‘डोळ्यांनी बघतो, ध्वनि परिसतो, कानी पदी चालतो। जिव्हेने रस चाखितो मधुरही, वाचे आम्ही बोलतो।। हातांनी बहुसाल काम करितो, विश्रांती ही घ्यावया। घेतो झोप सुखे फिरूनी उठतो, ही ईश्वराची दया।।’ लहानपणी आजी आम्हाला सकाळी जाग आल्यावर अंथरुणावरून न उठता ही प्रार्थना म्हणायला लावायची. चालीतील गेयतेमुळे हे शब्द कायमचे स्मरणात राहिले खरे, पण त्यातील खोल अर्थ पक्का उमजायला, अलीकडेच एक घटना कारणीभूत झाली. घडलं ते असं…

अजाणतेपणे चुकीच्या पद्धतीने बसून, सलग सहा-सात महिने लिखाणासाठी हाताचा अतिरिक्त वापर केल्याने, हात दुखू लागला अन् एक दिवस जड वस्तू उचलण्याचं निमित्त झालं आणि तो ठप्पच झाला. हात तोही उजवा, जेव्हा इंचभरही हलेना, तेव्हा डॉक्टरांकडे जाणं भाग पडलं. मग ‘एमआरआय’ वगैरे सोपस्कार पार पडल्यावर, उजव्या खांद्यावरील स्नायूचा तुकडा पडून, तिथले स्नायू मागे गेल्याचं निष्पन्न झालं. त्यामुळे शस्त्रक्रियेला पर्याय नव्हता. रुग्णालयाचा चार दिवस पाहुणचार घेऊन, हाताला ‘आर्म स्लिंग’च्या आवरणात बद्ध करून मी घरी परतले.

पुढचे सहा आठवडे हाताला अंगड्या-टोपड्यासह सांभाळायचं होतं. घरी आल्यावर मला क्षणोक्षणी हाताचं आपल्या आयुष्यातील स्थान, महत्त्व जाणवायला लागलं आणि वरील ओळींचा अर्थ मनात उलगडू लागला. खरंच आपण आपले हात, पाय, नाक, डोळे, कान…साऱ्याच अवयवांना किती गृहीत धरतो नाही? त्यांनी वर्षानुवर्षं विनातक्रार दिलेली सेवा आपल्या खिजगणतीतही नसते. त्यांच्याकडून वारेमाप कामं करवून घेतो, पण त्यांना साधे ‘धन्यवाद’ तरी देतो का? मात्र काही कारणाने एखाद्या अवयवाचं काम बंद पडलं की त्यावाचून किती अडतं ते पदोपदी समजतं.

कोणत्याही परिस्थितीत, जे ‘ही’ देवाची कृपा आहे असं मानतात, त्यांची गोष्ट वेगळी! ते संत कुळात मोडणारे! जसं संत तुकाराम म्हणत, ‘देवा, जर तू मला सुंदर, सुशील पत्नी दिली असतीस तर मी तिच्याच मागे लागलो असतो आणि तुला विसरलो असतो. म्हणून मला कर्कशा मिळाली तेच चांगलं झालं.’ पण तुम्ही-आम्ही कोणी संत नव्हे. आपल्याला संकट आल्यावरच देव आठवणार. साहजिकच हात जखडला गेल्यावर माझ्या मनात ‘कृतज्ञते’चा पूर आला.

उजवा हात जायबंदी झाल्यामुळे, सगळा भार डाव्या हातावर आला आणि सर्वप्रथम त्या हाताबद्दल मनात कृतज्ञता दाटून आली. वाटलं, आपण का याला ‘डावं’ ठरवलं? डोळे, कान, पाय याबाबत आपण डावं-उजवं करत नाही, मग हाताबद्दलच का? डावखुऱ्यांसाठी तर तो उजवाच हात असतो, झालंच तर काही जण मुद्दाम डाव्या हाताने लिहिण्याचा सराव करतात. काही शाळांतूनही दोन्ही हाताने लिहायला शिकवलं जातं. मीही माझी सगळी कामं, एक हाती करणाऱ्या डाव्या हाताला मनापासून ‘धन्यवाद’ म्हटलं आणि ठरवलं की यापुढे आपण तरी ‘डावं-उजवं’ हा शब्दप्रयोग करायचा नाही. ‘फिजिओथेरपी’ चालू असल्याने उजव्या हाताची मंद गतीने प्रगती सुरू झाली होती.

