ti-muktप्रत्येक गोंधळी कुटुंबाला पूर्वी पाच-दहा गावांचे वतन दिलेले असायचे. त्या गावातल्या घरी गोंधळ घालत व भिक्षा मागत ते उपजीविका करायचे. कालांतराने कुटुंबं वाढल्याने भिक्षा मागण्याशिवाय पर्याय उरला नाही. आज तर अनेक जणी बोहारणीचे काम करत उपजीविका करीत आहेत. गोंधळी समाजाची ही फरफट.   
महाराष्ट्राचा सांस्कृतिक ठेवा समृद्ध आहे. त्याचाच एक अविभाज्य भाग असलेले म्हणजे गोंधळी गीते व नृत्य. नुकत्याच पार पडलेल्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात, दिल्लीच्या एका शाळेने राष्ट्रपतींसमोर राजपथावरही याचे सादरीकरण केले. भारताच्या उज्ज्वल परंपरांच्या विविधतेतून एकता साधणाऱ्या परंपरांपैकी ही एक परंपरा असून याच सांस्कृतिक कला-परंपरेने भारताचा सांस्कृतिक झेंडा आंतरराष्ट्रीय पातळीवरसुद्धा अनेकदा दिमाखाने फडकावला आहे. पिढय़ान्पिढय़ा परंपरागत पद्धतीने ही कला जोपासणाऱ्या गोंधळी समाजाची, त्यातल्या महिलांची मात्र जगण्यासाठी फरफट होत आहे.
छत्रपती शिवाजी रेल्वे स्थानकाबाहेरील मुंबई महानगरपालिकेच्या इमारतीसमोरच्या फुटपाथला लागून असलेल्या मोकळ्या जागेत रात्री नऊच्या  ch16सुमारास सुमारे तीस ते पन्नास किलो वजनाचे जुन्या कपडय़ाचे गाठोडे डोक्यावर घेऊन आलेल्या गोंधळी महिला रोज दिसतात. पुढे अकरापर्यंत तीस-पस्तीस महिलांची इथे सहज गर्दी होते. रात्री तिथेच थंडीवाऱ्यात उघडय़ावर त्या झोपतात. रेल्वे स्थानकामधील स्वच्छतागृहांचा वापर करता येतो ही एकमेव सोय तिथे उपलब्ध आहे. अंबरनाथच्या अरुणा आमले व सोलापूरच्या रुक्मिणी नामदेव भोसले यांच्या सांगण्याप्रमाणे त्या पहाटे तीन वाजता उठून गाठोडय़ासह भेंडीबाजार(चोरबाजार)कडे कूच करतात. तिथे व्यापाऱ्यांना वजनावर किंवा नगावर ठोक भावाने कपडे विकून, पुन्हा घरोघर फिरून जुने कपडे गोळा करण्यासाठी आपापल्या भागात जातात. चाळीस-पन्नास किलोचे गाठोडे तयार झाले की ते घेऊन, रेल्वेप्रवासी आणि रेल्वे कर्मचारी यांचा रोष व विरोध पत्करत पुन्हा येथे येतात. मध्य रेल्वेचे शेवटचे स्थानक म्हणून इथे गाठोडे घेऊन उतरणे सोपे जाते. तरुण लेकुरवाळ्या महिला, नात्यातील प्रौढ महिलांना सोबत घेऊन फिरतात. बोजा वाहण्याच्या आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने ते सोयीचे ठरते. बऱ्याच वेळा दहा-बारा महिलांच्या गटागटाने त्या आठ-पंधरा दिवस गावोगाव फिरतात. उघडय़ावर राहतात किंवा स्वस्तात मिळाल्यास भाडय़ाने आसरा शोधतात. जर्मन-स्टीलची भांडी किंवा प्लॅस्टिकच्या वस्तूंच्या मोबदल्यात जुने कपडे घेतात. जास्त जीर्ण असतील तर दोन रुपये किलो भावाने घेतात जे पाच रुपये किलो भावाने विकले जातात. पँट, साडय़ा वगैरेचे नग पाहून नगाच्या किमतीपोटी दहा ते चाळीस रुपये मिळतात. सुट्टी न घेता ३० दिवस हे गावोगाव फिरण्याचे, गाठोडे वाहण्याचे काम केले तर चार ते पाच हजार रुपये महिन्याकाठी मिळतात.      
ch17गोंधळ्यांपैकी बऱ्याच महिला जिल्ह्य़ा जिल्ह्य़ातून हा व्यवसाय करताना आढळतात. या व्यवसायानिमित्ताने भांडी आणि जुने कपडय़ांचे गाठोडे मिळून एकूण तीस ते पन्नास किलो वजन रोज डोक्यावर आणि पाठीवर दूर दूर वाहून न्यावे लागते. वर्षांनुवर्षे हा व्यवसाय करणाऱ्या महिलांना पाठीच्या कण्याचे व कमरेच्या हाडांचे रोग प्रौढपणीच होत आहेत असा अनुभव येतो आहे.
