दीपक बाविस्कर
टर्नर, वायरमन, फिटर, इलेक्ट्रिशियन, वेल्डर, मोटार मॅकनिक, यंत्र दुरुस्ती करणारा कोण तर पुरुष, हे गृहीतक विसरायला लावणारी व्यावसायिक कामे आता तरुणी करायला लागल्या आहेत. म्हणूनच हे काम शिकवणाऱ्या स्त्रियांसाठी स्वतंत्र १६ ‘शासकीय औद्याोगिक प्रशिक्षण संस्था’ महाराष्ट्रात स्थापन झाल्या आहेत.

अनेक जणी ते काम अधिक अचूकतेने, परिणामकारकतेने, अत्यंत बारकाईने पार पाडत असल्याने मोठमोठ्या आस्थापनांही त्यांना प्राधान्य देत आहेत. मुलींमधील बदलत्या व्यावसायिक अभिरुचीची माहिती देणारा नाशिक औद्याोगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य दीपक बाविस्कर यांचा लेख…

नीता सिद्धार्थ माळी, अतिशय साधारण कुटुंबातली मुलगी, नाशिक येथील ‘शासकीय औद्याोगिक प्रशिक्षण संस्थे(महिला) तून ‘इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक’चे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर ‘कॅम्पस मुलाखती’च्या माध्यमातून ‘ऋषभ इन्स्ट्रुमेंट प्रायव्हेट लिमिटेड’ या औद्याोगिक आस्थापनेत शिकाऊ उमेदवार म्हणून रुजू झाली. तिथे तिने इतके कौशल्य मिळवले की पुढे ‘नॅश रोबोटिक्स’ या कंपनीत ‘तंत्रज्ञ’ म्हणून रुजू झाली. आज ती तेथील स्त्रियांच्या उत्पादन विभागाची प्रमुख म्हणून कार्यरत आहे.

जिजाबाई गवळी, दोन वर्षांचा ‘इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक’चा अभ्यासक्रम पूर्ण करून आज ती नाशिकच्या ‘गोगटे इलेक्ट्रो सिस्टीम्स प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीत ‘उत्पादन प्रमुख’ म्हणून काम करत आहे. दीपाली कुलकर्णी हिने आपले प्रशिक्षण पूर्ण केले. सातपूर येथील औद्याोगिक वसाहतीत छोटा कारखाना उभा केला आहे. यंत्र कारागिरीचा दोन वर्षं मुदतीचा अभ्यासक्रम पूर्ण करून आम्रपाली सपकाळे आज भुसावळ येथील रेल्वे दुरुस्ती विभागामध्ये ‘तंत्रज्ञ’ या पदावर काम करते आहे.

तर ‘इलेक्ट्रिशियन’अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर हेमलता गिरणारे पुणे येथे यंत्र चालक (ऑपरेटर) या पदावर रुजू झाली आहे. प्रणाली सातपुते, ‘ड्राफ्ट्समन मेकॅनिक’ या व्यवसायातील प्रशिक्षणार्थी, आज ‘डिझाईन डिपार्टमेंट’मध्ये संशोधन आणि विकास विभागात काम करत आहे.

यासारखी असंख्य उदाहरणं हेच दर्शवतात की, मुली-तरुणीही पारंपरिक शिक्षणात अडकून न राहता आता औद्याोगिक कौशल्य आत्मसात करून औद्याोगिक क्षेत्रातदेखील पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करीत आहेत. किंबहुना त्या या क्षेत्रातदेखील स्वत:चा ठसा उमटवत आहेत. मुलींना नैसर्गिकरीत्या कला आणि कौशल्यांची विशेष आवड असते. खरे तर त्यांच्यामध्ये या गुणांचे प्राबल्य अधिक असते असे मानले जाते त्यामुळे शिवणकाम, फॅशन डिझायनिंग, सौंदर्य प्रसाधनांसंबंधीचे व्यवसाय अशा क्षेत्रांमध्ये त्यांना अधिक संधी उपलब्ध होतात.

