भक्ती समेळ
जगात सुमारे १.५ अब्ज तर महाराष्ट्रात २.५ कोटी व्यक्तींना श्रवणदोष आहे. कर्णबधिरत्व हे अदृश्य व्यंग असल्याने ते अनेकदा पालकांच्या उशिरा लक्षात येते, म्हणूनच प्रत्येक बाळाच्या काही चाचण्या केल्या आणि बाळाला श्रवणदोष असल्यास त्यावर तातडीने उपाययोजना करता येतील. कर्णबधिरांची मातृभाषा ‘सांकेतिक भाषा’ व त्यांना सामाजिक सर्वसमावेशक करणारी ‘बोलीभाषा’ यांचे महत्त्व सांगणारा लेख २८ सप्टेंबरच्या‘जागतिक कर्णबधिर दिना’निमित्ताने.

सप्टेंबर महिन्यातील शेवटचा रविवार हा ‘जागतिक कर्णबधिर दिन’ म्हणून साजरा केला जातो. आजूबाजूचे शब्द, कोलाहल, मंजूळ स्वर आदी सगळ्याच आवाजापासून दुरावलेली माणसे म्हणजे कर्णबधिर व्यक्ती. टीव्हीवर एखादी चांगली मालिका सुरू असताना अचानक टीव्हीचा आवाज बंद झाला की, सर्वसामान्यांची घालमेल होते. टीव्हीवरील कलाकारांच्या ओठांच्या हालचाली दिसतात, मात्र ते काय बोलत आहेत याचा अर्थबोध होत नाही, तसे काहीसे या व्यक्तींबाबत आयुष्यभर घडत असते. दरवर्षी ‘वर्ल्ड फेडरेशन ऑफ द डेफ’ या आंतरराष्ट्रीय संस्थेतर्फे २२ ते २८ सप्टेंबर या कालावधीत एक संकल्पना अमलात आणली जाते आणि त्यावर वर्षभर काम केले जाते. ‘सांकेतिक भाषेचे अधिकार नसतील, तर मानवी अधिकार पूर्ण होत नाहीत’(No Human Rights Without Sign Language Rights) ही वर्ष २०२५ साठीची संकल्पना आहे.

‘जागतिक आरोग्य संघटना’ (WHO) २०२०-२१च्या माहितीपत्रकानुसार, जगात १.५ अब्ज व्यक्ती श्रवणदोषाने प्रभावित आहेत. महाराष्ट्रातील लोकसंख्येनुसार, २.२ टक्के म्हणजेच २.५ कोटी व्यक्तींना श्रवणदोष असल्याचे नमूद आहे. या व्यक्तींची ही संख्या लक्षात घेता, त्यांची मातृभाषा म्हणजे सांकेतिक भाषेचा प्रचार व प्रसार होणे गरजेचे आहे. अमेरिकेतील वॉशिंग्टन येथील गॅलॉडेट विद्यापीठ (Gallaudet University) कर्णबधिरांच्या शिक्षणासाठी प्रसिद्ध आहे. तिथे अमेरिकेतील सांकेतिक भाषेत (ASL) शिक्षण दिले जाते. याच धर्तीवर भारतातदेखील सांकेतिक भाषेत शब्दकोश तयार केलेला आहे. बोली भाषेत जशी विविधता असते, तशी सांकेतिक भाषेतदेखील असते. भारतातील सांकेतिक भाषेत समानता असावी यासाठी प्रमाणित ‘इंडियन साइन लँग्वेज’ (lSL) तयार केलेली आहे. ती शिकण्याची सुविधा ‘अली यावर जंग नॅशनल इन्स्टिट्यूट’ येथे तसेच भारतात अनेक ठिकाणी आहे.

समान संधींसाठी, सामाजिक समावेशासाठी आणि माणुसकीच्या दृष्टिकोनातूनही कर्णबधिरांच्या आयुष्यात सांकेतिक भाषेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे, याची जाणीव समाजाला करून देणे हे यामागचे उद्दिष्ट आहे. एकीकडे सांकेतिक भाषेला इतके महत्त्व मिळत असताना दुसरीकडे अनेक श्रुतक्षम पालक आपल्या कर्णबधिर अपत्याला मौखिक भाषेत शिक्षण देण्याचा निर्णय घेताना दिसतात. कानाला ‘श्रवणयंत्र’ लावून किंवा ‘कॉक्लिअर इम्प्लांट’ ही शस्त्रक्रिया करतात. यामुळे कर्णबधिर मुलांच्या कानावर आवाज पडतात. परंतु चष्मा लावल्यावर आपल्याला जसं स्पष्ट दिसतं, तसं श्रवणयंत्र लावून स्पष्ट ऐकू येत नाही. कानावर पडणाऱ्या ध्वनीला प्रतिसाद देणे, त्या आवाजांचा अर्थ लावणे, ढोबळ आवाज व भाषेचे आवाज यातील फरक ओळखणे इत्यादी गोष्टी मुलांना शिकवाव्या लागतात. कर्णबधिर शाळेतील विशेष शिक्षक हे कार्य करत असतात, तसेच ‘कॉक्लिअर इम्प्लांट’ केलेल्या मुलांसाठी थेरपी सेंटरदेखील असतात.

