‘‘प्रत्येक अडचणीवर निसर्गाकडे परिपूर्ण तोडगा आहे. पाण्यापासून बचावासाठी मातीचं कौशल्यपूर्ण घर बांधणाऱ्या ‘शेतकरी मुंग्या’, हजारो मैल स्थलांतर करणारे पक्षी, शेपटीचा त्याग करून वेळप्रसंगी माघार घ्यायला सांगणारी पाल आणि संपूर्ण अवस्थांतर करून लहानशा आयुष्यातही झाडांच्या उपयोगी पडणारी फुलपाखरं.. निसर्गात फक्त उपयोगिता आणि सौंदर्यच नाही, तर नियमितता, वक्तशीरपणा आणि सातत्यही हातात हात घालून बघायला मिळतं. सृष्टीचं कौतुक दाखवणारे निसर्गातले हे सगेसोयरे म्हणूनच मला गुरुस्थानी आहेत!’’ सांगताहेत निसर्गप्रेमी, निसर्ग अभ्यासक मकरंद जोशी. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या आठवडय़ात मुरुडजवळच्या फणसाड वन्यजीव अभयारण्यात गेलो होतो. दर वर्षीची पावसाळी फेरी होती. बरोबरच्या छायाचित्रणात रस असलेल्या आणि खास पावसाळय़ात दिसणारं पाण्याच्या थेंबांचं सौंदर्य (मॅक्रो) टिपायला आलेल्या लोकांना मी चालता चालता थांबवलं आणि रस्त्याच्या कडेला एका टेकाडाच्या उतारावर असलेलं ‘हार्वेस्टर अ‍ॅन्ट्स’ अर्थात शेतकरी मुंग्यांचं वारूळ दाखवलं.

  एकात एक गोलाकार तटबंद्यांची ती रचना अगदी लक्षवेधी होती. ‘हार्वेस्टर अ‍ॅन्ट्स’ हे सार्थ नाव धारण करणाऱ्या मुंग्याची ती जशी कलाकुसर होती, तशीच निसर्गत:च केलेली संरक्षणाची रचना- ‘सिक्युरिटी सिस्टीम’ही होती. या मुंग्या शेतात गळून पडलेले धान्याचे दाणे गोळा करतात, आपल्या या महिरपीदार वारुळाच्या बाहेर सोलतात, त्याची फोलपटं बाहेरच ठेवतात आणि धान्याचे दाणे तेवढे जमिनीखालच्या वारुळातल्या कोठारात साठवतात. पावसाळय़ाआधी किमान महिनाभर या मुंग्यांचं हे धान्य गोळा करण्याचं काम सतत सुरू असतं. आता इतका धान्यसाठा जमिनीखालच्या कोठारात जमवल्यावर त्याच्या सुरक्षिततेचा उपायही करायला हवाच ना? या मुंग्यांचं वारूळ उताराच्या जमिनीवर असतं. पावसाळय़ात वरून जो पाण्याचा लोंढा वाहत येतो, त्याच्या वेगामुळे यांचं जमिनीतलं धान्याचं कोठार उद्ध्वस्त होऊ शकतं. ते होऊ नये म्हणून ही जमिनीवरची वर्तुळाकार तटबंदी. चक्रव्यूहासारख्या या वारुळाच्या भिंतींमध्ये जेव्हा जोरानं वाहणारं पाणी शिरतं तेव्हा आपोआपच त्याचा जोर कमी होतो, गती मंदावते आणि वारुळाच्या गोल तटबंदीतून फिरत फिरत पाणी संथपणेच बाहेर पडतं. ‘हार्वेस्टर अ‍ॅन्ट्स’च्या चक्राकार वारुळामागचं हे रहस्य कळल्यावर उपयुक्तता आणि सौंदर्य (युटिलिटी अ‍ॅन्ड अ‍ॅस्थेटिक्स) हे निसर्गात कसं हातात हात घालून पाहायला मिळतं या विचारानं थक्क व्हायला होतं. मग माणसांनी अनेकदा सोयीसाठी, सुविधा म्हणून बांधलेल्या आणि डोळय़ांना खुपणाऱ्या अजागळ आणि बेढब इमारती आठवून निसर्गातल्या मुंग्यांइतकीही अक्कल आपल्याला नसावी याचं वाईटही वाटतं!

