‘‘कलासक्त मनाचा विकासच कलावंताच्या भटकंतीचा पाया असतो, हे पटल्यानंतर मी सतत प्रवास आणि प्रयोग यांचा विचार करत राहिलो. गेली तीस वर्ष लेखक आणि पत्रकार या दोन्ही भूमिकेतून देशापरदेशांत फिरत संचित गोळा करत राहिलो..’’ सांगताहेत ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक महावीर जोंधळे.

प्रत्येक कलावंतांच्या दृष्टिकोनानुसार त्याचा विचार बदलत असतो. कलाकृती, मग ती स्वत:ची असो वा दुसऱ्याची, त्यातील बदलाविषयी त्याचं मन बोलतं. नव्या जुन्या जाणिवांच्या पलीकडे जाऊन आणि अभ्यासून जे बदल नव्याने करायचे त्यासाठी भटकंती हा एकमेव पर्याय आहे असं मला वाटतं. बदलाशिवाय कला-शास्त्रात परिवर्तनाची नवी संकल्पना रुजत नाही. बहुतेक मान्यवर कलावंतांच्या जीवनात ते घडत असतं. त्यासाठी प्रत्येकाला आपापल्या आकृतीबंधातील मर्मरेषा समजून घ्यावी लागते.पत्रकार म्हणून काम करत असताना लेखक असण्याचा फायदा मला झाला आणि त्यातूनच चिंतनाची ओढ निर्माण झाली.

Naima Khatoon, Vice-Chancellor,
शंभर वर्षं… आणि नईमा खातून यांची कुलगुरूपदी निवड
documentary on mangroves of maharashtra
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : पावलोपावली नवशिक्षण
conceit of painter whose exhibition made critics take the term Ambedkari art seriously
हे विचार, हे जगणं दृश्यात आणलं पाहिजे…
lokmanas
लोकमानस: दांभिक नवनैतिकवाद्यांकडून अपेक्षा निरर्थक

न पटणाऱ्या घटनेविषयी चिंता करण्यापेक्षा चिंतनातून मार्ग निघू शकतो, असं ठाम मत बनलं आणि सातत्याने संधी मिळेल तेव्हा तो मार्ग घेत राहिल्यानं कलासक्त मनाचा विकास होत राहिला. हा विकासच कलावंताच्या भटकंतीचा पाया असतो, हे पटल्यानंतर तर मी सतत प्रवास आणि प्रयोग यांचा विचार करीत राहिलो. गेली तीस वर्ष लेखक आणि पत्रकार या दोन्ही भूमिकेतून ज्या भावविश्वाचा विचार करीत राहिलो त्यातून निर्माण झालेल्या कलाकृतीने मला बऱ्यापैकी नाव दिले. चित्रकलेविषयी बऱ्यापैकी ज्ञान असल्याने ख्यातनाम चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी यांच्याबरोबर भटकंती करून केलेला प्रयोग मूळ चिंतनातून उतरल्यामुळे ‘काळा चंद्र’ आणि ‘किरणपाणी’ या दोन पुस्तकांचा विद्यापीठीय पातळीवर गौरव झाला. तर ‘श्रीलंका सांस्कृतिक वैभव’ या संदर्भात मुंबई विद्यापीठाचे मराठीचे प्राध्यापक डॉ. अनिल सकपाळ यांच्याबरोबर पंधरा दिवस भटकंती केल्यानंतर त्याला मिळालेली वैचारिक बैठक सांस्कृतिक अभ्यासाच्या दृष्टीने उपयोगी ठरली. कलासक्त जीवनातील अपुरे राहिलेले क्षण पूर्ण करण्याची संधी गेली वीस वर्ष भटकंतीत मिळते आहे.

हेही वाचा… विधुरत्व.. नको रे बाबा!

मुळातच घरातील संगीत, नाटय़परंपरेचा संस्कार हा समजू लागल्यापासून मनावर होताच, पत्रकारितेत आल्यानंतर कोणत्याही गोष्टीच्या खोलवर जाऊन विचार करण्याची सवय लागली. केवळ नाटय़गृहात जाऊन नाटक पाहाण्यापेक्षा समांतर रंगभूमी आणि प्रायोगिक नाटय़चळवळ, लोककला यांच्या प्रेमापोटी वेळ काढून जाणीवपूर्वक भटकंती केली. पत्रकारितेमधून मुक्त झाल्यानंतर केवळ मनोरंजनातून, निसर्गात रमल्याने आनंद मिळतो म्हणून फिरत राहाणं हा माझा हेतू कधीच नव्हता. म्हणून तर प्रवासाची संधी आली, की डोळय़ांसमोर विषयही येत राहिले, जसं नागरिकशास्त्र आणि समाजजीवन, महायुद्धानंतरची जर्मनी, आदी परदेशस्थ आणि आदिवासी संस्कृती, वारली पेंटिंग हे आपले विषय. वयाच्या शहात्तरीतही मी अजून विद्यार्थी आहे, पण चार भिंतीपलीकडचा. ‘हे विश्वची माझे घर’ या पंथातील असल्यामुळे जे जे चांगलं ते ते मिळवत राहणं हा स्वभाव झाला आहे. त्यामुळे परदेशातही खूप प्रवास झाला.

