रोजचं जीवन जगत असतानाच आपल्याला आपल्या आंतरिक परिवर्तनासाठी सहकार्यरत राहायचं आहे. हे सअहकार्य कोणाला आहे? तर अर्थातच सद्गुरूला आहे. त्यासाठी सामान्य भावनेचं रूपांतर दिव्य भावनेत करायचं आहे. कारण आपण मागेच पाहिलं की आपलं समस्त जगणं हे भावनाप्रधान आहे. जशी आपली भावना तसे आपले विचार घडतात. माणूस विचारानं जगत नाही, तो भावनेनंच जगतो. आपल्या भावनेच्या युक्तिवादासाठी तो विचारशक्तीचा नुसता वापर करीत असतो. तर भावना जीवनाला व्यापून असल्यामुळे संकुचित भावनेतून जगण्याची रीतही संकुचितच होते. त्यामुळे ती संकुचित भावना जसजशी व्यापक होत जाईल तसतसं जगणंही व्यापक होईल. मग या सामान्य भावनेचं रूपांतर दिव्य भावनेत करण्याची प्रक्रिया कशी व्हावी? पहिली गोष्ट म्हणजे आपण ठरवून काही दिव्य भावनेनं जगू शकणार नाही. हे काही अभिनिवेशानं जगणं नव्हे. असा उसना अविर्भाव, अभिनिवेश कायमचा टिकू शकत नाही आणि आपलं मुख्य ध्येय हेच असलं पाहिजे की जर शाश्वत सुख हवं असेल तर त्यासाठीचे प्रयत्नही शाश्वताला धरून आणि शाश्वतच असले पाहिजेत. तेव्हा खोटय़ा अविर्भावानं काही दिव्य भाव अंगी बाणत नाही. मग ते कसं घडत असावं? तर पहिली गोष्ट म्हणजे आपण जे काही करीत असू त्याकडे साधनाभावानंच पाहिलं पाहिजे. एक म्हातारा अशिक्षित वारकरी होता. तो रस्त्यानं असाच भजनं म्हणत फिरत असे आणि पंढरपूरच्या वारीला जायचं आहे तर एक रुपया-दोन रुपये द्या, असं सांगत असे. आमच्या एका ज्येष्ठ गुरुबंधूंच्या घरावरून तो जात होता तर यांनी त्यांचा अभंग ऐकून त्यांना आत बोलावलं. दुपारची वेळ होती म्हणून मोठय़ा प्रेमानं जेवायलाही वाढलं. इतकंच नाही, तर या भागातून कधी जालं तेव्हा हे तुमचंच घर समजून या आणि जेवून जा, असंही सांगितलं. त्याचं भाग्य असं की एकदा गुरुजी आले असतानाच तो आला आणि गुरुजींकडून त्याला दीक्षाही मिळाली. नित्य साधनाही समजली. त्या नामसाधनेत प्रथम अनेक कवच मंत्र आणि मग मूळ मंत्र आणि मग पुन्हा शेवटी कवच मंत्र, असा क्रम आहे. बरं सगळे मंत्र संस्कृतात. काही वर्ष सरली. एकदा म्हातारबाबा आले होते आणि त्यांच्याशी बोलता बोलता आमचे हे गुरूबंधू जरा कठोर झाले आणि म्हणाले, ‘‘एवढी तुम्हाला दीक्षा लाभली, पण रोज सगळी साधना करता का? ते सगळे कवच मंत्र आणि मूल मंत्र करता का?’’ म्हातारबाबा म्हणाले, ‘‘हे बघा, ते सगळं संस्कृत काही मला जमत नाही. पण मी रोज सकाळी स्नान वगैरे आटोपल्यावर डोळे मिटून बसतो आणि मग गुरुजींना प्रार्थना करतो की, हे गुरुराया, मला काही ते सगळं जमत नाही. पण दिवसभर मी जे जे काही करीन, माझ्या हातून जे जे काही घडेल, ते ते तुम्ही नामसाधनाच मानून घ्या, अशी प्रार्थना आहे!’’ माझ्या गुरुबंधूंनी त्यांना नमस्कारच केला आणि म्हणाले, ‘‘अहो, गुरुजींच्या सहवासात इतका काळ राहूनही आमची ही भावना झालेली नाही. तुम्हाला खरी साधना कळली आहे!’’ तेव्हा साधना म्हणजे काही वेळापुरती होणारी एखादी क्रिया नव्हे. साधना म्हणजे मला लाभलेल्या या मनुष्य जन्मात खरं काय साधायचं आहे, याचं अखंड भान! अगदी खरं की, हे अखंड भान साधणंही सोपं नाही. आणि म्हणूनच तर बाह्य़ाकडे घसरणाऱ्या मनाला वारंवार अंतर्मुख करण्याचा अभ्यास करावा लागतो!

चैतन्य प्रेम