25 May 2020

News Flash

गांधी त्याला भेटला!

मोहनदास करमचंद गांधी! पंचा नेसलेला, हातात काठी घेतलेला म्हटलं तर एक साधा माणूस.

मोहनदास करमचंद गांधी! पंचा नेसलेला, हातात काठी घेतलेला म्हटलं तर एक साधा  माणूस. एकेकाळी ब्रिटिश राजसत्तेला तंतरून टाकणारा हा माणूस आजही अगदी कुणालाही नादी लावतो.. गांधी जयंतीच्या निमित्ताने.

महात्मा मोहनदास करमचंद गांधी हे कालबा झाले आहेत, असे अनेकांना वाटते. आमचे तर तसे लहानपणापासूनचे मत आहे. बालपणी आम्हांस गांधीजींबद्दल जे वाटे, तेच आजही वाटत आहे हे पाहून तर कधी कधी आमचा आम्हालाच अभिमान वाटतो, की काय पण आपली दूरदृष्टी आणि तर्कबुद्धी!

जीवन शिक्षण मंदिरात इत्ता पाचवी-क मध्ये शिकत असताना आम्ही अत्यंत गहन अभ्यास करून एक विचार मांडला होता, की भारतास स्वातंत्र्य मिळाले ते काही गांधीजींमुळे नाही. मुळात सत्याग्रह करून वगैरे स्वातंत्र्य मिळतच नसते. याला पुरावा आहे. गोष्ट तशी खूप प्राचीन आणि सुप्रसिद्ध असूनही अनेकांप्रमाणे आमच्याही बालपणीची आहे. एकदा किराणा मालाचे दुकानदार यांचे एक प्रतिनिधी आमच्या घरी आमच्या पिताश्रींशी आर्थिक घडामोडींबाबत चर्चा करण्याकरिता येत होते. लांबूनच त्यांना पाहून पिताश्रींनी आम्हास सांगितले, की त्याला सांग बाबा घरी नाहीत. आमच्या घराच्या तुळईवर बाबांनी एक वाक्य लिहिले होते. नेहमी खरे बोलावे. आम्हांस वाटे, की एवढे उंचावर लिहिलेले वाक्य खरेच असणार. तेव्हा आम्ही बाबांस सांगितले, की मी असत्य बोलणार नाही. त्यावर बाबांनी आमचे कर्णेद्रिय पिरगाळले व नेहमी थोरांचे ऐकावे हे अन्य एका तुळईवरील वचन आम्हांस दाखवले. तेव्हा आम्ही त्या दुकानदाराच्या प्रतिनिधीस सांगितले, की बाबांनी सांगितलेय की बाबा घरी नाहीत! (वाचकांसाठी सूचना : या कहाणीच्या स्वामित्वहक्काबाबतचे सर्व खटले केवळ इम्फाळ न्यायालयाच्या कक्षेत येतील, याची कृपया नोंद घ्यावी.) तर त्या सत्याग्रहाचे दुष्परिणाम असे झाले की घरी कोणीही पाहुणे वगैरे आले की याला माजघरात स्थानबद्ध करा, असे हुकूम सुटले! सत्याग्रहाने स्वातंत्र्य मिळत नसते, यास इतका सज्जड पुरावा अन्य कोणता असू शकतो?

गांधीजींची अहिंसा हा तर विनोदाचाच विषय. या विषयावर ज्याने विनोद केला नाही, विनोद सांगितला नाही वा इतरांच्या विनोदावर हसला नाही तो राष्ट्रभक्तच नव्हे, असे आमचे ठाम मत आहे. किंबहुना भारताच्या स्वातंत्र्यलढय़ाच्या वगैरे इतिहासाचे पुनर्लेखन करून गांधीजींना काळ्या पाण्यावर पाठवणे सोपे, परंतु भारतीय विनोदाच्या इतिहासातून मात्र त्यांना हद्दपार करताच येणार नाही. कोणी एका गालावर मारले की दुसरा गाल पुढे करायचा व त्यातून त्याचे मनपरिवर्तन करायचे हा जो गांधीविनोद आहे तो ख्रिस्त आणि बुद्धकाळापासून चालत आलेला आहे. तो कसा बरे हद्दपार करणार? शिवाय त्यांचे ब्रह्मचर्याचे प्रयोग! त्यावर      मा. श्री. बाळासाहेबांपासून आमच्या घराशेजारच्या शाखेतील नेनेजींपर्यंत किती तरी थोर थोर मंडळींनी विनोदीवाङ्मय प्रसवले आहे. आजही त्यात खळ नाही. तेव्हा ते कसे बाजूस सारणार? अखेर सांस्कृतिक परंपरा म्हणून काही चीज असते की नाही? ही परंपरा यापुढेही जपून अंतिमत: गांधींचे सारेच हास्यास्पद ठरविण्यात तर आपला राष्ट्रगौरव सामावला आहे!

