नंदीबैलाचे खेळ सर्वाना परिचित आहेत. दिवाळी सण होताच नंदीवाले आपापला नंदी घेऊन खेळ दाखवायला राज्यात, राज्याबाहेरही जातात. मात्र सध्या या नंदीबैलाच्या खेळांचे आकर्षण घटले असल्याने त्यांचे उपजीविकेचे साधन कमजोर झाले असून अभावग्रस्त आयुष्य जगावे लागत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘‘सहा सात वरीस झालं असतील बघा. मोठा पाऊस आला होता. झोपडय़ांत व पालात राहानाऱ्यांचं लई नुकसान झालं होतं. इतरासकट आमचीबी लवनात असलेली वीस पंचवीस पालं वाहून गेलती. नुकसान बघायला मानसं आली, पुढारी आले. आम्हासनी नुकसान भरपाई मिळणार, नारेगावच्या शिवारात पक्कय़ा घरासाठी आम्हाला पाच एकर जागा मिळणार, असं पुढाऱ्यांनी भाषणं केली. तसं पेपरात छापूनबी आलं. सगळ्यांना आनंद झाला. आम्ही देवापुढं प्रार्थना केली की, असंच चारी बाजूला लई मोठा पाऊस येऊ दे आनी साऱ्यांची पालं वाहून जाऊ दे, म्हंजी साऱ्यांना पक्कय़ा घरासाठी जागा मिळंल. पन कसचं काय अन कुठलं काय? आम्हाला कोनच पावलं नाही. आज पत्तोर आम्हासनी कायबी मिळालं न्हाई. काई दिसानं बळंच आम्ही हाफिसात गेलोवतो. वाहून जाण्याआधी ते पालं तिथं होतं याचा त्यांनी पुरावा मागितला. म्हंजी काय असं इच्चारलं तर, ते म्हणले, रेशन कार्ड व वीज बिलासारखी सरकारी छापील कागदं पाहिजेत. ती आमच्याजवळ नाहीत, असं सांगितल्यावर त्यांनी आम्हाला हाकलून दिलं. आम्ही पन त्याचा नादच सोडून दिला’’ हे सांगत होत्या, नंदीवाले जमातीच्या गंगूबाई गंगाराम फुलमाळी, शांताबाई येल्लप्पा फुलमाळी, मालनबाई हणमंत तिरमळ, गजरा रामू तिरमळ आणि त्यांच्या इतर नातेवाईक महिला. त्या साऱ्या राहतात औरंगाबाद परिसरातल्या गारखेड क्षेत्रातल्या गोविंदनगर शेजारच्या नंदीवाले जमातीच्या पाल वस्तीत.
‘सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय?’ हे गाणं महाराष्ट्राला सुपरिचित आहे. गाण्यातला भोलानाथ म्हणजेच नंदीवाल्यांचा नंदी. शिंगांना व पायात रंगीत सुती गोंडे बांधलेले, गळ्यात घंटय़ांची माळ आणि पाठीवर रंगीबेरंगी व सुंदर नक्षीकाम केलेली शाल अशा सजवलेल्या वेशातला नंदी, भविष्य जाणून घेऊ इच्छिणाऱ्या लोकांच्या प्रश्नांची उत्तरे होकारार्थी किंवा नकारार्थी मान हालवून देतो हे आपणा सर्वाच्या अनुभवाचे आहे. चौरंगी पाटावर किंवा त्याचा मालक असलेल्या नंदीवाल्याच्या छातीवर चारी पाय एकत्र ठेवून उभे राहण्याची कसरत पण करतो. गावातील कर्तेधर्ते किंवा पुढारी मंडळींकडून सामाजिक हिताची आश्वासने किंवा लोकांकडून नवस फेडण्याचे आश्वासन मिळेपर्यंत (मेल्यासारखे) निपचित पडून राहण्याचा हट्टाग्रह पण करतो. नंदी हा शंकर महादेवाचा भक्त व सेवक असल्याची भावना असल्यामुळे लोकांच्या मनात नंदीवर श्रद्धा व त्याच्या भविष्य कथनाबद्दल आदर असतो. याच श्रद्धा व आदरापोटी लोकांनी स्वखुशीने दिलेली दक्षिणा/देणगी हेच नंदीवाल्या जमातींच्या उपजीविकेचे परंपरागत साधन होय.

