23 February 2019

News Flash

तस्करांच्या रडारवर खवले मांजरं, शार्क आणि कासवं!

एका खवले मांजराच्या खवल्यांना लाखो रुपये मिळत असल्याचे सांगतात.

वन्य जीवांच्या तस्करीमध्ये एके काळी वाघ तसेच हत्ती या प्राण्यांना मोठय़ा प्रमाणात लक्ष्य केले जायचे. त्यासंदर्भातील योजनाबद्ध कारवाईनंतर आता खवले मांजर, कासवांच्या वेगवेगळ्या प्रजाती तसेच शार्क यांची तस्करीसाठी मोठय़ा प्रमाणावर हत्या होत असल्याचे आढळून आले आहे.

महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) तीन सप्टेंबरला मुंबईत काही गोदामांवर छापे घालून शार्क माशांच्या कल्ल्यांचा आठ हजार किलो वजनाचा साठा जप्त केला. सागरी वन्यजीवांच्या अवयवांचा इतका मोठा साठा सापडल्यानंतर वन्यजीवांच्या बेकायदेशीर व्यापाराच्या वाढत्या विस्तारावर चर्चा सुरू झाली. कधीकाळी वन्यजीवांशी संबंधित शिकार आणि व्यापाराचे गुन्हे हे केवळ वाघांभोवतीच केंद्रित झालेले होते. जसे वन पर्यटन म्हणजे वाघ पाहणे तसेच वन्यप्राण्यांची शिकार-व्यापार म्हणजे वाघ, वाघाची कातडी, नखे असेच समजले जायचे. त्यापूर्वी दक्षिण भारतात हस्तिदंताच्या तस्करीने धुमाकूळ घातला होता. पण गेल्या दहा वर्षांत हे चित्र बरेच बदलले आहे. व्याघ्र प्रकल्प, व्याघ्र शीघ्र कृती दल आणि बऱ्याच योजनांमुळे वाघांच्या शिकारीला चांगलाच आळा बसला हे वाघांच्या वाढत्या संख्येमुळे जाणवले. पण त्याच वेळी खवले मांजरं (पँगोलिन), कासवं, शार्क माशांचे कल्ले यांनी ही जागा व्यापली आहे. हे सर्व प्राणी भारतीय वन विभागाच्या वन्यजीव परिशिष्ट एकमध्ये नोंदले असल्याने त्यांची शिकार आणि व्यापार हे पूर्णत: बेकायदेशीर आहे.

आंतरराष्ट्रीय पातळीवर वन्यजीवांच्या तस्करीसंदर्भात काम करणारी ‘ट्रॅफिक’ ही संस्था अनेक देशांमधील वन्यजीव तस्करीची माहिती जमा करत असते. त्यांनी नुकत्याच जाहीर केलेल्या अहवालातून भारतातील खवले मांजरांच्या शिकारीची अतिशय धक्कादायक माहिती मिळते. ‘ट्रॅफिक’ने भारतात झालेल्या खवले मांजरांच्या खवल्यांच्या जप्तीच्या घटनांचा अभ्यास करून २००९ ते २०१७ या काळात भारतात पाच हजार ७७२ खवले मांजरांची शिकार झाली असा अहवाल प्रकाशित केला आहे. ही संख्या केवळ जप्त केलेल्या खवले मांजरांच्या खवल्यांच्या (पाच हजार ७६२ किलो खवले आणि काही जिवंत मांजरं) अभ्यासावर आधारित आहे. याशिवाय यंत्रणांना गुंगारा देऊन देशाबाहेर किती खवले मांजरे पाठवली गेली आहेत याचा ठावठिकाणा नाही. खवले मांजरांच्या खवल्यांच्या पावडरीचा वापर औषधासाठी केला जातो त्यामुळे या खवल्यांना प्रचंड मागणी असल्याचे तज्ज्ञ सांगतात. चीनमध्ये याचा वापर सर्वाधिक केला जात असल्याचे समजते. एका खवले मांजराच्या खवल्यांना लाखो रुपये मिळत असल्याचे सांगतात. हा सर्वच व्यापार बेकायदेशीर असल्याने त्याची खरी आकडेवारी कळत नाही. ‘ट्रॅफिक’ने प्रकाशित केलेल्या अहवालात प्रौढ खवले मांजराच्या खवल्यांचे वजन एक किलो असते असा उल्लेख आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील एका किलोला लाख रुपये ही किंमत गृहीत धरली तर हा मुद्देमाल ५७ कोटींचा ठरतो. आणि यंत्रणांची नजर चुकवून सहीसलामत बाहेर गेलेल्या खवल्यांचे मूल्य माहीतच नाही. इतक्या मोठय़ा प्रमाणात माल पकडला जात आहे त्याअर्थी हा व्यापार अव्याहत सुरूच आहे हेच यातून दिसून येते.

