04 August 2020

News Flash

जाणुनबुजून अतिरंजकता नको!

‘स्टार किड्स’ हा तर एक नवा ट्रेण्ड झालाय.

कलर्स चॅनलवर ‘ट्वेन्टी फोर’ या मालिकेच्या दुसऱ्या सीझनबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. याचं खास कारण म्हणजे अनिल कपूर. पहिल्यापेक्षा दुसरा सीझन अधिक रंजक व्हावा असं मालिकाकर्त्यांला वाटत असतं, पण अनिल याचा विरोध करतात. दुसऱ्या सीझनमध्ये जाणुनबुजून गोष्टी वाढवून मालिका अतिरंजक केली नसल्याचं ‘लोकप्रभा’शी बोलताना ते स्पष्ट सांगतात.

हिंदी सिनेसृष्टीत सध्या नव्या कलाकारांची लाट आहे. गेल्या दशकात सुरू झालेला हा नव्या चेहऱ्यांच्या पदार्पणाचा सिलसिला आता आणखी वाढलाय. ‘स्टार किड्स’ हा तर एक नवा ट्रेण्ड झालाय. या स्टार किड्समध्ये सगळेच उत्तम अभिनय करणारे असतीलच असंही नाही. पण, हा ट्रेण्ड पुढेही असाच सुरू राहणार असल्याचं सध्याचं चित्र आहे. नव्यांची फळी बॉलीवूडमध्ये पक्की होत असली तरी मधल्या काळातले असे काही कलाकार आहेत जे तेव्हाही लोकप्रिय होते आणि आजही आहेत. अशा कलाकारांमध्ये आवर्जून उल्लेख करावा लागेल तो म्हणजे िहदी सिनेसृष्टीच्या ‘झक्कास’ हिरोचा; अर्थातच अनिल कपूर यांचा. िहदी सिनेमांमध्ये हा हिरो ‘किंग’, ‘भाईजान’, ‘शहनेशहा’ असं काहीही झाला नसला तरी त्याने प्रेक्षकांच्या मनातलं त्याचं स्थान कायम आहे.

अनेक िहदी सिनेमे गाजवल्यानंतर अनिल कपूर वळालेत ते छोटय़ा पडद्याकडे; अर्थातच टीव्ही या माध्यमाकडे. तीन वर्षांपूर्वी आलेल्या त्यांच्या ‘ट्वेन्टी फोर’ (चोबीस) या मालिकेच्या पहिल्या सीझनमुळे टीव्ही माध्यमामध्ये काही प्रमाणात बदल घडून आला. रहस्य, ड्रामा, थ्रिलर असलेली ही मालिका त्या वेळी चांगलीच गाजली. भारतीय प्रेक्षकांनाही ‘ट्वेन्टी फोर’मुळे (चोबीस) वेगळ्या धाटणीची मालिका बघण्याची मेजवानी मिळाली. चोवीस भागांची मालिका या नव्या फॉर्मॅटचाही प्रेक्षकांना अनुभव घेता आला. आता पुन्हा एकदा असाच अनुभव देण्यास ही मालिका सज्ज झाली आहे. मालिकेचा दुसरा सीझन नुकताच सुरू झाला आहे. कथा, पटकथा, सादरीकरण, मांडणी, कलाकार, अ‍ॅक्शन हे या सीझनमध्ये उजवं ठरेल असं दिसतंय.

