याची एकदम आठवण झाली. अप्रतिम चव आणि रंग… परत काही तो कधी चाखायला मिळाला नाही.- प्रकाश गोखले, सांगली.

समर्पणाला सलाम!

अरुणा अंतरकर यांचा संध्या या अभिनेत्रीवरील (१८ ऑक्टोबर) लेख वाचला. लेख छान लिहिला आहे, पण मी काहीबाबतीत त्यांच्याशी सहमत होऊ शकलो नाही. कारण मला त्यांचा अभिनय बऱ्याच वेळा इतका ‘ओव्हर अॅक्ट’ वाटला की त्यात कृत्रिमता स्पष्टपणे दिसायची. तसेच मला उपजत नृत्याचे अंग दिसले नाही, ज्याला ‘फ्लेअर फॉर डान्स’ म्हणतात त्याचा अभाव जाणवतो. त्यामुळे नृत्य करताना त्यांचा अभिनय, स्टेप्स, एकंदर नृत्यात सहजतेचा अभाव किंबहुना कष्टपूर्वक, ओढूनताणून, मेहनतीने केलेले नृत्य दिसते. एक मात्र आहे की त्या अतिशय मेहनती होत्या आणि त्यांची मेहनत स्पष्ट दिसून येत होती, जाणवत होती. त्यांचे प्रसिद्ध होळी नृत्यही काही वेळा थयथयाट वाटत होता. तो कोरिओग्राफीचाही दोष असू शकेल. मात्र त्यांच्या समर्पण आणि मेहनतीला निश्चितच सलाम करायला हवा.- रवींद्र माथुरीया

समाजाच्या अपयशाचा पुरावा!

‘समाजवास्तवाला भिडताना…’ या सदरातले लेखिका अॅड. रंजना पगार-गवांदे यांचे लेख वाचतो. २१व्या शतकात पोहोचलेल्या समाजात आजही जात-पंचायतींचा उन्मत्त कारभार सुरू आहे आणि एक १७ वर्षांची निष्पाप मुलगी त्याला बळी पडते, ही बाब असह्य आहे. हेमाचा मृत्यू हा आत्महत्या नसून व्यवस्थेने घडवलेला संस्थात्मक खून आहे. एका मुलीचा वारंवार छळ करून, तिच्या कुटुंबाला धमक्या देऊन, बहिष्काराची भीती दाखवून तिला गळफास लावण्याशिवाय पर्यायच उरू नये, हा कोणत्याही सुसंस्कृत समाजाला न शोभणारा अपराध आहे. या अपराधी साखळीत फक्त राजू दोषी नाही, तर त्याचे आईवडील, त्यांना पाठीशी घालणारी जातपंचायत, आणि डोळ्यांदेखत घडलेल्या अन्यायावर मौन धारण करणारा संपूर्ण समाज तितकाच दोषी आहे. कायदे असूनही त्यांची अंमलबजावणी करण्याची इच्छाशक्ती नाही, धैर्य नाही. एका मुलीच्या आयुष्यापेक्षा जातपंचायतीच्या खोट्या प्रतिष्ठेला जपणं अधिक महत्त्वाचं मानलं गेलं. हे केवळ प्रशासनावर नाही, तर आपल्या संपूर्ण सामाजिक मूल्यव्यवस्थेवर घणाघाती भाष्य आहे. स्त्रीला ‘उपभोग्य वस्तू’ मानणारी मानसिकता आणि जातीवर आधारित वर्चस्वाची घाणेरडी रचना, या दोन पायांवर आजही अनेक दुर्दैवी घटना उभ्या आहेत. हेमाचा जीव गेला, पण हजारो हेमांना अजूनही अशाच धमक्या, अपमान आणि अन्याय सहन करावा लागत आहे. समाज म्हणून आपण या प्रश्नाला सरळसरळ सामोरे जायला हवे. जातपंचायतींचे अस्तित्व नामशेष करण्यासाठी ठोस कारवाई, पोलीस यंत्रणेची जबाबदारी ठरवणारे कायदे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे सामान्य लोकांत जागृती हे तातडीचे उपाय आहेत. अंधश्रद्धा, भीती आणि गुलामगिरीत जगणाऱ्या समाजात खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य कधीच मिळणार नाही. हेमाचा मृत्यू हा केवळ एका घराचा शोक नाही; तो आपल्या तथाकथित लोकशाही समाजाच्या अपयशाचा रक्तरंजित पुरावा आहे. आता तरी आपण बदललो नाही, तर उद्या पुन्हा कुणीतरी दुसरी ‘हेमा’ आपल्याला गळफास घेतलेली दिसणार.- परेश संगीता प्रमोद बंग,मूर्तिजापूर (अकोला)