मात्र बदलत्या काळानुसार आता मुली या क्षेत्रापलीकडे विविध कौशल्य आत्मसात करून त्यात प्रावीण्य मिळवत उद्याोगाचा मार्ग चोखाळत आहेत. त्यासाठी त्यांना मार्गदर्शक ठरत आहे ते ‘शासकीय औद्याोगिक प्रशिक्षण संस्था (महिला)‘आयटीआय’. महाराष्ट्र शासनाच्या केवळ स्त्रियांसाठी राज्यात १६ ठिकाणी या संस्था कार्यरत असून हजारो तरुणी दरवर्षी येथून प्रशिक्षित होत आहेत.

आधुनिक होत चाललेल्या औद्याोगिक क्षेत्राचा विचार केला तर माहिती-तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्ससारख्या व्यवसायांमध्येही स्त्रियांसाठी उत्तम संधी निर्माण होत आहेत. इलेक्ट्रॉनिक्स व संगणक क्षेत्रातील पीसीबीचे ( प्रिंटेड सर्किट बोर्ड) काम अत्यंत बारकाईने व कौशल्यपूर्वक करावे लागते, आणि हे काम स्त्रिया अधिक अचूकतेने व परिणामकारकतेने पार पाडू शकतात असा अनुभव आहे. त्यामुळे या क्षेत्रातील कंपन्या स्त्री उमेदवारांना अधिक प्राधान्य देत आहेत. काही कंपन्या तर ‘इलेक्ट्रॉनिक्स’ या अभ्यासक्रमाच्या पूर्णच्या पूर्ण तुकड्या थेट ‘कॅम्पस मुलाखती’द्वारे त्यांच्याकडे रुजू करून घेत आहेत.

स्त्रियांचा कल सध्या यंत्र दुरुस्ती, वाहन दुरुस्ती, जोडारी (फिटर), इलेक्ट्रिशियन, वेल्डर, टर्नर, वायरमन, वातानुकूलीकरण यासारख्या व्यवसायांमध्येदेखील मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. अलीकडच्या काळात मुली मोठमोठ्या कंपन्यांच्या उत्पादन विभागात (शॉप फ्लोअर) काम करताना दिसत आहेत. पूर्वी जेव्हा विद्यार्थिनी ‘आयटीआय’मधून प्रशिक्षण पूर्ण करून बाहेर पडत असत, तेव्हा औद्याोगिक आस्थापनांशी संपर्क साधल्यावर त्यांना तेथे घेण्यास त्या कंपन्या तयार नसत, कारण तेथे पुरुष वर्गाचे वर्चस्व असायचे, आणि मुख्य म्हणजे स्त्रियांसाठी वेगळ्या प्रसाधनगृहांची सुविधा नसायची. परंतु आज परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. त्याच कंपन्या आता मुलींना संधी देण्यासाठी उत्सुक असून त्यांच्यासाठी पायघड्या घालत आहेत.

आज आमच्या संस्थेतील शिकाऊ उमेदवारी (अप्रेंटिसशिप) करणारी मुलगी ‘महिंद्रा अँड महिंद्रा’, ‘टाटा’सारख्या औद्याोगिक आस्थापनांमध्ये उत्पादन विभागात रंगकाम (पेंटिंग) करत आहे. तसेच ‘फिटर’, ‘मोटार कारागिरी’ यासारख्या अभ्यासक्रमाच्या प्रशिक्षणार्र्थींनी यंत्रांच्या जोडणीचे कामही करताना दिसून येत आहेत. जेव्हा आम्हाला, मुलींना एका महिन्याच्या ‘ओजेटी’साठी (ऑन द जॉब ट्रेनिंग) कंपन्यांमध्ये पाठवावे लागते, तेव्हा त्या कंपन्यांमध्ये स्त्रियांसाठी आवश्यक सुविधा आहेत का, सुरक्षिततेचे नियम पाळले जातात का?, स्त्रियांना तिथे सामाजिकदृष्ट्या सुरक्षित वातावरण आहे का? याची आम्ही विशेष दक्षता घेतो. याही पुढे जाऊन सांगायचे झाले, तर आज औद्याोगिक क्षेत्रातील अनेक कंपन्या स्त्रियांच्या सुरक्षिततेसह, स्वच्छतेच्या बाबतीतही अत्यंत जागरूक झाल्या आहेत.

