आजची आपली ‘चतुरंग’ची (८ जून) पुरवणी खरोखरच बहारदार व वाचनीय आहे. ‘एक टाळी’ हा अभ्यासपूर्ण लेख लिहून गीतांजली राणे यांनी वाचकांना अंतर्मुख तर केले आहेच, पण ‘उरलेल्यांनी’ ‘त्यांच्याशी’ कसे माणुसकीने वागणे आवश्यक आहे याचेही चुरचुरीत अंजन घातले आहे.
साधेपणा हाच युगपुरुषांचा अनुकरणीय गुण कसा आहे ते स्पष्ट करणारा प्रा. मिलिंद जोशी यांचा लेख खरं म्हणजे तरुण मंडळींनी व तरुण आणि नव्या राजकारणी मंडळींनी वाचायला हवा व शिक्षक आणि प्राध्यापकांनी तर आत्मसात करायला हवा, म्हणजे वर्गात जाताना मोबाइल फोन न नेण्याचे भान तरी शिक्षकवर्गाला राहील.
‘चतुरंग’ची मैफल सात सुरांप्रमाणेच शब्दांनी सजवली आहे ती संगीतकार व गायक यशवंत देवांनी! ते स्वत:च ‘देव’ आहेत. त्यामुळे त्यांच्यासमोर सप्तसूर हात जोडून उभे आहेत व ही सरस्वती कशी प्रसन्न आहे ते सांगण्याचे शब्दसामथ्र्यही त्यांच्याजवळ आहे. त्यामुळे त्यांचा हा प्रवास आपल्यालाही एका वेगळ्याच स्वरयात्रेला घेऊन जातो. आपलेही मन नकळत ‘सूर लाऊ दे रे’ अशी साद घालू लागतं.
इतरही सर्व लेख वाचनीय आहेत, विचार करायला लावणारे आहेत. रिमझिम बरसणाऱ्या पावसाच्या जलधारांसोबत आजची आपली ‘चतुरंग’ची शब्दधारा ही खूप खूप आनंददायी आहे. धन्यवाद!
– नीळकंठ नामजोशी, पालघर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विनोद पेरणी आवडली
आपल्याला विनोदाची समृद्ध परंपरा असताना गेल्या काही वर्षांमध्ये मात्र (अर्थात सन्माननीय अपवाद वगळता) पुस्तके, सिनेमा, मालिका, नाटके, इ. अनुभवण्यास प्रचंड सहनशक्ती व एकाच ठिकाणी काही तास बसण्याची जिद्द लागते. एवढी हिंमत दाखवूनही शेवटी हातात येते ती निराशा व स्वत:चाच राग! विनोदाच्या या उत्कृष्ट शस्त्राची धार सध्याच्या सारस्वतांना नीट परजता येत नाहीये, असा वारंवार अनुभव येऊ लागलाय. विनोदाच्या नावाखाली नुसता थिल्लरपणा खऱ्या रसिकांच्या नशिबी आला आहे. ओढूनताणून केलेला विनोद पाहून किंवा वाचून अक्षरश: केस उपटून टाकावेसे वाटतात. आश्चर्य म्हणजे असल्या थिल्लर व चिल्लर विनोदी सिनेमा-मालिका-पुस्तकांना बहुतांश प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलेले दिसते. ‘सर्कशी’तील विदूषकी चाळे आणि ‘रेल्वे’तील आंधळ्या भिकाऱ्यांची गाणी यांचा कलेच्या प्रांतातजो दर्जा (?) असतो, तोच ‘दर्जा’ या अनेक हिंदी-मराठी विनोदी मालिकांचा आहे. शूटिंग चालू असताना कलाकारांकडून बोलण्याच्या, विसरण्याच्या किंवा बोबडी वळण्याच्या झालेल्या चुकांना जेव्हा प्रेक्षक नैसर्गिक ऊर्मीने व उत्स्फूर्तपणे हसतात, तेव्हा त्यांचे तेच हसणे संहितेप्रमाणे विनोद. कहर म्हणजे मालिकेच्या शेवटी ही चुकलेली दृश्ये दाखविली जातात, याला प्रामाणिकपणा म्हणावा की निलाजरेपणा? इतर विनोदी मालिकांमध्येही होत नसावे कशावरून? विनोदाचा हा अपमान नव्हे का?
हिंदी-मराठी चित्रपटातील बाष्कळ, अतार्किक व बिनडोक विनोदांच्या अशा या वातारणात ४ मेची ‘चतुरंग’ भयाण व रणरणत्या उन्हात अंगावर हळुवार शीतल हवेची झुळूक यावी अशी वाटली. शि. द. फडणीसांची व्यंगचित्रांच्या माध्यमातून चिमटे काढणारी आणि स्त्रियांची मानसिकता अधोरेखित करणारी विनोदनिर्मिती मन उल्हसित करून गेली. ‘रविप्रकाशा’इतक्या स्वच्छ प्रतिभा लाभलेल्या दिलखुलास व्यक्तिमत्त्वांबद्दलचे किस्से, काही गोष्टी, इ. चांगल्याच ‘जमती’च्या होत्या. मोहिनी निमकरांच्या शेजारणीने तर अक्षरश: धमाल आणली. ‘बोधिवृक्षातील’ थोरांचे बोल जगण्याची नवी दृष्टी देऊन गेले. एकंदरीत, विनोद हरवलेल्या जीवनात हास्यदिनाच्या निमित्ताने केलेली विनोद पेरणी खूप आवडली.
– राजेश अशोक कोरे, जळगाव</strong>

