मध्यंतरी एका ‘व्हॉट्स अॅप’ ग्रुपवर एक संदेश वाचला. आमच्या एका मैत्रिणीने लिहिलं होतं,‘‘आपल्या सगळ्यांना कळविण्यास अत्यंत आनंद होतो आहे की, आमच्या मुलीला नुकतंच कन्यारत्न प्राप्त झालं आहे. बाळ-बाळंतीण सुखरूप आहेत. आपणा सर्वांच्या शुभेच्छा व आशीर्वाद आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत, परंतु बाळ-बाळंतिणीच्या स्वास्थ्यासाठी आम्ही आपल्याला विनंती करतो की त्यांना भेटण्यासाठी कृपया कुणीही सध्या येऊ नये. आपल्या सगळ्यांना बघण्यासाठी बाळाचा फोटो पाठवीत आहे.’’
या निरोपानंतर आमच्या गटात चांगलीच खळबळ माजली. ‘काय हा माणूसघाणेपणा. साधं बाळाला बघायलासुद्धा येऊन देत नाहीत. माझ्या बाळाला बघायला तर रुग्णालयामध्ये शंभर एक जण येऊन गेले.’ असं मत बऱ्याच जणींचं होतं, तर काही जणींना हा निर्णय योग्य वाटत होता. ‘बाळंतपण’ हासुद्धा आपल्या समाजातला एक सोहळा. नवीन बाळाला बघण्याची सगळ्यांनाच उत्सुकता असते. त्यामुळे प्रसूती झाली की आईला भेटायला आणि बाळाला बघायला अनेक जण येतात. मित्रमंडळी, नातेवाईक येतात, आईपाशी गर्दी करतात आणि बाळालासुद्धा उचलतात. खरं तर प्रसूतीनंतर दमलेल्या आईला गरज असते विश्रांतीची, एकांताची, बाळाबरोबर जुळवून घेण्याची. या काळात आई व बाळ दोघांचीही तब्येत नाजूक असते. त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते. त्यामुळे त्यांना जंतुसंसर्ग होण्याची जास्त शक्यता असते. या काळात आईला मदत करण्यासाठी मोजक्या, जवळच्या लोकांनी तिच्याबरोबर असायला हवं. इतरांनी ही भेट जरा उशिराच घेतली तर चांगलं.
प्रसूतीनंतरचा ४५ दिवसांचा काळ हा अत्यंत महत्त्वाचा कालावधी. गर्भारपणात आईच्या शरीरात झालेले अनेक बदल या काळात पूर्ववत होतात. स्तन्यपान (स्तन्य – आईचे दूध) हा प्रसूतीनंतरचा नैसर्गिक टप्पा. पूर्वीच्या काळात आईने बाळाला स्तन्यपान करणं ही गोष्ट गृहीत धरली जायची. स्तन्यपान ही प्राचीन काळापासून आलेली परंपरा. मात्र पाश्चिमात्य देशात औद्याोगिक क्रांती झाल्यानंतर स्त्रिया मोठ्या प्रमाणात घराबाहेर कामाला जाऊ लागल्या. त्यावेळी त्या खूप वेळ बाळापासून दूर असायच्या. अशा वेळी आईच्या दुधाला पर्याय शोधण्याची गरज निर्माण झाली. १८६५ मध्ये नवजात बालकासाठी दुधाला पर्याय म्हणून पहिला ‘फॉर्म्युला’ बनवला गेला. त्या काळी केल्या गेलेल्या आक्रमक व व्यापक जाहिरातींमुळे हा ‘फॉर्म्युला’ हे बाळासाठी आईच्या दुधापेक्षा सरस व आधुनिक खाद्या समजलं गेलं. पाश्चात्त्य देशात स्तन्यपानाचं प्रमाण खूप कमी झालं. विसाव्या शतकातील शास्त्रीय संशोधनांमुळे स्तन्यपानाचं महत्त्व अधोरेखित झालं व स्तन्यपानास प्रोत्साहन देण्यास सुरुवात झाली. आईचं दूध हे बाळासाठीचं सर्वोत्तम खाद्या. याचा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे बाळाला आईच्या दुधातून रोगप्रतिकारक शक्ती मिळते. यामुळे बाळाला जंतुसंसर्ग होण्याची व बाळ आजारी पडण्याची शक्यता कमी होते. स्तन्यपानामुळे आई व बाळामधील प्रेमाचं बंधन दृढ होतं.
