-डॉ. भूषण शुक्ल

आताच्या आजी-आजोबांनी लहानपणी शिस्तीच्या नावाखाली मार खाल्ला, उलट न बोलता पालक सांगतील ते मनाविरुद्ध, निमूटपणे केलं. शिस्तीचा एवढा त्रास त्यांच्या मुलांच्या- अर्थात आताच्या तरुण/ मध्यमवयीन पिढीला झालेला नाही. मात्र या नवीन पालकांसमोरची आव्हानं वेगळी आहेत. पूर्वीची अतिकठोर शिस्त आता अवलंबणं अशक्य दिसत असतानाच त्यांना मुलांच्या मनात स्वत:साठी जागाही कायम राखायची आहे. कसा गाठावा हा सुवर्णमध्य?..

loksatta chaturang The main cause of new and old generation disputes is the mode of spending
सांधा बदलताना: ‘अर्थ’पूर्ण भासे मज हा..
family members
मनातलं कागदावर: साधू या सूरतालाशी लय!
Numerology Mulank Five People
Numerology: ‘या’ जन्मतारखेचे लोक असतात बुद्धिमान आणि हुशार, कामाच्या ठिकाणी होते त्यांचे कौतूक
wardha suicide, wardha sister commits suicide
वर्धा : संपत्तीचा वाद; बहिणीने केली भावाच्या घरी आत्महत्या

आखून दिलेल्या मार्गावर चालणं म्हणजे शिस्त. काही लोकांनी हा मार्ग ठरवायचा आणि इतर सर्वांनी त्यावर चालायचं हे शिस्तीचं सर्वमान्य रूप आहे. शिस्त जितकी जास्त, तितकी विविधता आणि स्वातंत्र्य कमी. त्यामुळे एक विशिष्ट, पण सामान्य उद्दिष्ट पटकन साध्य करायचं असेल तर शिस्तीला पर्याय नाही. काही लोकांच्या मते शिस्त ही ‘स्वयं-शिस्त’ असते. अनेक महान कलाकार, शास्त्रज्ञ आणि खेळाडूसुद्धा आपल्या कामाबद्दल इतके शिस्तबद्ध असतात, की सर्वसामान्य माणूस त्याची कल्पनाही करू शकत नाही. अनेकदा तर अशी खात्री पटते, की स्वयंशिस्तीशिवाय काहीही मोठं साध्य होऊ शकत नाही.

हेही वाचा…‘भय’भूती : भीती माणसांचीच!

कडक शिस्तीनं वागणारा समूह म्हणून सशस्त्र दलांकडे बोट दाखवता येईल. इथे शिस्त अंगात भिनलेलीच असते. इतकी, की कर्तव्य पूर्ण करताना दुसऱ्याचा जीव घेणं किंवा जरूर पडल्यास स्वत:चा जीव देणं हे क्षणाचाही विचार न करता केलं जातं.

सार्वजनिक आयुष्यात नियमानं राहणारे देश म्हणजे युरोपियन मंडळी. घराबाहेर शिस्त आणि घरात पूर्ण स्वातंत्र्य अशी वैयक्तिक आणि सामाजिक जीवनाची त्यांनी विभागणी केली आहे. या जोरावर मोठी शास्त्रीय प्रगती आणि समृद्ध देश त्यांनी उभे केले आहेत.

याचंच दुसरं टोक म्हणजे जपानसारखे प्राचीन देश. तिथे वैयक्तिक मताला फारशी किंमत नाही. समाजहित आणि देशहित हे सर्वात महत्त्वाचं, असं त्यांच्या संस्कृतीनं सर्वांसाठी ठरवलं आहे आणि त्याला विरोध करण्याची व्यक्तीला परवानगी नाही. कमी काळात संपूर्ण देशाची प्रचंड प्रगती घडवायची असेल, तर असं प्रारूप (मॉडेल) खूप यशस्वी ठरतं. या शिस्तीच्या जोरावर एका पिढीत जातिभेद संपवणारा जपान हा एकमेव देश आहे.

