मनश्री पाठक

पूर्वी आपण इतर मुलींपेक्षा काही तरी वेगळं करतोय यामुळे उगाच खूश व्हायला व्हायचं.. पण आता तसं वाटत नाही.. आता माझीही माझ्याकडे बघण्याची नजर बदललीय. कौतुक झालंच तर ते आता चांगल्या कामासाठीच व्हावं. केवळ ‘महिला पत्रकार’ म्हणून गळ्यात पडणारी कौतुकाची माळ आता नकोशी वाटतेय. प्रत्येक क्षेत्रात ‘महिला असूनही..’ या बिरुदामागे लपलेली कौतुकाची, आश्र्च्र्याची, तिरस्काराची भावना आता मिटायला हवी हे मनापासून वाटतं आणि माझ्या पातळीवर ती मी नक्कीच मिटवण्याचा प्रयत्न करेन..

भर पावसातली, तुंबलेल्या मुंबईतली दुपार. एका राजकीय पक्षाची पत्रकार परिषद होती. आपल्या वाहिनीवर त्याचं थेट प्रक्षेपण पाहिजे म्हणून आमच्या कार्यालयातून सतत फोन येत होते. माझा जेमतेम ५ फुटांचा देह. त्याच्या वजनाइतक्याच ट्रायपॉडचं वजन छातीवर घेऊन जिना चढत होते. धाप लागलेली, त्यात पावसानं आधीच आमच्या थोर फॅशन सेन्सच्या कपडय़ांचे बारा वाजवलेले. कापलेल्या केसांच्या ओल्याचिंब बटा गालांना चिकटलेल्या. अर्थात माझं या कशाकडेही लक्ष नव्हतं..

घाईगडबडीत मी तिथल्या एकाला विचारलं, ‘‘सर, पत्रकार परिषद कुठेय, मुख्यमंत्री येतायेत का?’’ त्यानं प्रश्नाचं उत्तर देण्याआधी माझ्याकडे एकदा हसून-थोडं निरखून पाहिलं. नंतर म्हणतो कसा, ‘‘चॅनल्सनी आता शाळेतली मुलंही घ्यायला सुरुवात केली की काय..’’ आणि मग खदाखदा हसू.. अर्थात मला हा अनुभव काही नवा नव्हता. एकदा तर, अनुष्का शर्माचा ‘एन.एच. १०’  चित्रपट पाहायला जाताना थिएटरवाल्यानं माझ्या वयाचा दाखलासुद्धा विचारलाय मला.

५ वर्षांपूर्वी मुंबईत आले, पत्रकारिता करायची म्हणून. तीही टीव्ही माध्यमात आणि त्यातही फिल्ड रिपोर्टिंग. ‘कसं करणार अगं तू? तुझी उंची केवढी, तुझं वजन केवढं, कशी झेपायची मुंबई तुला?’ असे प्रश्न, कुजबुज कानापाशी होतीच.. पण ही सगळी कुजबुज मला न ओळखणाऱ्यांची. कारण मुंबईत यायच्या आधी मी पुण्यात आणि त्याआधी जन्मगावी नाशिकमध्ये माझ्या वजन, उंचीला न शोभणारे बरेच उद्योग केले होते.

रिक्षात बसतानाही कुणाच्या तरी मांडीवर अ‍ॅडजस्ट होणारी मी, त्याच रिक्षावाल्याशी भांडायची वेळ आली तर मात्र आघाडीवर असते. त्यामुळे माझे बरेच मित्र, मला ‘छोटा बम बडा धमाका’ म्हणतात. पण कधीमधी अगदी आठवण ठेऊन या छोटय़ा बॉम्बची वात पेटायला लागते. नोकरदार आई-बापाची मी दुसरी मुलगी. लहानपणापासून ‘तुला भाऊ नाही का मग?’ असे अनेक चिंताग्रस्त प्रश्नांकित चेहरे मी पाहिलेत. त्यांना ‘नाही’ म्हणताना त्या ‘नाही’मध्ये कसं वजन आणायचं हे मी सरावानं शिकलेय. लहानपणापासून मदानी खेळ आणि माझं फार काही जमलं नाही. आधी पाळणाघर आणि त्यानंतर थोडं मोठं झाल्यावर आई-बाप नोकरीवर असताना घरात एकटं राहणं यामुळे जमलं काय ते पुस्तकांशीच. एकदोनदा शाळेत माइकसमोर उभं राहून बडबडगीतं म्हटलेली. जाम कौतुक झालेलं.. तेव्हापासून माइकसमोर उभं राहून बोललं तरच लोक आपलं म्हणणं गांभीर्याने ऐकून घेतील असं वाटायला लागलं. मग वक्तृत्व-वादविवाद स्पर्धासाठी बरीच गावं फिरले. तिथेही प्रत्येक वेळी माईकची उंची खास माझ्यासाठी कमी करायला लागायचीच. पण त्याच्या पुढची भाषणातली काही मिनिटं आपली असणार आहेत आणि त्यातच आपली खरी उंची काय हे ठरेल हे आतून माहीत असायचंच.

