माधवी घारपुरे
पानात अन्न वाया घालू नये, हे आपण नेहमी ऐकतो, परंतु प्रत्येकाच्या कृतीत ते दिसतंच असं नाही. या पार्श्वभूमीवर गुजरातमधील गांधीनगर आयआयटी महाविद्यालयामध्ये चालू असलेला माझ्या नातवाने सांगितलेला एक प्रकल्प फारच भावला. तिथल्या मेसमध्ये जेवल्यानंतर ताटातले खरकटे अन्न टाकायला एक पिंप ठेवलंय. त्यात अन्न टाकून ताट स्वच्छ करून मगच ते घासायला टाकायचं. सगळे विद्यार्थी तसं करतात. कारण तशी शिस्तच आहे तिथली. पण महत्त्वाची गोष्ट त्यापुढची आहे. त्या सर्व टाकलेल्या अन्नाचं वजन केलं जातं आणि दुसऱ्या दिवशी ते किती झालं हे मोठ्या अक्षरात मेसमधील फलकावर लिहिलं जातं आणि त्यातही अतिमहत्त्वाची बाब म्हणजे त्या आकड्याबरोबर ‘या अन्नात अमुक इतकी मुलं जेवू शकली असती’ हे वाक्य असतंच असतं.
मुलांना न सांगताच त्यामागचा उद्देश कळतो आणि हळूहळू अन्न टाकणं कमी होतं. आणि त्याही पुढचं पाऊल म्हणजे जी मुलं अजिबात जेवण ताटात शिल्लक ठेवत नाहीत त्यांना गोड खाऊ बक्षीस म्हणून दिला जातो. थोडक्यात, जबरदस्तीने ज्या गोष्टी होत नाहीत त्या गोष्टी भावनेला हात घालून केल्या जाऊ शकतात याचं हे उत्तम उदाहरण आहे असं वाटतं. ज्यांना दोन वेळा पोटभर अन्न मिळतंय त्यांना याची कल्पना करताच येणार नाही पण ज्यांना एक वेळचीच भ्रांत आहे त्यांना विचारा किंवा ज्या लोकांनी भुकेच्या वेळी केळ्याची सालं धुऊन खाल्ली आहेत त्यांना विचारा.
खरं तर अन्न अजिबात वाया जाऊ नये म्हणून ‘बुफे’ जेवणाची पद्धत निघाली. हवं तेच आणि हवं तेवढंच अन्न खावं हा त्यामागचा विचार. पण घडलं उलटंच! लहानशा प्लेटमध्ये दोन वाट्या आणि समोर १० प्रकारचे पदार्थ. ते त्यात मावत नाहीत आणि समोर दिसलं की राहवत नाही. आधीच ‘चाट’ खाऊन पोटं भरलेली माणसं परत परत रांगेत जायला लागू नये म्हणून प्लेट सांडेपर्यंत ती भरून घेतात. दिसतानाही ते खराब दिसतं. बसायला अनेकदा खुर्चा-टेबल नसतात अशा वेळी उभ्यानं हातात जड प्लेट धरून खाण्याचा प्रयत्न करतात. एवढंच काय अनेकदा तर प्लेटमधलं अन्न तसंच ठेवून दिलं जातं. कारण नंतर आइस्क्रीम आदी डेझर्टसाठी पोटात जागा ठेवायची असते ना? त्रयस्थ म्हणून तटस्थपणे नुसतं चित्र डोळ्यासमोर आणा. आपली आपल्यालाच लाज वाटेल. अर्थात सन्माननीय अपवाद.
या विषयावर जेवढं लिहावं तितकं कमीच आहे. पण काही गोष्टींचा विचार व्हायलाच हवा असं वाटतं. पहिला मुद्दा असा की, जेवायला चाट पदार्थ, पंजाबी, दाक्षिणात्य, चायनीज आणि महाराष्ट्रीय इतके सगळे पदार्थ ठेवायलाच पाहिजेत का? माणूस किती खाणार? तुम्ही तुमच्या लग्न समारंभात किंवा लग्नाच्या वाढदिवशी किंवा अन्य काही सेलिब्रेशन असेल तेव्हा किती अन्नपदार्थ ठेवता आणि नंतर डेझर्ट किती प्रकारचे ठेवता यावर तुमची श्रीमंती अवलंबून असते का?