लहान बाळ जसं उपडी पडायला लागलं, पुढे सरकायला लागलं, रांगू लागलं की त्याची ती वाटचाल बघून आपण हरखून जातो, तसं आज काय ब्रशवर टूथपेस्ट काढता आली, उद्या चूळ भरता आली, परवा चहाचा कप उचलून तोंडापर्यंत नेता आला अशा साध्या साध्या कृतीतूनही मला कमालीचा आनंद मिळू लागला. कामावरून घरी परतणाऱ्या मुला-सुनेचा दारातूनच प्रश्न, ‘आज काय जमलं?’ यावर आज्ञाधारक मुलासारखं मी दिलेलं उत्तर ऐकल्यावर घरात आनंदीआनंद! यादरम्यान मला व्हॉट्सअॅपवर आलेले मेसेज आणि व्हिडीओदेखील, ‘देवाने जे दिलंय त्याबद्दल कृतज्ञता माना’ हीच शिकवण देणारे होते.

एका व्हिडीओत, शरीराने फक्त दोन वर्षाच्या बाळाइतकीच वाढ झालेली आणि उठूनही बसता न येणारी एक २८ वर्षांची दिव्यांग मुलगी, आई-वडिलांवर आपला भार पडू नये, यासाठी करत असलेल्या प्रयत्नांबद्दल सांगत होती. तिच्या अवतीभोवती तिने केलेल्या हस्तकौशल्याच्या अनेक वस्तू मांडल्या होत्या.

ते दृश्य पाहताना, तिच्याबद्दल अत्यंत आदर तर वाटलाच, त्याबरोबर देवाने आपल्याला किती भरभरून दिलंय याची नव्याने जाणीव झाली. तसेच यापुढे त्याच्याकडे कसलीही तक्रार करायची नाही हा निश्चयही झाला. दुसऱ्या एका व्हिडीओत बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीच्या अकराव्या मजल्यावर उभा असलेला इंजिनीअर, जमिनीवर काम करणाऱ्या कामगाराला काहीतरी ओरडून सांगत होता. पण त्याचा आवाज त्या माणसापर्यंत पोहोचत नव्हता. म्हणून त्या इंजिनीयरने खिशातून एक रुपयाचं नाणं काढून खाली फेकलं. ते पाहून कामगार वर पाहील असं त्याला वाटलं होतं. पण त्या कामगाराने ते नाणं खिशात ठेवून आपलं काम सुरूच ठेवलं.

नंतर टाकलेल्या पाच रुपयाच्या नाण्याची पण तीच गत झाली. अखेर त्या इंजिनीयरने कामगाराच्या दिशेने एक खडा फेकला. त्या क्षणी त्याने वर पाहिलं. त्या व्हिडीओतील पुढचे शब्द होते…‘देव सर्व सुखे देतो, त्यावेळी माणसाचे लक्ष त्याच्याकडे जात नाही. पण जेव्हा तो जीवनात संकटाचा एखादा खडा टाकतो तेव्हा मात्र त्या व्यक्तीची प्रार्थना सुरू होते. यापेक्षा देवाला रोजच ‘धन्यवाद’ द्या म्हणजे आयुष्यात संकटाचे खडे येणार नाहीत, आणि आलेच तरी त्यांची बोच निश्चितपणे कमी असेल.’ अशा प्रकारे हे हाताचं दुखणं मला बरंच काही शिकवून गेलं. त्या दीड महिन्याने ‘धन्यवाद’ हा मंत्र माझ्या मनात रुजवला.

अर्थात पहिले धन्यवाद माझा हात पूर्ववत करणाऱ्या डॉक्टरांना. त्याबरोबर, आता हातात साधं पेन घेतलं तरी ते आकाराला येण्यात किती जणांचे हात असतील, हे जाणवून त्यांच्याबद्दल मनात कृतज्ञता दाटून येते. भाजी निवडताना, ती लावणाऱ्या शेतकऱ्यापासून आपल्या घरात येईपर्यंत जी साखळी असते ती आठवून, त्या सर्वांना ‘सुखी ठेव’ अशी प्रार्थना मनात उमटते, डांबरी रस्त्याने चालताना, ही सुखसुविधा आपल्याला मिळण्यासाठी किती जणांनी घाम गाळला असेल, या विचाराने त्यांना मनोमन ‘धन्यवाद’ दिले जातात. एखादी घटना आपल्याला खूप काही शिकवून जाते ती अशी! माझ्या विचारात एवढा बदल घडवणाऱ्या हाताचे, यासाठी मनापासून जाहीर धन्यवाद!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

waglesampada@gmail.com