फ्रान्समधील ‘मोने’ (Monet) या जगप्रसिद्ध चित्रकाराचे एक पेंटिंग आठशे साठ कोटी रुपयांना एक व्यापारी खरेदी करतो, ही गोष्टच मला अचंबित करणारी वाटली होती. जेव्हा मी फ्रान्सला गेलो तेव्हा त्याच्या घराला भेट दिली. त्यावेळी मी इतका चकित झालो, की पंधरा मिनिटं चक्क मौनातच गेलो! पुढे अधिक माहिती काढली तेव्हा त्याच्याबद्दलची गोष्ट समजली. असं सांगितलं जातं, की ‘मोने’ याने जेव्हा रंग-रेषांशी खेळायला सुरुवात केली त्या वेळी तो कंगाल होता. एका वेळेच्या खाण्याचीही भ्रांत होती. एके दिवशी तो एका व्यापाऱ्याकडे जेवायला गेला. त्यांची चांगली ओळख झाली. पुढे या व्यापाऱ्याला वाटलं, की याला आपण आश्रय देऊ. त्यांनी आश्रय दिला. त्याच काळात मोनेची चित्रकला बहराला आली. दोघं पती, पत्नी त्याच्या इतकी प्रेमात होती, की त्यांनी आपलं घरदार, जमीनजुमला सारं काही त्याच्या नावावर केलं. आज त्या प्रत्यक्ष जागेवर त्याचा स्टुडिओ आहेच, शिवाय त्या परिसरातील सुंदर, आकर्षक उद्यानाला जगातील हजारो पर्यटक रोज भेट देत असतात. असं म्हणतात, की जगातील कोणतंही फूल त्या बागेत बघायला मिळतं. तेथील खळाळत्या पाण्याचे झरे आणि फुलांच्या वेली, त्यांचे विविध रंग, आकार मन मोहून टाकणारे आहेत. आपल्याकडे शेताच्या बांधावर उगवणारी फुलं, कण्हेरी, झेंडूही त्या बागेत मानानं डोलत आहेत. वाहत्या पाण्याच्या कडेनं लावलेल्या फुलांच्या साक्षीनं माझ्यासमोर एक चित्र उभं राहिलं, आपल्याकडील नामवंत चित्रकारांचं अशाच पद्धतीनं स्मारक उभं राहील का? हा प्रश्न अस्वस्थ करून गेलाच.