खवले मांजर हे केवळ एक उदाहरण झाले, पण गेल्या काही वर्षांत आपल्या देशात वन्यजीवांच्या तस्करीमध्ये शार्क माशांच्या कल्ल्यांचे आणि कासवांचे प्रमाण वाढल्याचे  लक्षात आले आहे. आणि यामध्ये संघटित गुन्हेगारीचा समावेश आहे. वन्यजीव गुन्हे नियंत्रण विभाग हा यासंदर्भातील महत्त्वाची माहिती गोळा करणे, तिचे विश्लेषण तसंच अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांना संबंधित माहिती देण्याचे काम करतो. वन्यजीवांसदर्भात होणाऱ्या गुन्ह्यंची गोपनीय माहिती जमा करण्यासाठी या विशेष विभागाची स्थापना २००६ मध्ये करण्यात आली. सीमाशुल्क, वनखाते, महसूल गुप्तचर विभाग,  पोलिस आणि स्वयंसेवी संस्था अशा सर्वाशी या ब्युरोचा समन्वय असतो. या ब्युरोचे पश्चिम विभागाचे संचालक एम. मारंको सांगतात, ‘सध्या इतर प्राण्यांसंदर्भातील संघटित गुन्हेगारी कमी झाली असली तरी सागरी वन्यजीवांच्या तस्करीत संघटित गुन्हेगारी दिसून येते. शार्क माशांचे कल्ले, कासवांचा यामध्ये प्रामुख्याने समावेश करता येईल. तसेच खवले मांजरांची तस्करी हादेखील संघटित गुन्हेगारीचाच भाग आहे. पण सध्या वन्यजीव तस्करीचे प्रमाण कमी झाले आहे. वन्यजीव गुन्हे नियंत्रण विभागाने गेल्या काही वर्षांत अशा गुन्ह्यंची उकल केली आहे.’

सोशल मीडियाचा वापर

इतर व्यापारांत जसा ऑनलाइनने शिरकाव केला आहे, तसाच वन्यजीवांच्या अवैध व्यापारात सोशल मीडियाच्या माध्यमातून ऑनलाइन वापर होत असतो. सोशल मीडियावर जाहिरात करून कासवांची विक्री करण्याच्या क्लृप्त्या परदेशातच नाही तर अगदी डोंबिवलीतदेखील घडल्या आहेत. फेसबुकवरून जाहिरात करणे, व्हॉट्सअ‍ॅपवरून माहिती देणे असे प्रकार आपल्याकडे घडायचे. वन्यजीव गुन्हे नियंत्रण विभागाने त्यांचा पाठपुरावा करून त्यावर बराच प्रतिबंध आणला आहे. पण अन्य काही अवैध व्यापारांमध्ये गुप्त संदेशांची देवाणघेवाण होते तशी सोशल मीडियावरदेखील क्लोज ग्रुप वगैरेच्या माध्यमातून होऊन असा व्यापार घडत असल्याची शक्यता आहे.

‘ट्रॅफिक’चा अहवाल जागतिक पातळीवरील वन्यजीवांच्या तस्करीबाबत मार्मिक भाष्य करतो. एकेकाळी वन्यजीव गुन्ह्यंकडे फारसे गांभीर्याने पाहिले जायचे नाही. पण गेल्या काही वर्षांत वन्यजीवांविषयीचे गुन्हे आणि तस्करीमध्ये ज्या प्रकारे संघटितपणा वाढला आहे ते पाहता या व्यवसायाचा अमली पदार्थ, मानवी तस्करी आणि शस्त्रास्त्र तस्करीच्या खालोखाल चौथा क्रमांक लागतो.

आपल्याकडील वन्यजीवांची तस्करी, बेकायदेशीर व्यापार याची विभागणी तीन प्रकारांमध्ये होते. वन्यजीवांची शिकार करणे किंवा जिवंत पकडणे आणि त्यांचे अवयव अथवा जिवंत प्राणी देशाबाहेर नेऊन विकणे हा एक प्रकार झाला. दुसऱ्या प्रकारात जिवंत प्राणी अथवा त्याचे अवयव किंवा त्यापासून तयार केलेले उत्पादन हे देशांतर्गतच विकणे. तर तिसऱ्या प्रकारात परदेशातील वन्यजीवांची बेकायदेशीर आयात करणे. या तिसऱ्या प्रकाराचे अस्तित्व कमी असले तरी त्याला हळूहळू वेग येत आहे.