हेही वाचा…इतिश्री : ‘आईगिरी’चं ‘बेबीसिटिंग’

थोडक्यात, वैयक्तिक आणि सामाजिक एका अक्षावर, तर शिस्त आणि स्वातंत्र्य दुसऱ्या अक्षावर, अशी चार घरांची विभागणी करून त्याची चार प्रारूपं आपल्याला मिळतात. तुमची राजकीय किंवा धार्मिक विचारसरणी तुम्हाला एका प्रारूपात बसवते.

शिस्तीमुळे कामं वेगानं होतात. चर्चेशिवाय होतात. पण स्व-विचाराला जागा नसल्यानं या पद्धतीत सर्जनशीलतेला वाव नाही. विचार- स्वातंत्र्यानं मिळणारा आनंद यात नाही. कर्तव्यपूर्ती हाच एक आनंद शिल्लक राहतो. सत्तास्थानी असलेल्या मंडळींच्या सोयीची ही रचना आहे. कुटुंबातलं सत्तास्थान म्हणजे पालक!

गंमत अशी आहे, की कोटयवधी लोकांच्या समूहाला लागू पडणारे हे नियम ‘कुटुंब’ या सर्वात छोटया मनुष्यसमूहालासुद्धा लागू पडतात. स्वातंत्र्य या गुणाला जास्त किंमत दिली, तर खूप दर्जेदार आणि सर्जनशील काम होतं, मात्र ते वेगानं आणि इतरांना हवं तसं व्हायची शक्यता कमी. त्यातला आनंद हा सुद्धा एका व्यक्तीपुरता राहू शकतो. या विस्तृत चर्चेचा आपल्या पालकत्वाशी जवळचा संबंध आहे. तीन पिढयांमध्ये चाललेल्या संघर्षांत शिस्त आणि नियमबद्धता हा अत्यंत कटू वादाचा आणि मतभेदाचा मुद्दा बनला आहे.

हेही वाचा…माझं ‘सीझर’ होईल का डॉक्टर?

सध्या आजी-आजोबा असलेली पिढी टोकाच्या शिस्तीत वाढली. स्वत:च्या पालकांसमोर तोंड उघडायलासुद्धा त्यांना परवानगी नव्हती. शिस्त म्हणजे काय, हे त्यांना सांगण्याचीदेखील गरज पडली नाही. मोठया कुटुंबात वावरताना, इतर वागतात तसं वागत राहायचं; प्रश्न संपला. हे वर्तणुकीचे नियम सर्वमान्य होते. त्यांना मुळीच विरोध करण्याची व्यक्तीला परवानगी नव्हती. आणि या अंगात भिनलेल्या नियमबद्धतेलाच ‘संस्कार’ म्हणण्याची आपल्या देशात पद्धत आहे.

नियम मोडणाऱ्या व्यक्तीला/ मुलाला अत्यंत कडक शिक्षा ठरलेली होती. आता आपल्या कल्पनेतही बसणार नाहीत अशा क्रूर शिक्षा अगदी लहान मुलांनाही सर्रास दिल्या जायच्या. फक्त घरीच नव्हे, तर शाळा आणि इतर सार्वजनिक ठिकाणीसुद्धा कोणताही प्रौढ कोणत्याही मुलाची नियम मोडल्याबद्दल यथेच्छ धुलाई करू शके. त्यात कोणाला काही वावगं वाटत नव्हतं. मनाविरुद्ध वागणाऱ्या मुलांना कायमचं घराबाहेर काढणं, देशोधडीला लावणं, हेही या पिढीनं बघितलं आहे.