यातले अनेक जण एकीकडे या स्वत:ला गोंधळी, जोशी, वासुदेव या वेगळ्या जातीच्या म्हणवून घेतात तर दुसरीकडे आम्ही एकमेकांच्या रक्तसंबंधातले नातेवाईक आहोत असेही सांगतात. गुलबर्गा, सोलापूर, पुणे, अमरावती, धुळे, जळगाव, नंदुरबार, वर्धा, नागपूर, लातुर, नांदेड, मुंबई आदी ठिकाणचे त्यांच्यातले सोयरसंबंध तपासले तर काही पिढय़ांपासून याच्यात रक्तसंबंध प्रस्थापित झाल्याचे दिसते. बऱ्याच ठिकाणी सख्खे, भावभावकी, व्यवसायानुसार गोंधळी, जोशी व वासुदेव या तिन्ही जातींचे असल्याचे संबोधले जाते.
‘गोंधळा’ची व्युत्पत्ती परशुरामांनी केलेल्या मातृवंदनातून झाल्याचे म्हटले जाते. कथा अशी की, परशुरामांनी बेटासुर नावाच्या दैत्याचा वध करून त्याचे शिर कापले. त्याच्या नसा कापून त्याच्याच कवटीच्या रंध्रात ओवून त्या वाद्यांचा ‘तिंतृण तिंतृण’ असा आवाज करीत तो माता रेणुकेच्या जवळ आला व तिला वंदन केले. या वंदनातूनच गोंधळाचा उगम झाला व या वाद्यास ‘तुणतुणे’ असे संबोधले जाऊ  लागले. गोंधळी लोक, जमदग्नी ऋषी व रेणुका माता यांपासून आपली उत्पत्ती झाली व ‘माहुरगड’ हे आपले मूळ स्थान आहे असे मानतात. मात्र, काही संशोधकांनी गोंधळ ही कला भूतमाता व तिच्या भक्तांशी संबंधित आहे असा दावा केला आहे. संशोधकांच्या मते, श्री तुळजाभवानीचा कालखंड  इ.स. १०००पूर्वीचा आहे तर रेणुका माता त्याहूनही प्राचीन आहे. गोंधळात गायल्या जाणाऱ्या, रामदासांनी रचलेल्या आरतीत, ‘कवडी एक अर्पिता देसी हार मुक्ताफळा हो’ या ओळीतील ‘कवडी’ या चलनाचा संबंध येतो. कवडी हे चलन पाचव्या शतकाच्या दरम्यान कर्नाटकात प्रचलित होते. त्या वेळचे कदंब राजघराणे तुळजाभवानीला आपली कुलदेवी मानत होते. यावरून गोंधळ प्रथा तेव्हापासून प्रचलित असावी असाही संदर्भ दिला जातो. जन्म, लग्न, मुंज, गृहशांती, इ. प्रसंगी देवीचा गोंधळ घातला की आयुष्याचा गोंधळ होत नाही अशी धारणा होती. बहुतांशी समाजाचा कुळाचार असणारी एक प्रबोधक, मनोरंजक आणि महत्त्वपूर्ण परंपरा म्हणजे गोंधळ अशी परिस्थिती होती. शतकानुशतके चालू असलेल्या या गोंधळाचे स्वरूप, बदलत्या काळासोबत सकारात्मक व नकारात्मक या दोन्ही दृष्टीने बदलत आले आहे.
प्रत्येक गोंधळी कुटुंबाला पूर्वी पाच-दहा गावांचे वतन दिलेले असायचे. त्या गावातील लोकांच्या घरी गोंधळ घालणे व इतर वेळी देवीचे पुजारी या नात्याने वतनी गावात भिक्षा मागून खाण्यास त्यांना मुभा होती. गोंधळीकला दाखविताना संबळ, तुणतुणे, टाळ किंवा झांज, दिवटी व कवडय़ांची माळ ही साधने वापरतात. कालांतराने गावे तेवढीच राहिली व कुटुंबाचा विस्तार मात्र अनेक पटीने वाढला. त्यामुळे गोंधळ घालण्याचा हक्क पाच-दहा वर्षांनी एकदा मिळू लागला व एरवी उपजीविकेसाठी त्यांना भिक्षा मागण्याशिवाय पर्याय उरला नाही. म्हणून त्यांची भटकंती वाढली.