 आपल्या मेहनतीच्या अन्नसाठय़ासाठी सुरक्षित वारूळ उभारणाऱ्या या मुंग्या असोत किंवा पानाचं नाही तर वाळक्या काडीचं हुबेहूब रूप घेऊन स्वत:चा बचाव करणारे कीटक असोत; या सृष्टीच्या अफाट पसाऱ्यातले सगळेच जीव-जंतू आपल्याला नेहमी काही तरी मोलाचं, ध्यानात ठेवावं, आचरणात आणावं असं शिकवत- दाखवत असतात. त्यामुळेच निसर्गातल्या या सग्या-सोयऱ्यांची प्रत्येक भेट नेहमीच उत्साहित, आनंदित करणारी, मनावरची निराशा, ताण दूर करणारी असते.

  गेली पस्तीस वर्ष निसर्गाच्या या उघडय़ा पुस्तकातली दिसतील ती पानं वाचायचा, जाणून घ्यायचा मी प्रयत्न करतोय आणि या निसर्गवाचनानं मला जो आनंद दिला आहे त्याची तुलना कशाशीही होऊ शकत नाही. सृष्टीच्या या खजिन्याची चावी मला मिळाली ती सुमारे ३३ वर्षांपूर्वी ‘बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’नं (बी.एन.एच.एस.) कोकणातल्या कोकिसरे (ता. वैभववाडी) इथं आयोजित केलेल्या निसर्ग परिचय शिबिरात. या शिबिरात उल्हास राणे, डॉ. अरुण जोशी, बिभास आमोणकर, डॉ. जय सामंत असे अनुभवी मार्गदर्शक भेटले. त्यांनी अवतीभोवतीची ही अद्भुत दुनिया वाचायला शिकवलं आणि मग या निसर्गवाचनाचं जे वेड लागलं ते कायमचंच! सुरुवातीला ठाण्याला लागून असलेलं येऊरचं रान अगदी हक्काचं होतं. (तेव्हा तिथे एअरफोर्सची कॉलनी नव्हती आणि वन खात्याचे निर्बंधही नव्हते.) त्यामुळे ‘समान शीले व्यसनेषु सख्यम्’ अशा मित्रांबरोबर येऊरच्या वाऱ्या सुरू झाल्या. पक्षीनिरीक्षणापासून ते फुलपाखरांशी ओळख होण्यापर्यंतच्या अनेक यत्ता येऊरच्या रानात पूर्ण केल्यानंतर मग अवतीभोवतीच्या ठिकाणांची भटकंती सुरू झाली. त्यात फणसाड, तानसा, दातिवरे, कर्नाळा असे स्टॉप लागत गेले. नंतर मग क्षितिज आणखी विस्तारलं आणि ‘ताडोबा’च्या खेपा सुरू झाल्या. तेव्हा ‘ताडोबा’ म्हणजे निसर्गप्रेमींसाठी एक आदर्श जंगल होतं. व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा नसल्यानं ताडोबाला पायी भटकता यायचं, मचाणावर रात्रभर बसून पाणवठय़ावरचे प्राणी पाहाता यायचे. त्यामुळे अरण्यवाचनाची पदवी ताडोबातच घेतली, असं म्हणता येईल. यातूनच मग निसर्ग पर्यटनाचा व्यवसाय सुरू केला आणि निसर्गाच्या बिनिभतींच्या शाळेत अनेकांना अ‍ॅडमिशन मिळवून दिली! कर्नाटकातल्या दांडेली आणि अगुंबेपासून ते खारफुटीच्या सुंदरबन आणि एकिशगी गेंडय़ांच्या काझिरंगापर्यंत भारताच्या विविध प्रांतांतल्या अरण्यांमध्ये अनेकांना बरोबर घेऊन भटकंती केली. हे करताना सृष्टीतल्या सग्या-सोयऱ्यांशी जुळलेलं नातं अधिकच घट्ट झालं आणि जगण्याला नेमकी दिशा मिळाली.