कलर्सवर सुरु होणाऱ्या ‘ट्वेन्टी फोर’ (चोबीस)च्या दुसऱ्या सीझनबद्दल स्वत: अनिल खूप उत्सुक असल्याचं सांगतात. ‘नव्या सीझनची कथा-पटकथा वेगळी आहे. मालिकेची मांडणीही वेगळ्या पद्धतीने केली आहे. रंजक व्यक्तिरेखांमुळे नव्या सीझनकडून भरपूर अपेक्षा आहेत. आता मालिकेला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतोय ते हळू हळू कळेलच’, ते सांगतात. सिनेमा, मालिका किंवा रिअ‍ॅलिटी शो अशा कोणत्याही कलाकृतीचा दुसरा भाग बनवताना तो पहिल्यापेक्षा अधिक मनोरंजक बनवण्याचा प्रयत्न सगळेच करतात. त्यामुळे त्यातले अ‍ॅक्शन सीन्स आणखी वाढवले जातात, त्यातलं रहस्य आणखी खेचलं जातं आणि अधिक मनोरंजक करण्याचा अटोकाट प्रयत्नही त्यात असतो. ‘ट्वेन्टी फोर’ (चोबीस)मध्ये मात्र असं जाणूनबुजून केलं नसल्याचं अनिल सांगतात. ‘मालिकेचा दुसरा सीझन आहे म्हणून तो पहिल्यापेक्षा आणखी रंजक करण्याचा आम्ही मुद्दामहून प्रयत्न केला नाही. यामध्ये असणारे अ‍ॅक्शन सीन्स, रहस्यमयता, थ्रिलर हे सगळं कथेच्या गरजेनुसार मांडलेलं आहे. त्यात काहीतरी वाढवून सांगण्याचा अट्टहास अजिबात नाही’, ते सांगतात.

चॅनल्सची संख्या वाढतेय आणि पर्यायाने त्यावरील कार्यक्रमही वाढताना दिसताहेत. म्हणूनच तिथे स्पर्धाही दिसून येतेय. या स्पध्रेमुळे टीव्ही या माध्यमात सतत अनेक बदल होत असतात. ‘ट्वेन्टी फोर’ (चोबीस)चा पहिला आणि आताचा दुसरा सीझन या दोन्ही वेळी नेमका काय बदल अनिल यांना जाणवला त्याविषयी ते सांगतात, ‘‘‘ट्वेन्टी फोर’ (चोबीस)चा पहिला सीझन करताना आम्हाला प्रेक्षकांपर्यंत पोहोचावं लागलं होतं. कार्यक्रमाबद्दल थोडी माहिती द्यावी लागली होती. त्याविषयी समजावून सांगावं लागलं होतं. त्या वेळी चोवीसच भाग का, फक्त शनिवार-रविवारच का दाखवता, थोडं आणखी कलरफुल का नाही असे अनेक प्रश्न आम्हाला विचारले गेले. या सगळ्याचा विचार आम्ही दुसरा सीझन करताना केला आहे. या सगळ्याच गोष्टी अमलात आणणं शक्य नव्हतं. पण, आम्ही त्याचा विचार जरूर केला आहे.’’

अनिल कपूर हे नाव उच्चारलं की, अनेक गोष्टी डोळ्यांसमोर येतात. मग ते ‘एजी ओजी’ या गाण्यातली त्यांची दोन्ही हात वर करून नाचण्याची एक स्टेप असो, ‘मिस्टर इंडिया’मधला त्यांचा पेहराव असो किंवा अगदी अलीकडच्या ‘दिल धडकने दो’मधला गंभीर बाप असो; हे सगळं आजही तसंच आठवतं. त्यांच्या सिनेसृष्टीतल्या करिअरला ४५ वष्रे झाली. पण, सातत्याने काम करत असल्यामुळे प्रेक्षकांच्या मनातलं त्याचं स्थान कायम तसंच राहिलं. काही कलाकारांची विशिष्ट ओळख आहे. काहींना इंडस्ट्रीतल्याच त्यांच्या कामावरून नाव पडलंय तर काहींच्या बोलण्याच्या स्टाइलवरून त्यांची ओळख आहे. तसंच अनिल कपूरची ओळख त्याच्या ‘झक्कास’ या बोलण्यावरून आहे. त्याचा हा डायलॉग ‘युध’ या सिनेमातला आहे. या सिनेमाला आता तीस वष्रे झाली. तरी आजही झक्कास या शब्दामुळे अनिल यांची ओळख आहे.

