गतिमंद मयूराच्या आई-बाबांनी बब्याची माफी मागितली आणि काही दिवसांसाठी ते बाहेरगावी निघून गेले. परतल्यावर मयूरा खिडकीच्या फटीतूनच बाहेरचं जग न्याहाळायची. तिचे आईबाबा आता दरवाजा कायम बंद ठेवू लागले. मयूराची गंजलेली खुर्ची मुलांनी आता क्रिकेट खेळताना स्टंप म्हणून वापरायला काढली आहे. सभोवतालचं जग त्या खुर्चीवर बसून न्याहाळताना मयूराच्या भावनांची कासवाच्या गतीने का होईना; जी जडणघडण झाली त्याचा सभोवतालच्या जागरूकतेअभावी आणि इच्छाशक्तीअभावी रोज ‘क्लीन बोल्ड’ होतो आहे. पण इतरांचा खेळ सुरूच राहतो.. आणि एक धबधबा त्यातच आटून जातो..

घोडय़ाच्या वेगानं धावणाऱ्या सभोवतालच्या जगाचं आकलन, तिला मात्र कासवाच्या गतीनं होत होतं. शून्यात अडकलेली ती.. शून्याचं वलय भेदून असीम जगात जेव्हा ती डोकावते, तेव्हा तिच्या निरागस चेहऱ्यावर असंख्य भाव गर्दी करतात. बघता बघता ही भावनांची गर्दी कधी कमी होते, हे तिलाही कळत नाही. पुन्हा त्या शून्याच्या वलयात ती स्थितप्रज्ञ होते.. तेरा वर्षांची, गोल चेहऱ्याची, गुबगुबीत, जाड भुवयांची, बसक्या नाकाची आणि टपोऱ्या डोळ्यांची मयूरा जेव्हा हसते, तेव्हा ते हसू उंचावरून कोसळणाऱ्या पांढऱ्याशुभ्र धबधब्यासारखे उत्साही वाटते; पण वास्तवात तो आहे आटलेला धबधबा, एका अत्यंत एकलकोंडय़ा कुटुंबातला.

Shukra Gochar in Mesh
२४ तासांनी ‘या’ ६ राशींच्या नशिबाला मिळेल श्रीमंतीची कलाटणी? शुक्रदेवाच्या कृपेमुळे व्यापारात होऊ शकतो मोठा फायदा
demolishing building , citizens, Nandivali, dombivli, trouble of dust
Video : डोंबिवलीत नांदिवलीत रहिवासी, प्रवासी धुळीच्या लोटांनी हैराण; पुनर्विकासासाठी इमारत तोडताना नियम धाब्यावर
Ram Divya ABhishek
Ram Navami : प्रभू रामाच्या मूर्तीवर दुग्धाभिषेक! अयोध्येतल्या मंदिरातील रामलल्लाचं मूळ रुप दर्शन
Daighar Garbage, Daighar, Thane,
ठाणे : डायघर कचरा प्रश्न पेटणार, मतदानावर बहिष्कार घालण्याची तयारी

फिरोज चाळीत, रस्त्याला लागून मयूराच्या कुटुंबाची पहिली खोली. मयूरा बराचसा वेळ दरवाजात, पत्र्याच्या गंजलेल्या खुर्चीवर पाय मोकळे सोडून रस्त्यावरची रहदारी न्याहाळत असायची. तिच्या मागेच मयूराच्या आईचा कामाचा पसारा. ती बाहेरून आणलेली लहानसहान कामं करण्यात दिवस घालवायची. शेजारील लोखंडी पलंगाचा एक पाय गंजून कमी झालेला. पलंग कलंडू नये म्हणून खाली तात्पुरता टेकू लावलेला. मयूराच्या आयुष्यालाही असाच कसला तरी टेकू देता आला असता, तर त्यांच्या कलंडलेल्या संसाराला आधार मिळाला असता. कारण मयूरा जन्मापासूनच गतिमंद.. तिचे चाळिशीतच थकलेले वडील सकाळी लवकर कामावर जायचे आणि रात्री दमून उशिरा घरी यायचे. घरातलं सामान नेहमी अस्ताव्यस्त दिसायचं. वाटायचं, घर आहे की अडगळीची खोली? ना माणसांच्या चेहऱ्यावर उत्साह, ना घरातल्या सामानाच्या मांडणीत. रंग उडालेल्या घराच्या भिंती, काही अक्षरं लिहून मयूराने मात्र रंगवलेल्या होत्या. तिला शाळेत जाताना कुणी कधी पाहिले नाही. कदाचित, अक्षरांची ओळख तिला असावी.