उद्याोजकाचा देवमाणूस होतो तेव्हा…

‘ऊब आणि उमेद’ या सदरातील ‘उद्याोजकतेचं संवर्धन’ हा (२५ ऑक्टोबर) डॉ. आनंद नाडकर्णी यांचा लेख अप्रतिम वाटला. उद्याोजकात नेतृत्वाची दूरदृष्टी महत्त्वाची असते, स्वत:च्या विकासाबरोबर सर्वांचा विकास हे ब्रीदवाक्य असावे लागते, अशी अपेक्षा असते, तसाच अनुभव मी स्वत: घेतला आहे, मी ‘एनआरबी बेअरिंग्ज’ या कंपनीत ३८ वर्षे नोकरी केली. आमचे मालक त्रिलोचनसिंग सहानी हे पंजाबी कुटुंबातील होते. ठाण्यात एक छोटा कारखाना उभारून तेथे त्यांनी ‘नीडल बेअरिंग्ज’चे उत्पादन सुरू केले आणि आज त्यांचे पाच कारखाने देशात व परदेशात त्यांनी उभारून दाखविले आहेत. सुरुवातीला ३५ कामगारांचे पोशिंदे असलेले हे आदर्श उद्याोजक आज हजारो कामगारांचे पोशिंदे झाले आहेत. सर्वांचा विकास हे त्यांचे मुख्य धोरण होते, तर कर्मचाऱ्यांना ते ‘माझा परिवार’ असे म्हणत असत व तशीच त्यांची काळजी घेत असत. साधी राहणी व उच्च विचारसरणी, तसेच उत्तम व्यवस्थापन कौशल्य व ज्ञानाचे भुकेले, असे ते होते. मंदीच्या काळात कामगारांना ‘‘तुम्ही घाबरू नका, काम नसले तरी तुमचा पगार मी माझ्या खिशातून देईन’’, असे सांगणारे ते होते. गुणवत्तापूर्ण नेतृत्व व उत्तम दूरदृष्टी तसेच त्यांचे मार्केटिंग कौशल्य असामान्य होते. त्यांचे वडिलांचे ऑपेरा हाऊस येथे छोटे ‘ऑटोमोबाइल’चे दुकान होते, तेथून झालेली सुरुवात, आज संपूर्ण जगात ‘नीडल बेअरिंग्ज’ची निर्यात करत आहे, फक्त पैशासाठी कधीही काम न करता, सर्वांचा विकास व्हावा या एकाच ध्येयाने झपाटलेल्या या उद्याोजकाचा देवमाणूस कधी झाला, हे कोणालाच समजले नाही. त्याचवेळी माझ्या परिवारातील शेवटचा माणूस निवृत्त होईपर्यंत मी कारखाना बंद करणार नाही, अशी घोषणा सहानी साहेबांनी केली आणि ती प्रत्यक्षात आणून दाखवली. हेच त्यांचे देवत्व होते. वयाच्या ९२व्या वर्षी रोजच्याप्रमाणे बारा तास कार्यालयामध्ये काम करून, रात्री शांतपणे हा देवमाणूस देवाघरी गेला. त्यावेळी सर्व आजी-माजी कामगार त्यांच्या अंत्ययात्रेसाठी अत्यंत व्याकुळतेने जमलेले मी स्वत: पाहिले आहेत.- प्रदीप करमरकर, नौपाडा, ठाणे</p>