विद्या नाडगौडा
त्या रस्त्यावरच्या कचरा गोळा करणाऱ्या काही जणी, काळाच्या ओघात घट्ट मैत्रिणी झाल्या. अचानक एके दिवशी ‘हे’ वारले. त्या सगळ्या येऊन भेटून गेल्या. दहाव्याच्या दिवशीही आल्या. त्यांचे आगमन घरातल्या कोणाला फारसे आवडले नाही, पण मला मात्र त्यांच्या भेटीने आनंद झाला. थोडय़ा वेळाने त्यातल्या एकीने माझ्यापुढे एक पातळ आणि त्यावर एक कापड ठेवले. किंमत पाहिली तर तीनशे रुपये. मला राहावले नाही. विचारले,
‘एवढे पैसे कोठून आले?’
भरजरी गं पितांबर दिला फाडुनी, द्रौपदीशी बंधु शोभे नारायण..
माझी धाकटी बहीण पुष्पा गाणे म्हणत होती आणि मी आठवणींच्या राज्यात गेले. बहिणीला म्हटले, ‘‘अगं, तुला त्या द्रौपदीच्या भरजरी पितांबराचं आणि त्याच्या चिंधीचं कौतुक, पण मला अशा अनेक जणी माहीत आहेत, ज्यांना भरजरी पितांबर कसा असतो तेही माहीत नाही, उलट दोन फाटक्या विजोड कापडाचे तुकडे हाताने शिवून त्याचं पातळ नेसावं लागतं त्यांना. अशा अनेक जणी मी पाहिल्या आहेत नव्हे त्याचं प्रेमही अनुभवलं आहे.
बहिणीला उत्सुकता वाटली. ती म्हणाली, ‘‘सांग की कोण त्या अनेक जणी?’’
मी सांगायला सुरुवात केली, ‘‘खूप दिवसांपूर्वीची गोष्ट आहे ही. आम्ही दोघे रोज सकाळी फिरायला जात असू. थोडे चालल्यावर दमल्यासारखं वाटलं की मी वाटेतच जागा दिसेल तिथे बसत असे. हे पुढे जात. रस्त्यात केर काढणाऱ्या आणि केर भरून टाकणाऱ्या स्त्रिया मला दिसत. हळूहळू आमची ओळख झाली. मग बोलता बोलता त्यांना विचारले, ‘घरून चहा वगैरे घेऊन येता की, नाही?’ त्यावर त्यांचे, नाही हे उत्तर ऐकल्यानंतर मी त्यांना चहा विकत घेऊन देऊ लागले. कधी कधी त्याही मला चहा देऊ लागल्या. आता आमच्या मैत्रीचा दुवा घट्ट होत होता. एखादी आली नाही तर लगेच मी विचारी, ‘अगं ती बडबडी मैत्रीण का आली नाही?’ तर त्या सांगत, ‘काल नवऱ्याने दारू पिऊन बडवली तिला. आज तिला उठवत नाही.’ हे ऐकून मला फार वाईट वाटे, पण करणार काय? अशा रोज काही कथा त्यांच्या संसारात ऐकायला मिळत असत.
काळाच्या ओघात आम्ही अगदी घट्ट मैत्रिणी झालो होतो. मनातल्या सुख–दु:खाच्या भागीदार होतो. पण अकल्पित घटना घडली. हे आजारी पडले. घर ते दवाखाना फेऱ्या होऊ लागल्या. फिरणे बंद पडले. दवाखान्यातच त्यांचा अंत झाला. त्या सगळ्या येऊन भेटून गेल्या. पुन्हा दहाव्या दिवशी सगळ्या आल्या. घरात दहाव्याचे विधी सुरू होते. त्यांचे आगमन फारसे कोणाला आवडले नाही, पण मला मात्र त्यांच्या भेटीने आनंद झाला. अगदी जवळचे माणूस आल्यावर जसा आनंद होतो तसाच मला झाला होता.
थोडय़ा वेळाने त्यातल्या एका जणीने माझ्यापुढे एक पातळ आणि त्यावर एक कापड ठेवले. लगेच पातळावरची किंमत पाहिली तर २५० रुपये आणि कापड ५० म्हणजे तीनशे झाले. मला राहावले नाही म्हणून विचारले, ‘एवढे पैसे कोठून आले.’
त्यांनी सांगितले, ‘रोज आपण चहा घेत होतो तो बंद केला आणि त्या दहा दिवसातल्या पैशांत प्रत्येकीच्या पगारातले पैसे घेऊन भर घातली.’ हे ऐकून माझे अश्रू आवरेनात. सगळे नातेवाईक आश्चर्याने बघतच राहिले. आज या गोष्टीला १०–१२ वर्षे झाली, तो प्रसंगही नजरेआड झाला. मी ते पातळ सतत नेसूनही फाडले, पण त्याचा एक तुकडा तिजोरीत ठेवलाय. तिजोरी उघडली की दोन आसू त्या तुकडय़ावर, त्या चिंधीवर पडतातच. आता तूच सांग, तुझ्या द्रौपदीच्या चिंधीपेक्षा ही चिंधी कमी आहे का? याच्या सुतासुतावरच्या प्रेमाने अजूनही माझे मन गहिरवते. डोळे भरून येतात आणि नकळत दोन टिपे पडतात. आणि हात जोडून त्यांच्या सुखाची मागणी केली जाते.’’
माझी गोष्ट संपली होती, पण पुष्पाचे डोळे पाणावले होते.
chaturang@expressindia.com