संशयकल्लोळ : अपघात नि अविश्वास

निरंजन एका मुलीसोबत दिसतो हल्ली, त्यामुळे निशा वैतागलीय.

दोघांच्या मध्ये ‘ती’ आल्यावर निशा कोसळलीच. तिचा आत्मविश्वास, आत्मसन्मान ढासळला. लहानपणी चूक झाल्यावर मोठय़ांनी रुद्रावतार धारण करून शिक्षा करण्याची पारंपरिक पद्धत तिच्या परिचयाची होती. त्याचंच तिनं अनुकरण केलं. मात्र पुढे काय करायचं? ते न कळून तिथेच गरगरत राहिली. याचं कारण, संताप वाढवणाऱ्या मूळ भावनांचं जाणिवेनं संतुलन करणं ती कधी शिकलीच नव्हती.. ते शिकण म्हणजेच प्रगल्भ होणं असणार होतं..

‘‘निरंजन एका मुलीसोबत दिसतो हल्ली, त्यामुळे निशा वैतागलीय..’’
मानसीच्या कानावर बातमी आली आणि दोनच दिवसांनी निशा-निरंजन तिला भेटायला आले. ही जोडी मित्रमंडळींमध्ये ‘लव्हबर्डस’ म्हणूनच प्रसिद्ध होती. मार्केटिंग गुरू मानला जाणारा निरंजन निशाच्या साध्या, प्रेमळ, घरगुती असण्यावर आजही पूर्वीइतकाच फिदा होता. त्याची, मुलांची आणि घरादाराची सरबराई प्रेमानं करताना निशाच्या डोळ्यांत समाधानी गृहिणीची चमक असायची. आज मात्र फिकट चेहरा, चमक हरवलेले भकास डोळे, चुरगळलेला ड्रेस चढवलेली निशा आजारी वाटत होती. त्यात कडवट कमेंटस, चवताळून हातवारे करत बोलणं, निरंजनशी भांडताना अचानक ढसाढसा रडणं अशा तिच्या अनोळखी रूपाची मानसीला काळजी वाटली.
निशाच्या आरोप, आरडाओरडय़ाचं कारण कुणी ‘शर्वरी’ होती. काही महिन्यांपासून तिच्यासोबत निरंजनचे फोन, भेटीगाठी वाढल्या होत्या. अति झाल्यावर निशानं नाराजी व्यक्त केली. ‘तिच्याबद्दल बोलताना तुझ्या डोळ्यांत वेगळीच चमक येते’, ‘हल्ली तुझं घराकडचं लक्ष कमी झालंय’, असं काही काही तिनं थोडय़ा चेष्टेच्या सुरात निरंजनला जाणवून दिलंही पण ‘मार्केटिंग वर्कशॉपमध्ये बरेचदा गाठ पडते’, ‘तिला एसी घ्यायचा होता, माहीतगार म्हणून मदत केली,’ अशी कारणं निरंजन सांगायचा. अखेरीस न राहवून निशानं त्यांचं चॅटिंग, निरंजनची मोबाइलची बिलं, तिला केलेले कॉल तपासले, त्यांच्या भेटी कुठून तरी कानावर आल्या आणि त्यांची मैत्री वेगळ्या पातळीवर पोहोचल्याची खात्री होऊन निशा सैरभैर झाली. संतापून निरंजनवर तुटून पडली.
‘‘मानसी, तिचा नवरा चंडिगढला, मुलगा शिकायला बंगळुरूला आणि नोकरीचं निमित्त सांगून ही भवानी इथे एकटीच.. चोरून भेटतात गं दोघं, मी रेड हॅण्डेड पकडल्यावर मान्य करावंच लागलं त्याला.’’
‘‘मी लपवलंच नव्हतं तर तू पकडायचा कुठे प्रश्न येतो? आमचं भेटणं तुला आवडत नाही, चिडचिड नको म्हणून तुला सांगणं टाळलं इतकंच. एखाद्या बाईनं मदत मागितली तर ‘नाही’ म्हणणं पुरुषांना अवघड जातं.’’
‘‘निरंजन, हे पटण्यासारखं नाही हं. जरा नीट सांगशील का?’’
‘‘अगं, मध्यंतरी एका मार्केटिंग सेमिनारमध्ये शर्वरी भेटली. तिचा आत्मविश्वास, स्मार्टनेस मला आवडला. बोलली तेव्हा माझ्याच मनातल्या कन्सेप्ट्स मांडतेय असं वाटलं. अशी तार खूप कमी जणांशी जुळते, त्यामुळे मैत्री झाली. सध्या एकटी आहे, त्यामुळे नवीन एसी घ्यायचाय, वॉटरप्रूफिंग करायचंय अशा गोष्टींसाठी मी माझे काँटॅक्ट तिला दिले.’’