‘पाचवी-क’मध्ये असताना आमची गांधीजींबद्दल जी मते होती ती आजही कायम आहेत व मौज अशी की आमच्याप्रमाणेच अनेक जण याबाबत ‘पाचवी क’च्या पुढे गेलेले नाहीत. हे पाहिले की आमचा ऊर खरोखरच अभिमानाने भरून येतो. गर्वाने मान अशी उंच होते. कधी कधी वाटते, ‘पाचवी क’मध्ये असताना आम्हांस जे आकळत होते, ते गांधीजींना कसे बरे समजत नव्हते? बरे माणूस कमी शिकलेला होता असेही नाही. चांगला परदेशात जाऊन बॅरिस्टर झालेला होता. बहुधा तेव्हाच्या शिक्षणपद्धतीतच काही दोष होता. हल्ली बघा, परदेशात जाऊन शिकलेली माणसे कशी विद्वान व प्रगल्भ असतात! भारताचा इतिहास, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र आणि धर्मपरंपरा याबाबत किती निष्णात तज्ज्ञ असतात! म्हणजे बघा येथील राजकीय नेते, पुढारी, अर्थतज्ज्ञ, विचारवंत, झालेच तर माध्यमवीर यांस काहीच कळत नसते हे त्यांना कसे लख्ख समजते! शिवाय येथील जनता ही तर अज्ञान अंधकारातच खितपत पडलेली व प्राय: असंस्कृत असते. अशा प्रजेमुळेच हा देश मागासलेला राहिलेला आहे असे निदान ते कसे करू शकतात! तेही वर्षांनुवर्षे विलायतेत राहून! गांधीजींचे तसे नव्हते. बॅरिस्टर होऊनही ते भारतात परतले. बरे आल्यानंतर नीट वकिली करावी, तर तेही नाही. आणि वकिली चालणार तरी कशी? गांधीजी गांधीवादाच्या नादी लागले नसते, तर वकिली चालण्याची थोडी तरी संधी होती. पण त्यांनी कोणाचे ऐकले नाही. आमचे परमशेजारी रा. रा. लेले यांचेही तसेच.

ज्या अर्थी नरेंद्रजी मोदीजी (एनआरआय प्रधानमंत्री एवम् प्रधानसेवक, भारत) हे विदेशात जातील तेथे गांधीजी यांच्या एका तरी पुतळ्याचे अनावरण करतात व ज्या अर्थी त्यांनी स्वच्छता मोहिमेकरिता गांधीजी यांस ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसिडर म्हणून नेमले आहे, त्या अर्थी गांधीजी थोर होते यात शंका नाही, असे रा. रा. लेले यांचे म्हणणे आहे. येथपर्यंत ठीक आहे. खुद्द नमोजींनी सर्टिफाय केलेले असल्यामुळे ज्या प्रमाणे आपण मा. श्री. अमितभाई यांना थोर मानतो त्याचप्रमाणे गांधीजींना थोर मानणे आपणांस भाग आहे. पण म्हणून का गांधीजींची मते आचरणात आणावयाची? मुळात कोणत्याही थोर गृहस्थाच्या पश्चात स्मारक समिती उभी करून त्याचे पुतळे उभे करायचे असतात व थाटामाटात जयंती-मयंती उत्सव साजरे करायचे असतात. गांधीजींचे तर हेही करायची आवश्यकता नव्हती. कां की, ज्याच्या मागे केवळ सरकारी कार्यालयातील भिंती असतात, ज्याच्या मागे कोणतीही जात नसते, मतपेढी नसते याचा साधा अर्थ असा असतो की तो राष्ट्राच्या राजकारणात अनुत्तीर्ण झालेला असतो, हे आपण समजून घ्यायला नको? पण आम्हांस येथे आत्यंतिक खेदाने हे नमूद करावेसे वाटते की आजही या देशात अशी काही मनुष्ये आहेत की जी गांधीजींच्या मार्गावरून चालण्याचा प्रयत्न करतात. वस्तुत: आज संपूर्ण देशाने एमजी रोडऐवजी दलाल स्ट्रीटवरून चालण्याची सवय करावयास हवी. कां की त्यातच आपले सौख्य व देशाचे विश्वगुरू अर्थात जागतिक महासत्ता हे पद सामावले आहे. परंतु हे काहीही न ऐकता आमचे परमशेजारी रा. रा. लेले यांनी या कालबाह्य़ गांधीमार्गावरून चालण्याचे दु:साहस केले. lp09त्याची फळे अर्थातच त्यांस खावी लागली हे काही स्वतंत्र सांगावयास नको. रा. रा. लेले यांचे हे जे काही गांधीवादी सत्याचे प्रयोग होते, त्याची माहिती जनहितार्थ प्रसिद्ध करणे हे आम्ही आमचे कर्तव्यच मानतो.