साधारणपणे दिवाळी सण होताच हे लोक आपापला नंदी घेऊन बाहेर पडतात आणि शिवरात्रीला परत येतात. राज्याबाहेर गेलेले लोक आपल्या सोयीनुसार वर्ष, दोन वर्षेसुद्धा बाहेर फिरतीवर राहतात. नंदीचा खेळ करण्यासाठी नंदीला प्रशिक्षण द्यावे लागते. स्वराज्यात प्राण्यांना क्रूरतेने वागविण्याविरोधात केलेल्या (क्रुयेल्टी टू अ‍ॅनिमल्स अ‍ॅक्ट) कायद्यामुळे बैलाला (नंदीला) असे प्रशिक्षण देणे गुन्हा ठरते. प्रशिक्षणाअभावी नंदीचा आकर्षक व अचंबित करणारा खेळ करणे अवघड झाले आहे. त्यामुळे अलीकडे पुष्कळसे नंदीवाले नंदीला सजवून त्याचा दोर हातात धरून, ढोलाचा गुबुगुबु आवाज करत, त्याला दारोदार मिरवतात. फार तर होकारार्थी/नकारार्थी मान हालवायला लावतात. पाठीवर किंवा मानेवर पाचवा पाय किंवा
एखादे जादा शिंग असलेला किंवा इतर व्यंग असलेला नंदी मिळवून त्याचे प्रदर्शन करत काही जण फिरतात. अलीकडे हे अकुशलतेचे काम महिलाही करताना दिसतात. त्यामुळे नंदीबैलाच्या खेळाचे आकर्षण घटले आणि त्यांच्या उपजीविकेचे साधन कमजोर झाले.

नंदीबैल सांभाळण्यासाठी चारा उपलब्ध होणे महत्त्वाचे आहे. म्हणून यांच्या वस्त्या मध्यम पावसाच्या, विरळ जंगलाच्या, डोंगराळ भाग व मोठमोठे गवताचे पठार असलेल्या प्रदेशात दिसतात. महाराष्ट्रात यांच्या वस्त्या अहमदनगर, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, औरंगाबाद, जळगाव व बीड जिल्ह्य़ात आढळतात. आताच्या काळात पूर्वीसारखी रानावनात स्वैरपणे गुरे चारता येत नाहीत. कारण स्वशासनाने सामाजिक वनीकरणाचे ‘कुऱ्हाडबंदी, चराईबंदी’सारखे व वनसंवर्धनाचे इतर अनेक कायदे केले आहेत. ज्यामुळे जनावरे मुक्तपणे चारण्यास बंधने आली आहेत. बाजारातून महागडय़ा भावाने चारा विकत घेऊन नंदी पोसणे आर्थिक दृष्टय़ा परवडणारे नाही. शिक्षणाच्या प्रचार व प्रसारामुळे वाढलेली विज्ञाननिष्ठा आणि आधुनिक काळात घराघरात पोहचलेली करमणूक व्यवस्था यामुळे नंदीकडून भविष्य ऐकण्यात स्वारस्य उरलेले नाही. अशा रीतीने नंदीवाले समाजाचा परंपरागत व्यवसाय फारच कमजोर झाला असला तरीही जगण्यासाठी योग्य पर्याय मिळत नाही म्हणून वृद्धांना व चालत्या-खेळत्या लहान मुलांना एके ठिकाणी स्थिर ठेवून बाकी सारे कुटुंबीय नंदीबैलांसह राज्यात व राज्याबाहेरही फिरतात.