इतकी र्वष सिनेमातून काम केल्यामुळे विविध कलाकारांचा सहवास त्यांना लाभला. प्रत्येकाकडून काहीतरी शिकण्याची ऊर्मी त्याच्यात आजही तशीच आहे. ‘ट्वेन्टी फोर’ (चोबीस) या मालिकेत यंदाच्या सीझनमध्ये अनेक मराठी कलाकारांसोबत त्यांनी काम केलंय. त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव ते सांगतात, ‘‘मराठी रंगभूमीवरचे कलाकार अतिशय हुशार आणि कमालीचा अभिनय करणारे आहेत. मराठी रंगभूमीला फार जुनी परंपरा आहे. अशा रंगभूमीवरून आलेल्या कलाकारांचा अभिनय सकसच असतो. त्यांच्याकडून शिकण्यासारखं बरंच आहे. त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव खूप चांगला आहे. भविष्यातही त्यांच्यासोबत काम करण्याची आणि त्यांच्याकडून शिकण्याची माझी इच्छा आहे.’’

अनिल कपूर यांचे काही सिनेमे एव्हरग्रीन आहेत. कितीही जुने असले तरी आजही ते पाहावेसे वाटतात. ‘बेटा’, ‘विरासत’, ‘तेजाब’, ‘१९४२ अ लव्ह स्टोरी’, ‘लम्हे’, ‘मेरी जंग’, ‘मिस्टर इंडिया’, ‘जमाई राजा’, ‘घर हो तो ऐसा’, ‘ताल’, ‘पुकार’, ‘वेलकम’, ‘वेलकम टू’, ‘नायक’, ‘दिल धडकने दो’ अशा त्यांच्या लोकप्रिय आणि गाजलेल्या सिनेमांची यादी मोठी आहे. अशा सगळ्या सिनेमांत वेगवेगळ्या भूमिका करून त्यांनी त्यांच्या अभिनयाची छाप पाडली आहे. कधी ते प्रेमवीर झाले तर कधी ते गुणी मुलगा झाले. कधी विनोदी तर कधी गंभीर व्यक्तिरेखेत शिरले. त्यांचा प्रत्येक सिनेमा यशस्वी झाला असं नाही. पण, त्यांच्या प्रत्येक सिनेमातल्या त्यांच्या भूमिकेचं मात्र खूप कौतुक झालं. त्यांच्या करिअरच्या सुरुवातीला त्यांना प्रचंड मेहनत घ्यावी लागली. काम मिळवण्यापासून ते काम टिकवण्यापर्यंत त्यांच्या कामाचा कस लागायचा. पण या मेहनतीचं फळ त्यांना मिळालंच. ‘वो सात दिन’ हा त्यांचा मुख्य भूमिका असलेला पहिला िहदी सिनेमा. इथपासून त्यांची गाडी सुसाट सुरू झाली ती आजही तशीच आहे. त्यांच्या फळीतले काही कलाकार त्यांच्याचसारखे आजही सिनेमांमध्ये दिसतात. पण, अनिल कपूर यांची वेगळी छाप आहे.

मिशी असणारा हिरो म्हणून त्यांच्या पदार्पणाच्या वेळी इंडस्ट्रीत त्याची चर्चाही झाली. ‘‘मिशी असणाऱ्या हिरोंना िहदी सिनेसृष्टीत स्वीकारत नाहीत, असं मला एकदा दिग्दर्शक मनमोहन देसाई म्हणाले होते पण, नंतर तेच माझ्याकडे पुन्हा आले आणि त्यांचा तो समज चुकीचा होता असं त्यांनी सांगितलं’’, असं अनिल यांनी एकदा एका मुलाखतीत सांगितलं होतं. त्यांनी आजवरच्या त्यांच्या करिअरमध्ये फक्त तीन सिनेमांसाठी मिशी काढलेली आहे. ‘लम्हे’, ‘झूठ बोले कौआ काटे’ आणि ‘सलामे इश्क’ या तीन सिनेमांमध्ये ते मिशीशिवाय प्रेक्षकांच्या भेटीस आले आहेत. हे तिन्ही सिनेमे व्यावसायिकदृष्टय़ा अयशस्वी ठरले.