 दमट पानगळी रानं असोत किंवा खाडीलगतची खारफुटी वनं, हिमालयाच्या उतारावरचं सूचिपर्णी वृक्षांचं अरण्य असो किंवा माळरानावरचं खुरटं, झुडपी रान; निसर्गाची रूपं जशी बदलतात, त्याप्रमाणे तिथल्या जीवजंतूंची रूपंही बदलतात. या प्रत्येक परिसंस्थेत ठरावीक पद्धतीचेच जीव पाहायला मिळतात. त्या त्या जीवाकडे एक जागा, एक जबाबदारी सोपवलेली असते आणि तो जीव ती पार पाडत असतो. आपण माणसं मात्र अनेकदा सगळय़ांना एका साच्यात टाकायचा, एकाच पद्धतीत मोजायचा प्रयत्न करतो. बेडूक, ससा, सरडा आणि मासा यांची जशी धावायची शर्यत होऊच शकत नाही, तसंच माणसांमधले सगळेच जण विशिष्ट विषयातच हुशार असू शकत नाहीत, साचेबद्धपणे सगळय़ांचं मूल्यमापन एकाच निकषावर करणं योग्य तर नाहीच, पण त्या त्या माणसावर अन्याय करणारं आहे, हे आपण कधी शिकणार आहोत? निसर्गाला मात्र हे पहिल्या श्वासापासूनच उमगलंय. कोळी निसर्गत:च उत्तम जाळं विणू शकतो, म्हणून खेकडा तसं जाळं विणायचा प्रयत्न करताना दिसत नाही. कुंभारमाशी मातीचं मडक्यासारखं घर बांधू शकते, पण म्हणून मधमाशी मातीचं घर बांधायचा प्रयत्न करताना दिसत नाही. आपापले गुण, वैशिष्टय़ं, आपलं बलस्थान ओळखून त्याचा वापर केला तरच तुम्हाला खरं यश मिळतं आणि तुमच्या कामात तुम्ही सर्वोत्कृष्ट ठरता, हे निसर्गातले जीव पदोपदी सांगतात. आपण मात्र शाळकरी वयातच मुलांना गुणांच्या, नाही तर प्रवेशाच्या रॅटरेसमध्ये धावायला भाग पाडतो.  वरवर पाहिलं तर ही किती साधी शिकवण; पण ती ‘वळते’ या सग्या-सोयऱ्यांच्यातच! 