पहिल्या प्रकारात खवले मांजर, कासवं, शार्क माशाचे कल्ले, गेंडय़ाचे शिंग, हस्तीदंत, वाघांचे अवयव यांचा समावेश होतो. याला दक्षिण पूर्व देशांमध्ये सर्वाधिक मागणी आहे. त्यातही चीन हा या सर्वाच्या मध्यवर्ती आहे. ‘ट्रॅफिक’ने गेल्या नऊ वर्षांतील वन्यजीवांच्या जगभरातील हवाई तस्करीचा अहवाल प्रकाशित केला आहे. या अहवालानुसार या तस्करीत चीन आघाडीवर आहे. चीनमध्येच सर्वाधिक माल जप्त झाला आहे, तर इतर देशांमध्ये जप्त झालेला बहुतांश माल पोहोचवण्याचे शेवटचे ठिकाण हे चीन आहे. चीनबरोबरच व्हिएतनाम, मलेशिया हेदेखील या व्यापारात आघाडीवर आहेत. भारत यामध्ये सातव्या क्रमांकावर आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावरील ही तस्करी म्हणजे संघटित गुन्हेगारीच असते. नुकत्याच सापडलेल्या शार्क माशांच्या कल्ल्यांचे उदाहरण घेता येईल. असे कल्ले काही एका दिवसात जमा होत नाहीत. अनेक दिवसांपासून, अनेकांकडून, वेगवेगळ्या ठिकाणांहून ते गोळा केले जातात आणि साठवले जातात. त्यासाठी विशिष्ट पद्धतीची संपर्कयंत्रणा लागते, ती या लोकांकडे असल्याचे लक्षात येते. शार्क माशांच्या कल्ल्यांच्या अशाच दोन घटना गेल्या तीन-चार वर्षांत या विभागाने हाताळल्या आहेत. वन्यजीवांशी संबंधित कोणत्याही आयातीमध्ये या विभागाकडून परवानगी आवश्यक असते. बऱ्याच वेळा सागरी वन्यजीवांच्या आयातीत वरच्या बाजूला दुसरे मासे आणि आतमध्ये शार्क माशांचे कल्ले असा प्रकार आढळून आल्याचे एम. मारंको सांगतात. जेएनपीटी येथून सी हॉर्सच्या ३२ बॅगांच्या आत खोक्यामध्ये बांधलेले शार्क माशांचे कल्ले सापडले होते. याची किंमत जवळपास २८ हजार डॉलर्स इतकी होती. तर विलेपाल्रे येथील परदेशातील टपालाचे नियमन करणाऱ्या कार्यालयामध्ये आलेल्या पोत्यांमध्ये सी हॉर्सबरोबर ८५ किलो वजनाचे शार्कचे कल्ले दडवण्यात आले होते.

कासवांच्या बाबतीत हा व्यापार सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय अशा दोन्ही पातळ्यांवर चालतो. फिश टँकसाठी तसंच खाण्यासाठी यांचा वापर केला जातो. वन्यजीव गुन्हे नियंत्रण विभागाने दिलेल्या माहितीतून कासवांच्या तस्करीचे जाळे देशभरात पसरल्याचे लक्षात येते. या विभागाला मिळालेल्या माहितीनुसार बिहारमधील उन्नावमध्ये एक विक्रेता कासवांची विक्री, तस्करी करत होता. त्याचा पाठपुरावा केला असता विभागाला चेन्नईमधील व्यक्तीची माहिती मिळाली. चेन्नईमधील त्या व्यक्तीने या सगळ्याचा सूत्रधार उन्नावमध्येच असल्याचे सांगितले. उन्नावमधील सूत्रधारास पकडल्यानंतर त्याने दिलेल्या माहितीतून कर्नाटकातील बालगोवंडनहल्ली या गावात मुख्य सूत्रधार सापडला. मागील आठवडय़ातदेखील ५२३ कासवांची तस्करी पकडण्यात आली आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस येथे एका महिलेकडे ही कासवं सापडली. या कासवांचे मूळ कळले नसले तरी ते आंध्र प्रदेश किंवा कर्नाटक हे असल्याचा अंदाज आहे. हवाई तस्करीत अनेक क्लृप्त्या वापरल्या जातात. पायमोज्यांमध्ये कासवं भरून नेली जातात. एका व्यक्तीने तर  हगीजमध्ये कासवं गुंडाळली होती, जेणेकरून त्या कासवांनी मलमूत्र विसर्जन केले तरी काही कळले नसते. असे असले तरी हल्ली हवाई तस्करीमध्ये बरीच घट झाल्याचे एम मांरको सांगतात. पण ‘ट्रॅफिक’च्या अहवालानुसार २०१५ मध्ये इंडियन स्टार टॉर्टाइज आणि ब्लॅक पॉण्ड टॉर्टाइजची तस्करी एकूण २७ वेळा पकडण्यात आली. पण २०१७ मध्ये हवाई वाहतूक सोडता इतर ठिकाणी कासवं सापडली आहेत. म्हणजेच गुन्हेगारांनी मार्ग बदलला असण्याची शक्यता आहे.