आम्हांस हे व्यवस्थित स्मरते की यास प्रारंभ झाला तो इसवी सनाच्या २०१५व्या वर्षी. एके दिवशी प्रात:समयी आम्ही योगासनांत मग्न होतो. दूरचित्रवाणीच्या कोणा वाहिनीवर एक ललना योगासनांचे पाठ देत होती. योग म्हणजे आपला गौरवास्पद वारसा. तेव्हा तो कार्यक्रम आम्ही राष्ट्रकर्तव्य समजून पाहत होतो. अशा वेळी लेले आमच्या दारी पातले. तसे ते रोजच येतात व आमच्या घरी आलेली उद्याची रद्दी अर्थात विविध वृत्तपत्रे घेऊन जातात. याच वेळी ते कालच्या वृत्तपत्रांत आलेल्या विविध बातम्यांचे विष्लेषणही करतात. आमच्या माथी वृत्तपत्रे न वाचल्याचे महापातक येऊ  नये हाच केवळ यामागील त्यांचा सद्हेतू असतो.

त्या दिवशी लेले आले ते वेगळ्याच अवतारात. डोळे तांबरलेले. ओठांवर किंचितसे स्मित. चेहऱ्यावर रामायणातील अरुण गोविल यांच्यासारखा – वत्सा, जा तुजप्रति कल्याण असो – असा भाव आणि हातात चक्क वृत्तपत्रांचा भला मोठा गठ्ठा. त्यांस विचारले तर म्हणाले, विसूभाऊ, हे तुमच्याकडून नेलेले पेपर. ते तुम्ही परत घ्या व आम्हांस क्षमा करा.

म्हटले, लेले, हे काय? आणि तुमचे डोळे असे तांबरलेले का? रात्री अतिरिक्त अपेयपान तर नाही ना झाले?

तर ते म्हणाले, लाहोलविलाकुवत! तसे काहीही नाही. आम्ही रात्री मुन्नाभाई पाहिला.

आम्ही म्हटले, म्हणजे? तुम्ही येरवडय़ास गेला होता की त्यास पुन्हा रजा मिळाली? येथे आम्हांस साधी सीएल मिळायची मारामार! त्याला बरी दहा दहा दिवसांची रजा मिळते!

लेले म्हणाले, तसे नाही हो. रात्री उशिरापर्यंत चित्रपट पाहिला – लगे रहो मुन्नाभाई.

आम्ही म्हटले, अहो मग एवढय़ा सकाळी कशाला उठलात? आज ऐतवार आहे ना.

ते म्हणाले, विसूभाऊ, रात्री जागलो आणि जन्माभराची झोप उडाली! तुम्ही हे तुमचे पेपर घेऊन आम्हांला ऋणमुक्त करा. आमच्या माथी अपहाराचा कलंक नको.