 सृष्टीच्या या सगळय़ा घटकांमधली नियमितता, वक्तशीरपणा आणि सातत्य हे फक्त वाखाणण्याजोगंच नाही, तर अनुकरणनीयसुद्धा आहे. दरवर्षी शेकडो प्रकारचे पक्षी हजारोंच्या संख्येनं केवळ नैसर्गिक प्रेरणेनं जे स्थलांतर करतात, त्यातली शिस्त आणि वक्तशीरपणा थक्क करून सोडणारा असतो. हिमालयातल्या सर्वात उंच अशा एव्हरेस्ट शिखराच्या माथ्यावरून उडत येणारे पट्ट कदंब (बार हेडेड गीज) असोत किंवा सायबेरियातून येऊन भारतातून आफ्रिकेकडे जाताना सलग पाच दिवस हिंदू महासागरावरून उडत जाणारा आमूर फाल्कन असो; कोणत्याही दिशादर्शक यंत्राशिवाय, साधनाशिवाय अतिशय खडतर प्रवास करणारे हे पक्षी पाहिले की, आपण किती कृत्रिम जगतोय, आपण स्वत:ला किती यांत्रिक साधनांवर अवलंबून ठेवलंय याची जाणीव होते. स्थलांतर करणारे पशू-पक्षी आणि फुलपाखरांसारखे कीटक पाहिले, की प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यासाठी जर अधिक कष्ट घ्यायची, अधिक त्रास सोसायची तयारी असेल, तर अनुकूलता फार काळ दूर राहू शकत नाही, याची खात्री पटते. निसर्गाच्या चक्रातले सगळे घटक-दुवे हे परस्परांशी जोडलेले, एकमेकांवर अवलंबून असे आहेत आणि त्यामुळेच एकमेकांना धरून राहण्यात आपलं हित आहे याची जाणीव त्यांना असते. झाडाच्या शेंडय़ावरची माकडं वरचा कोवळा पाला खुडून खाली चरणाऱ्या हरणांना देतात आणि हरणं आपल्या तीव्र घ्राणेंद्रियांनी आसपास लपलेल्या वाघाचा गंध हेरून ‘अलार्म कॉल’- धोक्याचा इशारा देतात- जो माकडांद्वारे सगळय़ा जंगलात पसरवला जातो. ‘सेरोपेजिया’ म्हणजे कंदिलपुष्प तर परागीभवनासाठी थेट कीटकांना आपल्या पोटात ओलीस धरून त्यांच्याकडून परागीभवनाची जबाबदारी पार पाडून घेतं. ‘बी ऑर्किड’ नावाचं फूल तर यापेक्षाही पुढे जाऊन माशीला आकर्षित करण्यासाठी माशीचंच रूप धारण करतं. त्यामुळे नर माशी त्या फुलालाच मादी समजून तिच्याशी मीलन करण्याचा प्रयत्न करतो आणि या धडपडीत परागीभवन होऊन जातं. आपल्याला एका फुलानं ‘फूल’ बनवलं याचं वाईट वाटून न घेता तो नर खऱ्या मादीच्या शोधात दुसरीकडे जातो! कीटक आणि वनस्पती यांच्यातलं नातं हे सौहार्दाचं, मैत्रीचं, स्नेहाचं. उत्क्रांतीच्या ओघात सुमारे पस्तीस कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवर कीटकांचं आगमन झालं आणि त्याच वेळी सपुष्प वनस्पती निर्माण झाल्या. तेव्हापासून कीटकांनी फुलांमधला मधुरस घ्यायचा आणि त्या बदल्यात परागीभवन करायचं, शिवाय वनस्पतींची पानं अन्न म्हणून वापरायची, अळी, कोष अवस्थेत वनस्पतींचाच आधार घ्यायचा, अशी ‘लेनदेन’ कायम चालत आली आहे. मात्र याच निसर्गात काही वनस्पती कीटकांनाच आपलं भक्ष्य करतानाही पाहायला मिळतात. चिमुकल्या आणि सुंदर दविबदू (ड्रॉसेरा) या वनस्पतीपासून ते घटपर्णीपर्यंत (पिचर प्लॅंट) कीटकभक्षी वनस्पतींचे विविध प्रकार आहेत. कुणा एकाच घटकाला वरचढ होऊ न देता निसर्गचक्राचं संतुलन राखण्याचं धोरण अशा रचनेतून पाहायला मिळतं.

  मला स्वत:ला निसर्गातल्या विविध घटकांचं निरीक्षण करताना काही गोष्टी फारच भावल्या आहेत. निसर्गातले अनेक जीव कात टाकतात आणि नवा अवतार धारण करतात. आता ‘कात टाकणं’ म्हटल्यावर आपल्याला सर्वात आधी सापच आठवतात; पण साप ज्या गटात येतात त्या रेप्टाइल्समधले सरडे, पालीदेखील वाढ होताना कात टाकतात. इतकंच काय, पण कीटकांमधले सिकाडा, केटिडीड, टोळ, झुरळ, खंडोबाचा घोडा (प्रेइंग मॅन्टिस) असे सभासद, शिवाय अष्टपाद गटातले कोळी, विंचू, कवचधाऱ्यांमधले खेकडी, शेवंडदेखील कात टाकतात. आता आपल्याला- म्हणजे माणसांना काही अशी कात टाकायची गरज नसते, पण आपण मानसिक कात तर नक्की टाकू शकतो! आपल्या मानसिकतेमधल्या जुनाट, कमकुवत, त्रासदायक (स्वत:ला आणि इतरांनाही) गोष्टी, विचार जर ठरावीक काळानं जुन्या कातीसारखे काढून टाकले तर? जसं शारीरिक वजन घटवल्यावर हलकं-हलकं, ताजंतवानं वाटतं, तसंच मानसिक कात टाकल्यावर किती तजेलदार, उत्साही वाटेल! 

