संत तुकाराम महाराजांनी ‘आवा’ सासूबाईचे खूप छान वर्णन ‘आवा चालली पंढरपुरा’ या अभंगात केले आहे. पंढपूरला विठ्ठलाच्या दर्शनाला निघालेली आवा वेशीपासून पुन्हा परत येते, असंख्य सूचना सुनेला करते. कंटाळून शेवटी सूनबाई ‘स्वहित जोडा व मागील सर्व आशा सोडा’ असा सल्ला देते. आता मात्र आवा बाईंच्या मनात शंका-कुशंका येतात. नक्कीच या सुनेच्या मनात मला घरातून घालवून देण्याचे घाटते आहे. ‘मुले लेकरे घरदार तेचि माझे पंढरपूर’ असे म्हणत ती यात्रेला न जाता घरीच राहते. ‘तुका म्हणे ऐसे जन गोवियले मायेकरून’ असे म्हणत तुकारामांनी लोक संसाराच्या मोहात किती सापडतात हे सांगितले आहे. स्वत:ला आनंदी पाहण्यासाठी व इतरांना आनंदी करण्यासाठी संसारात ‘साक्षी’ साधना अत्यंत महत्त्वाची आहे. आपला संसारातील सहभाग एखाद्या उत्प्रेरक घटकाप्रमाणे असला पाहिजे. क्रियेची गती वाढविणारा पण स्वत: मात्र प्रत्यक्ष सहभागी न होणारा, अलिप्त!
साक्षी साधना
सांधे सल करणाऱ्या पवनमुक्तासनाचा पुढचा भाग या साक्षी साधनेचा सराव करीत करू या. बठक स्थितीतील विश्रांती अवस्था घ्या. उजवा पाय गुडघ्यात दुमडून टाच डाव्या जांघेमध्ये ठेवा. उजवा हात गुडघ्यावर व डाव हात वाकविलेल्या पायाच्या टाचेवर ठेवा. आता श्वास घेत सावकाश गुडघा छातीच्या दिशेने वर घ्या व श्वास सोडत सावकाश गुडघा जमिनीच्या दिशेला न्या. हे करीत असताना पाठीचा कणा समस्थितीत असू दे. आता डोळे मिटून ‘साक्षी’ भाव जागृत करून शांतपणे १० वेळा ही कृती करा. मला मिळालेला देह, त्यातील प्राणशक्ती, त्यामुळे मिळालेली इच्छाशक्ती व क्रियाशक्ती हे सर्व पाहणारा माझ्यातील ‘मी’ कोण याकडे विचार वळवू या.
कटकट, कुरकुर करण्यापेक्षा मला मिळालेला देह हा त्या ईश्वरी तत्त्वाची सेवा करण्यासाठी मिळालेले साधन आहे ती भावना प्रबळ होते. शरीर अगदी शिथिल होते.
 विरुद्ध पायाने ही कृती पुन्हा करा.
आनंदाची निवृत्ती : माझे ‘कार’नामे
तब्बल ३९ वर्षांची नोकरीची प्रदीर्घ कारकीर्द संपवल्यानंतर, नोकरी व संसार ही तारेवरती कसरत थांबवून मी निवृत्तीनंतरच्या प्रसन्न टप्प्यामध्ये प्रवेश केला. निवृत्ती म्हणजे स्वप्नांची पूर्ती करण्याचा कालखंड असे मनाशी पक्के ठरवले होते. त्यामुळे बऱ्याच वर्षांपासून मनात रेंगाळणाऱ्या ड्रायव्हिंग शिकण्याच्या इच्छेला मी मूर्त स्वरूप देण्याचे ठरवले.