आपल्या महान कर्तृत्वाचा ठेवा मागे ठेवून गेलेला शिल्पकार असो, चित्रकार किंवा छायाचित्रकार असो, सर्वच कलावंतांच्या कलासापेक्ष जीवनाविषयी मला नेहमीच प्रश्न पडतात. त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी भटकंती हा एक मार्ग आणि यांपैकी कोणत्याही एका छंदाविषयी, वेडाविषयी किंवा कलेच्या आत्म्याविषयी खोलात जाऊन चिंतनात डुंबून घेणं हा दुसरा मार्ग. मात्र अनेकदा अशा पद्धतीचा अवलंब करणाऱ्या कलावंतांना मूडी, अव्यवहारी मानलं जातं आणि त्यांनी कलेच्या क्षेत्रात दिलेल्या योगदानाचं चीज होत नाही. त्यांनी निर्माण केलेला वारसा जतन करावा आणि ते वैभव पुढील पिढीला देत राहावं, या इच्छाशक्तीचा आपल्याकडील अभाव अलीकडेच भेट दिलेल्या स्पेनची राजधानी माद्रिदमधली अनेक म्युझियम्स पाहताना जाणवला. आपल्याकडील ऌी१्र३ंॠी वा वारशाच्या जपणुकीसंदर्भातला हलगर्जीपणा, बेफिकीर वृत्ती प्रकर्षांने जाणवली. आपल्याकडे कर्तृत्ववान कलावंताकडे त्यांनी उभारलेल्या शिल्प, चित्राकडे, निर्माण केलेल्या कलापूर्ण उद्यानांकडे केवळ मौजेच्या अंगाने बघण्याची लागलेली सवय कलासक्त माणसांच्या जखमेवर मीठ चोळते. ‘दिव्यत्वाची जेथ प्रचीती, तेथे कर माझे जुळती’ ही कवीकल्पना रास्त असली, तरी त्याचे फारसे अनुकरण दिसत नाही. ‘नाही चिरा नाही पणती’ अशी सार्वत्रिक अवहेलना भारतीय कलावंतांच्या वाटय़ाला का आली असावी? उत्तर माद्रिद शहरातील लेखकांचे स्मारक पाहिल्यानंतर ही जाणीव तीव्रतेनं झाली. माद्रिदमधील राजवाडय़ासमोरचे केवळ लेखकाचे स्मारकच नव्हे, तर वेगवेगळय़ा रचनाबंधांतील, आकृतीबंधांचा समग्र इतिहास सांगणाऱ्या वास्तूंबाबत असंच म्हणावंसं वाटतं. हे निसर्गदत्त वास्तव नव्हे तर त्याला माणसाच्या कलावृत्तीचा ध्यास आहे. कोणत्याही गोष्टीची जपणूक तळहाताच्या फोडासारखी करायची असते. हे झालं बोलण्यापुरतं, पण आपल्या कृतीशून्य वृत्तीचं काय? त्यासाठी प्रबोधनाची गरज असते, तीही लहान वयापासून. माद्रिद इथेच जगातील ख्यातकीर्त कलावंतांची चित्रं एकाच दालनात सकाळ ते सायंकाळपर्यंत बघता येण्याचा दुर्मीळ आनंद मिळाला. शांत, प्रसन्न. विविध चित्रशैलींची मांदियाळी थक्क करणारी. प्रत्येक कलावंताला, त्याच्या कॅनव्हासवरच्या वैविध्यपूर्ण कलेला पाहून अभिवादन करावंसं वाटलं. ज्या देशात सांस्कृतिक संचित जपण्याची ओढ असते, तिथे हे कर्तव्य म्हणूनही पार पडतंच. अशा इच्छाशक्तीला भारतात रुजवण्यासाठी काय काय करावं लागेल याचा आलेख डोळय़ांसमोर मांडत विस्तीर्ण प्रांगण व कलादालन सोडून बाहेर पडलो तरी संपूर्ण कलाकृती, विविध रंग, आकृती , मांडणी सातत्यानं साथसंगत करत होती आणि पुढेही करत राहील.

हेही वाचा… वृद्ध पर्वाची सुरुवात?

प्रवास करता करता अभ्यास होत असतो, हा माझा अनुभव. जर्मनीच्या प्रवासात ड्रेस्डेन इथे (Dresden) सांगितली जाणारी एक दंतकथा आपणही समजून घेतली पाहिजे. ज्याच्याकडे चिंतकाची भूमिका असते तो अशा गमतीदार गोष्टींकडे वेगळय़ाच भूमिकेतून बघत असतो. ती दंतकथा अशी- जो असत्य बोलेल त्याचं नाक आपोआप लांब होत जाईल, असं तिथं जाहीर करण्यात आलं. लांब झालेलं नाक नको तिथे त्रास देईल या भीतीमुळे तिथले लोक कायम सत्य बोलायला लागले! लोक- शिक्षणासाठी आणि सत्याला पालखीमधून मिरवून आणण्यासाठी उपयोगी पडेल अशी ही स्वप्नाळू कथा पुन:पुन्हा आठवत राहिली. यातून मी, तुम्ही आणि सामान्य जनता नक्कीच काहीतरी बोध घेऊ. कलावंत आणि त्याची कला, त्याचं चिंतन, मनन हे नेहमी संगीत, नाटक, शिल्पकला, लोककला, नृत्य आणि त्याचबरोबर शेती आणि उद्योग या विषयांअंतर्गत फिरत ठेवली पाहिजे, असं
माझं मत आहे.