अशा परिस्थितीत वाढलेल्या या पिढीनं खूप मोठं स्थित्यंतर घडवलं. कमी मुलं वाढवली, पण समजूतदारपणा आणायचा प्रयत्न केला. आज आजी-आजोबा असलेल्या पिढीनं मुलांवरचा घरकामाचा बोजा कमी केला. मुलांना मोकळा वेळ दिला आणि निदान घराबाहेर मोकळा श्वास घेऊ दिला. त्यांनी शिस्त जरूर पाळली. आग्रहानं राबवलीसुद्धा. हात जरूर उगारला, पण त्यातली पूर्वसुरींची भयानकता कमी केली. वर्तणूक आणि बोलणं यात फरक ठेवला नाही. मुलांसाठी घातलेले नियम स्वत:च जास्त निष्ठेनं पाळले.

हेही वाचा…सांधा बदलताना : तोच वाद, तोच संघर्ष पिढयान्पिढया ?

पिढयान्पिढया चालू असलेल्या कर्मठ आणि निष्ठुर शिस्तीलाच मोडता घालणारी ही पहिली पिढी. शतकानुशतकं चाललेल्या पालकत्वाच्या प्रथा मोडण्याचं श्रेय या आजी-आजोबांना आहे. त्यांना हे श्रेय जाहीररीत्या कधीच मिळत नाही. शिवाय ‘जुनाट, बुरसटलेले’ वगैरे म्हणून हिणवलं जातं आणि ‘डिजिटल’ जगात त्यांची जी धडपड होते त्याची थट्टा केली जाते. हे चूक तर आहेच, पण कृतघ्नपणाचंसुद्धा आहे.

या थोरल्या पिढीनं शिस्तीनं आणि कर्तव्यदक्षतेनं वाढवलेली पिढी आता पालक आहे. त्यांनी असं ठरवलं आहे, की मुलांना आपल्याबद्दल काय वाटतं, ही आपल्या पालकत्वाची मोजपट्टी आहे. मुलं यशस्वी व्हावीत, ही महत्त्वाकांक्षा तर आहेच, पण त्यावर मुलांना आपण आवडावं, ही अत्यंत तीव्र इच्छासुद्धा आहे. मुलांकडून हव्याशा असलेल्या प्रेमाची आणि आपुलकीची आस असलेली ही संपूर्ण पिढी आहे. मुलांच्या मनाविरुद्ध उघडपणे वागणं किंवा मुलांना धाकदपटशा दाखवून शिस्त लावणं हे त्यांना धोकादायक वाटतं. आपण असे वागलो, तर मुलं दुरावतील किंवा बिथरतील आणि काही तरी वाईट होईल, अशी अनामिक भीती त्यांना आहे.

मृदू शब्दांत समजावून, वारंवार सांगून, लालूच दाखवून आणि अनेकदा कुटुंबाबाहेरच्या व्यक्तीची साक्ष काढून मुलांचं मन वळवण्याचा आणि त्यांची वर्तणूक शिस्तबद्ध करण्याचा प्रयत्न या पिढीचे पालक करतात. पटकन हात उचलला किंवा धारदार शब्द वापरला तर त्यांना कसंनुसं होतं. मनाला भीतीयुक्त टोचणी लागते आणि ते त्याचं परिमार्जन करण्याचा प्रयत्न करतात. ज्ञान आणि कौशल्याधिष्ठित समाजात टिकण्यासाठी आपल्या मुलांना स्वतंत्र विचार करता आला पाहिजे, सर्जनशीलता जमली पाहिजे, चाकोरीबाहेर विचार करता आला पाहिजे, याची पालकांना स्पष्ट जाणीव आहे. आणि हे सर्व हवं असेल तर यंत्रवत शिस्त आणि धाक चालणार नाही, हेसुद्धा त्यांना स्वच्छ दिसतं आहे. पण त्यांची पंचाईत वेगळीच आहे.

