मनोहर मंडवाले

फोटो काढत रानावनात भटकताना पक्ष्यांचं विश्व टिपणं फारच मनोरंजक असतं. वृक्षराज, पक्षी, लहानमोठे प्राणीकीटक यांचं ते जग… ‘एकमेकां साह्य करू’ म्हणत एकमेकांत विसावलेलं. ‘मज लोभस हा इहलोक हवा’ म्हणत आपणही तिथेच विलीन व्हावं, अशी उत्कट भावना देणारं!

सकाळचे सातच वाजले होते, नि आमच्या कल्याणजवळच्या अटाळी इथल्या दत्तमंदिरालगत गर्द झाडीत, मी नेहमीची पायवाट सोडून आत शिरलो होतो. कॅमेरा रेडी करून! उंचच उंच ताडाच्या झाडांबरोबर मधूनच इथे आंबा, निंबाची झाडं आहेत. अधे-मध्ये छोटे छोटे शेत-शिवारांचे तुकडेही आहेत. मात्र, पावसाळ्यात अस्ताव्यस्त वाढलेलं गवत तसंच असल्यानं त्या झाडा-झुडपांमध्ये आतल्या वाटाही गुडूप झाल्या होत्या. फूट-दीड फूट झाडीतून कुठंतरी दिसणारी वाट शोधत मी आत शिरत होतो. पाऊलन् पाऊल जपून टाकत चालत होतो. झाडा-ताडातून झिरपणारी, पानापानांना आरस्पानी रूप बहाल करणारी सकाळची प्रसन्न सूर्यकिरणं मधूनच माझं लक्ष वेधून घेत होती. शंभर-दीडशेच पावलं मी आत शिरलो असेन, की कुठलासा एक मोठ्ठा पक्षी माझ्या चाहुलीनं एका झाडावरून झर्रकन उडाला! ‘‘अर्रर्र… एक चांगला क्लिक मिस झाला!’’ मी स्वत:वरच चरफडलो. खाली बघून पावलं टाकण्याच्या नादात झाडांच्या वरच्या भागावर दुर्लक्ष झालं होतं. पायाखालच्या गवत-झाडीत जन-जनावर असू शकतं, त्यामुळे अति सावधानता बाळगायलाच हवी होती.

निराश झालेलं मन, पुन्हा लगेचच ताळ्यावर आणलं. कारण गर्द अशा त्या झाडांच्या टापूत तुम्ही एकटेच असता, खचितच कुणी गावातला मामा ताडी काढायला ताडाच्या झाडावर चढलेला दिसतो. तशीच वाट काढत मी जरा आणखी पुढे गेलो, अन् अचानक ‘तो’ नजरेस पडला. डोक्यावर तुरा असलेला नारिंगी रंगाचा. छोटासा, पण लांब शेपटीवाला! डोकं आणि मान गडद निळं, डोळे, चोच आणि छातीचा भाग श्वेत रंगाचा, पाठ आणि शेपटी नारिंगी रंगाची. लांब शेपटीमुळे त्याचं सौंदर्य लांबूनही लक्ष वेधून घेतं. त्याच्या रूपाइतकंच सुंदर त्याचं नाव आहे… स्वर्गीय नर्तक! त्याला उडताना पाहणं म्हणजे निसर्गाचा एक अद्भुत नजराणाच!

झाडाच्या मोठ्याशा फांदीवर, तो आता अगदी शांत बसून होता. माझी चाहूल त्याला अजिबातच लागली नव्हती. पण पठ्ठ्या झाडीत अशा ठिकाणी बसलेला होता, की त्या ठिकाणी जराही सूर्यप्रकाश नव्हता. खरं तर, आम्ही वाइल्ड लाइफ फोटोग्राफर जे जसं दिसतं, आधी ते तसं टिपून घेतो. तो क्षण ‘मिस’ केला, तर कधी कधी तेही टिपायला मिळत नाही. दोनच क्लिक मी घेतले असतील, की एक ‘फ्लाय’ घेऊन हा पठ्ठ्या पुढच्या दाट झाडीत कुठेतरी गुडूप झाला. तेवढ्या त्या सुखद क्षणांनीही मन सुखावलं. तनामनात आणखी उत्साह संचारला. आणखी काही पावलं आत शिरलो.