‘‘..आणि अशा तऱ्हेने आमच्यातलं नातं वाढत वाढत मैत्रीच्या पलीकडे पोहोचलं. कर ना कबूल.’’ निशा कडवट उपहासानं म्हणाली.
‘‘बघ, ही अशी बोलून भांडते, भडकवते.. तिला आमची मैत्री आवडत नाहीये हे लक्षात आल्यावर मी शर्वरीला टाळायचो पण दरवेळी ‘नाही’ म्हणणंही अवघड. निशाचा संशयकल्लोळ टाळण्यासाठी एक-दोनदा तिला न सांगता शर्वरीबरोबर गेलो, ते कळल्यावर निशाचं आकांडतांडव. आमच्यावर पाळत काय, मी कुठे आहे ते तपासायला तासातासाला फोन काय, आल्या आल्या मोबाइल तपासायचा, सर्व प्रकारे माझ्यावर चोवीस तास पहारा. घरात आलं की उलटतपासणी. कुठल्याही शब्दावरून कुठेही पोहोचायचं आणि भांडायला लागायचं. सुग्रास स्वयंपाक बनवायचा आणि टेबलवर बसलं की उकरून काढायचं, हिची भांडणं आणि रडारडीला मुलंसुद्धा वैतागली.’’
‘‘तू फक्त निशाच्या तक्रारी सांगतोयस निरंजन, मूळ मुद्दय़ाचं काय?’’
थोडं वरमून निरंजन म्हणाला, ‘‘..प्रामाणिकपणे सांगतो मानसी, शर्वरीची बुद्धी आणि बाहेर वावरण्याच्या आत्मविश्वासामुळे मी आकर्षित झालो. सुरुवातीला आमचं भेटणं-बोलणं मर्यादेपेक्षा जास्त झालं हे खरं. थोडासा वाहवलो, क्वचित खोटंही बोललो. पण निशावर प्रेम आहे माझं. ती दुखावलेली जाणवल्यावर खूप अपराधी वाटलं. शर्वरीशी स्पष्ट बोलून संपर्कही थांबवला. निशाला पुन:पुन्हा सॉरी म्हटलं. आजही म्हणतो. पण ही आता काहीच ऐकायला तयार नाही गं. दुखावलीय म्हणून फुंकर घालायला जातो तर हिचा असा भडका असतो रोज, दिवसातनं दहादा. मग कधी कधी माझाही तोल जातो.’’
‘‘का विश्वास ठेवू मी तुझ्यावर?’’
‘‘वर नाही नाही ते आरोप. ‘तुमची दोघांची शारीरिक जवळीक आहेच, मान्य कर’ म्हणून मागे लागते, पुरावे शोधते, काही सापडत नाही तेव्हा बेभान होते. माझं शर्वरीशी असं नातं कधीच नव्हतं, नाही आणि नसेल. पण हिला विश्वास ठेवायचाच नाहीये.’’ डोळ्यांतले हताश अश्रू निरंजनला लपवता आले नाहीत.
मानसीनं हळूवारपणे विचारलं, ‘‘समजा निरंजननं तसं मान्य केलं निशा, तर? वेगळी होणार आहेस?’’
‘‘..तसा विचारही करवत नाही. घराशिवाय अस्तित्वच नाही मला. त्यामुळे जगण्यातलाच अर्थ संपलाय. मनात फक्त घालमेल, बधिरपण.’’ रडणाऱ्या निशाच्या पाठीवर थोपटत मानसी म्हणाली, ‘‘तसं असेल तर या सगळ्यातून आता बाहेर पडायला हवं ना? एक नकोसा ‘अपघात’ अचानक घडला, पण वेळीच सावरलं हे महत्त्वाचं. निरंजननं तिच्याशी संपर्क थांबवलाय, सॉरी म्हणतोय, पण त्याच्यावर विश्वास नाही आणि मनात कल्पनांची भूतं हैदोस घालतायत. सहा महिन्यांत अशी दशा झालीय, तर पुढची पंचवीस र्वष अशीच काढणं जमेल का?’’
‘‘मग मी काय करू? निस्तरू दे त्याचं त्यालाच.’’
‘‘असा त्रागा केल्यावर प्रश्न संपतो का निशा? आपल्या समस्येचं उत्तर आपल्यालाच शोधायला हवं, आकाशातून आयतं हातात पडणार नाहीये ते. शर्वरीला दिवस-रात्र तूच मनात धरून ठेवतेयस आणि स्वत:चं जगणं मुश्कील करून घेतेयस हे लक्षात घे गं. निरंजनला आयुष्यभर अपराधी भावनेत ठेवून तू सुखी होशील का? उद्या अति झाल्यावर त्याला घरी येणंच नकोसं होईल, मुलांनाही घरापेक्षा हॉस्टेल बरं वाटेल. झेपेल तुला?’’
