सुष्मा देशपांडे
पहिलं नाटक लिहिलं ४०-४५ वर्षांपूर्वी. ते होतं, ‘एक आवश्यक बंड’! याची पाळंमुळं माझ्या व्यक्तिगत अनुभवातलीच. कोणती व्यक्ती तुम्हाला कुठे, कशी भेटेल आणि तुमच्या जगण्याचा भाग होत आयुष्याचा अर्थ शिकवेल हे सांगता येत नाही. तर बारामतीत आमच्या घरात काही ठरावीक मुख्य सणांना वाघ्या-मुरळी गायला यायचे. दिमडीच्या तालावर‘सहा महिन्या सोमवारी सोमवती येती, देव निघाले कर्हेवरती’ असा टिपेचा सूर लागायचा. आजही ते सूर आणि दिमडीचा ताल, मुरळीने वाजवलेली घाटी कानात गुंजत आहे. घरात पिकलेलं धान्यधुन्य, गहू, ज्वारी त्यांना दिलं जायचं. आमच्या घरी येणाऱ्या वाघ्या आणि मुरळीला मुलंही होती. तशी मी लहानच असताना एकदा वाघ्याला विचारलं होतं, ‘‘देवाच्या सांगण्याप्रमाणे वाघ्या-मुरळीचं नातं काय?’’ मी मालकाची लेक असल्यानं वाघ्याने मुकाट उत्तर दिलं, ‘‘बहीण-भावाचं’’. लगेच मी प्रश्न केला होता, ‘‘मग तुम्हाला मूल कसं झालं? तुम्ही देवाचं ऐकत नाही?’’ वाघ्या मोठ्याने खोटं हसला आणि म्हणाला होता, ‘‘ताई कायबी इच्चारत्यात.’’
अनेकदा मुरळीच्या समोर पाण्याने भरलेलं ताट ठेवलं जाई. त्यात रुपयाचं नाणं टाकलं जाई आणि मुरळीने हात पाठीवर ठेवून चेहरा त्या ताटात घालून त्यातला रुपया कपाळावर चिकटवून बाहेर काढायचा असे. मला हा खेळ आवडायचा नाही. अशा खेळात ती वाकल्यावर तिच्या दिसणाऱ्या शरीरात पुरुषांना रस असणार हे कळायला जरा वेळ गेला. मात्र या मुरळीशी गप्पा मारायला मला खूप आवडायचं. आमच्या घरी येणारी मुरळी कमाल सात्त्विक स्त्री होती. तिला थोरली मुलगी होती. या मुलीला मी जन्मापासून पाहिलं होतं. ती छान शाळा शिकत होती, अनेकदा आई-वडिलांबरोबर आमच्या घरी यायची. तिचा आणि माझा तेव्हा संवाद व्हायचा. त्या वाघ्याने, तिच्या बापाने ती १०-११ वर्षांची असताना तिला ‘मुरळी’ म्हणून खंडोबा देवाला सोडलं तेव्हा मलाच धक्का बसला. तिची शाळा सुटली. ती छोटीशी पोर आता ‘मुरळी’ म्हणून आमच्या घरी यायला लागली. तिच्या या अनुभवावर आम्ही दोघी खूप बोलत असू. ‘मुरळी देवाची, बायको गावाची’सारखी वाक्यं ऐकली की डोक्यात तिडीक जायची. अस्वस्थ मनाने मी आईशी बोलायचे, पण करणार काय? ती हतबलता खूपच त्रास द्यायची.
पुढे शिक्षणासाठी मी पुण्यात आले. त्या वर्षी प्रा. श्यामला वनारसे यांनी ‘पुरुषोत्तम करंडक’साठी ‘मॉडर्न’ महाविद्यालयातर्फे बसवलेली ‘प्रतिज्ञा’ एकांकिका खूपच गाजली होती. ‘प्रतिज्ञा’चा एका घरात प्रयोग ठरला होता आणि तो पाहायला सुप्रसिद्ध साहित्यिकपु. ल. देशपांडे यायचे होते. अरुण बेलसरे नामक एक मित्र माझं नाटकाचं वेड लक्षात घेऊन मला त्या प्रयोगासाठी घेऊन गेला. त्यानं सगळ्यांच्या ओळखी करून दिल्या. आणि पुलंना ‘सुषमा नकला करते’ असं उगाचंच सांगितलं. एकांकिका उत्तम झाली. पुलं माझ्याकडे बघून म्हणाले, ‘‘आता सुषमा आपल्याला काही करून दाखवणार आहे.’’ हे अनपेक्षित होतं. ‘‘काय करू?’’ म्हणत मी गोंधळलेल्या अवस्थेतच उठले. मनात आलं, असं जाहीर केल्यावर काहीच न करणं चुकीचं आहे. ‘‘मला गावाकडची गाणी आणि उखाणे येतात.
