हे काका त्यांचं ते कसनुसं हसणं, माझी वाट पाहणं, जिने चढताना अगम्य बोलणं. मला जाम त्रास होतो याचा. का? का, म्हणून मी हे सहन करावं? का बाळगावं मी या मध्यमवर्गीय, अतिनम्र संस्कारांचं ओझं? वैताग, वैताग आला नुसता.. पण एके दिवशी माझ्या मनाचं कुलूप उघडणार होतं.. कदाचित त्याच मुळे असेल हे घडत होतं.

बाइक पार्किंग लॉटमध्ये कशीबशी ढकलली आणि धावतच लिफ्टच्या अर्धवट बंद होत असलेल्या दरवाजातून स्वत:ला पुश केलं. दुसऱ्या मजल्यावर उतरून धाडधाड पावलं टाकत सरावाने सरळ घुसलो, तो स्टुडिओ नंबर ६२ मध्ये. स्टुडिओचा दुसरा भक्कम दरवाजा उघडून आत शिरता शिरता.. ‘काय रे, किती हा उशीर.. तुझं हे रोजचंच आहे.. स्टुडिओचं बुकिंग असतं ना!’ असं वैतागाने पुटपुटत पवनने हातात स्क्रिप्ट कोंबलं. त्याच्याकडे दुर्लक्ष करत, सरावाने मी मायक्रोफोन अ‍ॅडजस्ट केला. फिल्टरसमोर तिरकस उभा राहून हेडफोनचं शिरस्त्राण डोक्यावर चढवलं. काचेच्या पलीकडून सौरभने अंगठा वर केला आणि तो कानात बोलला, ‘‘आकाश, जरा लेव्हल दे.. ओके.. स्टार्ट..’’ कानात क्यु ऐकू येताच मी प्रमोचं स्क्रिप्ट वाचायला सुरुवात केली, ‘‘ताई, माई, आक्का.. सर्वाना मनोरंजनाचा महाधक्का.. सोमवार ते शनिवार रात्री ९ वाजता.. पाहत रहा..‘एल टीव्ही मराठी’ आणि ‘एल टीव्ही एचडीवर..’’ सौरभ कानात पुन्हा बोलला, ‘‘ओक्के.. डन’’ स्टुडिओचं दार उघडून मी बाहेर पडलो.. पवन, सौरभला बाय केलं आणि खाली आलो.

हे असंच चाललंय. हौस म्हणून सुरू केलेलं काम फुल्ल टाइम प्रोफेशनमध्ये कधी बदललं समजलंच नाही. आय अ‍ॅम नॉट कम्प्लेनिंग. इनफॅक्ट आय अ‍ॅम एन्जॉइंग इट. रोज उशीर होतो याचं कारण म्हणजे माझी राहण्याची जागा. ती आहे खूप दूर. मात्र आजच एक नवी जागा फायनल केली. इथे जवळच. बाइकवरून फक्त १५ मिनिटं. मस्त आहे कॉलनी. शांत, हिरवीगार. दुसरा मजला आहे, लिफ्ट नाही. पण त्याचा मला त्रास नाही. आता त्या पवनची त्रासिक कटकट ऐकायला लागायची नाही.

एकच छोटा त्रास आहे मात्र. ते चौथ्या मजल्यावरचे काका. काय ते त्यांचं नाव? लक्षात येत नाहीय. दोन-तीनदा ब्रोकरबरोबर जागा पाहायला गेलो होतो संध्याकाळी, तेव्हा नेमके बिल्डिंगच्या खाली भेटायचे. एकटेच राहायचे. त्यांची बागेत चक्कर मारून परत यायची वेळ, आणि माझी परतायची वेळ एकच व्हायची. अडखळत चालायचे आणि तसेच अडखळत बोलायचे. मला तर पहिल्यांदा आईशप्पथ एक शब्दपण कळला नाही. ते हसले म्हणून मी हसलो. त्यांनी घराची चावी पुढे केली आणि मला एवढाच अर्थबोध झाला की त्यांना चौथ्या मजल्यावरच्या त्यांच्या फ्लॅटचा दरवाजा उघडण्यासाठी माझी मदत पाहिजे आहे. कारण कुलूप लावताना खटक्याने दाबून त्यांना लावता येत असलं, तरी उघडताना त्यांचा हात पार्किन्सन्समुळे जाम थरथरतो. आय हेल्प्ड.