आम्ही चक्रावलोच. मनात आले, आम्ही लेलेंच्या वृत्तपत्रे पळवण्याच्या सवयीबद्दल हिच्याशी जे बोललो ते त्यांच्या कानी तर नाही ना गेले? पण मग मनात आले, आम्ही तसे नेहमीच पॉलिटिकली करेक्ट असतो. म्हणजे सर्वोंशीच तोंडदेखले प्रेमाने बोलतो. नावे ठेवतो ती पाठीमागेच. त्यांना समजणार नाही ही काळजी घेऊन. तेव्हा लेलेंना ते कळण्याची शक्यता शून्य होती.

लेलोंना म्हणालो, जरा शांत बसा. हा चहा घ्या आणि आम्हांस नीट खुलासेवार सांगा.

आजपासून चहा सोडला. दूधच घेईन, असे म्हणत ते बसले आणि त्यांनी आम्हांस त्यांचा विचार आणि निर्धार सांगितला. तो असा, की त्या चित्रपटातील गांधीगिरीचे प्रयोग पाहून त्यांनीही गांधीपथावरून चालण्याचे ठरविले आहे.

रा. रा. लेले हे कालबाह्य़ गांधीविचार अंगीकारणार आहेत हे पाहून आमची तर सर्व ज्ञानेंद्रियेच हँग झाली.

यानंतर अधूनमधून लेले यांचे गांधीगिरीचे प्रयोग आमच्या कानावर येत होते. त्या दिवशी ही सांगत आली, की लेले आणि त्यांच्या पत्नी यांचे कडाक्याचे भांडण झाले आहे. तुम्ही जरा लेलेभावोजींची समजूत काढा. कां की त्यांनी उपोषण पुकारले आहे.

ताडकन् उठून लेलेंच्या घरी गेलो. लेले लिंबू-पाणी घेत होते.

म्हणाले, आत्मशुद्धीसाठी करतोय हे सगळे.

आम्ही म्हटले, तुम्ही गप्प राहा. वहिनी, मला सांगा हा काय प्रकार आहे?

त्या पदराने डोळे पुसत म्हणाल्या, कालपासून काही खात नाहीत. नुसते पिताहेत.. लिंबूपाणी.

पण झाले तरी काय?

काही नाही हो. हल्ली खूप स्पष्ट आणि खरं खरं बोलतात.

आँ? अहो हे चांगले आहे की!

नाही हो. चांगलेच आहे. पण परवा शेजारच्या त्या पडवळकाकूंनी भाजी दिली होती. नंतर त्यांनी विचारले, कशी झाली होती? तर हे सरळ म्हणाले, वाईट! असे कोणी सांगते का? मला तर हल्ली यांना काही विचारायचीच भीती वाटायला लागलीय.

लेलेवहिनींचे बरोबरच होते. लेलेंच्या सत्याग्रहामुळे त्यांचीच नव्हे, तर लेलेंचीही पंचाईत होत होती. गेल्या कित्येक दिवसांत लेलेंना रजा घेता आलेली नाही. आज कामावर यावेसे वाटत नाही, हे काही रजेचे कारण होऊ  शकत नाही. पूर्वी याऐवजी कोणाला तरी आजारी पाडून, प्रसंगी ओंकारेश्वरावर पोचवून रजा घेता यायची. पण लेलेंची गांधीगिरी आता त्यांना अशा थापा मारू देत नाही की गोडगोड खोटे बोलू देत नाही.

असे बोलावे लागते. आता आमच्या कचेरीतील साहेब सतत बैठका बोलावतात आणि त्यात विनोद करतात. सर्वाना हसावेच लागते ना? की अशा वेळी आपण साहेबांस सांगतो, की पांचट विनोद करू नका. आम्हांस हसायला येत नाही? आता या हसण्यात काय खोटे असते?

परंतु लेलेंनी आता गांधीपथ स्वीकारला आहे.

ठीक आहे. या मार्गावरून आपणांस चालावयाचे आहे, तर पाय आपले आहेत, वाट आपली आहे. त्यात इतरांस कशास बरे ओढावयाचे?