अंधश्रद्धेचे बळी

देशांतर्गत वन्यजीवांच्या अवैध व्यापारात अंधश्रद्धा हा आणखीन एक मोठा घटक आहे. संपत्तीचा लाभ, पशाचा पाऊस, पुत्रप्राप्ती वगैरे गोष्टींमुळे काही वन्यजीवांना धोका पोहोचतो. घुबड हे त्यापैकीच एक. त्याचा बळी दिल्याने लक्ष्मी प्राप्त होते अशी समजूत असल्याने घुबड पकडणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. कासवांचा वापरदेखील धनप्राप्तीसाठी होतो. भाऊ काटदरे कासवांच्या संवर्धनात होते तेव्हा त्यांच्याकडे कासवांची मागणी आली होती. २१ नखे असलेले आणि पांढऱ्या पोटाचे कासव असेल तर लाखभर रुपये देण्याची तयारी खरेदीदाराने दाखवली होती. या कासवाच्या मदतीने पूजापाठ केल्यास घरात पशाचा पाऊस पडतो अशी त्या खरेदीदाराची समजूत होती.

वन्यजीवांच्या बाबतीत देशभर पसरलेली अशी आणखीनही नेटवर्क असण्याची शक्यता या क्षेत्रात काम करणारे तज्ज्ञ व्यक्त करतात. खवले मांजरांचे उदाहरण ताजेच आहे. ‘ट्रॅफिक’च्या अहवालात एक मुद्दा अधोरेखित होतो तो म्हणजे यापूर्वीची खवले मांजरांची तस्करी पूर्वोत्तर राज्यांमध्ये अधिक होती. किंबहुना आठ वर्षांत जेवढे खवले जप्त केले गेले आहेत, त्यात मणीपूरचा वाटा ३६ टक्के आहे. आणि २०१४ नंतर तेथे खवले पकडल्याच्या एकाही घटनेची नोंद नाही. त्याचे कारण तेथील खवले मांजरांची घटलेली संख्या. त्यामुळे देशातील इतर ठिकाणच्या खवले मांजरांकडे या तस्करांचे लक्ष वळल्याचे दिसून येते. चिपळूण येथील ‘सह्य़ाद्री निसर्गमित्र’ ही संस्था गेल्या दोन वर्षांपासून खवले मांजरांच्या संरक्षण- संवर्धनाच्या क्षेत्रात काम करत आहे. संस्थेने यापूर्वी ऑलिव्ह रिडले कासवांच्या घरटय़ांच्या संरक्षणासाठी भरपूर काम केले आहे. संस्थेचे भाऊ काटदरे सांगतात की, कोकणात अलीकडे खवले मांजरांचे खवले बाळगणाऱ्यांना पकडल्याच्या घटना घडल्या आहेत. यासंदर्भात त्या गावांमध्ये जाऊन चौकशी केली. खवल्यांची मागणी करणारे लोक घाटावरून कराड, सांगली, कोल्हापूर येथून येतात. भंगारवाला, कपडे विक्री करणारा अशा स्वरूपात ते गावांमधून भटकतात. तेथील कातकरी लोकांकडून मांजराची माहिती घेतात आणि खवले मांजर पकडण्यासाठी त्यांना चांगले पैसे देतात. पण आजवर खवले विकत घेणारा सापडलेला नाही, तर कातकरीच खवल्यांसहित सापडले आहेत.

