नागपूर : नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पामध्ये अलीकडेच सोडण्यात आलेल्या एका तरुण वाघिणीचे ‘रेडिओ कॉलर’ हे उपकरण जमिनीवर पडलेले आढळून आले असून त्यानंतर वाघीण बेपत्ता झाली आहे. ट्रॅप कॅमेऱ्यांच्या मदतीने तिचा शोध घेतला जात आहे.

वाघाचे संवर्धन स्थानांतरण उपक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील या वाघिणीला ११ एप्रिल रोजी नागझिरा अभयारण्याच्या कक्ष क्रमांक ९५ मध्ये मुक्त केले होते. ‘सॅटेलाइट जीपीएस कॉलर’ तसेच ‘व्हीएचएफ अँटेना’च्या मदतीने तिच्या हालचालींवर ठेवली जात होती. मात्र, १२ एप्रिलपासून ‘कॉलर’चे तसेच व्हीएचएफ सिग्नल एकाच जागेवरून येत होते. त्यामुळे दुसऱ्या दिवशी व्याघ्र प्रकल्पातील चमू, क्षेत्रीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शोध घेतला असता ‘रेडिओ कॉलर’ जमिनीवर पडलेले आढळले. तेथून एक किलोमीटर परिसरात यांनी वाघिणीचा शोध घेतला. मात्र ती आढळून आली नाही. वाघिणीच्या हालचालींमुळे ‘रेडिओ कॉलर’ गळून पडले असावे, अशी शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तविली. वाघिणीचा शोध घेण्यासाठी वरिष्ठ अधिकारी तसेच तज्ज्ञाच्या मार्गदर्शनाखाली शोधमोहीम राबवण्यात येत आहे. संपूर्ण क्षेत्रात अतिरिक्त ‘ट्रॅप कॅमेरे’ लावण्याची कार्यवाही सुरू आहे. वाघीण सापडल्यास तिला पुन्हा  ‘रेडिओ कॉलर’ लावण्याचा प्रयत्न केला जाईल, असे उपवनसंरक्षक अधिकारी प्रमोद पंचभाई यांनी सांगितले. 

हेही वाचा >>>“निवडणुका असल्या तरी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही,” मुख्यमंत्र्यांची ग्वाही; म्हणाले..,

नागझिरा अभयारण्यात एका वाघिणीचे हालचालींवर लक्ष ठेवणारे ‘रेडिओ कॉलर’ उपकरण गळून पडल्याचे आढळून आले आहे. या ‘बेपत्ता’ वाघिणीचा युद्धपातळीवर शोध घेतला जात आहे.

रेडिओ कॉलरचा उपयोग

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वाघांच्या हालचाली, स्थलांतरे यावर लक्ष ठेवण्यासाठी तसेच त्यांच्या वर्तणुकीचा अभ्यास करण्यासाठी तरुण वाघांना ‘रेडिओ कॉलर’ हे उपकरण बसविले जाते. डेहराडून येथील भारतीय वन्यजीव संस्थेचे शास्त्रज्ञ ही प्रक्रिया पार पाडतात. ही कॉलर गळून पडल्यास समस्या उद्भवू शकतात. सुप्रसिद्ध ‘जय’ या वाघाची कॉलर दोनदा गळून पडली होती. दुसऱ्यांदा कॉलर गळल्यानंतर त्याचा अद्याप ठावठिकाणा लागलेला नाही.