– डॉ. प्रदीप पाटकर

जेव्हा माणूस आर्थिक अडचणींमध्ये सापडलेला असतो, तेव्हा त्याच्या मनावर येणारे ताण आपण समजू शकतो. पण आर्थिक अडचणी नसताना आणि शैक्षणिक, सामाजिकदृष्टय़ाही सर्व काही उत्तम चाललं आहे, असं वाटत असतानाही माणसांच्या मनावर प्रचंड ताण येऊ शकतात. ही आधुनिक चिंता! आताच्या बदललेल्या जगात ती आपल्या अवतीभोवती दृष्टीस पडू लागली आहे. पण लक्षणांवरून ती नेमकी ओळखायची कशी?

Womens health Which blood type is required for marriage
स्त्री आरोग्य : लग्नाच्या होकारासाठी रक्तगट कोणता हवा?
How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…
risk of H5N1 bird flu outbreak Case Was Seen in Hens At Nagpur
कोविडहुन १०० पट जास्त भीषण विषाणू उड्या मारतोय! नागपुरातही आढळलं प्रकरण, तज्ज्ञांचं मत काय?
loksatta kutuhal artificial intelligence introduction of computer vision
कुतूहल : संगणकीय दृष्टी म्हणजे काय?

माझ्या क्लिनिकमध्ये दुसऱ्यांना त्रास देणारे किंवा स्वत:ला त्रास करून घेणारे यांचा राबता असतो. बऱ्याच जणांना आपले प्रश्न काय आहेत आणि ते का आहेत हे जाणून घ्यायचं असतं. पण त्या प्रश्नांमध्ये बऱ्याचदा आर्थिक प्रश्न आणि त्यामुळे ताणलेले नातेसंबंध मोठय़ा प्रमाणात असतात. नाती त्या दृष्टीनं ‘अर्थपूर्ण’ असतात हे मोठय़ा प्रमाणात जमीन विक्री झालेल्या तालुक्यातल्या कोर्ट केसेसवर नजर टाकली की लगेच लक्षात येतं. चिकाटीनं वर्षांनुवर्ष बहीणभावंडं एकमेकांविरुद्ध खटले लढवत असतात. मोठय़ा प्रमाणात कुटुंबातल्या आर्थिक व्यवहारांमुळे ‘जॉइंट फॅमिलीं’चे जॉइंट निखळतात. तेव्हा ताणतणाव वाढवणं आणि वितंडवाद घालणं या प्रापंचिक कामात पैसे मुख्य भूमिका निभावत असतात हे सगळय़ांनाच माहीत आहे. त्याचबरोबर प्रश्न सोडवायची किंवा तो तात्पुरता पुढे ढकलण्याची पैशांची ताकद वादातीत आहे, हे तर रोजच्या वर्तमानपत्राचं पहिलं-दुसरं पान सतत सांगत आलं आहे. पैसे असले की कायदा आणि सुव्यवस्थेची डोकेदुखी जागीच थांबवता येते. पैसे तात्काळ कुणाचीही (काही अपवाद वगळता) समजूत घालू शकतात. वर असाही (गैर) सल्ला दिला जातो, की ‘गुन्हा करायला हरकत नाही, तो पचवता येईल इतके पैसे जवळ आहेत ना एवढे पाहा म्हणजे झालं!’   मानसोपचारतज्ज्ञाकडे माणसं येतात तेव्हाही अर्थकारण महत्त्वाचं असतं. मुलगा नोकरी-व्यवसाय काहीच करत नाही, असलेली नोकरी फालतू कारणानं सोडून देतो, वर घरीदारी ऐश करायला जबरदस्तीनं घरातले पैसे घेऊन उडवतो, असं चित्र पालक असह्य होईतो पाहतात आणि मगच समुपदेशकाकडे जातात. त्याच्या व्यक्तिमत्त्वातले दोष तसे शाळेतच दिसून येत असतात. पण तेव्हा त्याची स्वार्थी, आत्मकेंद्रित, बेपर्वा वृत्ती (या वृत्तीला पुरुषी, मर्दानी, अवखळ अशी आकर्षक विशेषणं लावत) डोळय़ाआड केली जाते. फक्त नंतर आर्थिक फटका बसू लागला आणि प्रगती घसरून अधोगती वाढू लागली, की मग माणसं जागी होतात. तोपर्यंत ही वृत्ती व्यक्तिमत्त्वाचा घट्ट/ अविभाज्य भाग बनत जाते आणि उपाय कठीण होत जातात. (पण उगाच भूगर्भातला जलसाठा का वापरावा या उदात्त हेतूनं?) माणसं तहान लागली की मगच विहीर खणायला घेतात!

