रिअ‍ॅलिटी शो भव्य रूपात, झगमगाटात सादर केले जातात खरे, पण गफलत होतेय ती त्यातल्या परीक्षकांच्या निवडीबद्दल. सिनेमा आणि मालिकांमधल्या कलाकारांच्या कास्टिंगप्रमाणे आता रिअ‍ॅलिटी शोमधल्या परीक्षकांच्या कास्टिंगचीसुद्धा गरज वाटू लागली आहे.

एखादी मालिका, रिअ‍ॅलिटी, कथाबाह्य़ कार्यक्रम करायचा म्हटला की अनेक गोष्टी अतिशय बारकाईने तपासून घ्याव्या लागतात. विषय, कथा, पटकथा, संगीत, कलाकार, तंत्रज्ञान असं सगळंच त्यात येतं. सगळं योग्य आहे ना याची वारंवार खात्री करून घेतली जाते. पण, हे माध्यम आहे दिसण्याचं. त्यामुळे इथे चांगलंच ‘दिसावं’ लागतं. आणि या ‘दिसण्या’साठी चॅनलवाल्यांना दाहीदिशा फिराव्या लागल्या तरी चालतात. पण ‘दिसणं’ उत्तमच हवं. आता या दिसण्यात फक्त सुंदर दिसणं नाही तर त्यात विशिष्ट व्यक्तीची स्टार व्हॅल्यू किंवा फेस व्हॅल्यूसुद्धा महत्त्वाची ठरते. इथे दिसण्याची व्याख्या वेगळी आहे. ही व्याख्या लक्षात घेत चॅनल्सवाले मालिकांमध्ये तसं देखणेपण आणतात. कलाकार आणि लोकेशन असं दोन्ही घटकांना सुंदर करण्याइतका वाव मालिकेमध्ये मिळतो. पण, रिअ‍ॅलिटी शोमध्ये तितकासा वाव नसतो. तीन परीक्षक आणि एक सूत्रसंचालक एवढंच सुरुवातीला त्यांच्या हातात असतं. मग त्यांच्यावर मेहनत घेतलीच पाहिजे. यातही सूत्रसंचालकाचं चालून जातं. त्याचं बोलणं व्यवस्थित हवं, हजरजबाबीपणा हवा, मनोरंजन करण्याची क्षमता या एवढय़ा अपेक्षा त्याच्याकडून असतात. अर्थात त्यालाही स्टार व्हॅल्यू, फेस व्हॅल्यू हवीच असते. पण, परीक्षकाइतकी नाही. इतर रिअ‍ॅलिटी शोमधील परीक्षकांवर मेहनत घेताना नेमकी गफलत होते. कार्यक्रमाचा बाज आणि परीक्षकाची पाश्र्वभूमी याचा एकमेकांशी अजिबात संबंध नसतो. सध्या काही रिअ‍ॅलिटी शोजमध्ये ही गफलत ठळकपणे दिसून येतेय.

यातलं सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं उदाहरण म्हणजे करण जोहर. लेखक-दिग्दर्शक-निर्माता करण जोहर ‘झलक दिखला जा’ आणि ‘इंडियाज गॉट टॅलेंट’ अशा दोन्ही शोजचं परीक्षण गेले अनेक सीझन करतोय. ‘झलक..’ हा शो नृत्याशी संबंधित आहे तर ‘इंडियाज..’ हा विविध कलांशी संबंधित आहे. करण सिनेसृष्टीशी संबंधित असल्यामुळे त्याला विविध कलांची जाण आहे, हे अगदीच मान्य. पण, जाण असणं आणि त्याचा अभ्यास असणं यात खूप फरक आहे. असो. ‘झलक..’विषयीचा मुद्दा तर वेगळाच आहे. करण जोहरचा आणि नृत्याचा काय संबंध? बरं, तो त्या कार्यक्रमात जे काही नाचतो किंवा त्याला नाचवलं जातं ते परीक्षण करण्याइतपत पात्रही नसतं. पण चॅनलला तोच हवा! अति भावुक होणं, रडणं-रडवणं त्याला जमतं म्हणून तो तिथे असेल, असं समजूया. तसं बघायला गेलं तर ‘इंडियाज.’मध्ये इतर दोन परीक्षकांचं कास्टिंगही विचारात पाडणारं आहे. मलायका अरोरा खान आणि किरण खेर या दोघी त्यांच्या क्षेत्रात चांगलं काम करत असतीलही, पण या कार्यक्रमासाठी नॉट परफेक्ट!