ज्या कुटुंबांना गोंधळ घालण्याचा हक्क मिळतो ते पान-सुपारी व थोडेफार पैसे घेऊन लग्नात गोंधळ घालतात. लग्नसराई संपली की त्यांनाही इतर गोंधळ्यांबरोबर भिक्षा मागायला जावे लागते. गोंधळ्यांची मुले देवीच्या नावे पण वेगवेगळ्या पद्धतीने भिक्षा मागतात. महिला मात्र गळ्यात कवडय़ांची माळ घालून हातात परडी घेऊन दारोदार जोगवा मागण्यास जातात. लोक धान्याचे पीठ किंवा रोख पैशाच्या रूपात जोगवा वाढतात. उतारवयाच्या थकलेल्या महिलांजवळच्या देवीच्या मंदिरासमोर, दानशूर भक्तांकडून दान मिळण्याच्या अपेक्षेत, परडी घेऊन बसतात. दसरा, दिवाळी सणात यांची चंगळ असते. घरात गोडधोड करण्यापेक्षा गावातील घराघरांतून मिळेल ते मागून आणण्यावर यांचा जोर असतो. गोडाधोडाबरोबर मिळालेल्या पुरणपोळ्या, भात, भाजी, भजे यांसारखे जास्त दिवस न टिकणारे अन्न वाळवून साठवून ठेवले जाते. पुढे गरजेप्रमाणे ते जिरे, लसूण, साखर-मीठ यांसह ताकात मुरवून मोठय़ा आवडीने खातात. याला ते अंबुरा म्हणतात.
गोंधळ्यांचे कथाकथन, गायन व नृत्य या कला सादरीकरणात त्यांच्या महिला क्वचितच भाग घेतात. मुरळी किंवा इतर जातींतल्या कलाकार महिलांचा सहभाग मात्र घेतला जातो. ज्ञान-विज्ञानाचा प्रचार व प्रसार आणि आधुनिक विकास प्रक्रिया यांमुळे त्यांची परंपरागत कला त्यांच्या उपजीविकेसाठी कमजोर ठरत आहे.
गोंधळी, जोशी, वासुदेव ही नावे व्यवसायसदृश्य आहेत असे समजून यांच्यात विवाहसंबंध होत असले तरी इतर बाह्य़जातीत विवाह संबंध जोडणे निषिद्ध मानले जाते. जातपंचायतही त्यास विरोध करते शिवाय स्वत: पालकही ते फार अप्रतिष्ठेचे समजतात. याच जातीतील कुंभारकरांच्या मुलीने स्वमर्जीने केलेल्या आंतरजातीय विवाहाचा परिणाम अत्यंत क्लेशदायक व विषण्ण करणारा आहे. जातपंचायतीने दिलेल्या भारी दंडाच्या रकमेचा भरणा आणि केलेले लग्न मोडल्याशिवाय जातीत घेतले जाणार नाही ही भयावह धमकी आणि खोटय़ा प्रतिष्ठेपायी कुंभारकरांनी आपल्या आठ महिन्यांच्या गरोदर मुलीस गोड बोलून बाळंतपणासाठी माहेरला चल, असे सांगून वाटेतच तिचा गळा आवळून खून केला.
  समृद्ध लोककलेचा सांस्कृतिक ठेवा जपणारा हा कलाकार गोंधळी समाज अस्थिरता, अज्ञान, दारिद्रय़, जातपंचायत यांचा बळी ठरतो आहे. त्यांची लोककला त्यांच्या उपजीविकेसाठी भिक्षा मागण्याचे साधन न बनता ती त्यांना विकास व सन्मान मिळवून द्यायला आधारभूत कशी ठरेल आणि खास करून त्यांच्या महिलांना जगण्याचा अधिकार व विकासाची संधी मिळण्यासाठी योग्य ज्ञानकौशल्ये, व साधने कशी उपलब्ध होतील हे प्रश्न आहेत.
 प्रजासत्ताक दिनानिमित्ताने गोंधळी गाणी, नृत्ये तर पुढे आली परंतु त्यांच्या कायमस्वरूपी चरितार्थाचे काय हाही प्रश्न अधांतरीच आहे.