सामाजिक बहिष्काराविरोधात २०१६ मध्ये कायदा मंजूर झालेला असतानाही समाजात अशा घटना घडत असतात. सगोत्र विवाह केला म्हणून संतोष आणि धनश्री या जोडप्यावर संपूर्ण गावाने बहिष्कार टाकला. काय असावीत या बहिष्काराच्या मानसिकतेमागची कारणे? हे कसे बदलेल?

सगोत्र विवाह, आंतरजातीय विवाहास जातपंचायती विरोध करतात. आंतरजातीय किंवा सगोत्र विवाह करणाऱ्या जोडप्यांची तर अनेकदा हत्या केली जाते. त्यांच्या कुटुंबाला बहिष्कृत केलं जातं. मुलींनी, स्त्रियांनी मोबाइल फोन न वापरणं, टीव्ही न पाहणं, लग्नाच्या वरातीत सहभागी न होणं, जीन्स न वापरणं, मैदानी खेळ न खेळणं असे आदेश या जातपंचायती काढतात.

सगोत्र विवाह केला म्हणून हरियाणातील मनोज-बबली या जोडप्याची बबलीच्या माहेरच्या लोकांनी हत्या केली. मनोजच्या आई-वडिलांनी प्रकरण मागे घ्यावं म्हणून त्यांच्यावर दबाव आणला. त्यांनी नकार दिल्याने मनोजच्या कुटुंबाला खाप पंचायतीने समाज बहिष्कृत केलं. पुढे या प्रकरणात न्यायालयीन प्रक्रिया सुरू राहिली. या आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली गेली. सर्वोच्च न्यायालयाने फाशीऐवजी जन्मठेपेची शिक्षा दिली आहे.

सगोत्र विवाहावर बंदी घालण्यासाठी ‘हिंदू विवाह कायद्या’त सुधारणा करण्यासाठी संबंधित जातपंचांनी दाखल केलेली याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने २०१० मध्ये फेटाळली. याचिका फेटाळतानाच न्यायालयाचा वेळ घेतला म्हणून याचिकाकर्त्यांना दंडही ठोठावला. केवळ विवाहइच्छुक तरुण-तरुणी एकाच गावातील आहेत, त्यांचं गोत्र समान आहे, म्हणून विवाह अमान्य करणं, त्यांचा जीव घेणं, त्या जोडप्याला बहिष्कृत करणं, त्यांच्या कुटुंबीयांचा छळ करणं असली भयावह प्रकरणं अनेक राज्यांमध्ये घडतात. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी म्हणवल्या जाणाऱ्या राज्यातही घडतात.

सगोत्र विवाह केला म्हणून बहिष्कृत संतोष-धनश्री, त्यांचं कुटुंब व ‘हा तर राक्षसी विवाह,’ असं म्हणत त्यांना छळणारे जातपंच, जातपंचांना बळ देणारे गावकरी असं हे समाज वास्तव. संतोष ८-९ महिने सतत माझ्या संपर्कात होता. फोन, संदेश, पत्रव्यवहार सुरू होता. फोनद्वारे कधी प्रत्यक्ष भेटीत मार्गदर्शन घेत होता. एके दिवशी अगदी सकाळी सात वाजता फोन वाजला. ‘‘ताई, मी संतोष बोलतोय.’’ संतोषने थोडक्यात घटनेचं स्वरूप सांगितलं. ‘‘तुम्ही तातडीने येऊन जा’’, असंही तो म्हणाला. त्यानंतर दोन दिवस सलग संतोषचे फोन सुरू होते. दोन दिवसांनंतर मी संतोषच्या गावी निवाण्याला जाण्यासाठी निघाले.

जिल्ह्याच्या ठिकाणापासून सहा किलोमीटर अंतरावर निवाणे हे छोटंसं गाव. संतोषच्या समाजाची सुमारे शंभर घरं त्या गावात आहेत. संतोषच्या समाजाची लोकं बहुतांशी शेती व्यवसाय करणारी व खाऊन-पिऊन सुखी. शिक्षणाच्या प्रवाहात उतरलेली अनेक मुलं शिक्षण घेऊन नोकरी-व्यवसाय करतात. जातीचं अस्तित्व, शुद्धी टिकवण्याची मानसिकता व पुरुषसत्ताक मनोवृत्तीची यातून समाजावर अनेक बंधनं लादली गेली आहेत. लग्न ठरवणं, मोडणं, अन्य महत्त्वाचे निर्णय जातपंचायतच घेते.