पाच सहा महिन्यांपूर्वी मयूराच्या घरी टी. व्ही. आला आणि मयूराचं उंबरठय़ात बसणं थांबलं. तिची आई शेजाऱ्यापाजाऱ्यांशी बोलू लागली. हसू लागली, लोकांमध्ये मिसळू लागली. मयूराही सोबत असायची हे विशेष. तिच्या बाबांचा निर्विकार चेहरा थोडा का होईना बोलका दिसू लागला. हे कुटुंब चाळीतल्या गणपतीला, सत्यनारायणाच्या पूजेला सहकुटुंब हजेरी लावू लागलं. ‘हे एक्कलकोंड कुटुंब एवढं कसं बदललं?’ सगळ्यांनाच थोडं आश्चर्य वाटलं. या बदलांवर लक्ष ठेवून त्याबद्दल सहानभूती दाखवणारा बब्या, मयूराच्या घरासमोरच राहातो. गोरापान, घारा आणि आडव्या बांध्याचा, साधारण पस्तिशीतला बडबडय़ा माणूस. तो चाळीतल्या कोणाशीही केव्हाही तासन्तास गप्पा मारू शकतो. त्याच्या मतांवर तो चुकीचा असला तरी ठाम असतो. वेळ जात नाही म्हणून की काय, पण हुज्जत घालणं त्याला खूप आवडतं. त्याने बऱ्याच ठिकाणी कामं करून सोडली आहेत. त्याची बायको मात्र नियमित कामावर जाते. घरात केवळ नवरा-बायको. बऱ्याच वेळेस तिन्ही सांजेला दिवा लावताना दरवाजात ओवाळायला आणलेली उदबत्ती देवासमोर न संपता; एखाद्याशी गप्पा मारता मारता त्याच्याच हातात केव्हा संपून जाते हे त्यालाही कळत नाही. पण मनाने साफ, हेवेदावे करणं त्याला जमत नाही. मयूराचं कुटुंब लोकांमध्ये मिसळू लागलं आणि बब्या रोज त्यांची खबरबात घेऊ  लागला. जेवढा बब्या त्यांच्याकडे ऊठबस करी, तेवढं कदाचितच दुसरं कोणी करत असेल.

पूर्वी न संपणारा मयूराचा दिवस, बब्याची बडबड आणि टी. व्ही. यामध्ये नकळत संपून जाई. तिचं गतिमंद आयुष्य नव्या घडामोडींमुळे गतिमान होऊ  लागलं. जरी बुद्धी मंद प्रतिसाद देत असली तरी, निसर्ग का थांबणार होता? वयात येऊ लागली तशी मयूरा प्रचंड हट्टी वागू लागली. ओरडू लागली. सैरभैर झाली. मयूराला प्रथम रजोदर्शन झालं होतं, पण या बदलाला कसं सामोरं जावं हे ना तिच्या आईला समजत होतं, ना तिला. पारंपरिक पद्धतीने तिच्या आईने तिला समजावून पाहिलं. पण उपयोग होत नव्हता. मयूराची चिडचिड वाढू लागली. ती कधी स्वस्थ बसे, कधी मोठमोठय़ाने ओरडायची. तिला तिचा दिनक्रम स्वतंत्रपणे जगावासा वाटू लागला.

एक कडकडीत उन्हाची दुपार. चाळीतील दरवाजे अर्धवट मिटलेले. मयूराची आई कसलसं सामान आणायला बाहेर गेलेली, बाबा कामावर. चाळीत शुकशुकाट. मयूरा बब्याच्या घरी पोचली. दोन्ही मुठी बंद करून तिच्या घोगऱ्या आवाजात अडखळत तिने त्याला विचारलं, ‘‘सांगा कुठल्या मुठीत चॉकलेट आहे?’’ बब्या तिच्या मुठींकडे बघत अंदाज लावत होता. ‘‘सांगा ना..’’ मयूराने पुन्हा लाडानं विचारलं. बब्याने चुकीची मूठ दर्शवली. ‘‘चुकलं.. तरी चॉकलेट तुम्हांलाच मिळणार, मला आवडतं तुम्हांला चॉकलेट द्यायला.’’ बब्याला मयूराच्या आग्रहाखातर चॉकलेट घ्यावंच लागलं. मयूरा आपल्या घरातच घुटमळतेय हे बघून बब्याने गोंधळत तिला विचारलं, ‘‘तू इथे कशी? आई कुठे आहे तुझी?’’ बब्याचा हात खेचत मयूरा म्हणाली. ‘‘नाही, मला इथेच बसायचंय.. आई नाहीये.. बसा जवळ.. आपण खूप बोलूया.’’ बब्या चपापला, आज हे प्रकरण काही तरी वेगळं दिसतंय, हे त्याला जाणवलं. बब्या तडक घराबाहेर पडला, ‘‘काका, तुम्ही छान आहात.. मला आवडता’’ तरीही जाता जाता मयूराचं पुसटसं काहीतरी बब्याने ऐकलं. बब्या शेजारच्या काकूंकडे आला. ‘‘ती बसूनच राहिलीय आमच्याकडे.. जातच नाहीए.. तिला समजवा.. हात धरला तिने..’’ बब्या गडबडत देसाई काकूंना म्हणाला. इतक्यात मयूराही तिथे आली. ‘‘क..काकू हे.. हे बघा मला त्यांच्या घरात बसू देत नाहीत. मी यांना चॉकलेट पण दिलं’’ मयूरा भाबडेपणाने म्हणाली. अपराधीपणाची भावना तिच्या मनात नव्हती. काकूंना खूण करत बब्या तिथून सटकला.