हा असा वेळकाढू पवित्रा काही राजकारणी-समाजकारण्यांनी घेतला तर समजण्यासारखं असतं, कारण ते ‘प्रश्नजीवी’ असतात. पण प्रश्न ज्यांच्या जिवावरच उठलेले असतात, ते असं का करतात? विशेषत: कौटुंबिक आणि मानसिक प्रश्नांमध्ये असा वेळकाढूपणा कसा चालेल? त्यात प्रश्न माहीत होऊन स्वीकारेपर्यंत ते शर्यतीत आधीच पुढे गेलेले असतात आणि त्यांचा वेग उत्तरांच्या तुलनेत भलताच अधिक असतो. उत्तरं धापा टाकत प्रश्नांना गाठण्याचा प्रयत्न करत असतात. प्रश्न धावायला उभे राहण्याआधीच कळले, तर त्यांना तिथेच थांबवता येईल, पण त्यासाठी शास्त्रीय ज्ञानासह सजग दूरदृष्टी विकसित करावी लागते. मानसशास्त्रात या बाबतीत खूप उपयोगी ठरणारी माहिती आहे. या विषयातल्या तज्ज्ञांशी चर्चा करणं, त्यांच्या जाहीर मुलाखती जनसामान्यांसमोर आयोजित करणं, मानसशास्त्रावरची पुस्तकं वाचणं, आपापसात त्यावर चर्चा करणं, मानसिक प्रश्नोत्तरांची सदरं स्थानिक वृत्तपत्रांत प्रसिद्ध करणं असं अनेक प्रयत्न जागोजागी समाज हितचिंतक करू शकतात. विवेकी पालकत्व, शिकण्याच्या / ज्ञान ग्रहणाच्या पद्धती, अध्ययन समस्या आणि त्यातलं अध्ययनातलं अपयश, व्यक्तिमत्त्वाची जडणघडण, आकर्षण, प्रेम, विवाह, जोडीदाराची विवेकी निवड, सार्वजनिक स्वास्थ्य, विविध व्यसनं, घरादारात होणारा मानसिक छळ, कौटुंबिक हिंसाचार, लैंगिक छळ/ गुन्हे आदी अनेक विषयांची मांडणी मानसतज्ज्ञ जागोजागी, देशभर करताना दिसतात. मनोविकार ते मनोविकास, ही प्रगती साधण्यासाठी अनेक संस्था महाराष्ट्रात कार्यरत आहेत. महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाच्या जिवंतपणाचं मी हे एक लक्षण समजतो. उदा. ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती’नं १९९२ मध्ये माझ्या ‘शोध भुताचा बोध मनाचा’ या मोहिमेअंतर्गत मानसतज्ज्ञांच्या जाहीर मुलाखती आयोजित केल्या होत्या. त्यानंतरही आजपावेतो आपल्या वर्षभर चालणाऱ्या भरगच्च शैक्षणिक कार्यक्रमांमध्ये मानसशास्त्र आणि मनोविकार हा विषय ही समिती आवर्जून समाविष्ट करते. लातूर भूकंपानंतरच्या आमच्या आठ महिन्यांच्या कामात प्राथमिक मानसोपचारांचा मुद्दा विपत्त्योतर पुनर्वसनाच्या कामात महत्त्वाचा ठरतो, हे आम्ही सांगत आलो.

पण आजच्या संवादाचा मुद्दा वेगळा आहे. सर्व दृष्टीनं, म्हणजेच आर्थिक दृष्टीनं अडचण नसताना अशी माणसं ताणतणावग्रस्त का असतात, ते पटकन समजण्यासारखं नसतं. प्रत्यक्षात अतिप्रसिद्ध, धनाढय़, लोकप्रिय, सुंदर, यशस्वी अभिनेते-अभिनेत्री, नेते, खेळाडू, उद्योजक, कुख्यात गुन्हेगार इ. इ. सर्व क्षेत्रांतील व्यक्ती अतिप्रसिद्ध देवळांत फक्त देवाचे आभार मानायला जात असतात, की दु:खी, भयग्रस्त, संकटग्रस्त म्हणून देवाकडे कृपेची याचना करणारे याचक म्हणून जात असतात, हे कळलं तर लक्षात येईल, की त्यांचे प्रश्न पैसे सोडवू शकले नाहीत. त्याबद्दल बऱ्याचदा मनात उपहासही वाटतो. एक खरं, की दारिद्रय़ हे जगण्यातले ताण खूपच वाढवत असतं. अगदी अन्न-पाणी-निवारा-रोजगार आदि किमान प्राथमिक गरजाही जिथे पूर्ण होत नाहीत, तिथला ताणतणाव सहज समजून घेता येतो. तिथे त्या दु:खांचा उपहास वाटत नाही. (महागाई वाढली, की करदात्यांना हे सर्व ‘फुकटे’ वाटू लागतात, त्यांच्या श्रमांचा आपल्या आयुष्याला होणारा अप्रत्यक्ष लाभ लक्षात घ्यावासा वाटत नाही.)