मार्मिकता भावते!
‘‘तरीही..? म्हणूनच..?’’ हा मंगला गोडबोले यांचा लेख (२५ मे.) वाचला. जणू काही त्यांनी आमच्या सोसायटीतल्या प्रसंगाचेच वर्णन केले आहे. मंगला गोडबोले यांचे लेख, हे बरेचदा सुशिक्षित मध्यम किंवा उच्च मध्यमवर्गामधील समस्यांवर असतात. त्यांचे निरीक्षण, बारकावे व संवाद इतके तंतोतंत पटतात की, डोळ्यापुढे चित्र उभे राहते. आताची पोरं आणि आमच्या लहानपणी.. अशी मुद्दय़ाला सुरुवात करून दोन पिढय़ांमधील तफावत मार्मिकपणे कुटुंबांसमोर ठेवतात. शेवटी कडू क्विनाइनची गोळी साखरेत घोळून सगळ्यांना देतात.
१८ वर्षे वयाच्या ऐन उमेदीत मुलाने आत्महत्या केली व कॉलनीतल्या लोकांनी आई-वडिलांविषयी कुजबुज सुरू केली. बालमानस शास्त्रज्ञपण सांगतात, मुलांवर सक्ती करू नका, त्यांना हवं ते शिकू द्या- हवं ते करू द्या वगैरे वगैरे. सतत पालकांना लक्ष्य करतात हे अयोग्य आहे.
हल्ली मुलेच १२ वीनंतर त्यांचे जीवन आखीव-रेखीव वेलप्लॅन करून त्यावर ठाम असतात. मात्र, बाहेरची परिस्थितीच अस्थिर अनिश्चित आहे. सगळं ठरलेलं- ठरवलेलंच होतं असं नाही. कारण माणूस स्वत: पलीकडच्या असंख्य गोष्टींवर अवलंबून असतो. कोवळ्या वयात अपयश सहन होत नाही, झेपत नाही मग..
हल्लीची पिढी पाय पसरून अंथरूण शोधतात तर आधीची पिढी अंथरूण बघूनच पाय पसरतात हा फरक आहे. कोणाची बाजू घेणार? हा खरा कळीचा मुद्दा आहे.
– श्रीनिवास स. डोंगरे, दादर

‘नवप्रेरणा देणारे मनोगत’
‘माझ्या मना लागो छंद’ हा ‘चतुरंग मैफल’मधील लेख (दि. १ जून २०१३) म्हणजे ज्येष्ठ संगीतकार व गायक श्रीधर फडके यांनी विनम्रपणे व्यक्त केलेले मनोगत होय. आई-वडील या नात्याने त्यांचे पिताश्री स्वरगंधर्व सुधीर फडके आणि अविरत संगीतसाधना करणाऱ्या त्यांच्या मातोश्री ललिता फडके या उभयतांनी त्यांना दिलेल्या अमोल अशा संस्कारशिदोरीबद्दल आदरयुक्त शब्दांनी त्यांनी आपला कृतज्ञताभाव व्यक्त केला आहे. आई-वडिलांचे आशीर्वाद आणि रसिकांच्या शुभेच्छा यामुळेच यश संपादन करता आले हे त्यांनी नम्रपणे सांगितले आहे. त्यांची संगीतावरील निष्ठा, संगीतात नवं काही घडवून आणण्यासाठी असलेली प्रयत्नशील वृत्ती, आपल्या हातून चांगल्या गोष्टी घडून याव्यात ही त्यांच्या मनाची असलेली तळमळ, ईश्वरावरील असीम श्रद्धा, कलेबद्दल वाटणारे प्रेम, नवनवीन स्वरांचा शोध घेण्याचा अविरत जपलेला ध्यास या त्यांच्या गुणांचा वाचकांना झालेला परिचय हे त्यांच्या मनोगताचे वैशिष्टय़. ‘गाण्याची चाल साधी असावी’ ही बाबूजींची शिकवण त्यांनी श्रद्धापूर्वक कृतीत आणली आहे. त्यांचे हे मनोगत संगीतक्षेत्रातील नवागतांना नवप्रेरणा देणारे आहे.
– द. श्री. कुलकर्णी, नगर

