कान झिंगाट किंवा पिसाट झालेले असताना दूर माळरानावरची गाण्याची अस्सल लकेर ऐकली की त्या सौंदर्याकडे मन खेचलं जातं… चालीतलं संगीताचं सौंदर्य मनात अनाहूतपणे रुजत जातं. काही श्लोक उच्चारायला कठीण असतात, पण त्यातील छंदोबद्धता त्या कठीण शब्दांवर मात करते आणि त्याचं पाठांतर सहज होऊ लागतं. गणितातले पाढे सहज पाठ होणं असो की चाली लावलेल्या कवितांचं पाठांतर, ते सोपं होतं त्यातल्या गेयतेमुळे. साध्या-साध्या चालींमधलं ध्वनिसौंदर्य मनावर बराच काळ रेंगाळत राहतं…
‘डिजिटल डिटॉक्स’ म्हणून तनुजानं त्या दिवशी गजबजाटी जगापासून जरा दूर, शांत ठिकाणी जायचं ठरवलं. टीव्ही, मोबाइल फोन, गेमिंग, इंटरनेट, रिंगटोन्स, घोषणा, आरडाओरडा, तार सप्तकातील गाणी, अशा रोजच्या असह्य गदारोळातून दूर निघून तिला फक्त स्वत:सोबत राहायचं होतं. त्यासाठी तिनं एक छानसं पाश्चात्त्य वळणाचं महागडं कॉफी शॉप निवडलं. स्वच्छ काचांच्या पलीकडे असलेलं कॉफी टेबल, तिथला अॅम्बियन्स वा वातावरण आणि कॉफी शॉपबाहेर दरवळणारा अरोमा. ते पाहून निवांतपणाच्या कल्पनेनं ती सुखावली.
आता बाहेरच्या जगाशी संपर्क तोडून या वातावरणात स्वत:शीच शांतपणे दोन-तीन तास गप्पा मारायच्या, या मूडमध्ये ती एका एकांतातल्या कॉफी टेबलसमोर जाऊन बसली. थोड्याच वेळात तिच्या पुढ्यात दरवळणारी कॉफी आली. पण तिच्या लक्षात आलं की त्या कॉफीसोबत तिला अपेक्षित असलेली शांतता मात्र तिथे नाही. त्या झगमगीत माहोलमध्ये चार वेगवेगळ्या टीव्ही स्क्रीनवरून दिसणारी चार वेगवेगळी दृश्यं, चार वेगवेगळ्या प्रकारचं ऐकू येणारं संगीत, न समजणारे शब्द, न लागणारा अर्थ आणि मध्येच गायकांचे तार सप्तकात आक्रोश करणारे आवाज, कशाचाच कशाशी काहीच संबंध नव्हता, पण तरीही ‘करमणुकीच्या नावाखाली’ आवडीविरुद्ध जाणारं ऐकणं थोपवलं जात होतं. ते दृश्य आणि संगीत एक बहुरंगी मिश्रण असलं, तरी तिच्या कल्पनेतील शांतता अशी नव्हती. तिच्या मेंदूला आणि मनाला इतके वेगवेगळे ‘सिग्नल्स’मिळत होते की, त्यापैकी नेमकं कोणत्या संगीताकडे आणि दृश्याकडे लक्ष द्यावं हा गोंधळ तिच्या मनात निर्माण झाला. ‘चारी बाजूंनी आक्रमण करणारं हे संगीत ‘माझं’ नव्हे’ हे समजल्यावर, असह्य होऊन शेवटी तिथून ती उठली आणि पुन्हा एक नवी शांत जागा शोधू लागली.
आपल्यापैकी बऱ्याच जणांचं हे असंच होत असतं. काचेपलीकडे दिसणारा मोहक माहोल पाहून एखाद्या छानशा ठिकाणी आत शिरावं आणि तिथल्या संगीताने मनातल्या अपेक्षित शांततेला सुरुंग लागावा असं काहीसं वरचेवर होऊ लागलंय… जिम, दुकान, शाळा, मंदिर कुठेही असो, शांततेच्या मानगुटीवरच बसू पाहतात जणू माणसं. क्षेपणास्त्राप्रमाणे कुठूनही कानात घुसणारे आवाज आणि झिंगाट झालेलं वातावरण यात शांततेचं भान कसं जागं व्हावं? पण आवाजाच्या या झिंगाटातही कुणी तरी शहाण्या कानाचं संगीतही गात असतं. त्याकडे आपोआप लक्ष जातं.
गावातल्या गल्लीबोळातून भल्या सकाळी मोरपिसांची टोपी घातलेला एक वासुदेव एक साधंसं गाणं एकतारीवर गात हिंडत होता…
‘‘सकाळच्या पारी वासुदेव आला
जीवभाव गेला, शिवभाव आला’’
डीजेत धांगडधिंगा करायला मिळावा म्हणून रात्रीच्या कीर्तनाला टांग मारणारा पक्या साखरझोपेत त्या वासुदेवाचं गाणं ऐकत होता. वासुदेवाच्या हातातली एकतारी आणि चिपळ्यांच्या नादामुळे ते क्लिष्ट शब्दही त्याला हवेहवेसे वाटू लागले आणि त्याने डोळे किलकिले केले. त्या लोकगीतातील साधासुधा छंदप्रवाह त्याच्या मनावर रेंगाळू लागला. लोकगीत असूनही त्यात फार मोठं तत्त्वज्ञान भरलेलं होतं, वास्तविक नुसत्या शब्दातून कदाचित पक्याला ते समजलं नसतं पण वासुदेवाच्या संगीतातील आर्जवी शब्दप्रवाहातून अर्थाच्या झऱ्यात उतरल्याचं एक वेगळंच सुख त्याच्या मनाला जाणवत होतं. आज सकाळी-सकाळी वासुदेवाचं ते गाणं ऐकून कालच्या डीजेची झिंग उतरली होती आणि त्या लयीत मानही आपोआप डोलू लागली होती. त्यानं खिडकीतून खाली बघितलं तेव्हा त्याची आई वासुदेवाच्या झोळीत धान्य टाकत त्याला म्हणत होती, ‘‘काय ग्वाड गळा दिलाय देवान.’’आपल्या सांस्कृतिक श्रीमंतीचं हे सुंदर वास्तव पाहताना पक्याच्या मनात रात्रीच्या कीर्तनाला टांग मारल्याबद्दल ‘गिल्ट’आला, कारण वासुदेवानं त्याचा कान ‘शहाणा’ केला होता. आपल्यापैकी बऱ्याच जणांचं हे असंच होत असतं. कान झिंगाट किंवा पिसाट झालेले असताना दूर माळरानावरची गाण्याची एखादी अस्सल लकेर ऐकली की त्या सौंदर्याकडे मन खेचलं जातं आणि कान ‘शहाणे’ होऊ लागतात.
आपले कान वेडे असावेत असं कुणाला बरं वाटेल? कानावर जिथे जिथे चांगलं आणि दर्जेदार पडण्याची शक्यता आहे तिथे तिथे मानवी संस्कारशील मनाला आपसूकच धाव घ्यावीशी वाटते, कारण ती एक प्रकारे मनाची भूक असते. ऐकण्याची ही भूक शमविण्यासाठी लोकगीते, लोकधून, वेदपठण, सामूहिक भजने, संगीत नाटके, अभिजात संगीतांचे कार्यक्रम, कीर्तन प्रवचने, व्याख्याने, सामूहिक लोकपरंपरा अशा ज्या अनेक श्रवणप्रथा आपल्याकडे आहेत त्या पुन्हा लोकप्रिय झाल्या पाहिजेत. अशा दर्जेदार श्रवण मेजवान्यांमधून केवळ नादयुक्त उच्चार, सुरेल संगीत, चांगली आणि प्रभावी वाक्ये किंवा दर्जेदार शब्दसंपदाच हाती लागते असे नव्हे तर या व्यतिरिक्त, एक प्रकारची ‘रसाळ-वाणी’ आणि तिच्यातून निर्माण होणारे ध्वनिसौंदर्यदेखील ऐकायला मिळते. वारकरी संप्रदायात हरिपाठ, भजन हा नित्यक्रम अखंड सुरू असतो; तो ऐकणारे श्रोते पुढे सहजच गाऊदेखील लागतात, कारण शहाण्या कानांनी ऐकता ऐकता त्या चालीतलं संगीताचं सौंदर्य त्यांच्या मनात अनाहूतपणे रुजत असतं. अभंगांचे शब्द, भजनाची चाल, भजनाबरोबर वाजत असलेल्या वाद्यांची लय, या सगळ्या संगीत सौंदर्याशी ते एकरूप होत असतात. हा परिपाठ त्यांच्या अंगवळणी पडत जातो आणि म्हणूनच ते कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय केवळ कानांनी ऐकलेल्या दर्जेदार संगीताच्या श्रवणातून आणि निरीक्षणातून सहजपणे गाऊ लागतात.
गळ्यावर चांगलं काही तरी चढण्यासाठी, कानावर तसंच चांगलं काही तरी पडावं लागतं. कानावर पडणारं श्रवण हे कोणत्या वाणीतून (रसाळ की रटाळ?) ऐकायला मिळतं याच्या निवडीला फार महत्त्व आहे. एखाद्या विद्वान प्रवचनकाराचं प्रवचन ‘रटाळ’ वाटू शकतं परंतु कीर्तनकाराचं निरूपण ‘रसाळ’ वाटतं कारण त्यात संवाद आणि वाणीमाधुर्य असतं म्हणून त्यातून ध्वनिसौंदर्य अनुभवता येतं. रसयुक्त मधुर आणि आर्जवी वाणीतून भाषा, वाक्यं किंवा शब्द वजा केले तरीही शब्द-सुरांच्या चढउतारांचा म्हणून एक ओघ किंवा प्रभाव असतो, जो ऐकणाऱ्याच्या मनाला सुखकारक वाटत असतो. विद्वत्तापूर्ण भाषा एकसुरी, रटाळ आणि रूक्ष तर असतेच शिवाय तिचा अर्थही योग्य लावावा लागतो, तो नीट लागला नाही तर प्रसंगी त्यातून अनर्थही उद्भवतो. याउलट भाषा साधी असेल परंतु वाणी रसाळ असेल तर ती मधुर आणि सुंदर तर वाटतेच परंतु तिच्यात मन जिंकण्याचं- ंदेखील सामर्थ्य असतं; कारण त्यात संगीत मिसळलेलं असतं. हरिपाठ नुसता वाचला तर समजायला अवघड जाऊ शकतो; परंतु बाबा महाराज सातारकरांसारखी अधिकारी व्यक्ती तोच हरिपाठ समरसून गाते त्या वेळी शब्द कितीही जड असले तरीही नुसत्या चालीतल्या ध्वनिसौंदर्याचा प्रभाव मनाला आनंद देऊन जातो आणि अवघड शब्दांचाही अर्थ, आपल्या आतमधल्या संवाद प्रक्रियेचा कप्पा उघडून, हळूहळू आपोआप समजू लागतो.
बऱ्याचदा आपण करमणूक आणि मनोरंजन यात गल्लत करतो. करमणूक म्हणजे तात्पुरता विरंगुळा पण ‘मनो’रंजनाचा संबंध मनाशी आणि आनंदाशी आहे असं लक्षात घेतलं तर त्यातून कळत नकळत अभिरुचीच्या कक्षा विस्तारतील. ‘नुसतंच कानांनी यंत्रवत काही तरी ऐकणं म्हणजे ‘कान’रंजन तर मनाने रसास्वाद घेणं म्हणजे ‘मनो’रंजन’ असं लक्षात घेतलं, तर कलेतील अभिजात दर्जाचा आनंद समरसून घेता येतो, तो बराच काळ टिकू शकतो आणि पुन्हा पुन्हा घ्यावासा वाटतो. श्रवणाच्या बाबतीतलं मनोरंजन दर्जेदार करण्यासाठी कानांवर शहाणं करणारं संस्कार करणं, स्वत: गाऊन सहभाग घेणं फार आवश्यक आहे.
आजही सकाळ, दुपार, संध्याकाळ, अनेक घरांत विविध स्तोत्रं आणि जेवताना श्लोक किंवा सुभाषितं म्हणण्याची पद्धत आहे. स्वत:च्याच संगीतातून स्वत:चे कान शहाणे व्हावे हा एक सोपा मार्ग. यातील काही श्लोक उच्चारायला कठीण असतात; पण त्यातील छंदोबद्धता ही त्या कठीण शब्दांवर मात करते. त्या छंदात असलेल्या चढ-उतारांमुळे किंवा विशिष्ट चालीमुळे कठीण श्लोकांचे, सुभाषितांचे आपल्याला पाठांतर करावंसं वाटू लागतं. एवढंच काय, गणितातल्या अंकांना साधी हेल काढण्याची जरी चाल लावली तरी ‘बे एके बे’ असे पाढे आपोआप पाठ होऊ लागतात याचा आपल्यापैकी अनेकांनी (मराठी माध्यम) अनुभव घेतला असेल. मराठी, हिंदी कविता वाचता वाचता पाठ होऊ लागतात कारण त्या वाचनाला ‘चाल’ लागलेली असते. चालीतले शब्द जिवंत वाटतात. साध्या-साध्या चालींमधलं ध्वनिसौंदर्य आपल्या मनावर बराच काळ रेंगाळत राहतं, म्हणून त्यातील शब्द मुद्दाम लक्षात ठेवावे लागत नाही. मनात साठवलेली चाल आठवली की तिचे शब्द आपोआप आठवू लागतात. असं काहीसं ‘साठवलेलं’ आठवलं की पटतं, ‘शहाण्या कानांनी ऐकलेलं श्रवणच मनाच्या कप्प्यात जपून ठेवता येतं.’