कात टाकणाऱ्या जीवांचं जसं मला कौतुक वाटतं, तसंच जे कीटक ‘संपूर्ण अवस्थांतर’ म्हणजे ‘कम्प्लीट मेटॅमोफरेसिस’मधून जातात त्यांचंही वाटतं. असं संपूर्ण अवस्थांतर करणारे कीटक म्हणजे अर्थातच फुलपाखरं आणि पतंग. अंडी, अळी, कोष आणि फुलपाखरू असं यांचं जीवनचक्र असतं. एका अवस्थेचा दुसऱ्या अवस्थेशी संबंध नसतो. चिमुकल्या अंडय़ातून बाहेर येणारी कधी उग्र, कधी आकर्षक दिसणारी अळी आणि काही दिवसांनंतर त्याच अळीचं होणारं सुंदर, रंगीबेरंगी फुलपाखरू हे अवस्थांतर केवळ अविश्वसनीय असतं; पण हाच तर निसर्ग आहे. शिवाय इतकं सुंदर, आकर्षक दिसणारं फुलपाखरू फार काळ जिवंत राहाणार नसतं. केवळ काही दिवसांचं आयुष्य असतं त्यांचं, काही जातींच्या पतंगांचं तर अवघ्या काही तासांचं असतं. त्यामुळे या फुलपाखरांना पाहिल्यावर मला नेहमी ‘बाबू मोशाय, जिंदगी बडी होनी चाहिये, लंबी नही’ हाच डायलॉग आठवतो! अळीपासून फुलपाखरू बनण्यासाठी त्या जीवाला स्वत:ला कोषात बंद करून घ्यावं लागतं. म्हणजेच स्वत:मध्ये आमूलाग्र बदल घडवायचा असेल, तर बाहेरच्या गोष्टींवर अवलंबून राहू नका, आपल्या आत डोकावून बघा, कोषावस्थेत गेलात तरच तुमच्यातल्या अळीचं रूपांतर फुलपाखरामध्ये होऊ शकतं, हेच जणू निसर्ग सांगत असतो. शिवाय फुलपाखरं जशी आपल्या अल्पायुष्यात परागीभवनाचं मोठं काम करतात, फळांची सोय करून ठेवतात, तसंच आपल्या आयुष्याची लांबी किती जास्त असेल हे बघण्यापेक्षा त्या आयुष्यात आपण काय सकारात्मक, उपयोगी करू शकू याचा विचार करणं जास्त आवश्यक आहे, हे त्यांना बघताना दर वेळी नव्यानं उमगतं. 

