जगभरात थैमान घालत असलेल्या जीवघेण्या करोना विषाणूचा प्रादुर्भाव देशात अद्यापही दिवसेंदिवस वाढतच आहे. राजधानी दिल्लीत उपराज्यपाल अनिल बैजल यांच्या कार्यालयातील १३ जण करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. मंगळवारी सकाळी ही माहिती समोर आली. दिल्लीतील करोनाबाधितांची संख्येने २० हजारांचा टप्पा ओलांडला आहे.

दिल्लीत सोमवारी चार दिवसानंतर एक हजारांपेक्षा कमी करोनाबाधित रुग्ण आढळले होते. त्या अगोदर २८ ते ३१ मे दरम्यान सलग हजार पेक्षा अधिक करोनाबाधित रुग्णांची दिल्लीत नोंद झाली होती. तर १ जून रोजी ९९० रुग्ण आढळले होते. दिल्लीतील करोनाबाधितांची संख्या २० हजार ८३४ वर पोहचली आहे. तर आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ५२३ झाली आहे.

तर, देशातील करोनाचे रुग्ण सलग तिसऱ्या दिवशी आठ हजारांहून अधिक संख्येने वाढले आहेत. गेल्या चोवीस तासांमध्ये देशभरात ८ हजार१७१ रुग्णांची नोंद झाल्याने, देशातील एकूण करोना रुग्णांची संख्या १ लाख ९७ हजार ५८१ वर पोहोचली आहे. करोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेल्या दहा देशांमध्ये भारत सातव्या क्रमांकावर आहे. करोनाबाधितांच्या संख्येत आठवडय़ापूर्वी भारत नवव्या क्रमांकावर होता. मात्र आता देशातील रुग्णांची संख्या फ्रान्समधील रुग्णांपेक्षा जास्त झाली आहे.