या टापूत मोरही आहेत बरं का! अधूनमधून त्यांचे आवाज कानांवर पडत असतात. पण मागोवा घ्यावा तर एकही मोर दृष्टीस पडत नाही… (‘मॉर्निंग वॉक’वाल्यांना ते अगदी सहज दिसतात.) माणसांची हलकीशी चाहूलही त्यांना आपल्यापासून दूर ठेवते.

झाडां-झुडपांतून थांबून, वाकून वाकून पाहिलं, कुठे दूरवर वटवट्याची वटवट चालू होती, तर कुठे बुलबुलची भिरभिर नजरेस पडत होती. दोन्ही डोळ्यांनी एकाच वेळी दिसणारे छोटे-छोटे सौंदर्य तुकडे दर वेळी कॅमेरा टिपू शकेलच असं नाही. अशा वेळी वाटतं, की आपल्यालाही पक्ष्यांसारखं उडता यायला हवं. मग झाडांच्या शेंड्यावरला पक्षीही छान टिपता आला असता, नाही?

टिपण्यासारखं ‘हटके’ काहीच दिसत नाही म्हटल्यावर तसाच मागे फिरलो. ‘बर्डिंग’ करताना खूप संयम ठेवावा लागतो. खूप भटकावंसुद्धा लागतं. घरून निघताना मी त्या दिवशी मोबाइल घरीच विसरलो होतो. जरा थांबून बॅगेतून पाण्याची बाटली काढली, घटाघटा पाणी प्यालो. घसा ओला झाला, तसं बरं वाटलं. काय करू या? इथल्या पक्ष्यांचा आज मूड नाहीये वाटतं फोटो द्यायला! चार-पाचशे मीटर जरा मागे जाऊ या. इथे येताना उजव्या हाताला जी झाडी लागते त्या टापूत घुसू या… विचारांसरशी पटकन निघालो. बाइकवर बसता बसताच ‘काही छानसे क्लिक मिळू दे रे राजा,’ असं त्या नियंत्याला साकडंही घातलं! एव्हाना नऊ वाजायला आले होते. दोन मिनिटांत बाइक पुन्हा रस्त्याच्या कडेला लावली.

इथल्या झाडीच्या पलीकडे काळू नदी वाहते. गांधारी गावाजवळ काळू नदी आणि उल्हास नदीचा संगम आहे. खरं तर या दोन्ही नद्या आता पार नाल्यागत झाल्या आहेत. पावसाळ्यात केव्हातरी त्यांना स्वच्छ पाणी दिसतं. इथे फार तर शे-दीडशेच फूट मी आत शिरलो असेल की हवी तशी गर्द झाडी मला मिळाली. जमिनीपर्यंत पोहोचणाऱ्या लांब अशा पारंब्या वाढलेलं खूप जुनं वडाचं झाड दिसलं. त्याच्या बाजूला उंच गुलमोहराचं, पिंपळाचं आणि आजूबाजूला आंब्याचीही काही झाडं होती. वसंत ऋतूची चाहूल माणसाला सर्वांत आधी लागते ती आपल्या आजूबाजूच्या निसर्गातून! पळस, काटेसावरीसारखी नानाविध फुलं निव्वळ या ऋतूतच फुलतात, बहरतात. मनोलीसारख्या पक्ष्यांचा हा विणीचा हंगाम. या हंगामात मनोली पक्ष्याचा नर लाल रंग धारण करतो. विणीच्या हंगामातील नर आणि मादीची घरटं बांधण्यासाठीची लगबग बघण्यासारखी असते. आंब्याच्या झाडावर याच ऋतूत मोहर फुलू लागतो, पिवळाधम्म बहावा छान तरारून येतो.