मिहिर एका बहुराष्ट्रीय कंपनीत, मोठय़ा हुद्दय़ावर, साहजिकच भरपूर हा शब्द तोकडा पडेल, हेवा वाटेल, इतक्या मोठय़ा  पगारावर काम करतो. मुळात अत्यंत हुशार, तंत्रज्ञानात प्रवीण, स्वभावानं प्रेमळ, सर्वाना मदत करण्यात पुढे. विद्या त्याची सुविद्य, सुंदर पत्नी. तीही अशाच एका बहुराष्ट्रीय कंपनीत तेवढय़ाच महत्त्वाच्या आणि जवळपास तितक्याच पगारावर कामाला. घरी वाद व्हावेत इतका वेळ दोघांपाशी नाही आणि अतिपरिचयात अवज्ञा व्हावी इतकी जवळीक नाही. चांगलं चाललंय. ‘एनआरआय’ लोकांना कसला येणाराय प्रॉब्लेम’ असा परिचितांचा मत्सरमिश्रित सूर असतो. सतत विमानातून परदेश दौरे, फाइव्ह स्टार, सेव्हन स्टार हॉटेल्समधलं वास्तव्य, वाढत जाणारी संपत्ती हे समोर स्पष्ट दिसत असतं. अशांना ताण असणार, पण त्याची किती किंमत/ मोबदला त्यांना मिळत असतो, एवढंच लक्षात येतं. त्यांना पैसे हवेत, तर निम्न मध्यम वर्गाच्या घरासारखं सुख त्यांना कसं मिळणार, असा थेट प्रश्न मनात उभा राहतो. समदु:खितांच्या गप्पांमध्ये तो प्रश्न (स्वत:च उत्तर देणारा) पटापट एकमेकांना दिला-घेतला जातो. आपली मुलं-मुली त्यात नसतील, तर उपहासाला उधाण येतं. यात पुन्हा आनंद आणि समाधान यातला फरक कुणी लक्षात घेत नाही. आनंद अल्पायुषी ठरतो, बऱ्याचदा स्वत:पुरता मर्यादित असतो. समाधान अधिक काळ टिकू शकतं, इतरांच्या आनंदाला कारणीभूत ठरल्यानंही समाधान मिळतं, ते कृतार्थतेची भावना देऊ शकतं, स्वप्रतिमा उजळून देऊ शकतं.