मी तेच करते,’’ म्हणत सुरुवात केली. पुलं आणि मंडळी खळखळून हसायला लागले. आपण काही करतो आहोत आणि जगाला हसवणारा माणूस खूप हसतो आहे. मला हळूच त्यांचं ‘हसणं’ पाहण्याचा मोह होत होता. माझ्या आयुष्यातले कमाल आनंदाचे क्षण होते ते! निखळ आनंद. कार्यक्रम संपला आणि पुलं मला म्हणाले, ‘‘घरी ये.’’ त्यांनी पत्ताही सांगितला. ‘आपण गेलो घरी आणि हे बरे नाही वागले तर?’ या माझ्याच न्यूनगंडामुळे मी त्यांच्या घरी गेले नाही. काही दिवसांनी मी पुलंच्या एका भाषणाला गेले होते. लांब बसले होते. पुलंनी प्रेक्षागृहात एक नजर फिरवली. मला पाहताच भाषण संपल्यावर इथे भेट असं खुणेनं सांगितलं. अर्थात मी त्यांना भेटायला गेले. तर त्यांनी मी त्यांच्या घरी न गेल्याबद्दल तक्रार केली आणि स्वत:च मी त्यांच्या घरी जायचा दिवस व वेळ ठरवून टाकली. त्या दिवसापासून ते माझे ‘भाईकाका’ झाले.
मी गावात म्हटले जायचे ते उखाणे नव्यानं शिकायची आणि त्यांच्याकडे जाऊन त्यांना ऐकवायची हा शिरस्ता झाला. त्यांच्या घरातल्या अनेक आठवणी आहेत, जगातल्या अनेक गोष्टींवर त्यांच्याशी बोलले आहे. त्यांच्याबरोबर पत्रव्यवहार होता. या माणसाने मला भरभरून दिलं आहे. तर भाईकाकांना मी या तरुण मुरळीबद्दलही सांगितलं होतं. वाघ्या-मुरळीची गाणी ऐकवली होती. दिवाळीला बारामतीत जाणं व्हायचं तेव्हा ही मुरळी हमखास भेटायची. तिला ‘शिकावंसं वाटतं का?’ हे मी पुन्हा पुन्हा विचारायची. एक निरागस छोटी मुलगी ते आजची मुरळी झालेली युवा ती. तिचे बदलते भाव जाणवून अस्वस्थ व्हायची. मी तिला, ‘‘तू ये माझ्याकडे, आपण तुझं शिक्षण सुरू करू,’’ असंही सांगायची. हे सगळं मी भाईकाकांना सांगितलं.
तेव्हा मी ठाण्यात राहात होते. एकदा बारामतीत असताना मी त्या मुरळीला माझा पत्ता दिला आणि म्हटलं, ‘‘तुझा बाप कोणा पुरुषाबरोबर तुला पाठवत असेल आणि तुला जायचं नसेल, तर तू ये माझ्याकडे.’’ काही दिवसांनी मला तिचं पत्र मिळालं, तिनं माझ्याकडे यायचा निर्णय घेतला असल्याचं सांगणारं. ‘दादर पुलावर विक्री करणारं कोणी कुटुंब तिच्या ओळखीचं आहे. मी तिकडे येत आहे, तुम्ही घ्यायला या,’ असं कळवलं. दादर स्थानकाच्या पुलावर मी शोध शोध शोधलं. कोणीच भेटलं नाही. ती घरातून निघाली आहे आणि आता सापडत नाही, या विचाराने मी खूप अस्वस्थ झाले. आणि तिकडे तिचा बाप बारामतीतल्या आमच्या घरी गेला आणि ‘ताईंनी माझ्या मुलीला पळवलं,’ असा आरोप करत राहिला. त्याच्या म्हणण्यात थोडं तथ्य असलं तरी ती माझ्यापर्यंत पोहोचली नव्हती.
माझी काळजी, अस्वस्थपणा वाढत होता. आईशी फोनवर बोलले. तिला सत्य ते सांगितलं. आई खूपच काळजीत पडली. ३-४ दिवसांनी सकाळी दारावरची बेल वाजली आणि समोर मुरळीपण सोडून आलेली ‘ती’ होती. माझी अवस्था काय झाली हे सांगणं अवघड आहे. मी तिला घट्ट मिठी मारली. तिला घरात ठेवून घेणं स्वाभाविक होतं, पण पुढे काय करायचं? ते मलाच माहीत नव्हतं. तिचं घरात राहणं, माझ्या घरी येणाऱ्यांच्या नजरा, आम्ही बाहेर गेलो तर बाहेरच्यांच्या नजरा मला बरंच काही सांगत होत्या. ४-५ दिवसांत मला भान आलं, हिला घरात ठेवून घेणं सोपं नाही. त्यातच बारामतीतून एक धमकीवजा फोन आला, ‘‘तिला पुन्हा नाचवून दाखवू का?’’ मी गप्प राहिले.
