आजपासून नवरात्रीचा उत्सव मोठय़ा उत्साहात साजरा होईल, कोल्हापूरचं महालक्ष्मीचं मंदिरही त्याला अपवाद असणार नाही. देवीचा उत्सव साजरा होणाऱ्या या मंदिरालाही परंपरा आहे ती पुजारी घराण्याची. तब्बल आठ शतकांची. शतकानुशतकं, महालक्ष्मीची सेवा करणाऱ्या या मुनीश्वर घराण्यांविषयी.
ए क प्रसिद्ध आख्यायिका आहे. आदिलशाही राजवटीचा काळ होता. आदिलशहाचेच एक अधिकारी रामचंद्र सांगावकर प्रधान, परिस्थितीशरण अशी चाकरी करीत असले तरी वृत्तीनं धार्मिक होते. त्यांना एके रात्री दृष्टान्त झाला. स्वप्नात एक तेज:पुंज देवी सांगत होती, ‘मी इथं कपिलतीर्थी अज्ञातवासात आहे.’ कोल्हापूर हे तीर्थाचंच गाव. कपिलतीर्थाजवळ एक श्रीनृसिंह मंदिर आहे. प्रधान फार अस्वस्थ झाले. या देवीचा शोध घ्यायला हवा म्हणून कामाला लागले आणि त्यांनी स्वप्नातल्या देवीचा शोध घेतलाच.
 नृसिंह मंदिराच्या आश्रयानं राहणाऱ्या मुनीश्वरांनी परकी आक्रमणाच्या काळात श्रीमहालक्ष्मीची मूळ मूर्ती मंदिरातून हलवली. सुमारे ७५ वर्षांच्या अज्ञातवासाच्या काळात याच घराण्यानं मूर्तीची विधिवत् पूजाअर्चा चालू ठेवली आणि प्रधानांनी आदिलशहाकडे रदबदली करून मूळ मूर्तीची पुनस्र्थापना मूळ मंदिरात केल्यावर हे मुनीश्वर पुन्हा सन्मानानं देवीच्या पूजाअर्चनेत मग्न झाले. आजही कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या मंदिरात पूजाअर्चेचा मान मुनीश्वर घराण्याकडे आहे.
या घराण्याविषयी जाणून घेताना लक्षात आलं की, आपल्याला काही पिढय़ा नव्हे तर काही शतकं मागे जायला हवं. कृष्णंभट मुनीश्वर हे त्यांचे मूळ पुरुष आंध्र प्रदेशातून आले आणि कोल्हापुरात स्थिरावले. तो काळ सांगतात तेराव्या शतकातला. राजा कर्णदेव ज्यानं बदामीचं सुप्रसिद्ध मंदिर बांधलं, त्यानं कृष्णंभट मुनीश्वरांना ‘श्रीपूजक’ म्हणून कोल्हापुरात आणलं. ती परंपरा आज आठ शतकं चालू आहे.
सध्या श्रीमहालक्ष्मी मंदिराचे पुजारी किंवा ‘श्रीपूजक’ म्हणून ठाणेकर, चौधरी, बिडकर, लाटकर आणि गोतखिंडीकर एवढी घराणी काम करतात. याचीही कथा मुद्दाम ऐकण्यासारखी आहे. खरीखुरी कथा. आख्यायिका नव्हे.
मंदिराच्या व्यवस्थेसाठी राजा कर्णदेवानं १७०० एकर जमीन लावून दिली होती. पुढेही काही राजांनी देवस्थानाला जमिनी इनाम दिल्या. साऱ्याचे कागदपत्र श्रीमहालक्ष्मीच्या नावानं आहेत. मंदिराचं व्यवस्थापन प्रारंभी प्रधान घराणं, मग ताराराणींचा कालखंड आणि नंतर मंदिर व्यवस्थापन समिती असं कालानुरूप बदलत गेलं. व्यवस्थापन बदललं तरी पूजेचा मान मुनीश्वर घराण्याकडेच राहिला. मग ही आणखी पाच नावं कशी आली, तर ती कन्या वारसानं आली, हे वैशिष्टय़ लक्षात घेण्यासारखं आहे. ज्या काळात मुलीला जे द्यायचं ते लग्नातच, बाकी स्थावर जंगमचा वारसा घरच्या कुलदीपकाकडे अशी पद्धत होती, त्या काळात कन्यावारसा मान्य करणं हे मुनीश्वर घराण्याचं पुरोगामी पाऊल म्हटलं पाहिजे. वंशवृक्षाला शाखा फुटत फुटत व्यवसाय अनेकांमध्ये वाटला जात असतानाही या घराण्यात प्रत्येक जावयाला पूजेत सामावून घेतलं गेलं. त्यांच्या घरात अनेक कुटुंबांना फक्त मुलगीच झाली आणि तिचं स्वागत आनंदानं करून तिचा हक्क तिला बहाल केला गेला, म्हणून आता वर्षभराचे बारा महिने मुनीश्वर, ठाणेकर, चौधरी, बिडकर, लाटकर आणि गोतखिंडीकर या घराण्यांमध्ये विभागले गेले. त्यामुळे प्रत्येक घराण्यातला एक-एक कर्ता पुरुष कोल्हापुरातच स्थायिक झाला. बाकीच्यांनी आपापलं क्षेत्र निवडलं.