हेही वाचा…स्त्री ‘वि’श्व: ‘पर्यावरणीय स्त्रीवादा’ची पावलं

सर्जनशील स्वातंत्र्याचा रस्ता वेगळा नसतो. तो सरधोपट शाळा, कॉलेज, व्यवसाय/ नोकरी/ धंदा यातूनच सुरू होतो. वैयक्तिक आयुष्यात प्रलोभनं टाळून शिस्तीनं प्रयत्न केले, तरच यश साध्य होतं. म्हणजे स्वातंत्र्य आणि समृद्धीचा रस्ता हा शिस्तीच्या खडबडीतपणानं भरलेला आहे. ही पालकांची खरी पंचाईत आहे.

मुलाला खेळाची किंवा कलेची आवड अभ्यासापेक्षा जास्त असेल, तर त्यासाठी लागणारी उपकरणं आणणं, त्याचे प्रशिक्षण वर्ग लावणं, स्पर्धासाठी आपल्या कामातून सुट्टी घेऊन एका पालकानं मुलांबरोबर प्रवास करणं किंवा हजर राहणं, हे सर्व करायची त्यांची तयारी आहे. पण मुलानं खेळणे/ कलासाधना यावर मन केंद्रित करावं. आहार, व्यायाम, प्रशिक्षण आणि विश्रांती हे सर्व स्व-शिस्तीनं करावं.
ध्येयावरची नजर न ढळू देता वर्षांनुवर्ष शिस्तीनं जगावं, असं त्यांना वाटतं. दरवर्षी वेगळा खेळ आवडणारं, आहार-फिटनेसचा कंटाळा करणारं, रात्री पटकन झोपण्याऐवजी स्मार्ट फोनवर उशिरापर्यंत उद्योग करणारं मूल त्यांना अवघड जातं. स्वातंत्र्य आणि सुविधा हव्यात, पण जबाबदार वागणुकीच्या नावानं आनंद! असं मूल कसं सांभाळायचं हा खरा प्रश्न आहे.

याला स्वातंत्र्य म्हणायचं की स्वैराचार?.. यातली सीमा कुठं आहे? जेव्हा मूल ही सीमा वारंवार ओलांडतं, तेव्हा हे स्वातंत्र्य काढून घ्यायचं का? त्याला मुलाची प्रतिक्रिया काय असेल? काही वाईट तर होणार नाही ना?.. या सर्व प्रश्नांसमोर निरुत्तर झालेली पालक पिढी म्हणजे आपण सर्व!

हेही वाचा…सांदीत सापडलेले.. ! एका जगण्यात दोन आयुष्यं!

या प्रश्नांचं उत्तर आहे. पण ते कडवट आहे आणि सहज पचणारं निश्चितच नाहीये. सुविधा आणि स्वयंनिर्णयाची मोकळीक ही वय, स्वभाव, क्षमता, परिस्थिती आणि आतापर्यंतचा अनुभव, याचा व्यवस्थित विचार करून टप्प्याटप्प्यानं देण्याची गोष्ट आहे. मूल जन्माला येतं, तेव्हा ते पूर्णपणे परावलंबी असतं. त्या मुलाला हळूहळू पूर्णपणे स्वतंत्र आणि निर्णयशक्ती असलेली प्रौढ व्यक्ती बनवणं, हे पालकत्वाचं कार्य आहे. काही मुलांना हे पंधराव्या वर्षीच जमतं, तर काहींना पंचविशी उजाडावी लागते. याचं भान पालकांना असणं, ही महत्त्वाची गोष्ट आहे.

पूर्णपणे ढिल्या हातानं सुरुवात करून मोठा गोंधळ होण्याची वाट बघायची आणि नंतर ओढ द्यायची, यापेक्षा अगदी बालपणात सुयोग्य शिस्तीची सुरुवात करणं आणि मुलाच्या वाढीचा अंदाज घेऊन हळूहळू काढता पाय घेणं हा एकविसाव्या शतकातल्या जबाबदार पालकत्वाचा मूलमंत्र होऊ शकतो. त्यासाठी एक भावनात्मक बैठकही हवी. त्याविषयी पुढील लेखात.

chaturang.loksatta@gmail.com