खूप जवळचे म्हणून मी भाईकाकांना फोन केला. भाईकाकांनी तिला घेऊन मला पुण्याला यायला सांगितलं. तिच्याशी बोलून मी एका सकाळी तिच्यासह पुण्यात गेले. भाईकाका, नंदाकाका नारळकर यांना परिस्थिती माहीत होती. नंदाकाकांनी काही संस्थांची चौकशी केली होती. त्यातील एका संस्थेत तिला दाखल करायचं ठरलं. भाईकाका आणि नंदाकाका अनिल अवचटशी बोलले होते. तिचं शिक्षण सुरू व्हावं म्हणून अनिलनं ‘सेवासदन’मध्ये तिला दाखल करावं आणि तिथं एका वर्षात ती दोन इयत्ता करू शकेल, असं सुचवलं. स्वत: अनिल संस्थांशी आणि या मुरळीपण कायमचं सोडू इच्छिणाऱ्या मुलीशी सतत संवाद करत होता. हा कालावधी घालमेलीचा होता. तिचं शिक्षण सुरू झालं आणि मला खूप हायसं वाटलं.
त्या आनंदात मी एकदा अनिलशी बोलत असताना अनिल म्हणाला होता, ‘‘हे सगळं खूप सोपं नाही. मूळ जगण्याचे संस्कार खोलवरचे असतात. तुला अपेक्षित सगळं घडेलच असं नाही.’’ भाईकाका आणि नंदाकाकाही याच अर्थाचं बोलले होते. पण त्या दोघांनाही तिचं शिक्षण सुरू झालं यात आनंद होता. बारामतीत, घरात शांतता होती, कारण मदतीसाठी भाईकाका माझ्या मागे भक्कम उभे होते. वर्ष छान गेलं. दोन इयत्ता ती उत्तीर्ण झाली आणि घरच्या काही कारणांमुळे तिनं ‘वसतिगृहाबाहेर राहून शिक्षण पूर्ण करते,’ असा निर्णय घेतला. संस्थेतून ती बाहेर पडली. मी माझ्या घरात तिला ठेवून घेऊ शकत नसताना तू संस्थेतून बाहेर पडू नकोस, हे सांगायचा मला काय अधिकार? असं मला वाटलं. काही दिवसांतच तिचं शिक्षण थांबलं. पुढे ती आपल्या मार्गास लागली, पण पुन्हा मुरळी म्हणून उभी राहिली नाही. हा खोलवरचा अनुभव मनात रुतून राहिला.
बारामती सोडल्यावर पाहिलेलं जग आणि हा जिवंत अनुभव घेऊन त्यावर आधारित मी नाटक लिहिलं. हे मी लिहिलेलं पहिलं नाटक, ‘एक आवश्यक बंड.’ त्यात माझं आणि त्या मुरळीचं नातं होतं. भाईकाका, नंदाकाका आणि अनिल यांचं मिश्रण असलेलं, रंगमंचावर न दिसणारं एक पात्र होतं. इतर पात्रं मात्र सामाजिक कामात वेगवेगळे दृष्टिकोन कसे येतात आणि सारं अवघड कसं होतं, यावर आधारित होतं. नाटकातली मुरळी शेवटी आत्महत्या करते.
डॉक्टर श्रीराम लागूंना ते नाटक वाचायला दिलं. ते म्हणाले होते, ‘‘ही चित्रपटाची पटकथा वाटते. संवाद चांगले आहेत.’’ काही काळाने माझा मित्र विजय वांकर याने ‘अॅक्टिव्ह थिएटर, पुणे’तर्फे हे नाटक ‘राज्य नाट्य स्पर्धेसाठी’करण्याचा निर्णय घेतला. ज्योती सुभाष हिने ते दिग्दर्शित केलं. त्याचे प्रयोग तसे झाले नाहीत. पुढे दूरचित्रवाणीवर काही वाहिन्या सुरू झाल्यावर विश्वास कणेकरने ‘ई टीव्ही’साठी एक मालिका करण्यासाठी मान्यता मिळवली होती. मात्र तीही वास्तवात आली नाही.
पहिला लेखनप्रयत्न तसाच कपाटात पडून राहिला. नाती मात्र मनात गुंजत राहिली…