देसाई काकू मयूराला म्हणाल्या, ‘‘इथे बस, काकू नाहीयेत.. त्या आल्यावर जा तिकडे.’’ मयूरा काही क्षण पुन्हा स्तब्ध झाली. मग चिडून विचारू लागली, ‘‘काय होतंय बसलं तर.. काय होतंय?’’ देसाई काका, त्यांची लुंगीसारखी करत पुढे आले आणि त्यांनी फक्त डोळे वटारले. पण देसाई काकू शांतपणे मयूराची आई घरी येईपर्यंत तिला समजावत होत्या, त्या आल्यावर त्यांनी मयूराला घरी सोडलं.

घडल्या प्रकाराबद्दल बब्या आणि त्याची बायको देसाईकाकूंशी बोलले. गेल्या काही दिवसांपासून मयूराचं बदललेलं वागणं बब्याने काकूंना सांगितलं. टी. व्ही.वर गाणी लागली, की ती बब्याकडे पहात राहायची. दरवाजात बसून त्याच्याच घराकडे बघत असायची. तो आला की त्याला चॉकलेट द्यायची. त्याच्या घरी जाण्यापासून त्याला अडवायची. सुरुवातीच्या दिवसांत त्याला यात वावगं असं काही वाटलं नाही. पण नंतर मयूराच्या जाणूनबुजून केलेल्या स्पर्शामधे त्याला संशय येऊ  लागला. मयूराच्या मनात आपल्याबद्दल ‘तसं’ काही असेल यावर त्याचं शिक्कामोर्तब काही होत नव्हतं आणि हा प्रकार घडला.

‘‘गतिमंद मुलांना कसं वाढवायचं याची माहिती नसल्यानं असं होऊ  शकतं, त्यांचे वयात येतानाचे प्रश्न आणि लैंगिक गरजांचा विचारच केला जात नाही अनेकदा. त्यांच्या या गरजा दाबून टाकल्या जातात त्यामुळे त्या अशा पद्धतीनं बाहेर येतात. इथे तू होतास म्हणून, नाहीतर याचा गैरफायदा घेणारे काय कमी आहेत? या बाबतीत कुठेतरी जागरूकता यायला हवी.’’ देसाई काकूंनी मयूराचा आधार घेत सामाजिक प्रश्न मांडला होता.

मयूराच्या आईबाबांना ही गोष्ट समजताच त्यांनी बब्याची माफी मागितली, आणि काही दिवसांसाठी ते सारे बाहेरगावी निघून गेले. परतल्यावर मयूरा खिडकीच्या फटीतून बाहेरचं जग न्याहाळायची. तिचे आईबाबा आता कायम दरवाजा बंद ठेवू लागले. मयूराची गंजलेली खुर्ची मुलांनी आता क्रिकेट खेळताना स्टंप म्हणून वापरायला काढली आहे. सभोवतालचं जग त्या खुर्चीवर बसून न्याहाळताना मयूराच्या भावनांची कासवाच्या गतीने का होईना; जी जडणघडण झाली त्याचा सभोवतालच्या जागरूकते अभावी आणि इच्छाशक्ती अभावी रोज ‘क्लीन बोल्ड’ होतो आहो. पण इतरांचा खेळ सुरूच राहतो..

फिरोज चाळ पाडून तिथे आता इमारत उभी राहणार आहे. प्रत्येकजण सामान हलवतोय. चाळीत लगबग सुरू आहे.

‘‘काका तुम्ही कामावर जाता? खूप काम असतं का? उशिरा येता का घरी? चॉकलेट कोण देतं तुम्हाला?’’ पुन्हा तोच घोगरा आवाज आणि अडखळत बोलणं कानी पडलंय.. विस्तव अजून पूर्ण विझला नव्हता.. पूर्वी खूप बोलणारा आज फक्त स्मितहास्य करून पुढे निघून गेलाय.. मयूराच्या शारीरिक संक्रमण काळातील मानसिक प्रश्न मात्र तिथेच आहेत..

निरंजन काणे

kane.niranjan@gmail.com