िहदी सिनेसृष्टीत येणाऱ्या नव्या पिढीबद्दल ते त्याचं मत व्यक्त करतात. नव्या पिढीसाठी या क्षेत्रात येणं खूप सोपं आहे, त्यांना अनेक संधी सहज उपलब्ध होतात, नेम-फेम-ग्लॅमर चटकन मिळतं अशा समजुतींना अनिल विरोध करतात. ‘‘या क्षेत्रात येणाऱ्या नवीन पिढीसाठी सगळं सोपं आहे हा मोठा गरसमज आहे. इथे काहीही सोपं नाही. एखादी गोष्ट सोप्या मार्गाने मिळालीच तर दुसऱ्या एखाद्या गोष्टीसाठी झटावं लागतं. या क्षेत्रात मेहनत कोणालाच चुकलेली नाही. तुमच्या अभिनयाचा कस इथे लावावा लागतोच. नवे तरुण कलाकार अत्यंत हुशार आहेत. त्यांना या क्षेत्रात नेमकं काय करायचंय हे ते जाणतात. त्यांच्या कामाशी ते एकनिष्ठ आहेत. त्यांच्यासोबत काम करताना मजा येते. या नव्या तरुण पिढीकडे मी सकारात्मकदृष्टय़ा बघतो,’’ असं ते स्पष्ट सांगतात.

सिनेसृष्टीत येणाऱ्या नव्या तरुण पिढीविषयी बोलत असताना ते त्यांच्या मुलांविषयीही बोलते झाले. फॅशनिस्ता सोनम कपूर ही आता इंडस्ट्रीत चांगलीच रुळली आहे. तिच्या अभिनयाविषयी अनेकांचे आजही मतभेद असले तरी तिचे सिनेमे प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. तर दुसरीकडे अनिल यांचा मुलगा हर्षवर्धन सिनेक्षेत्रात पदार्पण करण्यास सज्ज आहे. त्याचा ‘मिर्जयिा’ हा सिनेमा ऑक्टोबरमध्ये प्रदíशत होत आहे. अनिल सांगतात, ‘‘सोनमने तिच्या करिअरच्या कमी वेळात खूप चांगले आणि लक्षात राहणारे सिनेमे केले आहे. रांझना, देल्ली सिक्स, खुबसुरत, नीरजा, भाग मिल्खा भाग असे सिनेमे तिने केले. तिची सिनेमांची निवड चांगली आहे. मला तिचा अभिमान वाटतो. हर्षवर्धन त्याचं या क्षेत्रातलं पदार्पण राकेश ओम प्रकाश मेहरा यांच्या सिनेमातून करतोय हीच मोठी गोष्ट आहे. मेहरा यांसारख्या उत्तम दिग्दर्शकासोबत त्याला पहिल्याच सिनेमात काम करायला मिळतंय हे आनंददायी आहे. त्याच्या सिनेमाचा प्रोमो सगळ्यांच्या पसंतीस उतरलाय. त्यामुळे प्रोमोमुळे त्याने अर्धी बाजी मारलीच आहे. आता सिनेमा प्रदíशत झाला की चित्र आणखी स्पष्ट होईल.’’

