शब्दांसह संवादू..

माझ्या आईची सख्खी मावशी म्हणजे माझी एक आजी कराचीत राहायची..

माझ्या आईची सख्खी मावशी म्हणजे माझी एक आजी कराचीत राहायची.. पण तसं पाहता स्वातंत्र्यापूर्वी कराचीत हजारो मराठी कुटुंब राहात होती. कराचीत मराठी चित्रपट झळकत होते. कोकणातले कित्येक चाकरमानी कराचीत नोकऱ्या करीत होते. मे महिन्याच्या सुट्टीत कराचीहून बोटीनं मुंबई गाठायची आणि तिथून कोकणात जायचं, असाही कित्येकांचा शिरस्ता होता. कराचीतली पहिली शाळा ‘जगन्नाथ वैद्य स्कूल’ ही मराठी माणसानं काढली होती. (आणि आजही ती त्याच नावानं तिथे आहे!) एवढंच काय, तर कराचीतली सर्व महाविद्यालयं मुंबई विद्यापीठाच्याच अखत्यारीत येत. ना. सी. फडकेंनीही काही काळ कराचीत प्राध्यापैकी केल्याचं सांगतात. त्यामुळे देशावर फाळणी घोंघावू लागली तेव्हाही, आपली कराची आपल्याला सोडावी लागेल, असं कुणालाच वाटलं नव्हतं.. फाळणीच्या उंबरठय़ावरही कराची प्रथम शांतच होतं..

एके  सकाळी माझा मामा नेहमीप्रमाणे दूध आणायला बाहेर गेला तेव्हा त्यानं आयुष्यात पहिली भोसकाभोसकी पाहिली. त्याचं वय तसं पोरसवदाच होतं. त्यामुळे घाबरून तो घरी परतला आणि त्याच क्षणी कराची सोडायचा निर्णय झाला! राहतं नांदतं घर आहे तसं मागे टाकून धाव घ्यावी लागली.. हजारो लोकांना घ्यावी लागली.. आजी दिल्लीला आली.. प्रथम काही दिवस वाटत होतं की, परिस्थिती सुधारेल.. परत आपल्या कराचीला जाता येईल.. पण तसं काही झालं नाही.. दिल्ली हेच त्यांचं कायमचं वस्तीचं आणि उत्कर्षांचं स्थान बनलं.. पण मनातली कराची? ती अखेपर्यंत गेली नाही.. कराचीचं कौतुक गेलं नाही.. कराचीतून जे जे फाळणीनं परागंदा झाले त्यांच्याही मनातली कराची कधीच पुसली गेली नाही.. म्हणूनच तर महाराष्ट्रात आणि देशात आजही कराचीच्या नावानं संस्था, शिक्षण संस्था, दुकानं आणि एखाद-दोन निवासी संकुलं उभी आहेत.

त्यामुळे कराचीवर मी जेव्हा मागे एक लेख लिहिला तेव्हा मूळच्या कराचीकरांचा भरभरून प्रतिसाद लाभला. कित्येकांनी त्यांच्या आई-वडिलांच्या किंवा आजी-आजोबांच्या तोंडून ऐकलेली वर्णनं कळवली.. आपला गाव आणि आपली भाषा यांच्याशी माणसाचं असं दृढ भावनिक नातं असतं. आणि परगावी किंवा परदेशात आपल्या गावची ओळख निघाली किंवा आपल्या भाषेचा दुवा आढळला तर माणसाला वेगळाच आंतरिक आनंद होतो. हा दुवा अनपेक्षितपणे समोर आला तर गमतीचा प्रसंगही घडतो.