गावोगांव भटकताना, रस्त्यात कुणाशीही नडताना, अगदी एस.टी. नाही म्हणून रात्र रात्र एस.टी. स्टॅन्डवरच झोपताना मला कधीच माझी उंची, वजन किंवा मुलगी असणं आड आलं नाही. तसं ते आताही येत नाही.. मात्र, वयानुसार आता उंडारण्यातही एक शिस्त आलीय एवढं नक्की. पोरगी अंगकाठीनं जेमतेम असली तरी तोंडानं तोफ आहे हे आई-बाप पुरते जाणून होते. तरी, माझ्यावर मांस चढवण्यासाठीचे प्रयोग आणि त्याबाबतचे सल्ले सुरूच राहिले. पुण्यात पत्रकारितेची पदवी घेताना हॉस्टेलला राहिले तेव्हा तर कानात चांगलंच वारं शिरलं. मुलीनं उंडारण्याच्या सगळ्या कमाल मर्यादांपर्यंत पोहोचून झालं होतं. बऱ्याच ठिकाणी भटकून झालं होतं. कुठे भाषणं, तर कुठे थोडेथोडके लेख यातून हातातोंडाशी गाठ घालून जगणं सुरू झालं होतं. आता पोटापाण्याच्या व्यवस्थेचं स्थर्य हवं होतं.. नोकरी हवी होती. पण नुसतीच दिसण्यावरून पारख करणाऱ्यांच्या जगात माझ्यासारख्या लहान चणीच्या मुलीला इलेक्ट्रॉनिक मीडियात नोकरी देणार कोण, हा प्रश्न मनात यायच्या आधीच तो सुटला. कॅम्पस इंटरव्हूत मुंबईतल्या चॅनेलमधल्या नोकरीसाठी बोलावणं आलं. सुरुवातीला सांगायलाही लाज वाटावी असा पगार. त्यात, ‘मुलींना टीव्हीत रिपोर्टिंगला घेतात ते फक्त देखाव्यासाठी.. फार फार तर ट्रायपॉड उचलायला लावतील आणि तुला तर तोही उचलता येणार नाही..’ अशा कमेंट. जे

होईल त्याला भिडायचं हे मनात ठेऊन नोकरी सुरू केली खरी. एरवी आपण एकटे कुठेही भटकू शकतो हे माहिती होतं. मात्र मुंबईच्या लोकलनं पहिल्याच दिवशी जेरीस आणलं. आपल्या चार-दोन वाक्यांतच आपण समोरच्याला घाम फोडू शकतो हा आपला किती फाजील आत्मविश्वास आहे हे

मुंबईच्या गर्दीनं काही मिनिटांत घाम फोडून दाखवून दिलं. इथे आल्यावर रिक्षावाल्यांशी भांडायची असलेली जुनी प्रॅक्टिस थोडी कामी आली. तसंच लोकलच्या भर गर्दीतही, आपण बारीक असल्याचा फायदा घेत सुळकन कोपऱ्यातनं पुढं सरकायची कला गवसली. दमट हवेची आणि इंचभर जागेचीही मोकळीक न ठेवणारी मुंबई काही आपलीशी वाटली नाही. पण आता काही करायचं तर ते इथंच, हे मनाशी नक्की ठरवलं. सुरुवातीच्या पगारातली निम्म्यापेक्षा जास्त रक्कम फक्त घरभाडं देण्यात जायची. तेव्हा एखादा चांगला चित्रपट पाहायलाही पंचमासिक योजना आखावी लागायची. घरीदारी झालेले लाड मुंबईत ‘बॅचलर’ म्हणून राहताना चांगलेच नडले. पण हात-पाय मारत राहायचं आणि कुठेही फेकलं तरी धडपडत का होईना उभं राहायचं याची खूणगाठ मनाशी पक्की केली.

मुलगी असण्याचा फायदा घेणारे-घेऊ पाहणारे बरेच नमुने आसपास होते, आजही आहेत. बरेचदा कामाचं क्रेडिट अंगभूत  कौशल्याला कमी आणि बाईपणाला जास्त दिलं जातं. अशा वेळी न मागता मिळणारं बाईपणाचं भांडवल, त्याचे फायदे आपसूकच मिळतात मात्र ते कटाक्षानं टाळले तरच चांगली पत्रकार होता येईल हे पक्कं लक्षात ठेवलं. फिल्डवर असताना गणपती विसर्जन, मोच्रे, आंदोलनं किंवा अशाच कुठल्या गर्दीच्या ठिकाणांचं वार्ताकन करताना बरेचसे आशाळभूत, वखवखणारे, चोरटे हात पुढे येतात. या हातांना वेळीच छाटावं लागतं. ‘एबीपी माझा’त नोकरी लागल्यानंतर पहिल्याच वर्षांत, एका बातमीच्या वेळी अशाच चार हातांना बेडय़ा घातल्या.. त्यावेळी वरिष्ठांनी, सहकाऱ्यांनी चांगलाच पाठिंबाही दिला.. अगदी विधानसभेतही मुद्दा गाजला. तेव्हापासून ‘नडला तिथे ठोकला’ हे सूत्र पक्कं करून टाकलं.