या मुलांचे ‘भाषा शिक्षण’ हे मधमाशीच्या न्यायाने चालते. मधमाशी अनेक फुलांवर बसते तेव्हा एक थेंब मध ती गोळा करते, तसेच एक शब्द अनेक वेळा कानावर पडला की तो या मुलांच्या लक्षात राहतो आणि मुले तो शब्द बोलण्याचा प्रयत्न करतात. प्रथम शब्द, नंतर छोटी वाक्ये, छोटे प्रश्न यातून मुले हळूहळू भाषा समजायला व बोलायला शिकतात. सोबतीला वाचातज्ज्ञांच्या मदतीने मुलांचे उच्चार स्पष्ट करता येतात. ऐकू येत नाही म्हणून बोलता येत नाही. भाषा शिकणे अवघड जाते, परंतु एकदा का या मुलांची भाषेची गाडी रुळावर आली की ही मुले सर्वसामान्य मुलांसोबत शिकू शकतात. समाजात उत्तम प्रकारे मिसळू शकतात.

काही मौखिक पद्धतीने शिकवणाऱ्या विशेष शाळेत शिक्षण घेतलेली मुले इयत्ता पहिलीनंतर किंवा इयत्ता चौथीनंतर सर्वसामान्य मुलांच्या शाळेत शिकण्यासाठी जातात. उत्तम गुणांनी उत्तीर्ण होतात. पदवीधर, द्विपदवीधर, अभियांत्रिकी, एमबीए तर होतातच, शिवाय सी.ए. आणि आय.आय.टी.मधूनही इंजिनीयरिंगची पदवी मिळवलेले अनेक कर्णबधिर विद्यार्थी आहेत. ‘सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट’मधून फाइन आर्टची पदवी मिळवलेल्या अजिंक्यची आई असो किंवा सी.ए. झालेल्या जसकिरणची. त्या म्हणतात,‘‘समाजात मिसळण्यासाठी आमच्या मुलांना समाजाची भाषा येणे आवश्यक आहे. अनेक मराठी पालक नाही का आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत टाकतात? कारण पुढे जाऊन भाषेमुळे त्यांच्या प्रगतीत अडथळा नको.’’

रश्मी पाटील वयाच्या विसाव्या वर्षापासूनच स्वत:च्या पायावर उभी आहे. तिने बनवलेली विविध उत्पादने प्रसिद्ध आहेत. याशिवाय ती भरतनाट्यमच्या परीक्षाही उत्तीर्ण आहे. तिचे नृत्याचे कार्यक्रम विविध ठिकाणी होत असतात. दोन वर्षांपूर्वी एका सौंदर्य स्पर्धेमध्ये भाग घेऊन ती विजेती झाली. एवढेच नाही, तर नुकताच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासमोर पदन्यास साकारण्याची व त्यांच्याकडून कौतुकाची थाप मिळवण्याची संधी तिला मिळाली. खरंच गगनाला गवसणी घालावी असे तिचे कर्तृत्व आहे.