इथे राहायला आलो आणि मात्र हे रोजचंच झालं. माझ्या परतण्याची वेळ अशीच काही जुळून यायची की ते खाली वाटच बघत उभे असायचे, हातात चावी घेऊन. मी थकलेलो असायचो आणि कधी एकदा घरात शिरून मस्त शॉवरखाली तासभर उभा राहतो, अशी ऊर्मी मला आलेली असायची. पण मला त्यांच्यासोबत सावकाशपणे चार मजले चढून, त्यांची अगम्य बडबड ऐकत कुलूप उघडावं लागायचं. त्यांच्या बोलण्याला थोडाफार सरावू लागलो तसं मला समजलं की कुलूप उघडल्यावर ते मला ‘चहा घेणार का?’ असं विचारायचे. पण मी शब्दही न बोलता, त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचो.

लहान असताना नागपूरला घरी अर्धागवायू झालेली आजी होती. बेड रिडन. एक, दोन नव्हे – चांगली पंधरा वर्ष. आईबाबांच्या उमेदीची कित्येक वर्ष तिने खाऊन टाकली. त्या गैरसोयीचा, वैतागाचा एक तवंग सदैव घरावर पसरलेला असायचा. तिच्या बडबडीने मीसुद्धा वैतागलेलो असायचो. नाहीच आवडायचं मला ते आजारपण, त्यामुळे येणारं परावलंबित्व, नकोसे असल्याची भावना.. खोटं का बोला? आजी गेली तेव्हा सुटकेचा नि:श्वासच टाकला होता मी. तो एक एपिसोड मी माझ्या आयुष्यातून दूर दूर, नजरेच्या पलीकडे सरकवून टाकला होता.

..पण हे काका का मला तिची पुन्हा पुन्हा आठवण करून देतात? त्यांचं ते कसनुसं हसणं, माझी वाट पाहणं, चार जिने चढताना अगम्य बोलणं. मला जाम त्रास होतो याचा. का? का, म्हणून मी हे सहन करावं? ती तरी माझी आजी होती. यांचं तर नाव काय, हेसुद्धा माहीत करून घेण्याची तसदी नव्हती घेतली मी. का बाळगावं मी या मध्यमवर्गीय, अतिनम्र संस्कारांचं ओझं? वैताग, वैताग आला नुसता.

महिनाभर हे चाललं आणि एके दिवशी मी कचकचतच घरी आलो. व्हॉइसओव्हरचं काम मनासारखं जमलं नव्हतं. त्यात रस्त्यात बाइक बंद पडली. ढकलत ढकलत तिला सोसायटीच्या आवारात आणली; तर हे काका समोर दत्त म्हणून उभेच! ओशाळवाणं हसत, चावी पुढे करत.

आज मी सरळ तोंड फिरवलं आणि ‘सॉरी’ म्हणून चार ढेंगांत दुसरा मजला गाठला. त्यांना अनपेक्षित असावं हे अर्थात. बट आय डिड नॉट बॉदर. कोणी त्यांना मदत केली की नाही, देव जाणे.

लाइफ वॉज नॉर्मल अगेन. एका मोठय़ा सिरियलचं डबिंगचं काम अचानक चालून आलं आणि रात्रीचा दिवस करून पंधरा दिवसांत मी ते पूर्ण केलं. शेवटच्या दिवशी तर शरीर आणि आवाज दोन्ही एकदम थकून गेले. त्या रात्री आम्ही सर्व कोआर्टिस्टनी मिळून जोरदार पार्टी केली. थंडगार बीअरचे अनेक घोट बऱ्याच दिवसांनी घशाला ओलावा देऊन गेले. कामाच्या दरम्यान मी हे पथ्य फार पाळतो.

पुढचे तीन-चार दिवस तसं काम नव्हतं. अतिथंड बीअरमुळे असेल कदाचित; थोडी सर्दीपण झाली होती. आय जस्ट चिल्ड!

आज पुन्हा सौरभकडे रेकॉर्डिग होतं. तिथे सकाळीच पोहोचलो. छोटासा प्रमो होता, पण जरा सेंटी असा- ‘‘काय तिला आपलं हरवलेलं प्रेम परत मिळेल? काय तो तिला पुन्हा आपली म्हणेल?’’- अशा टाइपचा.. हेडफोन चढवून मी बोलायला सुरुवात केली आणि सौरभ कानात बोलला, ‘‘कट. अरे फील नही है यार. रिपीट..’’ दोन-तीन वेळा असं झालं आणि मलाच आश्चर्य वाटलं. इतका सोप्पा प्रमो. माझ्या डाव्या हाताचा नव्हे, करंगळीचा मळ. बट आय जस्ट कुड नॉट डू इट टुडे. घसा ओला करावा म्हणून पाण्याची बाटली उचलली आणि तोंडात ओतली. तर.. तर ओठांच्या एका बाजूने पाणी खालीच ओघळू लागलं.. सारा प्रकार आता माझ्या लक्षात येऊ लागला. चेहऱ्याच्या एका बाजूचे स्नायू मला साथच देत नव्हते. मला हवा तसा माझा चेहरा, माझं तोंड मी एका बाजूने हलवूच शकत नव्हतो.