गर्द झाडीत शिरताना मी सावध होतो, वडासारखं मोठ्ठं गुलमोहराचं झाड मी पहिल्यांदाच बघत होतो, त्यामुळे आपसूकच त्याच्यावर नजर खिळली. जसजशी नजर वर गेली, बघतो तर काय… एक राखाडी धनेश (ग्रे हॉर्नबिल) तिथे बसलेला होता. झाडीत आणि सावलीत असल्यानं खास असा क्लिक मिळणार नव्हता, पण नोंद घेण्यासाठी तो क्लिक महत्त्वाचा होता. माझ्या कॅमेऱ्यासारखे माझे कानही पोपटांचं, कावळ्याचं ओरडणं आणि मधूनच एखाद्या कोतवालचं भुर्रकन उडून जाणं टिपत होते. कावळे मधेच कोतवालीचं काम करत होते. आपल्या आसपास कुणीतरी आहे, हे आपल्या इतर भावंडांना सूचित करत होते. पक्ष्यांची चहलपहल सुरूच होती. नजर टाकता टाकता मान एकदा खूप वर केली, अगदी माथ्यावरलं बघू लागलो. कॅमेऱ्याच्या ‘व्ह्यू फाइंडर’मधून पुन:पुन्हा पाहिलं. गुलमोहराच्या इवल्या इवल्या पानांवर पडलेल्या सूर्यकिरणांनी अफलातून रंगत आणली होती. एकमेकांवर पडलेली छोट्या छोट्या पानांची सावली, मधेच शुभ्र प्रकाश. खूपच वेगळा असा फोटो मिळाला. एकमेकांना खेटून खेटून उभी असलेली लंबगोल आकाराची निव्वळ पानंच होती ती, पण एका रेषेत! त्या पानांवरला छाया-प्रकाशाचा इतका अद्भुत मेळ क्वचितच कधी टिपायला मिळतो. वेगवेगळ्या अँगलनं धडाधड मी पाच-सहा क्लिक्स घेतले. इतका वेळ फिरल्याचं चीज झाल्यासारखं वाटलं. निसर्गात तुम्हाला अचानक कधी काय मिळून जाईल ते सांगता येत नाही, पण ते खास ‘क्लिक’ ओळखण्याचं कसब आणि कलात्मक भान तुमच्या ठायी असायला हवं!

आजचा दिवस सार्थकी लागल्यासारखं मला वाटू लागलं. त्या मौजीतच चाहूल घेत घेत दुसऱ्या बाजूनं मी बाहेर यायला वळलो. पन्नास-साठ पावलंच चाललो असेन, की वडाचं एक मोठं झाड दिसलं. पक्ष्यांनी अर्धवट खालेल्ली उंबरं खाली पडलेली दिसली. बारकाईनं वर पाहिल्यावर लक्षात आलं, छोटे छोटे पक्षी तिथे इकडून तिकडे उनाडत होते. एवढी सारी पाखरं आपल्या छायेत, आपल्याच अंगा-खांद्यांवर खेळत-बागडत पोट भरताहेत हे बघून ते वडाचं झाड जणू फुशारलं होतं.

त्याचा तो घेर, उंबरांनी डवरलेल्या फांद्या, जमिनीपर्यंत येणाऱ्या सूरपारंब्या आणि हिरव्या पानांचं मिश्कील हसू. बुजुर्गासारखा धिप्पाड वृक्षराज मला मोहवून गेला. बघता बघता तो माझ्यात विलीन होऊ लागला, माझ्यात सामावू लागला. आता मीच वृक्षराज झालो होतो! पाखरं येताहेत-जाताहेत आणि गातही आहेत. कधी कोकिळेची कुहू कुहू, कोकिळाचं उड्या मारत लपंडाव खेळणं, पोपटाची ‘टीईट,टीईट’ साद, खारूताईचं सावध उंडारणं, खोलवरून आलेले तांबटचे आगळे स्वर, बुलबुलची हळुवार शिट्टी, हळद्याची कुजबुजी लकेर… सगळेच आवाज एकमेकांना सुखद आनंद देत होते. कुठेही ओरडणं, ओरबाडणं नव्हतं.

माझा अवघा देह निखळ आनंदाचं लेणं अनुभवत होता. माहीत नाही मला स्वर्ग कसा असेल, कसा आहे ते?… पण पक्ष्यांचे हे मेळे, हे अवीट, मधुर-मदिर असं चैतन्य, अद्भुत सरसर आणि चराचराचं ते निसर्गाशी समर्पण… माझा स्वर्ग मला तिथेच गवसला आणि नेहमी असाच गवसत असतो!

manoharmandwale@gmail.com