त्यागमूर्ती ‘सुवर्णा’
जागतिक कुटुंब दिनानिमित्त १८ मेच्या पुरवणीतील ‘माझा असाही संसार’ या लेखात सुवर्णाच्या हिमतीची व त्यागाची कहाणी वाचली. याबाबत काही प्रश्न मनात उभे राहिले.
सुवर्णाने कुटुंबासाठी नवऱ्यासाठी, सासू-सासऱ्यासाठी केले. या सुवर्णाच्या जागी जर अविनाश असता किंवा कोणताही पुरुष असता तर त्याने आपल्या पत्नीसाठी आणि तिच्या आई-वडिलांकरिता हे केले असते का? उलट त्याच्याच आई-वडिलांनी यातून मोकळे होण्याचा सल्ला दिला असता.
आज सर्वत्र बहुतांशी स्त्रिया या शिक्षण घेऊन स्वत:च्या पायावर उभ्या राहून नोकरीसमवेत घर कुटुंब सांभाळत आहेत. या कामात पुरुषांचे त्यांना किती सहकार्य मिळते, हे प्रत्येक कुटुंबागणिक वेगळे आहे. काही कुटुंबांत त्यांना गोड बोलून त्यांच्याकडून काही गोष्टी करून घेतल्या जातात. उदा. रूढीपरंपरा, सणवार, कुळाचार, इ., पण हे सर्व सांभाळताना स्त्रियांची शारीरिक कार्यक्षमता दिवसागणिक कमी होते आणि स्वत: आजारी पडले की बघावयास कोणीच नसते अशा अनेक स्त्रिया आज समाजात दिसून येतात, तर काही स्त्रिया काही गोष्टी अंगाला लावून घेत नाहीत, त्या व्यवस्थित राहतात.
आमच्या पिढीने हा त्याग हौसमौज न करता केला, परंतु यापुढील पिढी असे करेलच असे नाही. कारण कामाचे वाढलेले तास, आई-वडिलांच्या नोकऱ्या, इ.गोष्टींमुळे मुलांवर संस्कार करावयास आपण कमी पडतो असे वाटते. उद्या सुवर्णाची मुलगी सुवर्णाची किती काळजी घेईल याबाबत काहीच सांगू शकत नाही.
सुवर्णासारख्या स्त्रिया आहेत म्हणून भारतात कुटुंबसंस्था अजून मोडीत निघालेली नाही, याचा मात्र अभिमान वाटतो.
– सीमा नागवेकर, बोरिवली, मुंबई</strong>

मंतरलेले दिवस आठवले
दि. ४ मे २०१३ च्या ‘चतुरंग’ संस्करणातील शि. द. फडणीस यांचे मनोगत आणि रविप्रकाश कुलकर्णी यांचा ‘काही गोष्टी काही गमती’ हे लेख, माझ्यासारख्या पासष्टी ओलांडलेल्या आणि वैभवशाली पुण्यनगरीतील मंतरलेले दिवस अनुभवलेल्यास भावविवश करणारे होते. जे वाचल्यावर मी त्या पुण्यात स्वत:स हरवून गेलो. ‘हंस’, ‘मोहिनी’, ‘नवल’चे दर्जेदार अंक आठवले. शि. द. फडणीस यांच्या तरल कल्पनाशक्तीतून आणि कुशल कुंचल्यातून साकार झालेली अजोड व्यंगचित्रे आठवली. कै. वा. य. गाडगीळ यांचे ‘हिरव्या चादरीवर’ ही अभ्यासपूर्ण आणि तरीही रंजक लेखमाला आठवली. कै. नारायण धारप आणि यशवंत रांजणकर यांच्या दर्जेदार गुढकथा आठवल्या. कै. पु. भा. भावे, अरविंद गोखले- गंगाधर गाडगीळ यांच्या कितीतरी दर्जेदार कथा ‘हंस’मधूनच प्रसिद्ध झाल्या होत्या- याच कालखंडात कै. ग. वा. बेहेरे यांचे ‘सोबत’ आणि भाऊ माजगावकरांचे ‘माणूस’ साप्ताहिक प्रसिद्ध होत असे, ज्यांची वाचक वाट पाहात असत- खरं तर मी या मंतरलेल्या दिवसात काही काळ स्वत:स हरवून गलो – ‘चतुरंग संस्करण’ खऱ्या अर्थाने दर्जेदार वाचनाची- पंचतारांकित मेजवानीच आहे- ही पुरवणी वाचल्यावर मलाही जुन्या पुण्यासंबंधी लिहिण्याची अनावर इच्छा झाली. असो.
अशोक आफळे, कोल्हापूर</strong>

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Readers response
First published on: 06-07-2013 at 04:05 IST