‘‘कारने कुणाला तरी उडवशील, तुरुंगात जाऊन बसशील,’’ असा घरचा आहेर शुभेच्छा समजून मी ड्रायव्हिंग क्लासमध्ये प्रवेश घेतला. सरांनी दिलेल्या सूचना पक्क्य़ा ध्यानात ठेवून मी गाडीतील चालकाच्या सीटचा ताबा घेतला. चावीने गाडी सुरू केली. मशीन सुरु झालं, पण गाडी पुढे काही जात नव्हती. मी डावी-उजवीकडे गाडी वळवून पाहिली तरी तेच.. मग माझ्याच लक्षात आले मी गाडीचा हँडब्रेक काढला नव्हता.
अखेर सुरू झाली..  हळूहळू चालवत मी थोडी लांब गेले. थोडय़ा कमी उतारावर हँडब्रेक लावला. गाडी थांबली, मात्र हँडब्रेक काढला की कार घरंगळायची. कशी चालू ठेवायची तेच कळेना. भीतीने तोंडाचे पाणी पळाले. शेवटी रस्त्यावरील लोकांनी चाकाला मोठा दगड लावून उतारावरून कार घराच्या दिशेने वळवून दिली. अखेरीस भेदरलेले डोळे व घाबरलेला चेहरा घेऊन मी घरी पोहोचले.
पण तोच माझा निर्णय क्षण होता. गाडी चालवायला आलीच पाहिजे, मी चंग बांधला. शंभर टक्के लक्ष केंद्रित करून मी क्लासला जाऊ लागले. अशीच एकदा घराच्या फाटकाच्या आत पार्किंग केलेली कार बाहेर काढून भिंतीलगत लावण्याच्या नादात अशी काही कंपाऊंडला ठोकली गेली की डावीकडचे दिवेच फुटले. सर म्हणाले, ‘‘रविवारची गर्दी कमी आहे, नाहीतर तुम्ही तीन-चार जणांना नक्कीच जायबंदी केले असते.’’ तेवढय़ात एक लहान मुलगी पळतपळत गाडीसमोर आली, पण बरे मी अलीकडेच गाडी थांबविली होती.
माझ्या अशा या ‘कार’नाम्यामुळे घरच्यांसाठी हा चेष्टेचा विषय झाला होता. एकदा नाशिकला निघालो तर जावई म्हणाले, ‘आईंनी याच प्रकारे, याच वेगाने गाडी चालवली तर आपण नाशिकला कधी पोहोचणार?’ त्यावर मुलीने माझी बाजू मांडण्याऐवजी, ‘अहो पोहोचूच याचीही काय गॅरेंटी’ असे म्हणून माझी खिल्ली देखील उडवली.
माझ्या शिकण्याचे सुमार प्रयत्न पाहून मला ड्रायव्हिंग शिकवणाऱ्या सरांचा व माझ्या यजमानांचा ठाम विश्वास होता की मला पर्मनंट लायसन्ससाठी खूप वाऱ्या कराव्या लागतील. मी मात्र याकडे साफ दुर्लक्ष केले व पावसाळ्याच्या दिवसांत माझ्या परीक्षेच्या दिवशी, रस्ते ओले, निसरडे झाले असतानाही मस्त कार चालवली. एका झटक्यात लायसन्स मिळाले आणि विशेष म्हणजे ब्लडप्रेशरचा त्रास न होता सरांची सुटका झाली!
आता मला छान ड्रायव्हिंग करता येते, पण हे मात्र ‘एक गाडी बारा भानगडी’ किंवा ‘किस्से ड्रायव्हिंगचे’ अशा नावाखाली माझ्या फजित्या व उडालेल्या भंबेरीची रसभरीत, कुरकुरीत वर्णने ऐकवून मैफिली सजवतात, पण मी मात्र ‘मला कार येते’ यातच खूश आहे..
ता. कलम- आता मी शास्त्रीय संगीत शिकण्याकडे मोर्चा वळवल्याने घरच्यांची झोप उडाली आहे.    
सुजाता उपाध्ये, नाशिक

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व आनंद साधना बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sakshi sadhana
First published on: 15-02-2014 at 01:06 IST