जिथे आपण काम करतो त्या विश्वातील अनेक चांगल्यावाईट घटना कुठल्या ना कुठल्या प्रसंगी आपणांस आठवतात. जे प्रसंग मनात मुरलेले असतात, ते सगळे कुठल्या तरी प्रसंगी बोलत राहतात, सलत राहतात.. अंधाऱ्या खोलीतील भिंत बोलावी तसे! म्युनिक शहरात फिरत असताना पी.टी.आय.च्या (प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया)आता पडदाआड गेलेल्या वार्ता पुरवणाऱ्या यंत्राची टिकटिक कानावर पडल्याचा भास का व्हावा? अर्थात त्याचं कारणही तसंच आहे. १९७२ मध्ये ऑलिम्पिक खेळ म्युनिकमध्ये चालू होते आणि इकडे माझ्या मराठवाडय़ात दुष्काळ होरपळून काढत होता. उपासमार चालू होती. पी.टी.आय.चं यंत्र मात्र रात्रंदिवस विजेत्या खेळाडूंच्या कौशल्याविषयी काहीबाही पाठवत होतं. त्या वार्ताच्या भेंडोळय़ात भारताचं स्थान सांगावं असं काही नव्हतं. शून्याचा भोपळा फुटत नव्हता. भारतीय खेळाडूंचं मन ‘प्रयत्नांती परमेश्वर’ याभोवती फिरत होतं आणि बातम्या त्याभोवती. दुष्काळात होरपळून निघणाऱ्यांना काय त्यांचं कौतुक? पत्रकारांना मात्र त्यांच्या पोटाचा भाग म्हणून याबाबतीतल्या वार्ता वाचकांपर्यंत पोहोचवाव्या लागतच होत्या. गोळा फेक, थाळी फेक, भाला फेक, उंच उडी, लांब उडी इत्यादी फेकाफेकीत सर्वांना रस नसायचा, पण कार्यालयातील क्रीडाप्रेमी सहकाऱ्यांची फेकाफेकी मस्त चालली होती. त्याच वेळी स्वत: उत्तम खेळाडू आणि क्रीडातज्ज्ञ अरविंद आत्माराम वैद्य यांनी काही काळ हा गलका थांबवला आणि गंभीर होऊन एक माणुसकीला काळिमा फासणारी बातमी सांगितली. ती होती, पॅलेस्टाईन अतिरेक्यांनी केलेल्या इस्रायलच्या खेळाडूंच्या हत्येची! तो सारा प्रकार रक्तलांछित होता. पुढे आम्हाला असं चित्र दिसू लागलं, की दुष्काळातील माणसांची होरपळ हळूहळू मागे पडली आणि या सूडनाटय़ाच्या पार्श्वभूमीवर म्युनिक ऑलिम्पिक खेळाडूंच्या मारेकऱ्यांना इस्रायलच्या सैनिकांनी कसं वेचून वेचून मारलं याच्या बातम्या वृत्तपत्रात वाचायला मिळाल्या होत्या. जेव्हा मी प्रत्यक्ष म्युनिक शहरात गेलो तेव्हा आम्हाला डोळय़ांसमोर त्या बातम्याच दिसत होत्या. गाईडही ही माहिती आम्हाला देत होता. पण एक खंत मनात राहिली.. वेळेअभावी ऑलिम्पिकचं ते गाजलेलं, कलंकित झालेलं मैदान आणि वर्षभर जगात चर्चेत राहिलेलं ते क्रीडा संकुल बाहेरूनच बघावं लागलं. कारण त्या वेळी आमच्या गाईडला महत्त्वाचं वाटत होतं, ते बीएमडब्ल्यू मोटारीची निर्मिती होणारं ठिकाण. जर्मनीत वाहतुकीच्या वाहनांच्या निर्मितीत केलेली प्रगती आम्हाला दाखवणं त्याला महत्त्वाचं वाटत होतं. कोळसा कितीही उगळला तरी काळाच असतो म्हणून तर आपल्याकडे नको असलेला तो इतिहासच गाळून टाकण्याचा खेळ चालू होता आणि आजही चालू आहे, असो.

माणूस जगाच्या पाठीवर कुठेही गेला तरी मनानं आपलं म्हणून काही जपून ठेवलेलं काहीतरी आठवतच राहतो. फ्रँकफर्टच्या रिमझिम पावसात अरुण कोलटकरच्या ‘भिजक्या वही’तील गूढगर्भिता आठवत राहिली आणि सुचत गेली एक मुक्त कविता –

फ्रँ कफर्टच्या मंद मंद धुंद पावसात,
रस्त्यावरून चालत होती,
अरुण कोलटकरच्या ‘भिजक्या वही’तील
एकेक पानं..
निर्मनुष्य रस्त्यावरून चकाकत्या
बर्फाकडं पाहात..
घशाला कोरड पडण्याआधीच,
घंटेनं टोल दिला..
क्रुसाची वेदना कळते ना कळते,
तोवर क्षणभर अनुभवला पाऊस..
मनसोक्त, पोक्त एक एक ढिलपी सोलून अलगद करताना आणि भिजक्या वहीतील कातळ काळे शब्द ऊन्हातान्हात, फ्रँ कफर्टच्या कुळकुळीत रस्त्यांना कुरवाळत चालताना..
रस्ते निर्मनुष्य झाल्यावर भिजक्या वहीतील एक एक शब्द हातात हात घेऊन चालत असतो आपल्याबरोबर..
फ्रँकफर्टची मध्यरात्र मेघनृत्य बंद करून कोलटकरी शब्दांना, पापणीवर पाय पसरून झोपू दिलं..

indumati.jondhale@gmail.com