श्रीपूजक शिरीष रामचंद्र मुनीश्वर सांगत होते, ‘अहो आमच्या घरात बँक ऑफिसर्स, इंजिनीयर्स, व्यावसायिक, शिक्षक सारेच आहेत.’ स्वत: शिरीष मुनीश्वर यांच्याकडे पूजेचा मान वर्षांतून दोन आठवडे फक्त असतो. ते स्वत: शिक्षक आहेत. पत्नीही शाळेत शिकवते. मुलगा यंदा इंजिनीयर होईल.
‘देवीच्या पूजेचं प्रशिक्षण तर लहानपणापासून पाहून पाहून आपोआप होतं. श्रद्धा असली की गोष्टी चटकन आत्मसात होतात. अगदी पहाटे देऊळ उघडण्यापासून, पाद्यपूजा आरती, नैवेद्य, पंचोपचार पूजा, अलंकार पूजा, दिनक्रम आखलेला असतो. ठरावीक वेळी ठरावीक विधी रेखलेले असतात. ते मन:पूर्वक पार पाडायचे. देवीच्या तबकात आपल्या वाराला जे पडेल ते आपलं. त्यातून जे समाधान, जी शांती मिळते ते आपलं भाग्य! नवरात्राचे नऊ दिवस घरातही साग्रसंगीत नैवेद्य, सवाष्ण, ब्राह्मण जेवण हे सारं पुजाऱ्याच्या धर्मपत्नीचं कर्तव्य. ते आनंदानं पार पडतं.’
शेखर मुनीश्वर यांचे आजोबा बंडोपंत अप्पाजी मुनीश्वर हे स्वातंत्र्य चळवळीत होते. आपलं पुजारीपण सांभाळूनही ते फिल्म इंडस्ट्रीकडे ओढले गेले. कै. भालजी पेंढारकरांकडे त्यांचं जाणं-येणं असे. माधवीताई देसाईंना ते इंग्रजी शिकवण्यासाठी भालजींच्या घरी जात असत. पण चित्रपट काढण्याच्या हौसेपायी ते कर्जात बुडाले. त्यांचे पुत्र रामचंद्र बंडोपंत मुनीश्वर यांनी मग माळीनगरच्या शाळेत शिक्षकाची नोकरी पत्करली, ती योग्य सन्मानानं केली. त्यांचे विद्यार्थी बऱ्याच मोठमोठय़ा पदांवर पोहोचले. पण बंडोपंतांच्या निधनानंतर आपल्या घराण्याची परंपरा सांभाळायची तर आपल्या पातीतल्या एकानं कोल्हापुरातच राहायला हवं म्हणून ते मंदिरासाठी परत आले. आता मंदिराचं पुजारीपण हे मानाचं आणि श्रद्धेचं प्रतीक आहे. उपजीविकेचं साधन नाही हे आवर्जून सांगितलं गेलं.
शेखर मुनीश्वर हे गणित आणि विज्ञानाचे शिक्षक आहेत. सर्व जातीधर्माच्या विद्यार्थ्यांमध्ये प्रिय आहेत. कारण ते एक उत्तम खेळाडू, मार्गदर्शक आहेत. राज्यपातळीवरच्या अनेक स्पर्धासाठी आपल्या विद्यार्थ्यांना तयार करतात. वाणीवर संस्कार व्हावेत म्हणून संस्कृत श्लोकपठण, गीता पाठांतर करून घेतात. याचा फायदा इतर धर्माचे विद्यार्थीही घेतात याचा त्यांना आनंद आहे. परंपरेनं ‘श्रीपूजक’ असलेलं हे घराणं ‘श्री-सरस्वतीपूजक’ आहे याचीच प्रचीती त्यांच्या बोलण्यातून येत होती. ते म्हणाले, ‘मी अंध:श्रद्ध नाही, पण सश्रद्ध आहे.’ तोच धागा पकडून त्यांना एखादा अनुभव सांगण्याची विनंती केली तर त्यांनी काही वर्षांपूर्वीचा एक अनुभव सांगितला.