संतोष हा २७ वर्षाचा तरुण. गावात त्याच्याच जातभाईंची घरं, या गल्लीतून त्या गल्लीपर्यंत लाबंच-लांब मोठं घरं. कुटुंबाची ८-१० एकर शेती. कुटुंबाचा उदरनिर्वाह शेतीवरच चालतो. संतोषचं त्याच्याच वस्तीत राहणाऱ्या त्याच्याच जातीच्या धनश्रीसोबत गेली तीन वर्षं प्रेमसंबंध होते. धनश्री चुणचुणीत १२वीपर्यंत शिक्षण झालेली तरुणी. त्या दोघांच्याही घरातून त्यांच्या लग्नास विरोध होता.

संतोषने त्याच्या आई-वडिलांना समजावण्याचा प्रयत्न केला पण त्यांचा नकार कायम होता. धनश्रीच्या आई-वडिलांना सांगण्याचा व परवानगी मिळविण्याचा प्रश्नच नव्हता. ती मुलगी होती. मुलीने निर्णय घ्यायचे नाहीत. मनाप्रमाणे वागायचं नाही. आई-वडील सांगतील त्याप्रमाणे दिल्या घरी सुखी राहायचं. अशी मानसिकता असलेले धनश्रीचे आई-वडील. आपली मुलगी घराजवळच राहणाऱ्या तरुणावर प्रेम करते, त्याच्याशी लग्न करू इच्छिते, समजल्यावर आगडोंब उसळेल असं तिला वाटत होतं.

धनश्रीच्या आई-वडिलांना कुठून कोणास ठाऊक तिच्या प्रेमसंबंधाची कुणकुण लागली. त्यांनी तिला मारहाण केली, धाक दाखवला. धनश्री जुमानत नाही असं लक्षात आल्यावर तिला बंदिस्त केलं गेलं. तिचं घराबाहेर पडणं बंद केलं. घरचे लोक सतत तिच्यावर नजर ठेवून होते. प्रेमी अशा बंधनांना थोडीच जुमानतात? धनश्री व संतोष घरातून पळून गेले. आळंदीला (जि.पुणे) जाऊन हिंदू-विवाह पद्धतीने त्यांनी लग्न केलं. लग्न करून दोघंही पुन्हा गावी परत आले.

दोघांनीही गावात येताच पोलीस ठाणं गाठलं. तिथं ‘विवाह प्रमाणपत्र’ दाखवून घरच्या विरोधाबाबत सांगितलं. पोलीस निरीक्षकांनी चांगली भूमिका निभावली. त्यांनी धनश्री व संतोषच्या कुटुंबीयांना व गावातल्या काही प्रतिष्ठितांना पोलीस ठाण्यामध्ये बोलावलं. त्यांना धनश्री व संतोषच्या विवाहाबाबत त्यांनी घेतलेला निर्णय, कायदा याबाबत समजावून सांगितलं. धनश्री आणि संतोष या जोडप्यास त्रास होईल असं वागू नका, अशा सूचनाही दिल्या. त्यानंतर संतोष धनश्रीला घेऊन स्वत:च्या घरी आला. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या लग्नाचा स्वीकार केला.

धनश्रीच्या माहेरचे लोक मात्र डूख धरून होते. दोघांचेही जातभाई दुखावले होते. जातपंच अपमानित (?) झाले होते. धनश्री आणि संतोषनं विनासंमती, जातपंचांचा मान-पान, रितीरिवाज न पाळता लग्न केलं होतं. त्यांचं लग्न जातपंचांनाही मान्य नव्हतं. जातपंचांनी धनश्रीच्या आई-वडिलांना चिथावणी दिली. ‘‘तुमच्या मुलीला संतोषनं पळवलं. हा सगोत्र विवाह म्हणजे राक्षसी विवाह आहे. हा विवाह आपल्या संस्कृतीला मान्य नाही. ही राक्षसी वृत्ती आहे.’’असं सांगितलं.