एकदा आम्ही काही स्तंभलेखक, पत्रकार आणि कार्यकर्ते पश्चिम बंगालच्या अभ्यास दौऱ्यावर गेलो होतो. रोज अनेक नेत्यांच्या आणि शिक्षण, साहित्य, प्रशासन या क्षेत्रातील नामवंतांच्या घरी वा कार्यालयातही जात होतो. एकदा तृणमूल काँग्रेसच्या एका नेत्याची भेटीची वेळ ठरली. त्यांच्या घरीच जायचं होतं आणि त्यांचं घर हावडय़ाच्या दुसऱ्या टोकाला होतं. पोहचेपर्यंत उशीर झाला होता. संध्याकाळ उतरू लागली होती. घर म्हणजे एक लहानशी बंगलीच होती. दार वाजवलं तरी कितीतरी वेळ ते उघडलंच जाईना. अखेर एका सेवेकरी म्हाताऱ्या बाईनं दरवाजा उघडला आणि आमच्याकडे संशयित नजरेनं पाहिलं. आमची भेटीची वेळ ठरली आहे आणि नेताजी घरात आहेत का, असं आम्ही विचारत होतो, पण तिला बंगालीशिवाय दुसरी भाषा येत नव्हती. शेवटी कसबसं तिला थोडं समजलं. आम्हाला घरात घेत ती बंगालीत जे काही म्हणाली त्याचा आशय असा होता की, ‘‘साहेब बाहेर गेलेत. तुम्ही वाट पाहा.’’

आधीच तास-दीड तासाच्या प्रवासानं आम्ही सगळे उबलो होतो. त्यात पुन्हा वाट पाहणं! त्यामुळे कातावून काहीबाही बोलत होतो की, या लोकांना वेळ पाळायला काय होतंय.. वगैरे. आम्ही निर्धास्त मराठीत बोलत असताना आतून बंगाली पेहरावातली एक बाई धावत बाहेर आली आणि तिनं भारलेल्या स्वरात मराठीत विचारलं, ‘‘तुम्ही मराठी आहात?’’ आम्ही सगळे सर्दच झालो. कारण आतापर्यंत काय काय बोललो असू कोण जाणे! ती मात्र अगदी आनंदानं बोलत होती. ती मूळची मराठीच आणि या युवा नेत्याशी तिचा प्रेमविवाह झाला होता. ‘माहेरची माणसं भेटल्यासारखं वाटलं बघा,’ असं तिनं आत्मीयतेनं सांगितलं आणि त्याच भावनेनं सरबराईही केली.

माझी एक मावशी राजस्थानात अजमेरला राहायची. तिचे पती ‘मेयो कॉलेज’मध्ये शिल्पकला शिकवायचे. त्या वेळी रेल्वेतल्या नोकरीमुळे तीन हजार कुटुंबं अजमेरला राहात. पण अजमेरचे दोन भाग होते. एक बाजू नागरी वस्तीची होती आणि एक बाजू फक्त ‘मेयो कॉलेज’! सहाशे एकरवर ते पसरलं होतं. त्याच्या नावात जरी कॉलेज असलं तरी ती खरी दहावीपर्यंतची शाळा होती. संस्थानिकांच्या मुलांसाठी ती काढली गेली होती. या कॉलेजचे पहिले प्राचार्य साठे, मराठीच होते. ते निवृत्त झाले तेव्हा मुलांच्या ‘पालकां’नी (म्हणजे संस्थानिकांनी!) त्यांची हत्तीवरून मिरवणूक काढली होती. तर त्या कॉलेजच्या परिसरात प्रत्येक प्राध्यापकाला राहायला प्रसादासारखी घरं होती.. अजमेरमध्ये महाराष्ट्र मंडळ आहे व त्यांची शतकोत्तर वाटचाल सुरू आहे. मंडळाची स्वत:ची मोठी वास्तूही आहे. तर तिकडे लहानपणी जायचो तेव्हा मराठी भाषेशी आपली नाळ टिकवण्याचे प्रयत्न जवळून पाहता यायचे. तेव्हा अशी परिस्थिती होती की तुम्ही आपलं राज्य सोडून परराज्यात गेलात की तुमची भाषा, तुमची संस्कृती यांचा संपर्क तटकन तुटत असे. आज मात्र परिस्थिती पालटली आहे. देशातच नव्हे तर परदेशात राहूनही महाराष्ट्रातल्या मराठी दूरचित्रवाहिन्या बघता येतात, मराठी गाणी ऐकता येतात, मराठी पुस्तकं वाचता येतात. तीस-चाळीस वर्षांपूर्वी अशी स्थिती होती की, मुंबईतले आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकता येत नसत, पण ‘रेडिओ मॉस्को’वरून प्रसारित होणारी मराठी गाणी खूप खरखरत्या स्वरात का होईना, ऐकता येत. ती ऐकण्यासाठीसुद्धा माणसं धडपड करीत. आज मात्र कुठंही गेलात तरी आधुनिक माध्यमांमुळे मराठी संस्कृतीशी संबंध टिकवता येतो. तरीही कुणाच्या बोलण्यात आपली भाषा आणि आपल्या गावच्या खुणा आल्या की वेगळीच आपुलकी वाटते.