अनेक र्वष िहदी सिनेमात काम केल्यानंतर या झकास हिरोने ‘मिशन इम्पॉसिबल घोस्ट प्रोटोकॉल’ या हॉलीवूडपटातही भूमिका साकारली. त्यानंतर ‘ट्वेंटी फोर’ या अमेरिकेतल्या सिरीजमध्येही त्याने काम केलं. त्याचीच भारतीय आवृत्ती ‘ट्वेन्टी फोर’ (चोबीस) ही मालिका त्याने निर्मित केली. आजच्या सास-बहू, फॅमिली ड्रामा, रोमँटिक ट्रॅक या सगळ्याच्या जमान्यात अशा प्रकारची एखादी मालिका करण्यासही अनिल तयार असल्याचं सांगतात. यामागची त्यांची भूमिका ते स्पष्ट करतात, ‘‘मी काम करताना टीव्ही, सिनेमा असा विचार कधीच करत नाही. माझ्यासाठी कथा ही अत्यंत महत्त्वाची आहे. एखादी गोष्ट मला आवडली आणि ती करावीशी वाटली तर मी त्यासाठी लगेचच तयार असतो. त्या वेळी टीव्ही, सिनेमा हा मुद्दा माझ्यासाठी गौण ठरतो. मी कोणत्याही माध्यमाला कमी लेखू इच्छित नाही आणि कोणाला डोक्यावरही बसवू इच्छित नाही. मी ज्यांच्यासोबत काम करतोय किंवा करणार आहे ते उत्तम असायला हवेत. तसंच मी करत असलेल्या कामासाठी लागणारा वेळ सत्कारणी लागतोय असंही मला वाटायला हवं. अखेरीस मी करत असलेल्या कामाचा मला आनंद, समाधान मिळायला हवं.’’

िहदी सिनेमांची संख्या वाढली आहे. पर्यायाने कलाकार, तंत्रज्ञांचीही संख्या वाढतेय. एकीकडे इंडस्ट्रीसाठी व्यावसायिकदृष्टय़ा ही जमेची बाजू असली तरी दुसरीकडे इंटरनेटच्या जाळ्यामुळे एक प्रकारची भीती सिनेकर्त्यांमध्ये पसरली आहे. सिनेमा लीक होण्याची भीती. काही महिन्यांपूर्वी सिनेमा प्रदíशत झाल्यानंतर दोनेक दिवसांनी किंवा सिनेमा प्रदíशत झालेल्याच दिवशी वेगवेगळ्या साइट्सवर येत होता. पण, गेल्या दोनेक महिन्यांमध्ये काही सिनेमे प्रदíशत होण्याआधीच लीक झाले आहेत. ‘उडता पंजाब’, ‘ग्रॅण्ड मस्ती’, ‘सुलतान’, ‘कबाली’ हे सिनेमे प्रदíशत होण्याआधीच लीक झालेत. एकीकडे सिनेमे लीक होण्याचं सत्र सुरू आहे तर दुसरीकडे सेन्सॉर बोर्डाचे नियम दिवसेंदिवस कडक होत चाललेत. या दोन्ही गंभीर विषयांवरही अनिल त्यांची मतं मांडतात. ‘‘सिनेमा प्रदर्शनाआधी लीक होणं ही अत्यंत चुकीची बाब आहे. अशा पद्धतीने सिनेमे पसरवणाऱ्याला कडक शिक्षा झालीच पाहिजे. असं केल्याने सिनेमाच्या संपूर्ण टीमचं नुकसान होत असतं. हे कळायला हवं. या क्षेत्रातल्या इतरांसोबत हे होऊ शकतं तर माझ्यासोबतही होऊ शकतं. दुसरा मुद्दा सेन्सॉर बोर्डाचा. सेन्सॉर बोर्डाचे नियम खूप जुने झाले आहेत. ते आता बदलायला हवेत. अनेक दिग्गजांच्या म्हणण्यानुसार सिनेमाला विशिष्ट प्रमाणपत्र मिळावं, तो सिनेमा सेन्सर्ड होऊ नये. पण, नियम बदलले तरी चित्रपटकर्त्यांनी त्यात काय दाखवावं, काय दाखवू नये याचंही भान ठेवायला हवं. नियमही फार कडक असू नये आणि सिनेमाकर्त्यांनीही भान ठेवावं. असा समतोल साधता आला पाहिजे. दोन्ही बाजूंमध्ये संवाद असायला हवा. लवकरच असं चित्र बघायला मिळेल असं वाटतंय.’’