चाळीतील देशपांडे यांस त्यांच्या मुलास मोठा सनदी अधिकारी करायचा आहे. मुंबईत तीन सदनिका, गावाकडे मोठ्ठाच्या मोठ्ठा बंगला आणि बँकेत लॉकर असावा ही त्यांची महत्त्वाकांक्षा. आता ती त्यांचे चिरंजीव नाही पूर्ण करणार तर कोण? त्यात अडचण एकच आहे, की त्यांचा चिरंजीव सध्या इयत्ता दुसरीत आहे. त्याने डीडी वाहिनीवरील चर्चा आणि राज्यसभा टीव्हीवरील माहितीपट पाहावेत, ज्ञानी व्हावे, अशी देशपांडेंची कळकळ. पण तो लब्बाड कार्टून पाहायचे असे म्हणतो. परवा देशपांडेंनी त्याला चांगलाच लंबा केला. आता या घरातील भानगडीत पडायचे लेलेंना काही कारण होते का? पण त्यांना गांधींची अहिंसा आठवली. सानेगुरुजींचे ‘करी मनोरंजन जो मुलांचे’ ते आठवले. हात जोडून त्यांनी देशपांडेंना विनंती केली, की कृपया आपल्या चिरंजीवास अशी मारहाण करू नका. देशपांडे म्हणाले, लेल्या, पोरगं माझं आहे. त्याचं काय करायचं ते मी करीन.

झाले! लेले म्हणाले, अन्याय सहन करणार नाही. दारासमोर अहिंसक धरणे आंदोलन करीन!

देशपांडे म्हणाले, करून तर बघ. रांगोळीसारखा झाडून लावीन.

लेलेवहिनींनी लेलेंना ओढत घरात नेले म्हणून पुढील समरप्रसंग टळला. पण एक झाले की देशपांडेंच्या घरातून अधूनमधून कार्टूनचे आवाज ऐकू येऊ  लागले आणि देशपांडेकाकू एकदा हळूच थँक्यू म्हणून गेल्या!

हल्ली चाळीतील सर्वाच्याच एक गोष्ट लक्षात येऊ  लागली आहे, की लेलेंपासून सगळेच एक अंतर राखून वागू लागले आहेत. नेहमीच्या बसच्या कंडक्टरने त्यांच्याकडून सुटे पैसे मागण्याचे सोडले आहे. कोपऱ्यावरचा वाणी छुट्टा नही म्हणत सगळ्या गावाला चॉकलेटे देतो. लेलेंपुढे मात्र तोही लवतो. चाळीतल्या झाडूवाल्याने तर आपली झाडू लपवून ठेवायला सुरुवात केली आहे. कचरा दिसला की हा साहेब सरळ झाडायला लागतो. त्या झाडूवाल्यास त्याचे काही नाही. पण हे असेच चालू राहिले, तर हमारी नौकरी जायेगी ना, ही चिंता त्याला सतावते आहे. आणि तिकडे लेलेवहिनींना साहेबांची नोकरी जाईल याची काळजी वाटू लागली आहे. कचेरीत वेळेवर जाणे, कामात कसूर न करणे, वृथा अवसरविनोदन न करणे अशा गोष्टींमुळे लेलेंनी आपल्या सहकाऱ्यांचा रोष ओढवून घेतला आहे.

आम्हांस मात्र लेलेंच्या नोकरीपेक्षा त्यांच्या प्रकृतीबाबतच भय वाटत आहे. उत्सवाच्या मंडपातून येणारा ध्वनी वातावरण प्रदूषित करतो आहे. त्यांच्या ध्वनिक्षेपकावरून ढणाणा वाजणाऱ्या भक्तिगीतांनी मुलांच्या अभ्यासात आणि ज्येष्ठांच्या झोपेत व्यत्यय येतो आहे या गोष्टींची जाहीर आणि परखड चर्चा करायची असते ती ज्याने-त्याने आपापल्या घरात. त्याकरिता त्या उत्सवाच्या मंडपात जायचे नसते. हे व्यवहारज्ञान आम्हांस लहानपणापासून आहे. यापूर्वी लेलेंनाही ते होते. पण त्यांच्या गांधींना ते नव्हते. कसे असणार? गांधींपुढे ब्रिटिश उभे होते. तेव्हा त्यांचे चार-दोन काठय़ांवर आणि तुरुंगवासावर निभावून गेले. समोर एतद्देशीय आल्यानंतर मात्र गोळीच खावी लागली. म्हणूनच आम्हांस लेलेंबद्दल आता भीती वाटू लागली आहे. उद्या कोणी त्यांना मारहाण केली, तरी त्यांना काडीमात्र सहानुभूती मिळणार नाही. उलट लोक म्हणतील, अलीकडे लेल्या जरा सटकलाच होता!

