News Flash

१२७. संस्कारबीज

अध्यात्माचे अखंड श्रवण घडून आपोआपच त्याचे मनन होऊ लागते आणि त्यातून विरक्ती उत्पन्न होते.’

सत्पुरुषाच्या सहवासात सदोदित, जीवनात शाश्वत काय आहे, खरं सुख कशात आहे, याचीच चर्चा सुरू असते. विविध कथा, रोज घडणारे प्रसंग याद्वारे जीवनाच्या वास्तविक स्वरूपाचाच बोध सत्पुरूष करीत असतो. या सहवासानं अनायास साधणारी दुसरी गोष्ट बाबा बेलसरे सांगतात ती म्हणजे, ‘अध्यात्माचे अखंड श्रवण घडून आपोआपच त्याचे मनन होऊ लागते आणि त्यातून विरक्ती उत्पन्न होते.’ माणूस जे ऐकतो त्याचा संस्कार त्याच्या अंत:करणावर होतोच. निसर्गदत्त महाराज म्हणत की, ‘माझं बोलणं वाया जाणार नाही. बीज पडलं आहे, योग्य वेळी ते अंकुरेलच.’ तेव्हा जे ऐकलं त्याचं बीज अंत:करणात पडतं, रुजतं आणि अंकुरतंदेखील. त्यातून थेट विरक्तीचा लाभ होतो, असं पू. बाबा सांगतात. अर्थात ही प्रक्रिया काही सोपी नसते. गुरुजी एकदा म्हणाले, ‘काही कालावधीसाठी आपलं घर आहे. ते नष्ट झाल्यावर आपण किती तळमळून रडतो. निश्चित कालावधीसाठी आई-वडील, भाऊ, पत्नी, मित्र, मूल हे संबंध आहेत. हे संबंध कायमसाठी नसतात. तरीपण वियोग झाल्यावर आपण किती तळमळून रडतो! मग भगवंत केव्हापासून दुरावला आहे. त्यासाठी कधी आपण रडतो का? कायमसाठी जो माझा आहे, त्या परमेश्वरासाठी कधी रडतो का? जो कायमचाच आपला आहे त्याच्या वियोगाची जाणीवच नाही. खरं तर प्रत्येकाला हे जग, हा गोतावळा सोडून एक ना एक दिवस जायचंच आहे आणि काय माहिती केव्हा जायचं आहे, तर मग सुटणाऱ्या वस्तूची आसक्ती का?’ आता असा बोध ऐकून तत्काळ जाग मात्र येत नाही. ऐकतानाही आपल्याला जग आणि आपला गोतावळाच खरा वाटत असतो आणि भगवंत अगम्य आणि म्हणूनच बराचसा काल्पनिक भासत असतो. मग जो अगम्य वाटतो, त्याच्यापासून आपण अनंत काळापासून दुरावलो आहोत, हे तरी कसं कळावं? त्या वियोगाचं दु:खं तरी कसं उमगावं? रामकृष्ण परमहंस ‘आई आई’ करून ज्या चिन्मयी मूर्तीसमोर भावाविष्ट होत ती विवेकानंदांनाही प्रथम मातीचीच तर मूर्ती वाटे! एकदा प्रापंचिक झंझावातानं विटून काहीतरी नोकरी मिळावी, या हेतूनं त्यांनी परमहंसांना सांगितलं की, ‘तुमच्या मातेला साकडं घाला ना!’ परमहंस म्हणाले, ‘तूच जा आणि सांग.’ विवेकानंद गेले. काही वेळानं परतले. म्हणाले, ‘मला सांगता नाही आलं! जेव्हा जेव्हा प्रयत्न केला तेव्हा तेव्हा वाटलं की मातेकडे एवढय़ा तुच्छ गोष्टीची याचना काय करायची!’ तेव्हा मातीच्या वाटणाऱ्या जी मूर्तीकडे पाहण्याची दृष्टीच बदलली! आपली दृष्टी काही इतक्या वेगानं बदलणारी नाही, पण ती बदलत जाईल एवढं मात्र नक्की! श्रीगोंदवलेकर महाराज यांचे अनन्य भक्त भाऊसाहेब केतकर यांची प्रकृती एकदा फार बिघडली होती. पू. बाबा यांच्या आध्यात्मिक जडणघडणीचा काळ होता तो. तर बाबांनी विचारलं, ‘भाऊसाहेब काय करावं?’ भाऊसाहेब म्हणाले, ‘एकदा स्वारींच्या ( म्हणजे महाराजांच्या) कानावर घालावं!’ बाबांनी त्याप्रमाणे महाराजांच्या तसबिरीसमोर उभं राहून प्रकृतीचं सांगितलं, पण तरी आपण तसबिरीसमोर आहोत, हाच भाव होता! तिथून ते  परतताच भाऊसाहेबांनी विचारलं, ‘‘स्वारींना सांगितलं ना? आता आपली काळजी संपली!’’ त्या निश्चिंतीचा बाबांच्या मनावर ठसा उमटल्याशिवाय राहिला नाही. तेव्हा प्रत्यक्ष सहवास हा असे अनेक संस्कार करतो. त्यातला मुख्य संस्कार म्हणजे परमतत्त्वाचं सत्यत्व त्या सहवासात उमगू लागतं. भौतिकाचा प्रभाव किंचित का होईना, ओसरू लागतो.

chaitanyprem@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 29, 2018 1:01 am

Web Title: loksatta chintan dhara part 127
Next Stories
1 १२६. सहज संगत
2 १२५. अनायास लाभ
3 १२४. दहा मण्यांची माळ
Just Now!
X