एखाद्या स्पर्धकाचा मेलोड्रामाटिक परफॉर्मन्स, मग त्याची तिथवर येण्याची कथा, त्याच्या कुटुंबाने केलेला संघर्ष कार्यक्रमाच्या एपिसोडमधून वास्तवापेक्षा किमान ३० ते ४० टक्केरंगवून सांगितला जातो. असे खरेखुरे स्पर्धक असतीलही. त्यांच्या संघर्षांवर, मेहनतीवर शंका मुळीच नाही. पण चॅनलवाल्यांना ते तसं दाखवण्याशिवाय पर्याय नसतो. रेटिंग मिळवण्यासाठी ते गरजेचं असतं. त्या विषयात आता खोलवर नको जाऊया. तुर्तास परीक्षकांच्या कास्टिंगवर मोर्चा वळवूया. तर, असं रंगवून सांगितलेल्या प्रसंगांवर तितकंच रंगवून व्यक्त होणंही गरजेचं असतं. आणि त्यासाठी या क्षेत्रात मुरलेले, जाणकारच हवेत हा त्यामागे एक विचार असू शकतो. अशा कार्यक्रमांमध्ये परीक्षकांची निवड करताना चॅनल निश्चितच विचार करत असेल. पण, त्यावर आणखी थोडी मेहनत घेणं गरजेचं आहे. परीक्षकाचा त्या त्या कार्यक्रमातील कलेबद्दलचा अभ्यास आहे का, हे तपासलं पाहिजे.

‘सुपर डान्सर’ हा शो सध्या प्रचंड गाजतोय. या कार्यक्रमातील लहान मुलं अफाट नाचतात. त्यांचं कौशल्य बघून अचंबित व्हायला होतं. त्यांची मेहनत, ध्यास, कौशल्य हे सगळंच वाखणण्याजोगं आहे. खटकतं ते अनुराग बासूचं त्या शोमध्ये परीक्षक म्हणून असणं. अनुराग बासू एक उत्तम लेखक-दिग्दर्शक आहे. पण, म्हणून त्याला नृत्यविषयक कार्यक्रमात परीक्षक म्हणून बसवायचं? याच शोमध्ये इतर दोन परीक्षक म्हणून शिल्पा शेट्टी आणि गीता कपूर या आहेत. दोघींनी नृत्याचं रीतसर प्रशिक्षण घेतलं आहे. दोघींना नृत्यातले खाचखळगे कळतात. त्यामुळे त्यांचं तिथे असणं अगदीच योग्य आहे. पूर्वी ‘इंडियाज बेस्ट ड्रामेबाज’ या शोमध्येही अनुराग बासू परीक्षक म्हणून होता. ते कास्टिंग अतिशय योग्य होतं. कारण तो शो अभिनय स्पर्धेचा होता. दिग्दर्शक असलेला अनुराग परीक्षक म्हणून तिथे योग्य होता.