मी नखशिखांत हादरलो!

‘‘..बेल्स पाल्सी’.. रिपोर्ट्स पाहून डॉक्टर म्हणाले. ‘‘अचानक होतं हे. तसं नक्की कारण सांगता यायचं नाही त्यासाठी. होईल बरं आपोआप, बहुधा. ही औषधं घ्या. डायरेक्ट ट्रीटमेंट नाही या रोगाला. सपोर्टिग ट्रीटमेंट आहे ही. बाकी काम तुमच्याच प्रतिकारशक्तीने करायचं आहे.’’ डॉक्टर निर्विकारपणे म्हणाले व पुढच्या पेशंटकडे वळले. कॉर्टीझोलसारखी काही तरी औषधं देऊन त्यांनी माझी बोळवण केली.

पुढचे दोन दिवस खूप म्हणजे खूप वाईट गेले. अशा वेळी घरची खूप आठवण येते. गेल्या वेळी घरी नागपूरला गेलो होतो त्याला सहा महिने उलटून गेले होते. नाही म्हणायला आठवडय़ातून दोन-तीनदा आईबाबांशी फोनवर बोलायचो, पण फोनवरचं बोलणं काही खरं नाही गडय़ा. त्याच दिवशी संध्याकाळच्या फ्लाइटने नागपूर गाठलं.

अचानक मला दारात उभा पाहून आई-बाबा चांगलेच गोंधळले. त्यांच्या डोळ्यांतील आनंदाला अश्रूंनी वाट करून दिली. अनुभवाने सांगतो, अश्रूपण सांसर्गिक असतात बरं..

पुढच्या पंधरा दिवसांत आईबाबांनी मला फुलासारखं जपलं. पहिल्या दिवशी बेल्स पाल्सीबद्दल वाचायला मी गुगल उघडलं आणि दहा टक्के प्रकारांत ते बरं होत नाही वगैरे भयानक इशारे वाचून बंदच करून टाकलं. आईने देवांना साकडय़ात टाकलं आणि चढणाऱ्या पाण्याला घाबरून का होईना, तिच्या देवांनी तिची प्रार्थना सत्वर ऐकली. तीन आठवडय़ांत मी ठणठणीत बरा झालो आणि मुंबईला परतायचा दिवस उजाडला. निघताना आईबाबांना जवळ घेतलं आणि पुन्हा एकदा भरून आलं. बऱ्याच वर्षांनंतर आजीच्या खोलीत गेलो आणि फोटोला मनापासून नमस्कार केला. मनात साठलेली सारी मळमळ अश्रूंनी धुऊन टाकली आणि मन निरभ्र केलं.

मुंबई एअरपोर्टवरून टॅक्सी केली आणि दिवेलागणीच्या वेळी सोसायटीच्या आवारात उतरलो. ड्रायव्हरला पैसे देऊन वळलो तर तेच काका काठी घेऊन लडबडत पायऱ्या चढू लागलेले दिसले. संधिप्रकाश होता म्हणून वॉचमनने आवारातले दिवे अजून लावले नव्हते. काकांनी मला नजरेच्या कोपऱ्यातून पाहिलं, पण मागच्या तुटक अनुभवाची भीती त्यांच्या डोळ्यांतून अजून गेली नसावी, हे मला जाणवलं.

मग मीच जवळ गेलो. ओळखीचं हसलो. त्यांचे डोळे लकाकले, पण शब्द नाही फुटले. हात पुढे करून मी त्यांची चावी मागून घेतली. त्यांच्या गतीने चार मजले चढलो. दरवाजावरची धुळाळलेली पाटी पहिल्यांदाच नीट वाचली – ‘शंकर नेवासकर’. त्यांच्या दरवाजाचं कुलूप उघडता उघडता मनातला खटका खटकन उघडल्याचा उगाचच भास झाला.

‘‘मग काय शंकरकाका, चहा घ्यायचा का? मी करतो ना..’’ असं म्हणालो आणि काका खूप खूप मोकळं, ओळखीचं हसले!

ajgaonkarrajesh@gmail.com

chaturang@expressindia.com