24 August 2019

News Flash

विंचू चावला..

काम क्रोध विंचू चावला, तम घाम अंगासी आला, त्याने माझा प्राण चालला

‘विंचू चावला..’ हे भारूड संत एकनाथांनी लिहिले आहे. आपले गुरू जनार्दन स्वामींनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी ईश्वराचे ध्यान केले. त्यांचा हा अभ्यास पूर्ण झाल्यावर स्वामींनी त्यांना समाज कसा सुखी होईल समाजाला चांगले वळण कसे लागेल त्याबद्दल प्रयत्न करायला सांगितले. एकनाथांनी अनेक अभंगांतून, भारुडातून समाजाला मार्गदर्शन केले. भारूड हा भक्तीचे महत्त्व सांगणारा लोकसंगीताचा एक प्रकार आहे. प्रत्येक माणूस हा तीन गुणांनी बनलेला आहे. हे तीन गुण म्हणजे सत्त्व, रज आणि तम. यातील जो गुण माणसात जास्त प्रमाणात असतो त्याप्रमाणे त्याचा तो स्वभाव होतो. तमोगुण जास्त असेल त्या वेळी तो माणूस दुर्गुणाच्या आहारी जातो. या भारुडात संत एकनाथ म्हणतात, ‘काम क्रोध हा जणू विंचू आहे, तो चावल्यामुळे तमोगुण वाढला. त्यामुळे फार दु:ख भोगावे लागले आहे.’

काम क्रोध विंचू चावला, तम घाम अंगासी आला, त्याने माझा प्राण चालला यातील मी म्हणजे माणसाचे मन. हा विंचू मनाला चावला, मन जणू काही आपली व्यथा सांगत आहे. माणूस जन्माला येतो त्या वेळी त्याचे मन कोणत्याही विकाराने भरलेले नसते. आपण लहान बाळ पाहतो. अगदी निष्पाप असते. आनंदात असते कारण त्या वेळी मनात कोणतेही विकार नसतात. परंतु, ते बाळ मोठे झाल्यानंतर मनाचे विकार मनात शिरतात. काम आणि क्रोध हे शत्रू मनाला सर्वात जास्त त्रास देतात. या विंचवाने दंश केल्यामुळे मन वाईट विचारांनी भरून गेले.

‘मनुष्य इंगळी अति दारुण, मज नांगा मारीला तिने, सर्वागी वेदना जाण, त्या इंगळीची’

इंगळी म्हणजे खूप मोठा विंचू, कधी कधी माणसाचे काम क्रोध हे विकार अतिशय प्रबळ होतात. त्याने मनाला फार वेदना होतात.

या विंचवाला उतारा, तमोगुण मागे सारा,

सत्त्वगुण लावा अंगारा, विंचू इंगळी उतरे झरझरा

काम क्रोध विंचवाचे विष निघून जाण्यासाठी सत्त्वगुणांचा अंगारा लावा म्हणजे चांगल्या गुणांचा आश्रय घ्यावा. या गुणांनी मनाचा दाह कमी होईल. शेवटी ते म्हणतात,

सत्त्व उतारा देऊन, अवघा सारीला तमोगुण

म्हणजे, सत्त्वगुणांच्या औषधाने तमोगुण निघून गेला. किंचित राहिली फुणफुण शांत केली जनार्दने. म्हणजे, तरीही जी काही थोडीशी आग राहिली होती (जे थोडेफार विकार राहिले होते) ती जनार्दन स्वामींच्या कृपेने गेली.

 माधवी कवीश्वर

madhavi.kavishwar1@gmail.com

First Published on September 24, 2016 1:03 am

Web Title: scorpion bite