जगताना काही वेळा माघार घेणं आवश्यक असतं किंबहुना जगण्यासाठी काही वेळा एखादी गोष्ट सोडून द्यावी लागली तरी हरकत नाही, हा आणखी एक धडा काही जीव शिकवतात. प्रत्येक वेळी जिंकण्यासाठीच आटापिटा करायचा नसतो. आपल्या घरांमध्ये आढळणारी पाल याचं आदर्श उदाहरण! हल्ला होतो तेव्हा बचावासाठी ती आपल्या शेपटीचा त्याग करते. शरीरापासून तुटून पडलेल्या शेपटीकडे हल्लेखोराचं लक्ष जातं आणि तोपर्यंत पालीला पळून जायला अवधी मिळतो. ही तुटलेली शेपूट कालांतरानं पुन्हा उगवतेही. हीच पद्धत कीटकांमधील काडी किडा (स्टिक इन्सेक्ट) वापरताना पाहायला मिळतो. हा किडा अतिशय सावकाश हालचाली करतो. या ‘गो स्लो’मुळे आपल्या जिवावर बेतू नये म्हणून शत्रूचं लक्ष विचलित करण्यासाठी तो स्वत:च आपला एक पाय शरीरापासून वेगळा करून टाकतो आणि त्या हलणाऱ्या पायाकडे शत्रूचं लक्ष वेधून स्वत:ची सुटका करून घेतो. हे असं जीव वाचवण्यासाठी स्वत:चं थोडंसं, तात्कालिक नुकसान करून घेणं हेच त्यांच्या ‘सर्वायव्हल’चं रहस्य आहे; पण काडी किडय़ामधली खरी करामत तर त्याच्या माद्यांमध्ये पाहायला मिळते. या कीटकांमध्ये नरांना पंख असतात, पण बहुसंख्यम् माद्यांना पंख नसतात. त्यामुळे जेव्हा एखाद्या प्रदेशात प्रतिकूल परिस्थिती निर्माण होते, तेव्हा अन्नाच्या शोधार्ध नर किडे उडून लांबच्या प्रदेशात जाऊ शकतात; पण माद्या मात्र तिथेच अडकतात. मग अशा माद्यांना जर मीलनासाठी नरच उपलब्ध झाले नाहीत, तर आपोआप त्यांच्यातल्या काही माद्यांचं नरांमध्ये रूपांतर होतं आणि काडी किडय़ांची पुढची पिढी जन्माला येते. प्रत्येक अडचणीवर एक परिपूर्ण तोडगा निसर्गाकडे उपलब्ध आहे. माणसांना आपल्या बुद्धिमत्तेचा गर्व आहे, पण माणसानं निसर्गातल्या समस्यांवर शोधलेले अनेक उपाय बहुतेक वेळा नवे प्रश्न निर्माण करणारे असतात. कारण आपण निसर्गचक्राचे संतुलन न सांभाळता त्यात हस्तक्षेप करून मानवी पद्धतीनं तो प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतो.

 सृष्टीच्या वैविध्यपूर्ण, अर्थपूर्ण, सुविहित रचनेमधून जगण्याचे अनेक धडे शिकायला मिळतात. आज मानवानं एकीकडे विज्ञान-तंत्रज्ञानाच्या मदतीनं अफाट आणि अचाट प्रगती केलेली असली, तरीही त्याच वेळी निसर्गाबरोबरचं आपलं नातं काहीसं कमकुवत होऊ लागलं आहे. या नात्याचे पीळ उसवू लागले आहेत आणि त्याचे (दुष)परिणाम सगळय़ा सृष्टीलाच भोगावे लागत आहेत. प्लॅस्टिकच्या अतिवापरापासून ते घनकचऱ्याच्या व्यवस्थापनापर्यंत माणसाच्या सुखासीन, सुखलोलुप जीवनशैलीतून निर्माण झालेल्या समस्या सोडवणं माणसाच्याच हातात आहे. फक्त त्यासाठी भोवतालच्या सृष्टीशी आपलं जे नातं आहे आणि ते टिकवलं पाहिजे याची जाणीव मनात रुजायला हवी. निसर्गचक्रातूनच निर्माण झालेला माणूस आज स्वत:ला निसर्गचक्रातल्या इतर घटकांपेक्षा श्रेष्ठ, वरचढ मानत आहे आणि त्यामुळे अनेक समस्या उभ्या राहिल्या आहेत. निसर्गातले सगळे घटक- मग अगदी महासागरातल्या व्हेल्सपासून ते चिमुकल्या मुंग्यांपर्यंत सगळेच आपले सगेसोयरे आहेत. त्यांची खुशाली विचारणं, त्यांना मदत करणं, त्यांना अनुकूल अशी परिस्थिती निर्माण करणं आणि ती टिकवणं ही सगळय़ाच मानवांची सामायिक जबाबदारी आहे. नाही तर आज माणसानं जसं स्वत:ला निसर्गापासून वेगळं केलंय तसं उद्या निसर्गानं माणसाला नको असलेला घटक म्हणून पुसायचं ठरवलं तर?.. तशी वेळ ओढवू नये म्हणून सृष्टीचं कौतुक दाखवणाऱ्या सग्यासोयऱ्यांशी पुन्हा नातं प्रस्थापित करायला हवं आणि सृष्टीच्या कौतुकात रंगून जायला हवं!

makarandvj@gmail.com

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Soyare sahchar nature soil skilled farmer ants migration beauty itself ysh
First published on: 30-07-2022 at 00:02 IST