भोजनगृहात पाट्या लावलेल्या असतात, ‘पानांत अन्न टाकू नये’ पण किती जण ती वाचतात? पाहतात तरी का? त्यासाठी अनेकदा इतरांनी केलेली कृती आपल्याला ते करण्यास भाग पाडते. नकारात्मक पाट्या, सूचना, बोलणं या सर्व गोष्टी मनाच्या परिस्थितीची नकारात्मकता वाढवतात. कमी करत नाहीत. ‘वर चढला आहेस पडशील’ असं म्हणण्यापेक्षा ‘वर चढला आहेस, फांदी घट्ट पकड’ हे म्हणणं केव्हाही उत्तम!
पुण्यात दोन-तीन डायनिंग हॉलमध्ये मी हा अनुभव घेतलाय, पानांत अन्न न टाकता ते स्वच्छ केलं तर बिलावर १० टक्के सूट मिळते. या प्रयोगामुळे बरेच खवय्ये पानं स्वच्छ करताना मी पाहिलं आहे.
समाजात न बोलता कामं करणारे अनेक आहेत. रतन टाटांचा आणि मुकेश अंबानींचा एक लघुपट मी पाहिला होता. एका पंचतारांकित हॉटेलमध्ये दोघं आणि त्यांची माणसं ‘बडा खाना’साठी गेले होते. जरुरीपेक्षा अधिकच डिशेस मागविल्या गेल्या. जेवण झालं. टाटांनी उरलेलं सगळं चांगलं अन्न पार्सल करून देण्यास सांगितलं. आणि आपल्याबरोबर असलेल्या माणसाच्या हातात ती पाकिटं दिली आणि बाहेर आल्यावर ती रस्त्यावरच्या गरजूंना वाटली. वर काही पैसेही! याला म्हणत अन्नाची आणि कष्टकऱ्याची जाण ठेवणं.
कोल्हापूरच्या एका कार्यक्रमासाठी विजयाताई वाड, मी आणि माजी कुलगुरू स्नेहलता देशमुख ‘महालक्ष्मी एक्स्प्रेस’ने चाललो होतो. गाडीत बरोबर नेलेली जेवणाची पाकिटं उघडून जेवलो. बरंच अन्न शिल्लक राहिलं. स्नेहलताताईंनी ते एका पाकिटात भरलं. त्यापेक्षाही अन्नलक्ष्मी पायी जाऊ नये म्हणून टिश्यूपेपरने खाली सांडलेलं खरकटं गोळा करून कचऱ्यात टाकलं. माझी मलाच शरम वाटली. मी का नाही खरकटं उचललं? आपलं पद विसरून एका अन्नपूर्णेने अन्नाचा अपमान वाचवला. स्टेशनवर उतरल्यावर त्यांनी ते पिशवीतलं अन्न प्राण्यांना खायला दिलं. म्हणाल्या, ‘‘एक धान्याचा कण आपल्याला जमिनीत कोंडून घेतो, शेतकरी घाम गाळेपर्यंत कष्ट करतो तर त्याच्या श्रमाची किंमत आपण ठेवायला नको? एका दाण्याचं कणीस तयार होऊन वाऱ्यावर डोलावं तेव्हा खरं तर शेतकऱ्यांचं हृदय आनंदानं डोलतं आणि सांगतं, उद्या याचे अन्न पोटभर खाऊन तुम्हीही डोलाल. म्हणूनच आपल्याला ‘वदनी कवळ घेता’ लहानपणापासून शिकवतात.
कृषिवल कृषिकर्मी राबती दिनरात
स्मरण करूनी त्यांचे अन्न सेवा खुशाल
नको घेऊ काही अधाशीपणाने
नका टाकू काही करा स्वच्छ पाने
(‘फ्रिपीक’वरून साभार.)
माधवी घारपुरे / gharpuremadhavi@gmail.com