उत्तर प्रदेश तर गुरुगृहामुळे मला माझ्या घरासारखंच वाटतं. त्यामुळे तिथली माणसं प्रवासात अवचित भेटली तरी मला तितकाच आनंद होतो. एकदा उत्तर प्रदेशातल्या एका दुर्गम गावी गेलो होतो. गाडीला वेळ होता म्हणून स्थानकाजवळच्या बाजारात काहीतरी खरेदी करत होतो. आम्ही मराठीत बोलू लागलो तसा तो दुकानदारही मराठीत बोलू लागला. मी आश्चर्यानं विचारलं, ‘‘तुम्ही इतकं चांगलं मराठी कसं बोलता?’’ तो म्हणाला, ‘‘या गावातल्या प्रत्येक घरातला एकजण तरी मुंबईत आहे. त्यामुळे मराठी बहुतेक सगळ्यांनाच समजतं!’’ हाच अनुभव बंगाल, आसाम, झारखंड आणि अगदी नेपाळमध्येही येतो. मराठी समजणारे बरेचजण आहेत, कारण कुणी ना कुणी मुंबई, पुण्यात राहून गेलेलं आहे. ‘लोंढय़ा’ची ही दुसरी बाजूही आहे!

आज मात्र अशी स्थिती झाली आहे की महाराष्ट्रातल्या आणि विशेषत: शहरी भागातल्या पालिकांच्या मराठी शाळांत ‘परप्रांतीय’ मुलं जास्त आहेत, पण मराठी मुला-मुलींना मराठी वाचता येत नाही. ठीक आहे. इंग्रजी माध्यमात जरूर शिकू द्या, पण त्यांना मराठीही उत्तम आली पाहिजे, यासाठी प्रयत्न का नकोत? मराठी भाषा समजते, पण वाचता येत नाही, अशांची संख्याही चिंताजनक वेगानं वाढत आहे. भाषा हा भावनिक पोषणाचा मुख्य आधार असते. भाषेतून ती संस्कृती प्रवाहित होत असते. ती भाषा जेव्हा बोली अवतारात आक्रसू लागते तेव्हा हळूहळू ती संस्कृतीही आक्रसत जाते.

मागे मी एक लेख लिहिला होता. अंदमान बेटांवर अनेक आदिवासी भाषा अस्तंगत होत आहेत. त्यातली एक भाषा तर अशी आहे की त्या भाषेत बोलणाऱ्या दोनच महिला जिवंत होत्या. त्यातली एक जेव्हा मृत्यू पावली तेव्हा दुसरीला अपार दु:ख झालं ते, आपल्या भाषेत आता कुणाशी बोलता येईल, याचं! ती वेळ मराठीवर येणार नाही हे खरं, पण ती कधीच येऊ नये, अशी इच्छा असेल तर प्रयत्न आपल्याच पासून सुरू व्हायला हवेत. एवढंच नव्हे तर देशातली किमान आणखी एक भाषासुद्धा आवर्जून शिकली पाहिजे. दोन विटांमध्ये सिमेंटचा थर जसा असतो आणि तो दोन विटांना सांधून टाकतो तशी भाषा ही दुहीचं नव्हे ऐक्याचं रसायन बनली पाहिजे. वादाचा नव्हे संवादाचा विषय झाली पाहिजे. कारण मुळात भाषेचा जन्म संवादासाठीच तर आहे!

चैतन्य प्रेम

chaitanyprem@gmail.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Articles in marathi on communication in marathi language