नंदीवाले जमात आंध्रातून दोन टप्प्यांत महाराष्ट्रात आली, असे समाजशास्त्रज्ञांचे मत आहे. साधारणत: ८०० वर्षांपूर्वी आले तो पहिला टप्पा. ते स्वत:ला तिरमळ नंदीवाले म्हणवून घेतात. तिरमळचे पाटील, चौगुले, कोमटी आणि दौंडीवाले हे चार पोटभाग आहेत. यांच्यात जाधव, पवार, चव्हाण, देशमुख, महाजन आदी आडनावे आहेत. दुसरा टप्पा आहे सुमारे अडीचशे वर्षांपूर्वीचा. हे लोक स्वत:ला फुलमाळी नंदीवाले म्हणवून घेतात. फुलमाळीचे दोन पोटभाग आहेत. एक देववाले आणि दुसरा रंगलोड. या सर्वाची मातृभाषा तेलगू आहे. यांना मराठी व हिंदी या दोन्ही भाषा चांगल्या तऱ्हेने बोलता येतात. भटकेपणामुळे यांच्यात शिक्षणाचे प्रमाण अत्यल्प असले तरी नवीन पिढीतील यांची बरीच मुले-मुली सरकारी मराठी शाळांत शिकत आहेत. तिरमळ व फुलमाळी या दोन गटांत बेटी व्यवहार होत नाही. पुणे जिल्ह्य़ातील इंदापूर तालुक्यात वडापूर येथे दर तीन वर्षांनी या सर्व नंदीवाले जमातीची मोठी यात्रा भरते. या यात्रेत लग्न जुळविणे, घटस्फोट मंजूर करणे व इतर वादावादी व तक्रारी सोडविणे ही कामे जात पंचायतीत होतात. महामाई ही त्यांची मुख्य देवता आहे. हे आषाढी पौर्णिमा साजरी करतात. हा समाज मांसाहारी आहे. यांच्याकडे मासेमारीचे व शिकार करण्याचे कौशल्य आहे. पण यांवर बंधने आल्यामुळे यांच्या अन्नसवयी बिघडल्या आहेत. यांच्यापैकी बरेच पुरुष सणवार, जन्म-मृत्यू, आषाढी व इतर सुख-दु:खाच्या प्रसंगी दारू पितात. शिवाय यांच्यातले बरेच लोक बिडय़ा ओढतात.

या जमातीत महिलांची भूमिका फार महत्त्वाची आहे. त्या मुख्यत: घरोघर फिरून छोटे छोटे कृत्रिम शोभिवंत दागिने, अशुभ किंवा वाईट गोष्टींपासून मुलांबाळांचे संरक्षण करणारे ताईत, बैलाच्या गळ्यात बांधण्यासाठी आवश्यक कवडय़ांच्या आणि मोठय़ा मण्यांच्या माळा, सुया-दाभण-बिब्बा, फणी-कंगवे-रिबिन आदी कटलरी वस्तू विक्रीचे काम करतात. विशेषत: या महिला कशिदा काम फार सुंदर करतात. नंदीबैलाच्या पाठीवर घालायच्या नक्षीदार शाली या महिलाच तयार करतात. रंगीबेरंगी ठिगळाच्या गोधडय़ा शिवण्याची यांची हस्तकला खास आहे. यांच्या गोधडय़ांना शहरात व परदेशातसुद्धा मागणी आहे. विक्री कौशल्याच्या अभावामुळे दलालांचा जास्त लाभ होतो. प्रसंगी त्या शेतमजुरीही करतात. नंदीबरोबर म्हैस-गाय-कोंबडय़ा सांभाळण्याचे कामही महिला करतात. त्यासाठी घरगुती कामे पहाटेच उरकून त्या सकाळी लवकर बाहेर पडतात.
