देशातील करोना संसर्गाचा दिवसेंदिवस उद्रेक होताना दिसत आहे. दररोज लाखांच्या संख्येत नवीन करोनाबाधित आढळून येत आहे. तर, रूग्णांच्या मृत्यू संख्येतही मोठी वाढ सुरू आहे.परिणामी आरोग्य यंत्रणा कोलमडत असल्याचे चित्र आहे. अनेक राज्यांमधील रूग्णालयांमध्ये ऑक्सिजनसह व्हेंटिलेटर, बेड, इंजेक्शन, लस आदींचा मोठ्याप्रमाणावर तुटवडा निर्माण झाल्याचे समोर येत आहे. तर, गंभीर बाब म्हणजे ऑक्सिजन अभवी रूग्णांचे मृत्यू देखील होत आहे. याच पार्श्वभूमीवर आंध्रप्रदेशमधील अनंतपूर येथील एका सरकारी कोविड रूग्णालयात शनिवारी १४ रूग्णांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. ऑक्सिजन अभवी रूग्णांचा मृत्यू झाला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. मात्र, हा आरोप फेटाळत रूग्णांचे मृत्यू ऑक्सिजन तुटवड्यामुळे झाले नसल्याचं जिल्हा प्रशासनाने म्हटलं आहे.

ही घटना समोर आल्यानंतर सह जिल्हाधिकाऱ्यांनी रूग्णालयास भेट देऊन, ऑक्सिजन पुरवठ्याची प्रत्यक्ष पाहणी केली. ज्यांनी ऑक्सिजन पुरवठ्याबाबत अफवा पसरवणाऱ्यांबद्दल चौकशी सुरू करण्यात आली आहे.

तसेच, त्यांनी सांगितले की, आमच्या पथकाने ऑक्सिजन प्लॅन्टची पाहणी केली आहे. आम्ही वॉर्डात जाऊन प्रत्येक लाईन आणि वॉल्वची तपासणी केली. तिथं कुठल्याही प्रकराची गळती नाही. ऑक्सिजन प्लॅन्टचा दाब देखील योग्य प्रमाणात आहे. पुरवठ्यामध्ये कोणतीही अडचण नाही. ऑक्सिजनचा योग्यप्रकारे वापर सुरू आहे.

दरम्यान, काल दिल्लीत  देखील अशीच एक धक्कादायक घटना घडली, येथील बत्रा हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन अभावी एका डॉक्टरसह आठ रूग्णांचा मृत्यू झाल्याचे समोर आले.

धक्कादायक : दिल्लीत ऑक्सिजन अभावी एका डॉक्टरसह आठ रूग्णांचा मृत्यू

दिल्ली उच्च न्यायालयात बत्रा हास्पिटलकडून याबाबत माहिती देताना सांगण्यात आलं होतं की, ”रूग्णालयात सध्या ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा असून, तासभरापेक्षा जास्त काळ ऑक्सिजन पुरवठा होत नाही. यामुळे एका डॉक्टरसह आठ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. आम्हाला वेळेत ऑक्सिजन मिळत नाही. आमच्याकडे दुपारी १२ वाजता ऑक्सिजन संपला होता. त्यानंतर आम्हाला दीड वाजता ऑक्सिजन मिळाला. परिणामी आम्ही आमच्या एका डॉक्टरसह रूग्णांचा मृत्यू झाला.”