लोक असे म्हणतील याचे कारण मुळातच महात्मा मोहनदास करमचंद गांधी हा माणूस आजच्या युगात कालबाह्य़ झाला आहे!

तो कालसुसंगत ठरण्यासाठी दोन गोष्टींची आत्यंतिक आवश्यकता असते. एक म्हणजे नैतिक बळ. ते कमवावे लागते. पुन्हा ते नुसते असून चालत नसते. त्याची आजूबाजूच्या समाजास जाणीव असावी लागते. नैतिक टोचणी लागावी एवढी त्या समाजाची कातडी मऊ असावी लागते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आत्मबळ. प्रहार करण्याकरिता जेवढे आत्मबळ लागते त्याहून अधिक लागते प्रहार परतवण्याची ताकद अंगी आहे हे माहीत असूनही ते झेलण्याकरिता. एरवी सगळेच दुबळे अहिंसक असतात, पण त्यात काही अर्थ नाही.

आता आमुच्या बालपणी आम्हाला सतत वाटायचे की तोंडाचे बोळके झालेला हा छातीची हाडे दिसणार फाटका वृद्ध, यास रुबाबदार इंग्रज घाबरतीलच कसे? हा मुसलमानांचा कैवारी, हिंदू धर्मद्रोही आणि राष्ट्रद्रोही, याच्यामागे बहुसंख्य हिंदू जातीलच कसे? याचे उत्तर माहीतच करून घ्यायचे नसल्याने आम्ही त्यावर खूप खूप विनोद करायचो आणि खुदुखुदु हसायचो.

आमचा बालपणीचा तो विनोदी स्वभाव आजही कायम आहे. आजही आम्ही त्या बेंगरूळ, अर्धनग्न म्हाताऱ्याची जाम टिंगल करतो. लेलेंसारख्या काहींना तो अजूनही झपाटतो. त्यांची आम्ही मस्करी करतो. आजच्या संगणकाच्या काळात हा म्हातारा कसा टिकणारच नाही ते सांगतो. हे करीत असताना मात्र आमचे आम्हांलाच आश्चर्य वाटते, की त्या आधुनिक, पाश्चात्त्य देशांना हे कसे कळत नाही? भारतात ज्या फकिराचे नाव म्हणजे टिंगलीचा विषय बनलेले आहे, त्याचे पुतळे उभारून ते सौंदर्यासक्त देश आपल्या चौकांचे, बागांचे सौंदर्य का खराब करीत आहेत?

आता हा प्रश्न खचितच बावळटपणाचा आहे हे आम्ही जाणतो. गांधीजींचे काय चुकले हे सांगण्याची पात्रता ज्या आमच्या अंगात आहे, त्याला एवढी अक्कल नसेल का? आहेच.

पण तो राष्ट्रपिता म्हणजे एक गूढ कोडेच आहे. तो सगळ्यांनाच कोडय़ात पाडतो. भांडवलदारांना तो पर्यावरणाची कोडी घालतो, नगर संस्कृतीवाल्यांना तो मानवी प्रतिष्ठेचे प्रश्न घालतो, उद्योजकांना श्रमप्रतिष्ठेचे काय म्हणून विचारतो आणि सत्यमेव जयते म्हणणाऱ्या संस्कृतीला तुमचे सत्य कोणते असे विचारून भंडावतो.

लेलेंसारख्यांकडे नसेल त्याच्याइतके नैतिक बळ, पण त्यांनाही तो नादी लावतो. हा गांधी कोणालाही कुठेही भेटतो!
विसोबा खेचर – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 2, 2015 1:39 am

Web Title: mohandas karamchand gandhi
Next Stories
1 आत्मसन्मानाचा लढा
2 संस्कृतीच्या नावाखाली उन्मादाची बाजारपेठ!
3 देशोदेशीचा गणेशोत्सव
Just Now!
X