स्त्रिया स्वतंत्रपणे उत्पन्न कमावतात म्हणून इतर भटक्या जमातींच्या मानाने त्यांचा कुटुंबातला दर्जा उच्च आहे. काही स्त्रिया आपल्या नवऱ्याच्या कामात मदत करतात. नंदीबैल घेऊन स्वतंत्रपणे फिरतात. गावातल्या कुणबी किंवा मराठा समाजाच्या पद्धतीनुसार यांची लग्ने केली जातात. वडीलधारी लग्न ठरवतात. हळद लावणे, अंतरपाठ धरणे, मंगलाष्टके म्हणणे, अक्षता टाकणे, सप्तपदी करणे हे विधी केले जातात. मात्र यांच्यात परंपरेनुसार मुलाला हुंडा दिला जात नाही. मुलांकडून मात्र ऐपतीप्रमाणे मुलीला ‘वधूदक्षिणा’ दिली जाते. गरिबात गरीब मुलाने किमान एक हजार रुपये दिले पाहिजेत. लग्न होईपर्यंत मुला-मुलीला सांभाळण्याची जबाबदारी पालकांची असते असे मानले जाते. महत्त्वाचे म्हणजे परंपरेने सासू-जावई आणि सासरा-सून या नात्यात बोलणे, हसणे, एका घरात राहणे निषिद्ध आहे. आजही बऱ्याच अंशी हे पाळले जाते. दीर-भावजय, मेहुणा-मेहुणी यांच्यात बोलणे व थट्टामस्करी चालते. मृत पत्नीच्या लहान बहिणीबरोबर आणि मृत पतीच्या लहान भावाबरोबर लग्ने केली जातात. मंगळसूत्र हे विवाहित स्त्रीचे मुख्य लक्षण आहे. त्याशिवाय कुंकू आणि पायाच्या बोटातली जोडवी ही विवाहितेची लक्षणे आहेत. पती, पत्नी दोघानांही घटस्फोट मागण्याचा अधिकार आहे. दोघांनाही पुनर्विवाह करता येतो.

यांच्या कष्टाच्या मानाने यांना उत्पन्न मिळत नाही. हा तसा अभावग्रस्त समाज आहे. काही थोडी उदाहरणे समाधान देणारी आहेत. काही लोक स्वबळावर शिकून सरकारी नोकरीत आहेत तर काही व्यवसायात स्थिर झाली आहेत. सांगली जिल्हा, तासगाव तालुक्यात नेहरूनगर (निमनी) हे नंदीवाल्यांचे गाव आहे. सुमारे एक हजारपेक्षा जास्त कुटुंबांचे गाव. आधी सारे झोपडय़ांत राहणारे. पण आता त्यांच्यापैकी बऱ्याच कुटुंबांना शासकीय घरकुल योजनेचा लाभ झाला आहे. त्यांच्यातूनच अनिता देशमुख ही युवती पुढे आली. तिथे तिने ‘प्रकाश शिक्षण प्रसारक संस्थे’तर्फे काम सुरू केले. मुलांना शाळेत दाखल करण्यापासून त्यांना शिकवत गावात दोन वाचनालये सुरू केली. महिलांचे बचत गट केले. महिलांना म्हशी, शेळ्या वाटल्या. किफायतशीर व्यवसाय केला. युवक-युवतींची आरोग्य शिबिरे, क्षमता वृद्धी शिबिरे, व्यवसाय प्रशिक्षण कार्यशाळा आदी कार्यक्रमांतून जागृती व संघटन कार्य केले आहे. त्यातूनच आज संपूर्ण गावाला धान्य पुरवठा करणारे धान्य केंद्र महिलांतर्फे यशस्वीपणे चालविले जात आहे. गावात स्वयंरोजगारनिर्मितीचे चांगले काम झाले आहे. कदाचित भिक्षेकरी भटक्या जमातीतल्या महिलांतर्फे केले जाणारे हे कार्य पहिलेच असावे. यातून एकच सिद्ध होते की, संधी-साधने व योग्य मार्गदर्शन मिळाले की भटक्या जमातींच्या महिलासुद्धा प्रतिष्ठेचे चांगले काम करू शकतात. ल्ल
अ‍ॅड.पल्लवी रेणके – pallavi.renke@gmail.com

मराठीतील सर्व 'ती' मुक्त-विमुक्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Story of tribal community
First published on: 24-10-2015 at 01:01 IST