खवले मांजरांबाबत एका दुर्लक्षित गोष्टीकडे यानिमित्ताने लक्ष पुरवणे गरजेचे असल्याचे भाऊ काटदरे सांगतात. ती म्हणजे खवले मांजरांचा अभ्यास. मुळातच आपल्याकडे वन्यजीवांमध्ये मोठय़ा प्राण्यांचाच अधिक अभ्यास झाला आहे. त्यामुळे खवले मांजरांसारख्या प्राण्याचा ठोस डेटाबेसच उपलब्ध नाही. त्यामुळे त्यांची संख्या किती आहे हे माहीत नाही. ‘ट्रॅफिक’चा अहवालदेखील याच मुद्दय़ावर भर देतो. भारतातील खवले मांजरांची संख्या माहीत नसल्यामुळे इतक्या मोठय़ा तस्करीचा वन्यजीवनावर नेमका काय परिणाम होतो हे सांगणे कठीण असल्याचे हा अहवाल नमूद करतो. हीच बाब शार्क माशांनादेखील लागू होते. शार्क माशांचे कल्ले सापडले याचा अर्थच तेवढे शार्क मासे मृत झाले. पण आपल्याकडे किती शार्क आहेत हेच ठाऊक नाही. वन्यजीवांबाबतची उदासीनताच यातून दिसून येते. ‘सह्य़ाद्री निसर्गमित्र’ संस्थेने गुहागर आणि चिपळूण या दोन तालुक्यांत खवले मांजरांच्या अधिवासांचा अभ्यास करण्यासाठी ३० कॅमेरा ट्रॅप लावले आहेत. दोन महिन्यांत यामध्ये १५ वेळा खवले मांजरांचे अस्तित्व दिसून आले आहे. हे निरीक्षण केवळ दोन तालुक्यांपुरतेच आहे. अशाच नोंदी इतर ठिकाणी होण्याची गरज आहे.

आपल्या देशातून होणारी अन्य वन्यजीव तस्करी म्हणजे गेंडय़ांचे शिंग आणि हस्तीदंत. गेंडय़ांच्या शिंगांच्या तस्करीत भारताचा वाटा बराच आहे. २०१३ या एकाच वर्षांत भारतात ४१ गेंडय़ांची शिकार झाली होती. पण ‘ट्रॅफिक’च्या अहवालानुसार २००९ ते २०१७ या काळात गेंडय़ांच्या शिंगांची तस्करी पकडल्याची एकही घटना नोंदवलेली नाही. आपल्याकडचा एकशिंगी गेंडा हा उत्तर पूर्व राज्यांमध्ये आढळतो. येथे शिकारीच्या घटना बऱ्याच आहेत. पण येथून गेंडय़ाची शिंगे म्यानमार, नेपाळ किंवा चीनमध्ये नेले जात असल्याचे हा अहवाल नमूद करतो.

आंतरराष्ट्रीय तस्करीबरोबरच वन्यजीवांचा बेकायदेशीर व्यापार देशांतर्गत पातळीवर सुरू असतो. त्यामध्ये पक्षी, माकडं, घोरपड, अस्वल, घुबड, नाग आणि कासव यांचा समावेश होतो. यांच्यासंबधीचा बेकायदेशीर व्यापार मुख्यत: शहरांमध्ये दिसून येतो. गारुडी, मदारी यांचे खेळ, ठिकठिकाणच्या संस्थानांचे पाळीव हत्ती हे सर्व बेकायदेशीर असते, पण ते केले जाते. करमणुकीसाठी किंवा सादरीकरणासाठी प्राण्यांचा वापर अशा प्रकारात मोडतात. अशा ठिकाणी स्वयंसेवी संस्थांचा सहभाग असेल तर त्या व्यापाराला प्रतिबंध घालता येऊ शकतो. मुंबई आणि परिसरात ‘प्लान्ट अ‍ॅण्ड अ‍ॅनिमल वेल्फेअर सोसायटी-पॉज’ ही स्वयंसेवी संस्था अशा घटनांमध्ये कार्यरत आहे. या संस्थेने नाग, अस्वल, पक्षी अशा अनेक प्राण्यांची वन खात्याच्या माध्यमातून सुटका केली आहे. त्यांनी २००५ मध्ये नागपंचमीच्या दिवशी वन खात्याच्या सोबत प्रत्येक शिवमंदिराच्या परिसरात जाऊन गारुडय़ांकडून साप जमा केले. त्यानंतरही दोन वर्षे ते काम केल्यानंतर आज गारुडय़ांचे प्रमाण कमी झाले आहे.

