देशात सर्वात कमी रुग्ण व मृत्यूही; केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती

भारतात करोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण जगभरात सर्वात कमी असून ते ३.३ टक्कय़ांवरून २.८७ टक्कय़ांवर आलेले आहे, तर जगभरात मृत्यूचे सरासरी प्रमाण ६.४ टक्के आहे. रुग्णांचे प्रमाणही अन्य देशांच्या तुलनेत भारतात कमी आहे. जगभरात एक लाख लोकांमध्ये करोनाचे ६९.९ रुग्ण आहेत, तर भारतात केवळ १०.७ रुग्ण आढळले आहेत. देशातील एक लाखामागे मृत्यूचे प्रमाण ०.३, तर जगभरात ४.४ असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य सहसचिव लव अगरवाल यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

देशातील करोना रुग्णांची संख्या १ लाख ४५ हजार ३८० झाली असून मृत रुग्णांची संख्या ४,१६७ वर पोहोचली आहे. गेल्या २४ तासांमध्ये ६,५३५ नव्या रुग्णांची भर पडली आहे. सलग पाचव्या दिवशी रुग्णसंख्या सहा हजारांहून अधिक आहे. आत्तापर्यंत ६०,४९१ रुग्ण बरे झाले आहेत. रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण सातत्याने वाढत असून ते मार्चमध्ये ७.१ टक्के होते, तर आता ते ४१.६ टक्कय़ांवर पोहोचले असल्याचेही अगरवाल यांनी सांगितले.

प्रमाण आश्चर्यकारकरीत्या कमी!

भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेचे महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतामध्ये करोना रुग्ण दगावण्याचे प्रमाण आश्चर्यकारकरीत्या कमी आहे. त्यासाठी वेगवेगळी कारणे दिली जात असली, तरी त्याबाबत निष्कर्ष काढता येत नाही.

बीसीजी लस, प्रतिकारशक्ती अधिक असणे वगैरे अनेक मुद्दे सांगितले जात आहेत. पण हे निव्वळ अंदाजच आहेत. मात्र, खूप आधीपासून करोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यावर भर देण्यात आला. रुग्णांना वैद्यकीय सुविधा पुरवण्यात आल्या. या प्रतिबंधात्मक उपायांमुळेही भारतात मृत्यूचे प्रमाण कमी असल्याचे मत अगरवाल यांनी व्यक्त केले. करोनाची साथ आटोक्यात आल्याचेही केंद्राचे म्हणणे नाही, असेही अगरवाल म्हणाले.

वेगवेगळ्या औषधांचा वापर

करोनाच्या रुग्णांवर कोणती औषधे परिणामकारक ठरू शकतील हे निश्चित सांगता येत नाही. प्रॉफिलेक्सिस, क्लोरोक्विन वा हायड्रोक्सिक्लोरोक्विन (एचसीक्यू) ही औषधे मलेरियावर उपचार करण्यासाठी शंभर वर्षांपासून घेतली जात आहेत. त्यामुळे ती सुरक्षित मानली जातात. एचसीक्यू हे विषाणूविरोधी असल्याचे आढळले आहे. त्याचा रुग्णांना उपयोग होत असल्याचेही दिसले आहे, असे भार्गव यांनी सांगितले.

केंद्राला ग्रामीण भागांची चिंता

गेल्या तीन आठवडय़ांपासून स्थलांतरित मजूर प्रामुख्याने उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, छत्तीसगड आणि मध्यप्रदेश या पाच राज्यांमध्ये परतले आहेत. त्यामुळे या राज्यांमध्ये करोनाच्या रुग्णांमध्ये वेगाने वाढ होत असून, ही परिस्थिती आटोक्यात कशी आणायची हा प्रश्न केंद्र सरकारपुढे आहे. आतापर्यंत महाराष्ट्र, तमिळनाडू, गुजरात या विकसित आणि शहरी राज्यांमध्ये करोनाचे रुग्ण वाढत असल्याने केंद्राने तिथे वैद्यकीय पथके पाठवली होती. आता लक्ष ग्रामीण राज्यांकडे वळवण्यात आले आहे. या संदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी पाचही राज्यांचे मुख्य सचिव व आरोग्य सचिव यांच्यासोबत सविस्तर बैठक घेतली. यावेळी करोना रुग्णांना वैद्यकीय सुविधा वाढवण्याचे आदेश देण्यात आले.