आज महाराष्ट्रातील प्रत्येक ‘औद्याोगिक प्रशिक्षण संस्थे’ने साधारणत: परिसरातील २५ औद्याोगिक आस्थापनांसमवेत सामंजस्य करार केलेला असून स्त्री प्रशिक्षणार्र्थींनी परिसरातील आपल्या व्यवसायाशी संबंधित असणाऱ्या औद्याोगिक आस्थापनात जाऊन एक महिन्याचे ‘ऑन द जॉब ट्रेनिंग’ पूर्ण करत आहेत. त्यामुळे औद्याोगिक वातावरणाशी जुळवून घेणे त्यांना शक्य होत असून त्यामुळे अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर त्या त्या औद्याोगिक आस्थापना त्यांना नोकरीसाठी प्राधान्य देत आहेत. ‘ड्युअल सिस्टीम ऑफ ट्रेनिंग’च्या (डीएसटी) माध्यमातून ‘औद्याोगिक प्रशिक्षण संस्थे’मध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या स्त्री उमेदवारांना तीन ते सहा महिन्यांचे प्रशिक्षण हे सामंजस्य करार करण्यात आलेल्या औद्याोगिक आस्थापनांतून दिले जात आहे.

‘शासकीय औद्याोगिक प्रशिक्षण संस्था (महिला) नाशिक’ येथील प्रशिक्षणार्र्थींनी याच योजनेअंतर्गत ‘हिंदुस्तान एरोनॉटिक्स प्रायव्हेट लिमिटेड’ यासारख्या केंद्र सरकारच्या ‘महारत्न’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सार्वजनिक उपक्रमातून प्रशिक्षण घेत आहेत.

आज विविध औद्याोगिक संस्थेतर्फे ‘कॅम्पस’ मुलाखतीद्वारे ‘औद्याोगिक प्रशिक्षण संस्थे’तील प्रशिक्षणार्र्थींची अंतिम परीक्षा होण्यापूर्वीच निवड केली जात असल्याचेही अनुभवास आले आहे. साधारणत: अभियांत्रिकी आणि बिगर अभियांत्रिकी व्यवसायातील अशा ‘कॅम्पस मुलाखतीं’चे प्रमाण जवळपास ८० टक्क्यांच्या पुढे आहे. ‘गोदरेज’, ‘टीडीके’ यांसारख्या नामांकित कंपन्या जेव्हा आमच्या संस्थेला भेट देतात आणि ‘स्त्रियांसाठी स्वतंत्र उत्पादन साखळी निर्माण करायची आहे,’ असे सांगतात, तेव्हा हे स्पष्टपणे जाणवते की, स्त्रियांनी त्यांच्या कौशल्याच्या बळावर या क्षेत्रात आपले अस्तित्व ठामपणे निर्माण केले आहे.

म्हणूनच केवळ प्रशिक्षण देऊन ‘औद्याोगिक प्रशिक्षण संस्थां’चे काम संपत नाही तर ज्या मुलींना स्वत:चे व्यवसाय उभे करायचे आहेत, त्यांच्यासाठी विविध बँका, शासकीय आस्थापना, शासकीय योजनांची माहिती देणे, त्यासाठी मार्गदर्शन प्रकल्प अहवाल तयार करण्यातही संस्था पुढाकार घेत आहे. ज्यामुळे स्त्रियांना स्वत:च्या पायावर उभे राहणे शक्य होते आहे.