नागांच्या बाबतीत आणखीन एक घटना यापूर्वी उघडकीस आली होती. मुंबईत नागपंचमीला येणारे गारुडी मुंबईहून परत जाताना हे नाग व्यापाऱ्यांना विकत. मग त्या नागांपासून तयार केलेल्या पर्स वगैरे कुलाबा कॉजवेला विकल्या जायच्या. राज्याचे सध्याचे अप्पर प्रधान वनसंरक्षक नितीन काकोडकर त्या वेळी ठाण्याचे उपवनसंरक्षक म्हणून कार्यरत होते तेव्हा त्यांनी अनेक सर्पमित्रांच्या साहाय्याने या गारुडय़ांच्या नागविक्रीला आळा घातला होता. नागपंचमीच्या आधी हे गारुडी कल्याण, उल्हासनगर परिसरात बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत राहायचे. पण वन खात्याने कल्याण स्थानकातच अनेकांना अटक केली. १९९६ ते १९९८ अशी सलग तीन वर्षे ही कारवाई सुरू होती. त्यामुळे नंतरच्या काळात या विक्रीला आळा बसू शकला.

नियम आणि सुविधांतील त्रुटी

कायद्यात सुधारणा होत असतात, पण त्यासाठी एखादी घटनाच घडायची वाट पाहण्याची गरज नसते. अन्यथा त्याचा फटका पर्यावरणाला कसा बसतो त्याचं उदाहरण वन्यजीवांच्या बाबतीत देता येते. भारतीय पाकोळी ही एकेकाळी वन्यजीवांच्या प्रतिबंधित परिशिष्टात नव्हती. २००१ मध्ये ‘सह्य़ाद्री निसर्गमित्र’ या संस्थेचे भाऊ काटदरे व अन्य सदस्य वेंगुर्ला रॉक्स येथील बन्र्ट आयलंडजवळ पक्षी निरीक्षणासाठी गेले होते. तेथे बांबूच्या परांती लावल्याचे दिसून आले. अधिक माहिती घेतल्यावर लक्षात आले की येथे हजारो पाकोळ्यांची घरटी आहेत. आणि तेथे बांबू लावून त्यावर चढून ही घरटी काढून त्याची तस्करी केली जात आहे. यानंतर वनखाते आणि पोलिसांनी या घरटे चोरणाऱ्यांना पकडले. पण हा भाग वन खात्याच्या अखत्यारीत नव्हता, ना ती पाकोळी वन्यजीव कायद्याच्या परिशिष्टात समाविष्ट होती. पण ही पाकोळींची घरटी मलेशिया, हाँगकाँग येथे समुद्रमार्गे पाठवली जायची. त्या घरटय़ाच्या सूपमुळे लैंगिक शक्ती वाढते असा समज आहे. त्यामुळे भरपूर पैसे घेऊन ती विकली जायची. या पाकोळ्यांमुळे वेंगुर्ला येथे वर्षांला ५० लाख रुपयांचा व्यापार होत असे. पण कोणालाच त्याची खबर नव्हती. यानंतर ही पाकोळी वन्यजीव परिशिष्टामध्ये समाविष्ट करण्यात आली. नंतरच्या वर्षांत तेथील पाकोळ्यांच्या संख्येमध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून आले. सध्या साइट्सची यादी आणि आपल्या यादीतील फरक याकडे म्हणूनच गांभीर्याने पाहावे लागेल.

वन्यजीवांची तस्करी पकडल्यानंतर सर्वात महत्त्वाचा मुद्दा असतो तो म्हणजे सुटका केलेले वन्यजीव कुठे ठेवायचे. राज्यात केवळ तीनच केंद्रं त्यासाठी उपलब्ध आहेत. त्यामुळे कधी कधी एखाद्या रिसॉर्ट वगैरे ठिकाणी परदेशी वन्यजीव असेल तर त्याची सुटका करून पुन्हा तेथेच ठेवला जातो. असे प्रकार आपल्याकडे घडले आहेत. कारण ते सांभाळण्याची खात्याकडे सुविधा नसते. सध्या ज्या प्रकारे वन्यजीव गुन्ह्य़ांचे स्वरूप बदलेले आहे ते पाहता त्या दृष्टीने बदल करणे गरजेचे आहे.

शहरात आढळणाऱ्या वन्यजीव व्यापारातील काही बाबी केवळ कायद्याची माहिती नाही यामुळेदेखील होताना दिसतात. अनेक पक्षी, कासवं ही वन्यजीव कायद्याच्या प्रतिबंधित परिशिष्टात मोडतात. त्यांची शिकार करणे, त्यांचा व्यापार, त्यांना पाळणे हे बेकायदेशीर असते. कासवं आणि पक्षी यांच्याबाबत हे थेटच लागू होते. अनेक जण फिश टँकमध्ये पाळण्यासाठी तीन-चार हजार रुपयांना कासव आणतात. पोपट पाळणे हे तर आपल्याकडे पूर्वापार चालत आले आहे. पण या बाबी बेकायदेशीर आहेत याची जाणीव अनेकांना नसते आणि असली तरी अनेकजण पैसे मिळवण्याचे साधन म्हणून त्याचा वापर करतात. ‘पॉज’चे नीलेश भणगे सांगतात की, वनखात्याने अशा गोष्टी पकडल्या की अशा वेळी अनेक जण हे पक्षी, कासव आमच्याकडे आणून देतात. आणि आम्ही मग ते पुण्याच्या बचाव व पुनर्वसन केंद्रात नेऊन देतो.