दूरचित्रवाणी किंवा दुसऱ्या कोणत्याही दृश्यमाध्यमातली पत्रकारिता म्हटली की त्यात दिसणारे चेहरे हे आखीव-रेखीव, गोरेगोमटे, साजरेच दिसले पाहिजेत असा एक अदृश्य, कुणीही उघडपणे बोलत नाही असा नियम आहे. हे मला फार म्हणजे फारच उशिरा कळलं. तोपर्यंत, काही स्टोरीजमुळे लोकांपर्यंत पोहोचणं झालं होतं. माझा चेहरा लोकांनी बऱ्यापैकी ओळखायला सुरुवात केली. एका बातमीच्या वेळी माझ्यासारख्या अस्ताव्यस्त, वेंधळ्या मुलीसोबतही अनेकांनी भर गर्दीत सेल्फी काढायला सुरुवात केली. तेव्हा कळलं, की लोक बातमीसाठी चेहरा बघतात. चेहऱ्यासाठी बातमी नाही. आणि कुणीही काहीही म्हटलं तरी, आपण बातमीचाच चेहरा व्हायचं.

रिपोर्टर हा उन्हापावसात, धूळमातीत, असेल त्या परिस्थितीत बातमीदारी करतो. बातमीतल्या लोकांशी, तिथल्या परिस्थितीशी तो जोडला जातो. एखादी भीषण परिस्थिती दाखवताना, शेतकरी बायाबापडय़ांच्या भेगाळलेल्या टाचा दाखवताना, पुरात वाहून गेलेलं घरदार दाखवताना लोक त्याचा चेहरा नाही तर त्याची बातमी बघत असतात. त्यामुळे कॅमेऱ्यासमोरच्या माझ्या चेहऱ्याला बातमीमुळे किंमत आहे हे कायम लक्षात असू द्यावं लागतं.

बरेचदा लोक पत्रकारितेतल्या मुली-स्त्रियांचा उल्लेख अगदी आवर्जून ‘महिला पत्रकार’ म्हणून करतात. महिला असूनही बिनभरवशाच्या, वेळकाळ नसलेल्या क्षेत्रात काम करतात वगैरेसारखी टिपिकल कौतुकं होतात. मात्र आताशा या कौतुकांना मी वेळीच आडकाठी करते. आधी हे वेळकाळ नसलेलं, आव्हानात्मक, धावपळीचं काम करताना अप्रूप वाटायचं. आपण इतर मुलींपेक्षा काही तरी वेगळं करतोय यामुळे उगाच खूश व्हायला व्हायचं.. पण आता तसं वाटत नाही.. आता माझीही माझ्याकडे बघण्याची नजर बदललीय. कौतुक झालंच तर ते आता चांगल्या कामासाठीच व्हावं. केवळ ‘महिला पत्रकार’ म्हणून गळ्यात पडणारी कौतुकाची माळ आता नकोशी वाटतेय. प्रत्येक क्षेत्रात ‘महिला असूनही..’ या बिरुदामागे लपलेली कौतुकाची, आश्चर्याची, तिरस्काराची भावना आता मिटायला हवी हे मनापासून वाटतं आणि माझ्या पातळीवर ती मी नक्कीच मिटवण्याचा प्रयत्न करेन.

आता, ‘ही ‘माझा’ची लहानगी रिपोर्टर’ असं म्हणणारे बऱ्यापैकी लोक ‘मॅडम’ म्हणतात तेव्हा हसायला येतं. ‘एवढीशी आहेस तू, कसं जमेल तुला’ या प्रश्नापासून ‘ती फक्त दिसते एवढीशी.’ या उत्तरापर्यंत सध्या प्रवास आलाय. पण हा प्रवास न संपणारा आहे. स्वत:ला सिद्ध करण्याचा प्रवास कधीच संपत नसतो. तोच हा प्रवास. जेव्हा ‘तू अमुक एक करू शकणार नाहीस’ असं कुणी म्हणतं तेव्हा ते करून दाखवण्याची जिद्द आता आपोआप तयार होतेच. या प्रवासात बरेचसे यू-टर्न, ओव्हरटेक, खाचखळगे येतील. पण म्हणून काय प्रवासावरचं प्रेम कमी होत नसतं. कारण सजग बाईपणापासून माणूसपणाकडे नेणारी ही वाट बरीच लांबची आहे.

manashreepathak9@gmail.com