संपूर्ण समाज नवीन जोडपं आणि संतोषच्या कुटुंबीयांच्या विरोधात गेला. जातपंचायतीचे पंच आक्रमक झाले. जातपंचांनी दुसऱ्याच दिवशी जातपंचायत भरवली. संतोषच्या कुटुंबावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. संपूर्ण कुटुंबाला आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम, लग्न, अंत्यसंस्कार यासाठी समाजाने बोलावू नये किंवा त्यांच्याकडे जाऊ नये, असा लेखी ठराव घेण्यात आला. संपूर्ण गावाला संतोषच्या कुटुंबाविरोधात भडकवण्यात आलं.

‘समाजातून बहिष्कृत केल्याबद्दल व गावातून या निर्णयास समर्थन मिळालं म्हणून गावकऱ्यांचे धन्यवाद, योग्य निर्णय’’ असा संदेश समाज माध्यमावर टाकण्यात आला. गावाने संतोषच्या कुटुंबीयांशी संपर्क तोडला. बोलणं बंद केलं, संतोषच्या शेतात कुणीही कामाला जायचं नाही असं फर्मान निघालं. संतोषचे कुटुंबीय गल्लीतील रस्त्यानं गेल्यास जातभाई पाणी टाकून रस्ता स्वच्छ करत. त्याच्या कुटुंबीयांना गावातील चावडीवर येण्यास बंदी घातली. मंदिर प्रवेश नाकारण्यात आला. धार्मिक उत्सवात सहभाग नाही. यामध्ये दीड महिन्याचा कालावधी गेला. धनश्री व संतोष ग्रामपंचायत कार्यालयात ‘विवाह नोंदणी’ संबंधाने चौकशीसाठी गेले असता जातबांधवांनी त्यांना बेदम मारहाण केली. संतोषच्या कुटुंबावर वारंवार हल्ले होऊ लागले.

संतोषनं फोनवर मला याबाबत सांगितलं. मी तातडीनं पोलीस ठाण्याला तक्रार नोंदवण्यास सांगितलं. संतोषनं तक्रार नोंदवली. मी स्वत: पोलीस अधिकाऱ्यांशी फोनवर बोलले, पण हल्ले काही थांबले नाहीत. संतोष व त्याचं कुटुंबीय फोनवरून सतत माझ्या संपर्कात होते. मध्ये बराच काळ गेल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांवर मोठा हल्ला झाला. त्यानं मला या घटनेबाबत कळवल्यावर परिस्थितीचं गांभीर्य लक्षात येऊन मी निवाणे गाव गाठलं. सोबत सहकारी अशोक गवांदे होते. फोनवर संतोषच्या घराच्या परिसरात पोहोचलो. वेळ सायंकाळी पाच वाजताची होती.

संतोषचं घर असलेल्या गल्लीत स्मशान शांतता होती. आमची रिक्षा तिथे थांबल्यावर कोणी दरवाजा किलकिला करून तर कोणी खिडकीच्या फटीतून आमच्याकडे पाहात होतं. आम्ही संतोषच्या घरी पोहोचलो. दरवाजा वाजवला. बराच वेळ कोणी दरवाजा उघडलाच नाही. एक तरुण लाकडी दरवाजाच्या फटीतून आमच्याकडे बघत असल्याची हालचाल जाणवली. त्यानं आतूनच, ‘‘कोण आहे?’’ असं विचारून खात्री करून मगच दरवाजा उघडला. आम्ही आत जाताच दरवाजा बंद केला.

संतोष-धनश्री आणि त्यांचं सर्व कुटुंबीय तिथं आले. त्यांच्या व्यथा त्यांनी मांडल्या. ‘‘खूप मोठ्या काळानंतर असं कुणीतरी आमच्या घरी आलं आहे. आम्हाला घराबाहेर पडणं मुश्कील झालं आहे. आमच्यावर वारंवार हल्ले होतात. आम्हाला कुणी लग्न-कार्य, अंत्यसंस्काराला येऊ देत नाहीत. आमच्याशी कोणी बोलत नाही. आम्ही घराबाहेर पडलो तर स्त्री-पुरुष आम्हाला वाईट बोलतात, टोमणे मारतात. कुणी आम्हाला पाहून घराचे दरवाजे आपटतात. आमच्या शेतात कोणाला कामाला येऊ देत नाहीत. सर्व बाजूने आमची कोंडी झाली आहे. कालचा हल्ला, तर जीवघेणा होता. २५-३० लोक आमच्या घरावर चाल करून आले. आम्ही लपून बसलो म्हणून वाचलो.