स्थानिक पातळीवर होणाऱ्या या घटनांबाबत एक महत्त्वाची बाब लक्षात घ्यावी लागेल. मदारी, गारुडी या लोकांचा हा पूर्वापार व्यवसाय असतो. त्यांच्या पुनर्वसनाची योग्य  तरतूद नसेल तर हे लोक तो व्यवसाय पूर्णपणे सोडत नाहीत असे नीलेश भणगे नमूद करतात. पण पक्षी विकणारे, कासवांची विक्री करणारे हे व्यापारी, तस्करीशी संबधित असतात. बऱ्याच वेळा त्यांच्यावर कारवाई होते, पण सूत्रधार सापडत नाही.

स्थानिक पातळीवरील हा व्यापार, तस्करी मर्यादित स्वरूपातील असली तरी त्यामुळे पर्यावरणाला धोका असतोच. त्यामुळे ती किरकोळ म्हणून सोडून देता येणार नाही.

वन्यजीव तस्करीचा तिसरा प्रकार म्हणजे अन्य देशांतून भारतात आणले जाणारे वन्यजीव. हा प्रकार हल्ली जोर पकडू लागला आहे. यामध्ये पक्ष्यांबरोबरच, अन्य काही प्राणी येत असल्याचा संभव पर्यावरणप्रेमी व्यक्त करतात. यामागचे सोपे कारण म्हणजे आज आपल्या देशातील लोकांकडेदेखील अशा बाबींसाठी पसा खुळखुळतो आहे. केवळ शौक म्हणून, शोपीस म्हणून अशा गोष्टी बाळगणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यांची अधिकृत आकडेवारी उपलब्ध नाही, पण या तस्करीचे अस्तित्व आहे हे नक्की. अलीकडील काळातील केरळच्या महापुरानंतर त्या भागात गेलेल्या वन्यजीवतज्ज्ञांना तेथे अमेझॉनमधील माशांच्या काही प्रजाती आढळून आल्या. याचा अर्थच कधी तरी त्यांची तेथे विक्री झाली असणार हे नक्की.

अशी होते खवल्या मांजरांची शिकार

खवले मांजरांच्या घटना गेल्या काही दिवसात कोकणात आढळून आल्या आहेत. चिपळूण आणि परिसरात यासंदर्भात काम करणारे ‘सह्य़ाद्री निसर्गमित्र’ या संस्थेचे भाऊ काटदरे सांगतात की, घाटावरून येणारे काही खरेदीदार या खवले मांजरांची मागणी कातकऱ्यांकडे करतात. कातकरी लोकांना खवले मांजरांची ठिकाणं माहीत असतात. मुळात खवले मांजर हा भित्रा प्राणी आहे. त्यामुळेच त्याला संरक्षणासाठी खवले दिलेले आहेत. धोक्याची जाणीव झाली की ते शरीर आक्रसून घेते आणि खवल्यांचा एक गोल चेंडूच तयार होतो. हे खवले अतिशय मजबूत असतात. ती चेंडूची रचना जोपर्यंत मांजराला स्वत:ला सुरक्षित वाटत नाही तोपर्यंत तशीच राहते. ती सोडवणे अतिशय कठीण काम असते. यांची बिळे डोंगर पायथ्याला दोनएक मीटर लांब असतात. अशा बिळांचा शोध लागतो तेव्हा चार-पाच लोक त्या बिळाच्या वरून आणि बाजूने माती उकरतात. त्यामुळे ते बीळ रुंद होते. मग शेवटच्या टप्प्यात एक माणूस त्या जागेतून बिळात शिरून खवल्या मांजराचा तो चेंडू पकडतो. खरेदी करणाऱ्यास मांजर नको असते. त्यांना फक्त खवलेच हवे असतात. पण मांजर चेंडूची रचना सोडत नाही. त्यामुळे मग मांजराचा हा चेंडू एकतर आगीमध्ये टाकला किंवा मग उकळत्या पाण्यात बुडवला जातो. मेलेल्या मांजराचे मांस खाण्यासाठी वापरून कल्ले खरेदीदारास दिले जातात. ‘सह्य़ाद्री निसर्गमित्र’ सध्या या कातकऱ्यांच्या प्रबोधनाचे काम करतात. जेणेकरून त्यांनी हे उद्योग बंद करावेत.