राज्यात सद्या:स्थितीत एकूण ४१९ ‘शासकीय औद्याोगिक प्रशिक्षण संस्था’ (आयटीआय)आहेत. यामध्ये ८३ प्रकारच्या व्यवसाय अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण दिले जाते. दरवर्षी एक लाखाहून अधिक उमेदवारांना प्रशिक्षण दिले जात आहे. यापैकी ३० टक्के जागा या स्त्रियांकरिता राखीव आहेत. या सर्व व्यवसायांमध्ये स्त्री उमेदवार प्रवेश घेऊ शकतात तसेच राज्यात स्त्रियांकरिता स्वतंत्ररीत्या १५ ‘शासकीय औद्याोगिक प्रशिक्षण संस्था’ असून यातून विविध २४ व्यवसायांतून सुमारे ४ हजारांहून अधिक स्त्री उमेदवारांना प्रशिक्षण दिले जात आहे.

अहिल्यानगर (पूर्वीचे अहमदनगर) येथील सोळाव्या ‘महिला औद्याोगिक प्रशिक्षण संस्थे’ला राज्य शासनातर्फे नुकतीच मान्यता देण्यात आलेली आहे. मागील पाच वर्षांचा विचार करता त्यातील ४१९ औद्याोगिक प्रशिक्षण संस्थांमधून सुमारे १६ हजारांहून अधिक प्रशिक्षणार्थी प्रशिक्षित झाल्या असून विविध क्षेत्रांमध्ये आपला ठसा उमटवत आहेत.

यात उल्लेख करण्यासारखी सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ‘शासकीय औद्याोगिक प्रशिक्षण संस्थे’तून प्रशिक्षण पूर्ण करण्याकरिता स्त्रियांना वयाची अट नाही. त्यामुळे १४ वर्षे पूर्ण करणाऱ्या (दहावी उत्तीर्ण) मुलीपासून कितीही वयाच्या स्त्रीला या अभ्यासक्रमांना प्रवेश घेता येतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे, नाशिक येथील आमच्या संस्थेत गेल्या वर्षी आरती मोरे या तरुणीने ‘पेंटर (जनरल)’ या व्यवसाय अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेतला, तर तिच्यासमवेत तिची आई योगिता मोरे यांनी ‘ड्रेस मेकिंग’वा ‘कपडे शिवणे’ या अभ्यासक्रमासाठी. आई व मुलगी एकाच वेळी एकाच संस्थेत प्रशिक्षण घेत आहेत. मागील वर्षी याच संस्थेतून ५६ वर्षीय नूतन हेबडे यांनी ‘कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट’ हा अभ्यासक्रम पूर्ण केला.

आज ‘औद्याोगिक प्रशिक्षण संस्थां’मध्ये केवळ तांत्रिक कौशल्यांचेच प्रशिक्षण दिले जाते, असे नाही. विद्यार्थिनींना व्यक्तिमत्त्व विकास, संवाद कौशल्य Communication Skills), मुलाखतीचे तंत्र यांसारख्या व्यक्तिमत्त्व वा स्वभाव कौशल्ये (सॉफ्ट स्किल्स) यांचेही प्रशिक्षण दिले जाते. स्त्रियांना आत्मनिर्भर करण्याच्या उद्देशाने स्वयं संरक्षणाचे धडेदेखील दिले जात आहेत तसेच या सर्वच संस्थांमधून ‘राष्ट्रीय सेवा योजना’ राबवली जात असून सामाजिक सेवेची आवड असणाऱ्या विद्यार्थिनी त्यात सहभाग घेतात.

यासारख्या अभ्यासक्रमांमुळे नेहमीच्या शैक्षणिक वाटेपेक्षा वेगळ्या वाटेवर जाऊन स्वत:मधल्या कौशल्यांची ओळख होऊन त्यात नैपुण्य मिळवण्यासाठी अनेकींना त्याचा उपयोग होतो आहेच, परंतु स्वत:च्या पायावर उभे राहण्याबरोबरच इतरांनाही त्यांच्या पायावर उभे राहायला मदत करता येते आहे.

अनेक तरुणींनी तयार केलेली व्यवसायाची ही पायवाट अनेकांसाठी आता महामार्ग होऊ लागला आहे, याचा संस्था म्हणून आम्हाला आनंदच आहे.

(लेखक ‘संत मीराबाई शासकीय औद्याोगिक प्रशिक्षण संस्था (महिला), नाशिक’ येथे प्राचार्य आहेत.)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

deepakbaviskar73 @gmail.com