स्तन्यपानाविषयी अनेक समजुती-गैरसमजुती आढळतात. प्रसूतीनंतरचा पहिला सोनेरी तास(Golden Hour) स्तन्यपान सुरू करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. बाळाला भूक लागेल तेव्हा दूध पाजायला हवं (Demand Feed). किमान सहा महिन्यांपर्यंत बाळाला स्तन्यपान करायला हवं. याबाबत काही समस्या असल्यास वैद्याकीय तज्ज्ञ वा सल्लागारांची मदत घ्यावी. शाळेतल्या इतिहासाच्या धड्यातील धाराऊचं नाव आठवतंय? छोट्या संभाजीराजांच्या त्या ‘दूधआई’ होत्या. पूर्वीच्या काळात आजारामुळे, मृत्यूमुळे किंवा इतर काही कारणामुळे एखादी आई जर आपल्या नवजात बाळाला दूध पाजू शकत नसेल तर अशा वेळी दूधआईला बोलावलं जायचं. दूधआई बाळाला आपलं दूध पाजत असे. पाश्चात्त्य देशातील सधन कुटुंबे आईच्या सोयीसाठी दूधआईला (Wet Nurse) कामावर ठेवत. अपुऱ्या दिवसांची, आजारी बाळे ज्यांना त्यांची आई स्वत:चं दूध पाजू शकत नाही अशा बाळांसाठी आधुनिक व शास्त्रीय उपाय म्हणजे ‘मानवी दूध बँक’(Human Milk Bank). मानवी दूध बँकेत, आईचं जास्तीचं दान केलेलं दूध गोळा करून तपासलं जातं. त्यावर ‘पाश्चर’ प्रक्रिया केली जाते व छोट्या, गरजू बाळांना ते दिलं जातं. हे महत्त्वाचं असं समाजकार्य आहे.
अनेकदा गर्भपात झाल्यानंतर अखेर यावेळी श्रद्धाची पूर्ण दिवसांची प्रसूती झाली. बाळ एकदम छान, सुदृढ होतं. गेले नऊ महिने असलेला ताण आता जरा कमी झाला होता. श्रद्धा अतिशय आनंदात होती. बाळंतपणानंतर १५ दिवसांनी मात्र श्रद्धाची आई तिला बळजबरीनेच दवाखान्यात घेऊन आली. घरातले सगळेच जण श्रद्धाच्या वागण्याने त्रस्त झाले होते, काळजीत पडले होते. श्रद्धा सारखी चिडचिड करत होती. नीट खात-पीत नव्हती. स्वत: बाळाची काळजी घेऊ शकत नव्हती, पण इतर कुणालाही बाळाला हातसुद्धा लावून देत नव्हती. अगदी स्वत:च्या आईलादेखील बाळाजवळ येऊ देत नव्हती. ‘‘तुम्ही माझ्या बाळाला माझ्यापासून दूर घेऊन जाल.’’ असं म्हणत रडत होती.
प्रसूतीनंतर काही स्त्रियांना असे शारीरिक व मानसिक त्रास जाणवू शकतात. शारीरिक समस्या लगेच लक्षातही येतात व त्यावर लगेच उपाय केला जातो. मानसिक त्रास मात्र अनेकदा दुर्लक्षित राहतात. सगळं छान झालंय मग आता कशासाठी उगाच चिडचिड करते आहेस? किंवा ‘आम्हाला नव्हता बाई असं रडत बसायला वेळ’ असं म्हणून मानसिक त्रासाला समजूनच घेतलं जात नाही. प्रसूतीनंतर होणाऱ्या मानसिक समस्या ही काही आजकालची गोष्ट नव्हे. इसवी सन पूर्व ७०० मध्ये हिप्पोक्रेटसने या समस्यांविषयीचा उल्लेख केला आहे.
प्रसूतीनंतर साधारण ८० टक्के स्त्रियांना थोडाफार मानसिक त्रास होतो. (Postpartum Blues) रडायला येणं, भीती वाटणं, चिडचिड होणं ही त्याची सर्वसामान्य लक्षणं. संप्रेरकांमधील चढ-उतार, प्रसूतीचे श्रम व बाळाची नीट काळजी घेता येईल ना, याविषयी वाटणारी भीती कारणीभूत असते. ही लक्षणं बहुतेकदा आपोआप कमी होतात. या काळात स्त्रियांना गरज असते मानसिक आधाराची. यापैकी १० टक्के स्त्रियांच्यात हे त्रास तीव्र होतात व त्यांना प्रसूतीनंतर नैराश्याचा त्रास होतो (Postpartum Depression). मानसिक असंतुलन, नैराश्य येणं, खिन्नपणा वाटणं, भूक न लागणं, सारखं झोपून राहाणं ही त्याची लक्षणं. या स्त्रिया स्वत:च्या बाळाची काळजी घेऊ शकत नाहीत. त्यांच्या मनात कधी कधी आत्महत्येसारखे विचारही येऊ शकतात. मानसिक ताणतणाव, अनुवंशिकता व पूर्वीचे मानसिक आजार असणाऱ्या स्त्रियांमध्ये नैराश्याचं प्रमाण अधिक आढळतं. अशा वेळी त्वरित वैद्याकीय सल्ला घ्यायला हवा. समुपदेशन व औषधांच्या मदतीने ही समस्या नियंत्रणाखाली आणता येते.
