ती खारूताई असली म्हणून काय झालं, ती आई होती म्हणूनच अशी वागू शकली. आईच्या हृदयाची महती सांगणारा प्राणी जगतातला हा प्रत्यक्ष अनुभव, खास उद्याच्या जागतिक मातृदिनानिमित्ताने..
संध्याकाळची वेळ होती. आम्ही दोघं बाहेर जाण्याच्या तयारीत होतो. कपाटाखाली कसला तरी आवाज येत होता म्हणून मी खाली वाकून पाहिलं तर खारीचं अगदी छोटं पिल्लू होतं. मला पाहताच दुसऱ्या कपाटाखाली जाऊन लपलं. बापरे! आता काय करायचं? ते खिडकीतून आलं असेल तर तसंच जाईल, असा विचार करून आम्ही खिडकी उघडी ठेवून बाहेर गेलो. रात्री यायला खूप उशीर झाला. कुठे काही आवाज येत नव्हता. आम्हाला वाटलं, एव्हाना पिल्लू आपल्या आईकडे परतलं असेल.
दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आम्ही टी.व्ही. बघत बसलो असताना ते पिल्लू हळूहळू चालत आमच्या दिशेने येताना दिसलं. त्याच्या पायाला काही इजा झाली आहे, असं वाटत होतं. आमची चाहूल लागताच ते मागे पळू लागलं. कसंबसं त्याला पकडलं आणि एका टोपलीत ठेवून वरून जाळीचं झाकण लावलं. त्याला खाण्यासाठी थोडा भात व चपातीचे तुकडे आत ठेवले. सकाळी बघितलं तर त्यानं काही खाल्लं नव्हतं. मग मोकळी हवा लागावी म्हणून आम्ही ती टोपली गॅलरीत ग्रिलमध्ये ठेवली. थोडय़ा वेळाने एक मोठी खार तिथे आली. तिच्या आवाजात जोरजोरात ओरडू लागली. तिचा आवाज ऐकल्यावर ते पिल्लूही त्याच्या किनऱ्या आवाजात ओरडण्याचा प्रयत्न करू लागलं.
बराच वेळ हा प्रकार चालू होता. मी कामासाठी आत गेले. थोडय़ा वेळानं परत येऊन पाहते तर काय! ती खार चक्क त्या पिल्लाला भरवत होती. भरवता यावं म्हणून तेवढय़ातल्या तेवढय़ात तिनं जाळीला छोटं भोक पाडलं होतं व त्या भोकातून त्या पिल्लानं इवलंसं तोंड बाहेर काढलं होतं व खार त्याच्या तोंडात चपातीचे एकदम बारीक तुकडे करून घालत होती. आईशिवाय दुसरं कोण करणार होतं हे. भरवण्याचा कार्यक्रम झाल्यावर ती खार त्या पिल्लाला निर्धास्तपणे आमच्यावर सोपवून निघून गेली. पिल्लूही पोट भरल्यामुळे शांत झालं. संध्याकाळी ती टोपली आम्ही घरात ठेवली. दुसऱ्या दिवशी सकाळी परत खार आली. आम्ही टोपली बाहेर ठेवली. पुन्हा भरवण्याचा कार्यक्रम झाला. हा प्रकार असाच पुढे २-३ दिवस चालू होता. २-३ दिवसांत ते पिल्लू जाणवण्याइतकं मोठं दिसू लागलं. पायही चांगला वाटत होता. ती टोपली आता त्याला छोटी पडू लागली. म्हणून आम्ही ती बदलण्याचे ठरविले, परंतु बदलत असताना ते आमच्या हातून सटकलं व पळत चुकून टॉयलेटमध्ये गेलं. मोठय़ा शिताफीने त्याला पकडून एका बादलीत ठेवलं व वरून त्याला जाळी लावली. सकाळी ती बादली पुन्हा ग्रिलमध्ये ठेवली. थोडय़ा वेळाने खार आली. या वेळी तर जरा जास्तच जोरजोरात ओरडत होती. ती जसजशी ओरडत होती तसतसं ते पिल्लू आतमध्ये उडय़ा मारत होतं. आम्ही खिडकीपासून जरा दूर उभे राहून तो सारा खेळ अनुभवत होतो.
आईनं त्याला प्रथम थोडं खाऊ घातलं. परत ती जोरजोरात ओरडू लागली. (बहुतेक ती त्याला काही सांगत असावी) ते पिल्लू बादलीत जोरजोरात उडय़ा मारू लागलं. उडय़ा मारून मारून त्यानं वरची जाळी उडवली व बाहेरच्या पत्र्यावर उडी मारली. आम्ही एकदम घाबरलो, कारण पत्रा छोटा होता व बाजूला असलेले झाड तसं दूरच होतं. पिल्लाला त्यावर उडी मारणं अशक्य होतं. आम्ही श्वास रोखून पाहू लागलो. तेवढय़ात ती खार झाडावरून एकदम त्याच्या जवळ आली. पिल्लानं आईच्या पोटाला घट्ट पकडलं. आईनं पिल्लाची शेपटी स्वत:च्या तोंडात पकडली व पिल्लासकट तिनं बाजूच्या झाडावर जोरात उडी मारली. आणि क्षणार्धात पिल्लाला घेऊन ती झाडाच्या फांद्यांत दिसेनाशी झाली. काही क्षणांतच हे सर्व घडलं. आम्ही मंत्रमुग्ध होऊन ती गेली त्या दिशेने बघतच राहिलो..
इतक्यात फोनच्या िरगने मी भानावर आले. माझ्या मुलाचा फोन होता, ‘आई, हॅपी मदर्स डे’ सांगणारा. पण आम्ही नि:शब्द होऊन गेलो होतो. आई-बाळांच्या प्रेमाचा हृदयंगम प्रसंग आता डोळय़ांसमोर घडला होता. तो सांगायला शब्दच कमी पडत होते.. पण मनोमन मी तिला म्हणून टाकलं, ‘हॅपी मदर्स डे, खारूताई.’