निखिलेश ‘फ्रीलान्सिंग’ करतो. भाषेमुळे त्याला समाजात मिसळायचा आत्मविश्वास मिळतो. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘छावा’ या सुप्रसिद्ध चित्रपटात त्याने ‘व्हिज्युअल इफेक्ट’ आणि ‘कंपोझिटर’ची भूमिका पार पाडली होती. याशिवाय या चित्रपटात एक छोटी भूमिकाही साकारली होती. ऐश्वर्या शिक्षिका झाली आहे, तर अभिजीतने स्वत:ची पॅथॉलॉजी लॅब सुरू केली आहे. अब्दी सिव्हिल इंजिनीयर झाला आहे, तर अवंती एमबीए आहे. प्रथमेश माळीने तर इंजिनीअरची पदवी ‘आयआयटी’ पवई येथून प्राप्त केली आहे आणि आता एका आंतरराष्ट्रीय कंपनीत नोकरी करत आहे. आपल्या कामाचे स्वरूप सांगताना कुंदन म्हणतो, ‘‘माझ्या हाताखाली बारा कर्णबधिर मुले काम करीत आहेत. मालकाने सांगितलेले काम मी त्यांना समजावून सांगतो. सांकेतिक भाषेतून मी त्यांच्याशी बोलतो आणि मालकाशी बोलीभाषेतून. थोडक्यात, मालक आणि कामगार यांच्यातील मी दुवा आहे. पोस्ट खात्यात अधिकारी असलेली सिद्धी डवरी, ‘महाराष्ट्र शासन प्रेस’मध्ये असलेला सुशांत मांजरेकर, ‘स्टेट बँके’तील अधिकारी नमिता अशी कितीतरी उदाहरणे देता येतील. या सर्वांचं म्हणणं एकच आहे की, व्यवस्थित बोलता येत असल्यामुळे आम्ही समाजात सहज वावरतो. आमच्यात आत्मविश

अंधत्व, अस्थि विकलांगता, मतिमंद असणं ही दृश्य व्यंग आहेत. अशी बाळे जन्मत:च अथवा काही महिन्यांतच डॉक्टरांच्या निदर्शनास येतात, मात्र कर्णबधिरत्व हे अदृश्य व्यंग आहे. या मुलांची वाढ सर्वसामान्य मुलांप्रमाणे होते. दोन ते तीन वर्षांचे झाल्यावर जेव्हा मूल बोलत नाही किंवा हाक मारली तरी लक्ष देत नाही. तेव्हा ते पालकांच्या लक्षात येते. त्यानंतर बाळाच्या कानाची तपासणी व उपचार सुरू होतात. तोपर्यंत बाळाची महत्त्वाची पहिली दोन ते तीन वर्षं वाया गेलेली असतात. यावर उपाय म्हणून प्रत्येक बाळाच्या जन्मत:च केल्या जाणाऱ्या इतर चाचण्यांप्रमाणे ‘ओएई’ (OAE) अथवा ‘बीईआरए’ (BERA) या चाचण्या केल्या तर बाळाचा श्रवणदोष लवकर लक्षात येईल. त्यावर उपचार करता येतील. लवकरात लवकर बाळाच्या कानाला श्रवणयंत्र लावता येईल अथवा ‘इम्प्लांट’ करता येईल. त्यामुळे त्याच्या कानावर आवाज, शब्द लवकर पडतील व बोलीभाषेची समज त्याला वेळेवर येईल. मूल वयानुरूप बोलायला शिकेल. अशा बाळांना व त्यांच्या पालकांना मार्गदर्शन करण्यासाठी विशेष शाळांमध्ये ‘अर्ली इंटर्वेंशन सेंटर’ (० ते ६ वर्षांच्या मुलांमधील अपंगत्व किंवा विकासात्मक समस्या लवकर ओळखून त्यावर तातडीने उपचार करणारे केंद्र) असावे असे ‘दिव्यांग शाळा संहिता’मध्ये नमूद आहे. पालक येथे जाऊन आपल्या पाल्यासाठी विनामूल्य मार्गदर्शन घेऊ शकतात.

‘भाषा’ ही संवादाचे साधन आहे. आज भाषेमुळेच इतर प्राणी आणि मानवामध्ये वेगळेपणा दिसतो. भाषेतून भावना व्यक्त करता येतात, विचार मांडता येतात. परंतु प्रश्न जेव्हा कर्णबधिर व्यक्तींच्या भाषेचा येतो, तेव्हा त्या दोन प्रकारे असतात. एक ‘सांकेतिक’ आणि दुसरी ‘मौखिक’. दोन्ही भाषांचे महत्त्व कर्णबधिर व्यक्तीला व्यक्त होण्याच्या दृष्टिकोनातून अनन्यसाधारण आहे. त्यामुळेच ‘कानाने बहिरा, मुका परी नाही. बोलविता भाषा बोले कसा पाही,’ या चंद्रशेखर गाडगीळयांनी गायलेल्या ओळी शब्दश: खऱ्या ठरतील.

(लेखिका मुंबईतील ‘द सेंट्रल स्कूल फॉर द डेफ’च्या मुख्याध्यापिका आहेत.)

bhaktisamel1@gmail.com