अनिल कपूर यांचा जन्म मुंबईचाच. त्यांच्या वागण्या-बोलण्यात मुंबईकर झळकतो. इतकी र्वष ते मराठी लोकांसोबत राहिले आहेत. या अनुभवाविषयीही ते भरभरून बोलतात, ‘‘माझा जन्म चेंबूरचा. माझे शेजारी, मित्र, खाणं-पिणं असं सगळंच मराठी आहे. महाराष्ट्र किंवा भारताबाहेर मला कोणी ‘तुम्ही कुठचे आहात’ असं विचारलं तर मी लगेच सांगतो की मी महाराष्ट्रीय, मुंबईकर आहे. इतकी र्वष मराठी संस्कृतीत वावरतोय. त्यामुळे इथल्या लोकांशी आपसूकच जवळीक निर्माण झाली आहे. हे सगळे माझेच लोक आहेत असंच मी नेहमी म्हणतो.’’

अलीकडे िहदी सिनेमातले जाणकार मराठी सिनेमांमध्ये वेगवेगळ्या कारणांनी सहभागी होतात. कोणी सिनेमा निर्मित करतो तर कोणी त्यात काम करतं. पण, मराठी सिनेमात सहभागी होण्याविषयी अनिल त्यांचं काहीसं वेगळं मत मांडतात. ‘‘सध्या मराठी सिनेमांनी एक वेगळीच उंची गाठली आहे. त्यांचे विषय वेगळे आणि अतिशय उत्तम असतात. सादरीकरण, मांडणी हे सगळंच कौतुक करण्यासारखं असंतं. तिथल्या कलाकारांचा अभिनय तर लाजवाब. मी नाना पाटेकर यांचा ‘नटसम्राट’ बघताना अतिशय भावुक झालो होतो. मराठी भाषा, साहित्य, संस्कृती, कला हे मला अतिशय आवडतं. पण, मराठी सिनेमांमध्ये मी कोणत्या ना कोणत्या भूमिकेतून सहभाग घेतला तरच मी त्या संस्कृतीशी जोडला गेलोय असं नाही. मी मुंबईकरच असल्याने मराठी सिनेसृष्टीशी आपसूकच जोडला गेलोय. त्यासाठी मला एखाद्या मराठी सिनेमाची निर्मिती करावी लागेल असं अजिबातच नाही. एखादा िहदी सिनेमाचं कामही मी अनेकदा मुंबईत राहूनच करत असतो. एखाद्या मराठी सिनेमाची कथा आवडली तर मराठी सिनेमाही करेन. पण मी मराठी सिनेमा केला तरच माझं महाराष्ट्रावर खूप प्रेम आहे हा समज चुकीचा आहे.’’

गेली ४५ र्वष प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा हा झक्कास हिरो आजही तितकाच लोकप्रिय आहे. प्रेमकथा, अ‍ॅक्शनपट, रहस्यपट, विनोदीपट असे अनेक बाजांचे सिनेमे त्यांनी केले. प्रत्येक भूमिका साकारताना त्यांनी त्यांचं अभिनयकौशल्य दाखवून दिलंय. अनिल कपूर हे मागच्या पिढीचे हिरो असले तरी आजच्या तरुणाईमध्येही ते तितकेच लोकप्रिय आहेत. अनेक सिनेमे गाजवून छोटय़ा पडद्याकडे त्यांनी घेतलेली झेप यशस्वी झाली आहे. आता पुन्हा एकदा ते मालिकेतून दिसणार आहेत. ‘ट्वेन्टी फोर’ (चोबीस)च्या पहिल्या सीझनप्रमाणे नव्या सीझनमध्येही त्यांच्या कामाचं कौतुक होईल यात शंका नाही. या नव्या सीझनची दणक्यात सुरुवात झाली असली तरी पुढचे भाग बघणं प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचं ठरणार आहे.
चैताली जोशी – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 29, 2016 1:08 am

Web Title: anil kapoor interview
Next Stories
1 महाएपिसोड.. मालिकांचा सण!
2 ..आणि म्हणे आम्ही हुशार!
3 शिव सगळ्यांच्या आवडीचा!
Just Now!
X