पूर्वीच्या काही शोजमध्ये अशी आणखी उदाहरणं सापडतील. यात सगळ्यात गाजलेलं नाव म्हणजे चेतन भगतचं. ‘नच बलिये’ या लोकप्रिय कार्यक्रमाच्या सातव्या सीझनमध्ये तो परीक्षक म्हणून होता. एक लेखक एका नृत्याच्या कार्यक्रमात परीक्षक आहे, हे वाक्यच गोंधळात टाकणारं आहे. त्याला अशा शोमध्ये परीक्षक म्हणून का घेतलं, याचं उत्तर तो शो संपून एक वर्ष झालं तरी सापडलेलं नाही. बरं त्या शोमध्ये तो काय करायचा तर जोडप्यांच्या केमिस्ट्रीविषयी बोलायचा, त्यांच्या कहाण्या ऐकायचा, त्यावर त्याचे एक्स्पर्ट मतं, सल्ले द्यायचा आणि वेळ मिळालाच तर नृत्याबद्दल बोलायचा. कधीकधी अशी शंका यायची की, त्या कार्यक्रमातल्या जोडप्यांच्या सर्व कहाण्या एकत्र करून एक प्रेमकथाच तो लिहिणार की काय. पण तसं काही झालं नाही. निदान ते अजून दिसलं तरी नाही. चेतनप्रमाणेच ‘नच बलिये’मध्येच आणखी एक चुकीचं कास्टिंग दिसून आलं. साजिद खानचं. साजिद खानच्या सिनेमांबद्दल न बोललेलंच बरं. कार्यक्रमात नृत्याबद्दल कमी बोलणं आणि कोणाकोणावरून विनोदनिर्मिती करणं हेच त्याचं काम होतं.

मराठीमध्ये तुलनेने हा प्रकार आटोक्यात आहे. मुळात मराठीमध्ये कथाबाह्य़ किंवा रिअ‍ॅलिटी शो कमी असतात. असले तरी त्याचा हिंदीइतका पसारा नसतो. तरी मराठीने आणखी थोडी मेहनत घ्यायला हवी. ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ या शोचं रंगरूप बदललं. नव्या स्वरूपात तो प्रेक्षकांच्या भेटीस येतो. हा शो विनोदी नाटुकल्यांचा आहे. इथेही गुण वगैरे आहेत. हा शो मनोरंजन करतो. या शोमध्ये परीक्षक आहेत महेश कोठारे आणि सोनाली कुलकर्णी. इथे गडबड झाली. महेश कोठारे आणि विनोदनिर्मिती यांचं नातं सगळ्यांनाच माहीत आहे. त्यांचे चित्रपट अनेकांनी पाहिलेही आहेत. त्यामुळे ते योग्य खुर्चीवर बसले आहेत. पण सोनाली कुलकर्णी हे परीक्षक म्हणून कास्टिंग खटकतं. सोनाली चांगला अभिनय करते. उत्तम नाचते. तिने विनोदी सिनेमांमध्ये भूमिका केल्या आहेत. पण म्हणून एखाद्या विनोदी कार्यक्रमासाठी परीक्षक म्हणून तिची निवड काहीशी खटकणारी आहे. मात्र हिंदीमधली ‘फेस व्हॅल्यू’ची लाट मराठीकडे वळतेय, हे यावरून दिसून येतंय.

मध्यंतरी ‘मजाक मजाक में’ हा कार्यक्रम सुरु होता. तो कधी सुरु झाला, कधी संपला हे कोडंच आहे. हरभजन सिंग आणि शोएब अख्तर हे क्रिकेटर त्या शोचं परीक्षण करत होते. क्रिकेट आणि विनोदी कार्यक्रम याचा संबंध काय, हा संशोधनाचा विषय असू शकतो. त्या दोघांना विनोदी कार्यक्रमाचं परीक्षण करताना बघून असं वाटलं की, सिनेसृष्टीत उत्तम विनोदी कलाकार नाहीतच, असं झालंय की काय?