ते म्हणतात,‘आम्ही संतोष-धनश्रीला जिवंत ठेवणार नाही. सगोत्र विवाह हा समाजाला बट्टा आहे.’काय करावं? ’’ तासभर संतोषच्या कुटुंबीयांशी चर्चा केल्यानंतर आम्ही पोलीस ठाण्यात गेलो. तिथं संबंधितांशी चर्चा केली. आरोपी, संतोषच्या कुटुंबावर वारंवार हल्ले करतात. दोन दिवसांपूर्वी झालेल्या जीवघेण्या हल्ल्याबाबत फिर्याद दिली. पीडितांना संरक्षण देण्याबाबत चर्चा केली. संतोषच्या प्रकरणामध्ये पोलिसांनी सामाजिक बहिष्काराच्या संबंधाने कलम लावलं नव्हतं ते लावावं म्हणूनही लेखी अर्ज दिला.

त्यानंतर मी पोलिसांशी फोनवर सतत संपर्कात होते. पोलिसांनी सामाजिक बहिष्कारविरोधी कायद्याचं कलम लावण्यासंबंधाने पुरावे जमा केले. संतोषचा पुरवणी जबाब घेतला. संतोषच्या कुटुंबाला संरक्षणही दिलं, परंतु जोपर्यंत जातबांधवांच्या मनातील बहिष्काराची भावना हटत नाही, संकुचित वृत्ती दूर होत नाही, पोकळ ताठा, मान-अपमान, अनिष्ठ रूढी, प्रथा-परंपरा हद्दपार होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने संतोषच्या कुटुंबाला न्याय मिळाला असं म्हणता येणार नाही. यासाठी सातत्याने संवाद व प्रबोधनाची गरज आहे. परग्रहावर वस्ती करण्याचं स्वप्न पाहणारा माणूस, संगणक, दूरध्वनी वापरत कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग करत संपूर्ण जग कवेत घेऊ इच्छिणारा माणूस जात, धर्म, पंथ, पावित्र्याच्या कल्पना याबाबत एवढ्या कोत्या मनाचा कसा काय? दुसऱ्याचं व्यक्तिस्वातंत्र्य, जोडीदार निवडीचं स्वातंत्र्य हिसकावण्याच्या प्रयत्नात सामाजिक बहिष्कारासारखी क्रूर शिक्षा का दिली जावी?

गेले चार महिने कोकणातील आणखी एक कुटुंब सामाजिक बहिष्कार टाकला म्हणून माझ्या संपर्कात आहे. योग्य ती कार्यवाही सुरू आहे. मागच्या पंधरवड्यात न्यायालयात दाद मागणाऱ्या कुटुंबावर जातपंच व गावकीने सामाजिक बहिष्कार टाकल्याची बातमी दैनिक ‘लोकसत्ता’मध्ये वाचली. या कुटुंबाशी संबंध ठेवण्यास इतर ग्रामस्थांना मज्जाव केला. संबंध ठेवल्यास तीन हजार रुपये दंड करण्याचा ठरावही घेतला या संबंधाने पंच व अन्य तेवीस लोकांविरोधात गुन्हा दाखल झाला.

सामाजिक बहिष्काराविरोधात २०१६ मध्ये ‘महाराष्ट्र सामाजिक बहिष्कार प्रतिबंध निवारण कायदा’ झाला. ‘अंनिस’चं प्रबोधनाचं कामही सुरू आहे. परंतु समाज बदल खूप धिम्या गतीने होतो, होत असतो. कायद्याचीही भीती नसलेली ही खोलवर रुजलेली बहिष्काराची मानसिकता नष्ट होण्यासाठी समाज म्हणून, व्यक्ती म्हणून आपण काय करू शकतो? काय करायला हवं?

(सदर लेखातील व्यक्तींची नावे आणि स्थळ बदलले आहे.)