‘मी एकदा देवीची चंदनपूजा बांधायची असं ठरवलं. कोणी अशी पूजा बांधताना बघितलं नव्हतं. रात्रभर खपून संपूर्ण कुटुंबानं ५ किलो चंदनलेप तयार केला. दुपारी १२ नंतर पूजा बांधायला सुरुवात केली, तर उष्म्यानं तडे जाऊ लागले लेपाला. मग बाटलीत पाणी भरून हलका हलका स्प्रे मारत संपूर्ण मूर्तीला लेपन पूर्ण केलं. दुरून मूर्तीला डोळे भरून पाहावं म्हणून गाभाऱ्याच्या बाहेर आलो तर सभामंडपात एक अतिशय देखणी, गोरीपान तेजस्वी स्त्री मूर्तीकडे बघत म्हणाली, ‘हे रूप तू मला दिलंस होय!’ सहसा मंदिरात पुजाऱ्यांना कुणी ए-जा करीत नाही, म्हणून मी चमकलो, पण ‘होय आई’ म्हणत नमस्कारही केला. तेवढय़ात ती निघून गेली. सभामंडपात सुरक्षेसाठी असलेल्या पोलीस कॉन्स्टेबलनंही तिला पाहिलं. पण ना ती आत येताना कुणाला दिसली, ना बाहेर जाताना. साक्षात अंबामातेनं येऊन मला दर्शन दिलं अशीच माझी भावना आहे.’
‘भाव तेथे देव’ असं म्हणत शेखर मुनीश्वर यांच्यासह मी मंदिरातून बाहेर पडत होते तोच प्रसाद देणाऱ्या काऊंटरवरच्या एका हसतमुख सावळ्या, चमकदार डोळ्यांच्या मुलानं माझं लक्ष वेधून घेतलं. मुनीश्वर म्हणाले, ‘बाई, ही घ्या आमच्या ललकारीवाल्यांची चौथी पिढी. हे देवीचं चोपदार घराणं आहे. रोज दिवसातून पाच वेळा घाटद्वारातली प्रचंड घंटा वाजवायची आणि देवीच्या पालखीपुढे ललकारी द्यायची हा यांचा मान.’ या तरुणाचं नाव प्रसाद चंद्रकांत नाडगोंडे, शिक्षण एम.ए. (पोलिटिकल सायन्स). मी माझ्या चेहऱ्यावरचं आश्चर्य लपवू शकले नाही. तर प्रसाद हसत हसत म्हणाले, ‘आपण नोकरी कशासाठी करतो? आर्थिक स्थैर्यासाठी. इथं मला दोन्ही लाभतं. अहो, खूप पैसा मिळवून लोक इथं येतात. सेवेची संधी मिळावी म्हणून पुन:पुन्हा येतात. माझ्या वाड-वडिलांनी हे भाग्य मला परंपरेनं दिलंय. पोटापुरता पगारही मिळतोय. आणखी काय हवं? माझी पत्नी इंटीरियर डिझायनर आहे, तीही इथं खूश आहे. आणि बरं का मॅडम, शिक्षणाचा उपयोग आपण करून घेण्यावर असतो. मला शिक्षणानं जो दृष्टिकोन दिला त्याचा फायदा रोजच्या जीवनात होतोच आहे. मी मंदिरात समाधानी आहे.’
चार पिढय़ांचं हे प्रसाद नाडगोंडे यांचं कुटुंब अवचित गवसलं म्हणून मी आनंदात होतेच. पण कित्येक शतकांपूर्वीपासून कन्यावारसा जपणारं ‘श्रीपूजक’ मुनीश्वर घराणं आणि पिढय़ा न् पिढय़ा देवीचे चोपदार असणारे नाडगोंडे घराणं दोघांविषयी मला मनापासून कौतुक वाटलं. मंदिराची दैनंदिन कर्मकांडंही पुरोगामी डोळसपणे जपता येतात हेच तर सिद्ध करताहेत ही दोन्ही घराणी!    
vasantivartak@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व कुटुंब रंगलंय... बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Priest from the mahalakshmi temple
First published on: 05-10-2013 at 01:01 IST