यात भरीत भर म्हणजे नवजोतसिंग सिद्धूची. खरं तर ‘कॉमेडी नाइट्स विथ कपिल’ या शोमध्ये परीक्षक किंवा तत्सम व्यक्तीची गरज नाही, तरी सिद्धू तिथे विराजमान आहेत. याचं कोडं त्या शोचं चॅनल बदलल्यावरही सुटलेलं नाही. मोठमोठय़ाने हसता येतं आणि शेरेबाजी करता येते असं गणित तिथे बसवलं असावं. पण या गणिताची इथे काहीच गरज नव्हती. काही दिवसांनी या यादीत आणखी एका नावाची भर पडेल. फराह खान हे ते नाव. लवकरच ‘इंडियन आयडॉल’ हा रिअ‍ॅलिटी शो सुरू होतोय. या कार्यक्रमाची लोकप्रियता नेहमीच टिकून असते. यामध्ये अतिशय गुणवंत स्पर्धक सहभागी होत असतात. त्यामुळे कार्यक्रम प्रत्येक वेळी वेगळ्या उंचीवर जातो. नव्या सीझनमध्ये सोनू निगम, अनू मलिक आणि फराह खान हे त्रिकूट परीक्षकांच्या खुर्चीत बसणार आहे. यापैकी सोनू निगम ही निवड अचूक आहे. अनू मलिकची प्रतिमा फार चांगली नसली तरी त्याचा संगीताचा अभ्यास आहे. त्यामुळे तेही ठीक आहे. पण फराह खान? नृत्याच्या रिअ‍ॅलिटी शोमध्ये फराह खानने अनेकदा परीक्षण केलंय. पण गाण्याच्या रिअ‍ॅलिटी शोमध्ये तिला परीक्षक म्हणून बघणं न पचणारं आहे. खरं तर ‘इंडियन आयडॉल’च्या पहिल्या आणि दुसऱ्या सीझनमध्ये फराहने परीक्षक म्हणून काम केलं आहे. पण तेव्हाही ती तिथे परीक्षक म्हणून का, हा प्रश्न होताच. एखाद्या कलेचं परीक्षण करण्यासाठी त्या कलेची जाण असण्यापेक्षा त्याचा अभ्यास असणं महत्त्वाचं आहे.

हे सगळे चुकीचं कास्टिंग झालेले परीक्षक प्रेक्षकांचं मनोरंजन चांगलं करतात हे मात्र नाकारता येणार नाही. प्रेक्षकांचं मनोरंजन होत असल्यामुळेच असे कार्यक्रम बघणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. जे दाखवताहेत ते आवडतंय म्हणून चॅनलही तशीच पावलं उचलतात. परीक्षक म्हणून बसलेले हे कलाकार, दिग्दर्शक, लेखक आपापल्या क्षेत्रात नावाजलेले आहेत. त्यांच्या कौशल्याबद्दल अजिबात शंका नाही. पण विशिष्ट कलेचा त्यांचा पुरेसा अभ्यास नसताना ते त्या कार्यक्रमांचं परीक्षण करतात हे खटकतं. पण एखाद्या सिनेमा, मालिकेसाठी जसं कलाकारांचं कास्टिंग केलं जातं तसंच रिअ‍ॅलिटी शोजसाठी परीक्षकांचं कास्टिंग करायला हवं. कार्यक्रम ज्या कलेवर आधारित आहे त्याबद्दलचा अभ्यास कितपत आहे, त्याविषयीचा अनुभव किती आहे, ते बोलतात कसे असं सगळं पडताळून बघायला हवं. कलाकारांची जशी लुक टेस्ट होते तशी परीक्षकांची लुक टेस्ट नाही पण तत्सम टेस्ट घ्यायला हवी. चॅनलला फेस व्हॅल्यू, स्टारडम, ग्लॅमरस चेहराच हवाय तर मग एकेक गोष्टी पडताळत चाळणी लावायला हवी. मनोरंजन आणि विशिष्ट कलेबद्दल अभ्यास अशी दोन्हीचं ज्ञान असलेला कलाकार परीक्षक म्हणून निवडायला हवा. तरच अधिक सकस आशय प्रेक्षकांना बघायला, ऐकायला मिळेल!
चैताली जोशी – response.lokprabha@expressindia.com
@chaijoshi11