News Flash

“इथे विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी पैसा नाही आणि सरकारने करदात्यांचे ८४५८ कोटी रुपये विमानावर खर्च केले”

मोदी सरकारच्या ‘एअर इंडिया वन’च्या खरेदीच्या निर्णयावरुन टीका

प्रातिनिधिक फोटो

‘एअर इंडिया वन’च्या दोन व्हीव्हीआयपी विमानांपैकी पहिले विमान भारतात दाखल होणार असल्याचे वृत्त गुरुवारी एएनआयच्या हवाल्याने समोर आले. खास राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्यासाठी हे विमान भारत सरकारने खरेदी केलं आहे. देशातील अती महत्वाच्या व्यक्तींसाठी खास ‘द स्पेशल एक्स्ट्रा सेक्शन फ्लाइट’ दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल होईल, असे सरकारमधील सूत्रांनी एएनआयला सांगितले. मात्र यावरुनच आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व खासदार जयराम रमेश यांनी सरकारचा प्राधान्य क्रम चुकत असल्याचा टोला लगावला आहे. या बातमीची लिंक शेअर करत जयराम रमेश यांनी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीच्या मुद्द्यावरुन मोदी सरकारवर टीका केली आहे.

“करदात्यांचे ८४५८ कोटी रुपये पंतप्रधान आणि दोन महत्वाच्या व्यक्तींसाठी विमान घेण्यासाठी खर्च करण्यात आले. एकीकडे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यासाठी पैसे नसतानाच हा खर्च करण्यात आला आहे. देशावर आर्थिक संकट असतानाच सरकारचा प्राधान्य क्रम पूर्णपणे चुकीचा असल्याचे दाखवून देणारे हे उत्तम उदाहरण आहे,” असं जयराम रमेश यांनी ट्विटरवरुन म्हटलं आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या एअर फोर्स-वन या विशेष विमानाप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही एअर इंडिया वनची सेवा दिली जाईल. बोईंगच्या डलास येथील प्रकल्प स्थळावर ७७७-३०० ईआर या विमानांची बांधणी करण्यात आली आहे.

मिसाइल डिफेन्स सिस्टिम

राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांव्यतिरिक्त कोणालाही या विमानाचा वापर करता येणार नाही. सध्या राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान परदेश दौऱ्यावर जाण्यासाठी एअर इंडियाच्या विमानाचा वापर करतात. त्यांच्या छोटया दौऱ्यासाठी इंडियन एअर फोर्सच्या व्हीव्हीआयपी ताफ्यातील विमानांचा वापर केला जातो. बोईंग ७७७ हे विशेष सुरक्षा प्रणालीने सज्ज असलेले भारतातील पहिले विमान ठरणार आहे.कामकाजाच्या सुलभतेसह सुरक्षेचा दृष्टीने या विमानाची रचना करण्यात आली आहे. जून २०२० पर्यंत ही विमाने भारताला मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. पंतप्रधानांसाठी बनवण्यात येत असलेली ही दोन्ही विमाने मिसाइल डिफेन्स सिस्टिमने सुसज्ज असतील. शत्रूचा क्षेपणास्त्र हल्ला परतवून लावण्यात सक्षम असतील. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे बोईंग ७४७-२०० बी जितके सुरक्षित आहे तितकेच हे विमान सुद्धा सुरक्षित असेल.

रडार जॅमर आणि आधुनिक यंत्रणा

शत्रूचे रडार जॅम करण्यासह क्षेपणास्त्र हल्ला परतवून लावण्यास हे विमान सक्षम असेल. नव्या विमानातील मिसाइल डिफेन्स सिस्टिम एअर इंडियाऐवजी इंडियन एअर फोर्सच्या नियंत्रणाखाली रहाणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने जबाबदारीत बदल करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. मिसाइल डिफेन्स सिस्टिम म्हणजे शत्रूने डागलेल्या क्षेपणास्त्रापासून रक्षण करणारी यंत्रणा. अमेरिका, रशिया, तैवान, भारत, चीन आणि इस्रायलने अशी सिस्टिम विकसित केली आहे. एअर फोर्स वनच्या दिशेने येणाऱ्या क्षेपणास्त्राचा मार्ग बदलण्याची यंत्रणा डिफेन्स सिस्टिममध्ये असेल. आयएएफकडे या विमानाचे नियंत्रण गेले तर ‘एअर इंडिया वन’ऐवजी ‘एअर फोर्स वन’ म्हणून हे विमान ओळखले जाईल.

एकदा इंधन भरल्यानंतर

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे विशेष विमान एकदा इंधन भरल्यानंतर सलग १७ तास उड्डाण करु शकते. हे विमान एखाद्या नियंत्रण कक्षाप्रमाणे काम करण्यास सक्षम आहे. सर्व आधुनिक तंत्रज्ञान वापरुन तयार करण्यात आलेल्या या विमानामधून कोणत्याही प्रकारच्या हॅकींग किंवा टॅपिंगच्या भीतीशिवाय ऑडिओ आणि व्हिडिओ संवाद साधता येणार आहे. सध्या भारताकडे असणाऱ्या व्हिआयपी विमानांना १० तासांच्या उड्डाणानंतर इंधन भरण्यासाठी उतरावं लागायचं. टाइम्स नाऊने दिलेल्या वृत्तानुसार या दोन्ही विमानांची एकंदरित किंमत ८ हजार ४५८ कोटी रुपये इतकी आहे. २००५ साली बोईंगकडून ६८ विमाने विकत घेण्यासंदर्भात जो निर्णय घेण्यात आला होता त्यामध्येच या दोन विमानांच्या खरेदीला मंजुरी देण्यात आली होती. या विमानांवर भारत असं लिहिलेलं असेल तसेच यावर अशोचक्रही असेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 2, 2020 2:42 pm

Web Title: 8458 crore rs of taxpayers spent on new aircraft for pm and dignitaries when there is no money for students scholarships say jairam ramesh scsg 91
Next Stories
1 निर्भया प्रकरण: …जाब विचारणाऱ्या ‘त्या’ संतप्त तरूणींना तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री शिंदे म्हणाले,…
2 हाथरस : तृणमूलच्या नेत्यांना पीडितेच्या कुटुंबीयांना भेटण्यापासून रोखलं; पोलिसांकडून धक्काबुकी
3 पाकिस्तानी लष्कराला कमकुवत करण्यासाठी नवाज शरीफांना भारताची मदत : इम्रान खान
Just Now!
X