प्रपंचात राहून परमार्थ साधू इच्छिणाऱ्या साधकासाठी पू. बाबा बेलसरे यांनी सांगितलेल्या दहा बोधमण्यांतला शेवटचा बोधमणी आपण पाहात आहोत. हा मणी सांगतो की, ‘‘आपले जीवन अर्थात आपला प्रपंच व परमार्थ भगवंताच्या इच्छेने चालला आहे अशी भावना वाढीस लावावी.” आपण गेल्या भागात पाहिलं त्याप्रमाणे मुळात प्रपंच म्हणजे आपल्या अनंत इच्छांचाच विस्तार असतो. त्यामुळे तो आपल्या मनाजोगता अर्थात मनातील इच्छांजोगता करण्याची आपली धडपड आजन्म सुरू असते. त्या इच्छांना विपरीत असा प्रपंच आपल्याला सहन होत नाही. अशावेळी हा प्रपंच भगवंताच्या इच्छेनंच सुरू आहे, ही भावना परिस्थितीच्या समंजस स्वीकारासाठी उपयुक्त ठरते. म्हणजे काय? तर अनेकदा आपल्या प्रपंचात आपल्या इच्छेविरुद्ध परिस्थिती ओढवत असते. ती अटळ असते. म्हणजेच ती टाळण्याचा कितीही प्रयत्न केला, तरी ती टळत नाही. मग त्या परिस्थितीचा स्वीकार करून, त्या परिस्थितीत धीरानं राहून ती बदलण्याचा प्रयत्न करीत राहणं अधिक शहाणपणाचं असतं. आपण त्या परिस्थितीनं अगदी खचून जातो आणि मग ती दूर करण्यासाठी आततायी प्रयत्न करतो. ते प्रयत्न करतानादेखील मनाचा समतोल नसतो. कधी कधी मन शांत राखलं आणि ओढवलेल्या परिस्थितीचा बाऊ करून तिला अकारण महत्त्व दिलं नाही, तरी परिस्थितीचा प्रभाव अगदी हळू का होईना, पण ओसरू लागतो. तेव्हा आपला प्रपंच आणि परमार्थ भगवंताच्या इच्छेने चालला आहे, ही भावना वाढीस लावणं सादकासाठी फार महत्त्वाचं आहे. बरं, त्यातही गंमत अशी की, आपण प्रपंच स्वत:च्या इच्छेनं करू पाहातो, पण परमार्थ मात्र भगवंताच्या इच्छेवर सोडून देतो! म्हणजे, साधना नीट होत नाही, पुरेशी होत नाही, तर ती भगवंताची इच्छा मानून शांत बसतो. पण प्रपंचात जरा काही मनाविरुद्ध होऊ द्या, आपण लगेच धावपळ करून ती परिस्थिती पालटण्यासाठी प्रयत्नांची शर्थ सुरू करतो. तेव्हा, प्रपंचातल्या चढउतारांनी गांगरून न जाता आणि ती परिस्थिती पालटण्याचे प्रयत्न शांत चित्तानं करीत असतानाच आपण परमार्थाकडे अधिक लक्ष दिलं पाहिजे. परमार्थावरून आपलं मन हटता कामा नये. आता परमार्थ करणं म्हणजे काय? तर परमार्थ हा नुसता बाह्य़ कृतीचा नाही. ती बाह्य़ कृती अंत:करणाशी जोडलेली हवी. म्हणजेच साधनेनं अंत:करणावर भावसंस्कार होत गेला पाहिजे. त्यासाठी कृतीला विचाराची, चिंतनाची, मननाची जोड असलीच पाहिजे. माणसाचा जन्म कशासाठी आहे, या प्रश्नाचा निदान साधकानं तरी सतत सूक्ष्म विचार केला पाहिजे. या प्रश्नाचं उत्तर साधनेनं मिळतं म्हणून साधना केली पाहिजे. खरी साधना म्हणजे सदोदितचं आत्मपरीक्षण! आपलं मन भौतिकातच गुंतून आहे का? अशाश्वाताला शाश्वत मानून चिकटत आहे का? नश्वर इच्छांपायी ईश्वरापासून अंतरत आहे का? याचं परीक्षण हेच आत्मपरीक्षण! अहो, स्वानुभवावरून सांगतो की, माझ्यासारख्या तुच्छ माणसाला जर सदगुरू आणि त्यांचं प्रेम लाभू शकतं, तर या जगात ते कुणालाही सहज प्राप्य आहे! तेव्हा जे आयुष्य उरलं आहे ते शाश्वताच्या प्रेमात घालवलं पाहिजे.भले आपले प्रयत्न टिटवीनं समुद्र हटवावा, तसे असतील. पण जर ते चिकाटीनं सुरू राहिले तर सदगुरूच ते पूर्णत्वास नेतील!
chaitanyprem@gmail.com