देशात बरे झालेल्यांचे प्रमाण ८० टक्क्यांजवळ

नवी दिल्ली : देशात रविवारी सलग दुसऱ्या दिवशी करोनाच्या नव्या रुग्णांपेक्षा करोनामुक्तांची संख्या अधिक नोंदविण्यात आली. गेल्या २४ तासांत करोनाचे ९२ हजार ९०५ रुग्ण आढळले. याच कालावधीत ९४ हजार ६१२ रुग्ण बरे होऊन घरी गेले.

देशातील करोनाबाधितांची एकूण संख्या ५४ लाखांहून अधिक झाली आहे. करोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण ७९.६८ टक्क्यांवर पोहोचले आहे. देशात गेल्या २४ तासांत करोनामुळे १,१३३ जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची एकूण संख्या ८६ हजार ७५२ वर पोहोचली.

 ‘फेलुदा’ चाचणीस मान्यता

करोना विषाणू संसर्गाचे निदान करणाऱ्या ‘फेलुदा’ चाचणीत भारताच्या औषध महानियंत्रकांनी परवानगी दिली आहे. टाटा समूह आणि ‘सीएसआयआर’च्या रीसर्च इन्स्टिटय़ूट ऑफ जिनॉमिक्स अँड इंटिग्रेटिव्ह बायॉलॉजी या संस्थांनी संयुक्तरीत्या हे चाचणी संच विकसित केले आहेत. प्रसिद्ध बंगाली दिग्दर्शक व लेखक सत्यजित राय यांच्या कादंबऱ्यांमधील लोकप्रिय गुप्तहेर पात्र ‘फेलुदा’ याचे नाव या चाचणीस देण्यात आले आहे. ‘क्लस्टर्ड रेग्युलरली इंटरस्पेसड शॉर्ट पॅलिनड्रोमिक रिपीटस’ (सीआरआयएसपीआर) तंत्राचा अवलंब करून ही चाचणी करोनाचे निदान करते. या चाचणीची अचूकता ‘आरटीपीसीआर’ चाचणीइतकीच असून त्यापेक्षा कमी खर्चात आणि कमी वेळेत ती करता येते, असे ‘सीएसआयआर’ने म्हटले आहे.  करोना विषाणूचा शोध घेण्यासाठी यात ‘कॅस ९’ प्रथिनांचा यशस्वी वापर करण्यात आला असल्याचे टाटा आणि ‘सीएसआयआर’च्या वतीने सांगण्यात आले.

राज्यात २०,५९८ नवे रुग्ण : राज्यात गेल्या २४ तासांत २०,५९८ रुग्ण आढळले असून, ४५५ जणांचा मृत्यू झाला. याच कालावधीत २६,४०८ रुग्ण बरे होऊन घरी परतले. राज्यातील करोनाबाधित रुग्णांची आतापर्यंतची संख्या १२ लाखांवर गेली. राज्यात लागोपाठ तिसऱ्या दिवशी नव्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे.