३० मेच्या ‘चतुरंग’मधील ‘विवाहाचे ना हरकत प्रमाणपत्र’ या मंगला सामंत यांच्या लेखावर अनेक प्रतिक्रिया आल्या, त्यातील या काही निवडक प्रतिक्रिया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

समस्येच्या मुळांशी भिडणारा लेख
मंगला सामंत यांचा हा लेख अतिशय अभ्यासपूर्ण आणि समस्येच्या मुळांशी भिडणारा आहे. त्यांनी लिहिल्याप्रमाणे अशा समस्यांवर वरवर विचार केला जातो आणि ‘पुरुषांची मानसिकता बदलली पाहिजे’ असे ढोबळ विधान केले जाते. विवाहसंस्था आवश्यक आहे हे खरे असले तरी त्यात मानवाने निसर्गनिर्मित प्रेरणेला नियंत्रित करण्याचा प्रयत्न केलेला दिसतो, या वस्तुस्थितीकडे  डोळेझाक करून चालणार नाही. लेखिकेने उल्लेख केलेल्या वस्तुस्थितीला सामोरे जाण्याचे धैर्य जोपर्यंत समाज दाखवत नाही, तोपर्यंत यावर ठोस उपाय शोधणे अवघड आहे.
– ज्ञानेश्वर सुडके, पुणे</strong>

सडेतोड मते भावली
मंगलाताईंनी पुरुषांची बाजू सडेतोड मांडल्याबद्दल त्यांचे कौतुक वाटले. विषय तसा किचकट आहे. प्रत्येक उत्तरातून किंवा सुचवलेल्या इतर मार्गातून अनेक उपप्रश्न तयार होतातच. जसे की कामभावना दडपून पुरुष कुटुंब पद्धत राखण्याचा, विवाहसंस्था अबाधित ठेवण्याचा जसा प्रयत्न करत असतो, त्याच भावनेने स्त्रीनेही मनाविरुद्ध का होई ना कधी कधी त्याला साथ का देऊ  नये? आणि असे केल्यावर याला बलात्कार मानावे का? लेखिका म्हणते, त्याप्रमाणे साथ न दिल्याने पुरुषावरसुद्धा अन्याय होतो हे जरी पत्नीने जाणले तरी लेखाचा हेतू साध्य होईल व त्याचा चांगला परिणाम कुटुंबपद्धतीवर दिसून येईल यात शंका नाही.
-गजानन कुलकर्णी, इन्डियाना, अमेरिका

‘त्या’ समाजधारणा कालबाह्य़
अतिशय संवेदनशील विषयावरचा शास्त्रीय तसेच वैचारिक विवेचन करणारा प्रभावी लेख.  मी व्यवसायाने सर्जन व कर्करोगतज्ज्ञ असून अनेक वैद्यकीय व सामाजिक विषयावर लेखन करत असतो. आपल्या देशात लैंगिक शिक्षणाला अजिबात महत्त्व दिले जात नाही. भरीस भर म्हणजे याविषयी बोलणे, खुले मतप्रदर्शन करणे हे अनैतिक, लज्जास्पद समजले जाते! वास्तविक पाहता, ज्या देशातील वात्सायनाने कामसूत्र लिहिले, त्याच देशात या महत्त्वाच्या विषयाशी संबंधित पाप-पुण्याच्या खुळचट कल्पना का आणि कोणी जोडल्या हा एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. मानवी जीवनाच्या अन्न,वस्त्र, निवारा व मैथुन या मूलभूत गरजा असताना फक्त मैथुन हा विषय कंसात का टाकायचा? या विषयाच्या समाजधारणा कालबाह्य़ झाल्या आहेत असे मला ठामपणे वाटते.
-डॉ. शिरीष कुमठेकर, सोलापूर

 विसंगतीपूर्ण लेख
मंगला सामंत यांचा लेख विसंगतीपूर्ण असून त्यात अनेक मुद्दय़ांची स्पष्टता नाही, असे वाटते. विवाहसंस्थेबाबतचा व एकूण स्त्री-पुरुष संबंधांबाबत लेखिकेचा वैचारिक गोंधळ लेखात दिसून येतो. अशा लेखांमधून विषयाची स्पष्टता होण्याऐवजी गरसमज, चुकीचे विचार पसरू शकतात. तसे होऊ नये म्हणून काही मुद्दय़ांचा ऊहापोह करावासा वाटतो.
लेखाचा रोख असा आहे की, पुरुषांची कामप्रेरणा स्त्रियांपेक्षा खूप जास्त आहे. विवाहप्रथेमुळे नैसर्गिक स्त्री-पुरुष मुक्त संबंधांना प्रतिबंध होतो. पुरुषांच्या अतिरिक्त कामवासना शमण्यास अडसर निर्माण होतो. यातून पत्नीवर/स्त्रियांवर जबरदस्ती करण्यावाचून कित्येकदा विवाहित पुरुषाकडे काही पर्याय राहत नाही. विशेषत: पत्नी प्रसवा असेल तेव्हा! अशा जबरदस्तीला बलात्कार म्हणायचे का? असा प्रश्न लेखिका विचारते आणि विवाह हे कशाही पद्धतीच्या आणि जबरदस्तीच्या संबंधांचे ना हरकत प्रमाणपत्र झाले आहे, अशी टीकाही करते! स्त्रियांवर होणाऱ्या विविध लैंगिक अत्याचारांना पुरुषांच्या कामेच्छांची कोंडी कारणीभूत आहे असेही तिला वाटते.
उत्क्रांतीच्या प्रवासात माणसाने (यात पुरुषही आलेच) आपल्या बुद्धीचा वापर करून विचारपूर्वक भूक, झोप, काम इत्यादी नैसर्गिक प्रेरणांना शिस्त लावण्याचा प्रयत्न केला, नियम केले, स्वत:वर बंधने घालून घेतली. हे सर्व करण्याचा उद्देश स्वत:च्याच या प्रेरणांचे दमन करण्याचा निश्चितच नसेल! तो समाजहिताचाच होता. यातूनच हळूहळू विवाह, कुटुंबसंस्था रूढ झाल्या. पुरुषांची कामेच्छा खूप जास्त आहे असे मानले, तरी स्त्रियांवर जबरदस्ती करणारे पुरुष तुलनेने कमीच असतात. पत्नी ‘प्रसवा’ असताना अन्य पर्याय शोधणारे पुरुष किती असतील? बहुसंख्य पुरुष स्वत:च्या लैंगिक भावना योग्य तऱ्हेने व्यक्त करतात, अनिच्छेने वा धाडस नाही म्हणून ते ‘सभ्य’ वागतात, असे म्हणता येणार नाही!
१५ ते ३० वर्षे या काळात लैंगिक भावना तीव्र असल्यामुळे विवाहपूर्व संबंध सहजपणे स्वीकारावेत, त्यांना मान्यता द्यावी असे लेखिकेने सुचविले आहे. पाश्चात्त्य प्रगत देशांचे उदाहरण दिले आहे. पाश्चात्त्य देशात सुख उपभोगल्यामुळे कशाही प्रकारे लैंगिक आनंद मिळविण्याची तेथील पुरुषांना गरज वाटत नाही असे त्यांचे निरीक्षण आहे, यानंतरही काही प्रश्न निर्माण होतात-
प्रगत देशात कुमारीमाता व त्यांच्या मुलांचे प्रश्न आहेत. सरकारला आता ही जबाबदारी घेणे अवघड झाले आहे. आपल्याकडे तर ते अधिकच अवघड आहे , अशा संबंधाचा विचार करताना एचआयव्ही/एड्स यांचे काय?, मूल होऊ न देण्याची काळजी घेतली तरी गर्भपात, संतती प्रतिबंधक साधने, इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स यांचे स्त्री शरीरावर होणारे दुष्परिणाम आहेतच,  अशा संबंधामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीची जबाबदारी ही तरुण मुले घेऊ शकणार का?  एकीकडे विवाहाचे फायदे दिसत असताना, स्थैर्य लाभत असताना आणि प्रगत देशात याच कारणासाठी, परंतु कामभावाचा जोर कमी झाल्यावर लग्नाचा पर्याय स्वीकारला जात असताना आपण आधीच जो स्थैर्याचा विचार करत आहोत तो का नाकारायचा? पाश्चात्त्य देशात मुक्त लैंगिक संबंधांना मान्यता असूनही ‘मॅरिटल रेप’ यासारखे कायदे करण्याची गरज का भासली?,  तेथील वेश्या व्यवसाय बंद- निदान कमी झाला का? याचाही विचार व्हायला हवा. तेव्हा नैतिकतेचा मुद्दा बाजूला ठेवून विवाहसंस्थेला या सर्वासाठी जबाबदार न धरता विवाहपूर्व मुक्त लैंगिक संबंधांना मान्यता हा योग्य उपाय ठरेल, की नवीन प्रश्न निर्माण होतील याचा विचार व्हायला हवा. लैंगिकता शिक्षण, विवाहपूर्व मार्गदर्शन, समस्या उद्भवल्यास समुपदेशन, विवाह-कुटुंबसंस्थात आवश्यक बदल याद्वारे स्त्री- पुरुषांचे सहजीवन सर्वार्थाने समाधानी होईल यासाठी प्रयत्न का करू नयेत?
 – मृणालिनी दातार, अ‍ॅड् शालिनी बापट

स्वीकार भारतीय संस्कृतीचा
अत्यंत विचारपूर्वक, विषयाचे गांभीर्य जाणून लिहिलेला हा लेख आहे. भारतीय पुरुषांची मानसिकता/ भारतीय वातावरण यावर त्यांनी केलेले भाष्य योग्यच आहे. भारतीय पुरुषांची मानसिकता बदलल्याशिवाय भारतीय स्त्री-पुरुष सुखी राहू शकणार नाही हे त्यांच्या लेखात अधोरेखित केलेले भाष्य पटण्यासारखेच आहे.
माझ्या मते, मानसिकता बदलण्यासाठी  भारतीय संस्कृतीचा डोळसपणे स्वीकार केला तर हे शक्य आहे, असे वाटते; परंतु दुर्दैवाने स्व-संस्कृतीला बासनात गुंडाळून, परदेशी संस्कृती, राहणीमान, पेहराव, खानपान यांचा स्वीकार केल्यामुळेच समाजात हिंसक प्रवृत्ती शिरकाव करते आहे.  मुळात मनुष्यावर झालेले संस्कारच त्याला आयुष्यात चांगल्या किंवा वाईट मार्गावर नेत असतात; परंतु विविध प्रलोभनांमध्ये माणूस एवढा गुरफटला आहे, की चांगले/वाईट याचा विचार करावयास त्याला वेळच नाही.
 – दिलीप कऱ्हाडे, ठाणे</strong>

ठोस उद्दिष्ट नाही
मंगला सामंत यांच्या लेखात, विवाहसंस्थेच्या संकल्पनेत थोडी अधिक स्पष्टता हवी असे वाटते. पूर्वीपासूनच, विवाह हा केवळ समागम आणि पुनरुत्पादनासाठी योजला नसून जगाच्या पाठीवर कुठेही दोन समूह (समाज) यांना एकत्र आणण्यासाठी, धर्माच्या नावाखाली पुढची पिढी आणि मागची पिढी अधिकृत एकत्रित बांधण्याची सोय असावी, यासाठी योजला आहे.
जगात जवळपास सर्व ठिकाणी पुरुषप्रधान संस्कृती असताना, केवळ कामवासनेची पूर्तता हे ध्येय असते तर एकापेक्षा अधिक स्त्रियांबरोबर लग्न न करता समागम करायची सोय त्यात करून ठेवता आली असती, पण तसे झाले नाही. आपला वंश, समुदाय वाढणे व आपले आधिपत्य वाढावे, ही एक प्रमुख बाब यामागे दिसून येते.
– नितीन नाईक

उदात्तीकरण नको!
‘विवाहाचे ना हरकत प्रमाणपत्र’ या लेखात लेखिकेने विवाहाअंतर्गत पतीची शरीरसंबंधाबाबत असणारी पत्नीवरची जबरदस्ती हा ‘बलात्कार’ समजायचा का? या मुद्दय़ावर चर्चा करताना इतरही अनेक बाबींचा ऊहापोह केला आहे’ तथापि ‘विवाहबंधन’ ज्याला आपण पवित्र मानतो, त्या बंधनातच खरी मुक्ती आहे आणि त्या मुक्तीचा आनंद, समाधान हे त्या व्यक्तीला मानसिक शांतता देणारे आहे.  ‘मुक्त लैंगिक पद्धती’च्या लेखिकेने चर्चिलेल्या फायद्यांपेक्षा त्याचे होणारे नजीकच्या वर्तमानकाळात अथवा दूरगामी दुष्परिणाम हे कित्येक पटीने अधिक आहेत. अनियंत्रित, असंयमित कामभावनेच्या आहारी जाणे हे एक प्रकारचे व्यसनच म्हणावे लागेल.
‘विवाहपूर्व संबंधांना मान्यता देणे’ हा पर्याय कुठल्याही परिस्थितीत आपल्या समाजासाठी व उत्तम भवितव्यासाठी योग्य आहे असे वाटत नाही आणि म्हणूनच अशा गोष्टींचे उगाचच उदात्तीकरण करण्यात येऊ नये हेच उचित आहे.
– डॉ. सरिता कोठाडिया, सोलापूर

‘अधिक समतोल चर्चा हवी’
विवाहाचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ हा मंगला सामंत यांचा विस्तृतपूर्ण लेख वाचून संस्कारी मनाला थोडा धक्का बसला. लेख विस्तृत आणि काही प्रमाणात अर्थपूर्ण असला तरी काही बाबी खटकल्या.
जीवशास्त्रीयदृष्टय़ा विचार केला तरी इतर सस्तन प्राण्यांप्रमाणे माणूस वागू शकेल का? विवाह हा असा संस्कार आहे, की ज्यामध्ये एकमेकांचा आदर करून एकमेकाला स्वीकारलेले असते. त्यामुळे जबरदस्तीचा प्रश्नच येत नाही. काही अपवादात्मक उदाहरणे असली तरी सरसकट आपण त्याविषयी भाष्य करू शकत नाही. अगदी शरीरशास्त्रीयदृष्टय़ा पुरुषांचा विचार केला तरी मुक्त स्त्री-पुरुष संबंधांचे स्वातंत्र्य त्यांना देता येत नाही. शैक्षणिक विस्तार झालेला आणि संस्कारक्षम पुरुष असे करणारच नाही जरी निसर्गतत्त्वानुसार नसले तरी, कारण तेवढी बौद्धिक प्रगल्भता आपल्याला देवाने, निसर्गानेच तर बहाल केलेली आहे. अभ्यासपूर्व म्हणून लेख खरेच आवडला, पण एखाद्या विषयाची चर्चा समतोल साधून केली गेली पाहिजे असे प्रामाणिकपणे वाटते.
– मीनल श्रीखंडे, पुणे

अंतर्मुख करणारी मते
एका नाजूक विषयाची इतकी सुंदर हाताळणी केल्याबद्दल लेखिकेचे अभिनंदन. विषयाची उकल, त्याचे वैज्ञानिक दृष्टीतून विश्लेषण, त्यानुसार मुद्दय़ांची मांडणी त्यांनी अतिशय योग्य केली आहे. प्रस्तुत विषयावरची आपली मते त्यांनी परखडपणे मांडली आहेत. मी स्त्री-पुरुष भेदभाव मानणाऱ्यांपैकी नाही; पण ही मते त्यांनी स्त्री असूनही इतक्या स्पष्टपणे मांडली आहेत. म्हणून पुरुष वर्गालाच नाही तर महिला वर्गालाही हा लेख अंतर्मुख करणारा आहे. पाश्चात्त्य देशांमध्ये स्त्री-पुरुष संबंधातील बंधनमुक्तता याचाही ऊहापोह लेखिकेने कोणताही आडपडदा न ठेवता केला आहे.
– लक्ष्मीकांत अंबेकर

उपाय सुज्ञ वाटतो
मंगला सामंत यांचा लेख अत्यंत उत्सुकतेने वाचला आणि भरून पावलो. या विषयावर इतके सयुक्तिक विवेचन आज ना उद्या त्यांच्याकडून होईल, याची खात्री होतीच. मात्र मुक्त लैंगिक संबंधांचा जो उपाय/पर्याय त्यांनी सुचविला आहे तो पटायला कठीण असला तरी सुज्ञ वाटतो. मुख्य म्हणजे छत्तीसगढमधील गोंडी आणि हळबी या जमातींमधील एकेकाळच्या ‘घोटुल’ या निकोप प्रथेशी या उपायाचे लक्षणीय साम्य असल्याचे जाणवून आश्चर्य वाटले. तसेच पाश्चात्त्य समाजात झालेल्या बदलांचे लेखिकेने केलेले विवेचन मर्मग्राही आहे आणि आपल्याकडे या संदर्भात झडणाऱ्या काहीशा भावुक चर्चाना योग्य दिशा देईल अशी आशा निर्माण करणारे आहे. पुरुष ‘प्राण्या’ची झालेली कोंडी अत्यंत साक्षेपाने मांडून, येता-जाता त्याला लक्ष्य करण्याची सध्याची तथाकथित पुरोगामी पण अवैज्ञानिक टूम सौम्य शब्दांत उघडी पाडली आहे – अविनाश जोशी

 धाडसी उपायाचे स्वागत
आपल्या विवाह संस्थेबद्दल अभ्यासपूर्ण मते मांडणारा लेख लिहिल्याबद्दल सामंत यांचे आभार. स्त्री-पुरुषांमधील जीवशास्त्रीय फरक, त्यांच्या गरजा व सामाजिक प्रतिसाद व अनुषंगाने निर्माण होणाऱ्या समस्या यावर भाष्य करणारा लेख त्यांनी अचूक शब्दांत मांडला आहे. पुरुषांच्या कोंडीमुळे त्यांच्यासमोर अनेक आव्हाने निर्माण होतात व प्राप्त परिस्थितीतील मर्यादा पाहता, ही कोंडीच अनेक अत्याचारांसारख्या सामाजिक समस्यांचे मूळ असल्याचे दिसते. यावर लेखिकेने सुचवलेल्या धाडसी मार्गाचेही स्वागत.
 – संकेत मोहिते

काही पिढय़ा जाव्या लागतील
मंगला सामंत यांची मते खूप चपखल आणि तौलनिक वाटली. जणू माझीच मते कुणी मांडल्यासारखे वाटले. परंतु सद्य परिस्थितीत ती मते कशी आणि कधी रुजतील, याविषयी साशंकता आहे. रूढींचा पगडा शेकडो वर्षांचा आणि तोही एवढय़ा मोठय़ा लोकसंख्येच्या बाबतीत बदलायचा म्हणजे पाश्चिमात्य देशांइतकं सोपं काम नक्कीच नाही. त्यांच्याकडे ना एवढा ऐतिहासिक पगडा होता ना एवढय़ा लोकांच्या मतपरिवर्तनाची गरज. काही पिढय़ा लागतील कदाचित आपल्याकडे मंगलाताईंनी सुचवलेल्या मार्गाचा स्वीकार व्हायला. तोपर्यंत हे वैचारिक परिवर्तन नक्कीच मार्गदर्शक ठरेल अशी आशा आहे.
 -हेमंत भागवत, पुणे

विचारप्रवर्तक लेख
हा लेख म्हणजे एका अत्यंत संवेदनशील विषयावर, कसलाही दांभिकपणा न बाळगता केलेले मुद्देसूद समर्थन होय. म्हणूनच लेखातील परखडपणे व्यक्त केलेली मते स्पृहणीय वाटली. अर्थात, लेखावर ‘सो कॉल्ड’ संस्कृती रक्षकांची झोडपणारी पत्रे येतील. पण एवढे खरे की एका खूपच मोठी व्याप्ती असलेल्या तरीही दुर्लक्षित विषयावर विचार करायला लोक प्रवृत्त होतील.
 -विजय हरचेकर

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Response to chaturang
First published on: 20-06-2015 at 12:15 IST