तर, आपल्या गोष्टीतला मिहिर खूप बुद्धिमान आणि मेहनती आहे. स्पष्ट काही कारण समोर नसताना त्याला अचानक छातीत धडधड होते, घाम फुटतो, अस्वस्थ वाटतं. हल्ली त्याला त्याच्या तीन वर्षांच्या मुलीकडे- स्नेहाकडे पाहून मन भरून येतं. आपल्याला असं अचानक काही झाल्यास हिचं पुढे कसं होईल याची चिंता वाटू लागते. डोकं गरगरतं. हा सारा त्रास होत असताना त्याच्या मनात हृदयविकाराच्या झटक्याची आशंका वाटू लागली. अनेक नावाजलेल्या डॉक्टरांनी सर्व सिस्टीम्स परफेक्ट असल्याची खात्री देऊनही मनातली शंका फिटत नव्हती. जीवाची खात्री कुणी डॉक्टर कशी काय देऊ शकतील? अशी शंका काढणारी बुद्धी तर स्वत:चीच असते ना! त्यात आपले प्रेमळ मित्र आणि नातेवाईक असतातच इतर ओळखीच्या डॉक्टरांचं ‘सेकंड ओपिनियन’ घेऊ म्हणून सांगायला. बराच खर्च आणि त्रास झाला आणि मग मिहिर नाइलाजानं माझ्यासारख्या मनोविकासतज्ज्ञापर्यंत पोहोचला होता. काहीच शारीरिक दोष नाही, मानसिक प्रश्न नाही, मग ही लक्षणं का? तीही सारखी सारखी का? हे त्याचे प्रश्न होते. इथे मिहिरला त्याचं अंतर्मन/ सुप्त मन सारखं काही सांगण्याचा प्रयत्न करत आहे, ते समजत नसल्यामुळे त्याला अनाकलनीय भीती वाटत आहे आणि ती शारीरिक लक्षणांद्वारे व्यक्त होत आहे, असा एक तर्क करायला हरकत नव्हती. परामानस शास्त्र, दृष्ट, करणी, मूठ मारणं, पिढीजात शाप, कुणी पूर्वजांनी मारलेला नाग, मृतात्म्यांची अतृप्तता, अशी अनेक कारणं अंधश्रद्ध नातेवाईकांनी शोधायला सांगितली असतीलही. आजही आधुनिक काळात, अस्वस्थतेची, अपयशाची, अधोगतीची स्पष्ट कारणं सापडली नाहीत, की या सर्व गोष्टी पुढे मांडल्या जातात. घराण्याची पारंपरिक श्रद्धास्थानं, गुरुजी, महाराज, यातील जाणकार बुवा-भगत-तांत्रिकांना दैवी उपायांसाठी विचारलंही गेलं होतं. मिहिर ते सर्व सांगण्यासाठी उत्सुक नव्हता आणि ते उपाय सविस्तर जाणून घेण्यानं मलाही निदानाला कसली मदत होणार नव्हती. व्यवहारात यशस्वी मिहिरच्या जागृत मनाला या शारीरिक लक्षणांचा अर्थ लागत नव्हता. उलट अचानक आपलं काही वाईट घडलं तर काय, अशी भीती सतावत होती. आजच्या धकाधकीच्या जीवनात या प्रश्नाला समाधानकारक उत्तर नव्हतं. पत्नी आणि मुलीच्या भावी जीवनाची आर्थिक तरतूद झाली आहे असं वाटत होतं आणि नव्हतंही. जगभर अर्थतज्ञ वैश्विक अर्थकारणाबाबत इतकं भेसूर चित्र रोज रंगवत असतात, की कुणीही अर्थसाक्षर निवांत झोपी जाऊ शकणारच नाही. अतिसावध मिहिरला तर त्याची अधिकच जाण होती. आपले गुंतवणूक सल्लागार सुरेख भविष्य समोर मांडतात, पण साहजिकच बारीक अक्षरात ‘मार्केट रिस्क’ आवर्जून सांगून अंती अस्वस्थ करतात. नोकरीचं मार्केट दिवसेंदिवस बेभरवश्याचं होत चाललं आहे. आंतरराष्ट्रीय घटनांचा परिणाम आता जगभर त्वरित जाणवतो. हे न कळणाऱ्या साध्या माणसाला महागाईचं गणित कसं कळणार? कोण कुठला पुतिन युक्रेनशी युद्ध छेडतो आणि इथे साध्या माणसाला बाजारातला टोमॅटोदेखील सुखानं खाऊ देत नाही. कुरकुरणाऱ्या मनाला वंगण वापरावं, तर ते किंवा साधं तेलही महागलेलं. नवश्रीमंत वर्गाला या साध्या आर्थिक चिंता भेडसावत नसतीलही, पण परदेशात एकटं असल्यानं छोटय़ामोठय़ा अडचणी उद्भवल्या, तर त्यांच्याजवळ आधाराला हक्काची माणसं नाहीत.

मेंदूतली रसायनं (मुख्यत्वे न्यूरोट्रान्समीटर्स) आपल्या वर्तन-विचार-भावनांवर परिणाम घडवत असतात हे आपल्याला माहीत आहे. ‘मुन्नाभाई एम.बी.बी.एस.’नं त्याला ‘केमिकल लोचा’ म्हटलं आहे. समष्टीच्या वर्तन-विचार-भावनांमध्ये सामाजिक आदानप्रदानात जे बदल घडतात त्यातून ताण वाढतो आणि त्याचा उलट परिणाम मेंदूतल्या न्यूरोट्रान्समीटर्सवर होतो, ही आणि अशी अनेक स्पष्टीकरणं सतत शोधणारं मनोविज्ञान आणि समाजशास्त्र या समस्येची उकल करण्याचा प्रयत्न करत आहे. प्रगतीकडे घोडदौड करण्यासाठी सज्ज असलेल्या मिहिरसारख्या हुशार, मेहनती, तंत्रतज्ज्ञ मुलांची ही सुप्त मनातली अस्वस्थता, चिंता कशी समजून घ्यायची आणि ती कमी कशी करायची? याचा शोध घेताना आधुनिक मानसशास्त्र वैश्विक अर्थकारण, राजकारण, समाजमानसशास्त्र यांची मदत घेतं. कशी ते पुढच्या लेखात.

patkar.pradeep@gmail.com