१९९३ मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी अहमद मोहम्मद लंबूला अटक करण्यात आली आहे. गुजरात एटीएसने धारिया येथून त्याला अटक केली असल्याचं वृत्त एएनआयने दिलं आहे. मोहम्मद लंबू हा अर्जून गँगमध्ये सहभागी होता. त्याच्याविरोधात वॉरंट आणि रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली होती. गुजरात एटीएस लवकरच त्याला मुंबई सीबीआयच्या हवाली करणार आहे. दोनच महिन्यापुर्वी १९९३ बॉम्बस्फोटातील वॉण्टेड आरोपी आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा साथीदार मोहम्मद फारुख याचं संयुक्त अरब अमिराती येथून भारतात प्रत्यार्पण करण्यात आलं होतं. त्यानंतर लगेचच ही कारवाई करण्यात आल्याने अंडरवर्ल्डला मोठा धक्का बसला आहे.

५७ वर्षीय फारुख ज्याला फारुख टकला म्हणूनही ओळखलं जातं त्याला विशेष न्यायालयाने १० दिवसांची कोठडी सुनावली होती. १९९३ मुंबई साखळी बॉम्बस्फोटप्रकरणी एकूण १०६ जणांवर आरोप सिद्ध झाले असून ३८ जणांना जन्मठेपेची तर दोघांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आरोपींच्या यादीत आता मोहम्मद लंबूच्याही नावाचा समावेश झाला आहे.

याआधी एप्रिल महिन्यात ताहिर मर्चंट उर्फ ताहिर टकला याला न्यायालायने मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली होती. मात्र त्याआधीच पुण्यातील रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला होता. छातीत दुखू लागल्याने त्याला रुग्णालयात भर्ती करण्यात आलं होतं अशी माहिती कारागृह प्रशासनाने दिली होती.