‘‘..मला माझा सुखी संसार परत हवाय. उद्या दुसरी शर्वरी आली तर?’’
‘‘तू निरंजनला असं दूर लोटलंस तर ती शक्यता वाढेल की कमी होईल? अविश्वासाला धरून एकत्र राहिलात तर गेल्या सहा महिन्यांसारखंच रोज मरत जगावं लागेल. याउलट विश्वास जागवून निरंजनला माफ केलंस तर तू शांत होशील. जुने दिवस परत येण्याची शक्यता वाढेल. या सहा महिन्यांपेक्षा तुमचं वीस वर्षांचं सुखी सहजीवन मोठं नाही का?’’ निशा विचारात पडली.
दोघं घरी गेली तरी मानसीचं विचारचक्र चालू होतं. एरवीच्या शांत, समंजस निशाचं सैरभैर होणं समजू शकतं. पण इतकं बेभान आकांडतांडव कशामुळे? हा धक्का पचवून ‘मूव्ह ऑन’ करायला इतके महिने का?
खरं तर घरातलं सुख, समाधान, विश्वास संपवणारे अपघात घराघरात घडतात. पुरुषांच्या आणि स्त्रियांच्याही आयुष्यात. त्यांना हॅण्डल करता न आल्याने दोघंही परस्परांना वर्षांनुर्वष बोचकारत आयुष्य काढतात. आपला संसार ‘आपल्या मनाप्रमाणे’ सरळ रेषेत चालणारच आहे हे निशा एवढं गृहीत धरून चालली होती की अनपेक्षित परिस्थिती आल्यावर ती गडबडली. ‘संसार’ हे एकमेव सार्थक मानल्यामुळे तिथे हादरा बसल्यावर पार कोलमडली. प्रेमळ गृहिणी ही ओळख निर्थक झालेली आणि त्यात टोकाची असुरक्षितता, भीती, कमीपणा, दु:ख, दुखावलेपण, असाहाय्यता, कोंडमारा, अविश्वास, अपमान अशा असंख्य नकोशा भावनांशी एका वेळी सामना करायची वेळ कधी आलीच नव्हती. त्यात शर्वरीच्या बुद्धिमान स्मार्टनेसशी मनात तुलना होऊन आत्मविश्वास, आत्मसन्मान ढासळलेला. निरंजनच्या एका चुकीमुळे स्वत:शी ही अगतिक लढाई. म्हणून त्याचा संताप. लहानपणी चूक झाल्यावर मोठय़ांनी रुद्रावतार धारण करून शिक्षा करण्याची पारंपरिक पद्धत तिच्या परिचयाची होती. त्याचंच तिनं अनुकरण केलं. निरंजनला हडसून-खडसून विचारलं, बोल बोल बोलली. ‘माझं चुकलं, पुन्हा करणार नाही’ असं शंभर वेळा म्हणायची शिक्षाही दिली. मात्र पुढे काय करायचं? ते न कळून तिथेच गरगरत राहिली. याचं कारण, संताप वाढवणाऱ्या मूळ भावनांचं जाणिवेनं संतुलन करणं ती कधी शिकलीच नव्हती.
मानसीला वाटलं, हा अनुभव कदाचित ते संतुलन शिकण्याची संधी असू शकेल. वेळ लागेल, पण स्वत:ला तर्कसुसंगत प्रश्न विचारत नकोशा भावनांचा निचरा करणं जमेल तिला. खोटेपणा हा निरंजनच्या वागण्याचा नेहमीचा पॅटर्न नाही हे लक्षात आल्यावर ती विश्वास ठेवू शकेल. शिक्षा केल्यानं ईगो सुखावतो पण प्रश्न सुटण्यासाठी वास्तव स्वीकारावं लागतं हे उमजेल तेव्हा या भावनिक गरगरण्यातून मोकळी होईल ती. जगण्याला अर्थ देणारा एखादा छंद, कला, कौशल्य यापुढे जोपासून कठीण परिस्थितीत उभं राहण्यापुरती ऊर्जा निश्चित मिळवू शकेल. भावनिक भोवऱ्यांची जागा सारासारविचारानं भरायचं तिनं ठरवायला हवं. तर हा अपघात त्या दोघांचं नातं प्रगल्भ करणारं वरदानही ठरू शकतो.
 neelima.kirane1@gmail.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: How to handle tensions and clashes in relationship

ताज्या बातम्या