परदेशी प्राणी, पक्षी पकडले जातात तेव्हा त्यांच्यावर काय कारवाई करायची हा प्रश्न काही वेळा वन खात्यासमोर उभा राहतो. कारण हे परदेशी वन्यजीव आपल्याकडे ज्यांची तस्करी अवैध मानली जाते, अशा प्राण्यांच्या यादीत नसतील तर ही कारवाई करणाऱ्यांवर कारवाई करणे कठीण असते. जगभरात होणारी वन्यजीवांची तस्करी तसंच व्यापार धोक्याच्या पातळीवर पोहोचला आहे. त्याला आळा घालण्यासाठी वेगवेगळ्या देशांनी एकत्र येऊन वन्यजीवांची यादी तयार केली आहे. या यादीतील वन्यजीवाची तस्करी होते आहे असे आढळले तर ती करणाऱ्यावर कारवाई करता यावी यासाठी ही यादी (CITES) करण्यात आली आहे. पण त्या देशाच्या वन्यजीव यादीत नोंद नसलेला वन्यजीव तस्करीत सापडला तर मग पकडलेला माल पुन्हा त्या देशी पाठवण्याची तरतूद आहे. पण यंत्रणांची नजर चुकवून एखादा वन्यजीव आपल्या देशात आणला गेला असेल तर त्याचे काय करायचे याची तरतूद आपल्या देशाच्या वन्यजीव कायद्यात नाही. वन्यजीवतज्ज्ञ केदार भिडे सांगतात, ‘यासाठीच आपल्याकडे परदेशी वन्यजीवांची नोंद असायला हवी. तसेच हे वन्यजीव पकडल्यानंतर आपण आपल्या पर्यावरणात सोडत असू तर त्यांच्या शरीरात आरएफआयडी चिप बसवावी लागेल. जेणेकरून त्यांचा माग ठेवता येईल. आपल्या पर्यावरणाबाहेरील वन्यजीव आपल्या पर्यावरणात सोडण्याचे परिणामही अभ्यासता येतील. पण सध्या तरी अशी काही यंत्रणा उपलब्ध नाही. त्यामुळे आपल्या पर्यावरणाला धोकादायक असा रिटीक्युलेटेड पायथॉन मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात आला. तो केवळ अंदमान आणि पूर्वेकडील देशांमध्ये सापडतो. पण तो आपण येथील पर्यावरणात सोडला.’ अशा प्रकारे बाहेरच्या पर्यावरणातील वन्यजीव आपल्या पर्यावरणात सोडणे हे आपल्या पर्यावरणाशी खेळण्यासारखेच आहे. आपल्याकडील शिकारी, तस्करी रोखण्याबरोबरच या मुद्दय़ाचादेखील विचार करायला हवा.

आपल्याकडील वन्यजीवांच्या व्यापार तस्करीचा ही परिस्थिती आहे. यात अजूनही अनेक छोटय़ामोठय़ा गोष्टींचा समावेश होतो. हा तसा चच्रेत नसलेला विषय. किंबहुना त्यामुळेच तपास यंत्रणांच्या रडारवर नसलेलादेखील. पण त्याचबरोबर अनेक पातळ्यांवर विस्तारत जागतिक स्तरावर हातपाय याने पसरले आहेत. याची पाळमुळं अजून फारशी खणता आलेली नाहीत. आपल्याकडची माहिती ही केवळ जप्त केलेल्या मुद्देमालापुरतीच मर्यादित असते. न सापडलेला मुद्देमाल किती हे आपण सांगू शकत नाही. आणि सापडतात ते केवळ मुद्देमाल घेऊन जाणारे वाहक आणि शिकारीच. काही मोजके अपवाद सोडता मूळ सूत्रधारांपर्यंत पोहोचण्याची उदाहरणं नाहीतच. म्हणूनच याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. अन्यथा मागील आठवडय़ात सापडलेल्या शार्क माशांच्या आठ हजार किलो सुळ्यांप्रमाणे एखादा दुसराच प्राणी सापडायचा.

छायाचित्र सौजन्य :

वन्यजीव गुन्हे नियंत्रण विभाग, सह्य़ाद्री निसर्ग मित्र, चिपळूण

First Published on September 14, 2018 1:01 am

Web Title: pangolin sharks and turtle on the radars of smugglers