बाळंत होऊन दहा महिने झाले, तरी माधवीला मासिक पाळी सुरू झाली नव्हती. एक दिवस पोटात हालचाल जाणवायला लागल्याने ती डॉक्टरांकडे गेली. तपासणीमध्ये ती चार महिन्यांची गर्भवती असल्याचं लक्षात आलं. प्रसूतीनंतर मासिक पाळी सुरूच न झाल्याने गर्भ राहिल्याचं तिच्या लक्षातच आलं नव्हतं. बाळंतपणानंतर मासिक पाळी वर्षभरात कधीही सुरू होऊ शकते व सुरुवातीच्या काळात ती अनियमितपणे येऊ शकते. पहिली मासिक पाळी येण्याआधीच गर्भधारणा होऊ शकत असल्याने ती टाळण्यासाठी गर्भनिरोधक वापरणं संयुक्तिक ठरेल. या काळात कंडोम, तांबी, संप्रेरकयुक्त गर्भनिरोधक यांसारखी अनेक प्रकारची संततिनियमनाची साधनं वापरता येतात.
गर्भाशयात ठेवल्या जाणाऱ्या गर्भनिरोधक साधनांचा इतिहास खूप जुना आहे. फार पूर्वी चीनमधील स्त्रिया मूल नको असल्यास गर्भाशयात डाळिंबासारख्या फळांचे दाणे सरकवत. १९०९ मध्ये डॉ. रिचर्ड रिश्टर यांनी रेशमाच्या किड्याच्या आतड्यापासून एक वर्तुळाकार गर्भनिरोधक साधन बनवलं. तेव्हापासून अशी अनेक साधनं संततिनियमनासाठी वापरली गेली. हल्ली प्रचलित असणारं साधन म्हणजे तांबी किंवा कॉपर टी. या साधनातून गर्भाशयात अत्यंत अल्प प्रमाणात तांबं (कॉपर) सोडलं जातं. ज्यामुळे गर्भाशयातील आवरण गर्भधारणेसाठी प्रतिकूल बनतं. तांबीच्या यशाचा दर जवळजवळ ९९ टक्के आहे. मात्र तांबीबद्दल अनेक गैरसमजुती असल्याने फक्त दोन टक्के स्त्रिया गर्भनिरोधनासाठी तांबी वापरतात. भारतातील काही शहरांत दंडात घालायचे ‘प्रोजेस्टेरॉन’युक्त गर्भनिरोधक साधनही (Implanon) उपलब्ध आहे. स्तन्यपान करणाऱ्या स्त्रियांनी गर्भनिरोधक गोळ्या घेण्यापूर्वी मात्र वैद्याकीय सल्ला घ्यायला हवा.
स्त्री व पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया ही कायमस्वरूपी संततिनियमनासाठी केली जाते. पुरुष नसबंदी ही खरं तर स्त्री नसबंदीपेक्षा सोपी व कमी गुंतागुंत असलेली शस्त्रक्रिया. परंतु पुरुष नसबंदीमुळे पौरुषत्व कमी होतं, शरीरसंबंधात अडचणी येतात. यासारख्या गैरसमजुतींमुळे फार कमी पुरुष नसबंदीसाठी तयार होतात. आपल्या देशात संततिनियमनाच्या साधनांपैकी पुरुष नसबंदी प्रमाण अत्यल्प म्हणजे ०.३ टक्के आहे. आपल्या शेजारील भूतान या देशात हे प्रमाण ४० टक्के आहे. पुरुष व स्त्री नसबंदीचा यशदर ९९.८ टक्के असतो.
प्रसूतीनंतरचा काळ जरी अत्यंत महत्त्वाचा असला, तरी अनेकदा दुर्लक्षित राहतो. बाळाची काळजी घेण्यात व दररोजच्या दैनंदिन व्यवहारात स्त्रिया इतक्या व्यग्र होतात की स्वत:च्या तब्येतीकडे नीट लक्षच देत नाहीत. चुकीचा आहार व व्यायामाचा अभाव यामुळे अनेक जणींचे वजन बाळंतपणानंतर खूप वाढते. यामुळे कंबर-पाठदुखीसारखे त्रास त्यांना जाणवतात. श्रोणिचे स्नायू (Pelvic floor muscles) कमकुवत झाल्याने लघवीवरील नियंत्रण कमी होऊ शकते. या काळात स्त्रियांनी स्वत:च्या तब्येतीची नीट काळजी घ्यायला हवी – शारीरिक तंदुरुस्तीसाठी वैद्याकीय सल्ल्याने निरोगी जीवनशैली अंगीकारायला हवी.
आईच्या दुधातून बाळाचे पोषण होत असल्याने चौरस आहार घ्यायला हवा. आहारातील कॅल्शियम व प्रथिनांचं प्रमाण वाढवायला हवं. स्तन्यपान करणाऱ्या स्त्रियांनी दररोज किमान ३ लिटर पाणी प्यायला हवं. तेल, तूप, गोड पदार्थाचे अति सेवन टाळायला हवं. गरोदरपणात शिथिल झालेल्या स्नायूंना बळकटी आणण्यासाठी दररोज व्यायाम करायला हवा. लोह व कॅल्शियमच्या गोळ्या नियमितपणे घ्यायला हव्या. एक आदर्श माता होऊन बाळाची नीट देखभाल करण्यासाठी सर्वप्रथम स्वत: तंदुरुस्त असणं फार महत्त्वाचं आहे.
–डॉ. वैशाली बिनीवाले
Vaishalibiniwale@yahoo.com