दिल्ली-एनसीआरमध्ये तुफान पाऊस सुरु असून ठिकठिकाणी पाणी साचलं आहे. काही ठिकाणी इमारत कोसळल्याच्या, रस्ता खचल्याच्या घटनादेखील समोर आल्या आहेत. यादरम्यान इंदिरापुरम येथे स्थानिक प्रशासनाचा निष्काळजीपणा एका व्यक्तीच्या जीवावर बेतला. रस्त्यावर पडलेल्या विजेच्या तारांमुळे एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला आहे. करंट लागल्याने ३४ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जोरदार पाऊस सुरु असताना सरोज आपल्या मुलीला शाळेत सोडण्यासाठी चालले होते. यावेळी रस्त्यावर पडलेल्या विजेच्या तारेचा करंट लागून त्यांचा मृत्यू झाला. स्थानिक प्रशासनाने वेळीच लक्ष दिलं असतं तर कदाचित ही दुर्घटना झाली नसती.

दुसरीकडे गाजियाबादमधील खोडा येथे इमारत कोसळल्याने १० वर्षाचा मुलगा जखमी झाला आहे. ग्रेटर नोएडा येथे तीन मजली बंगला कोसळला आहे. सुदैवाने कुटुंब सुरक्षित आहे.

दिल्ली-एनसीआरमध्ये सकाळपासून सुरु असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. गाजियाबादला पावसाचा खूप मोठा फटका बसला असून वसुंधरा येथे रस्ता खचल्याने पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झालीये. नोएडा, गाजियाबाद आणि गुडगाव येथे रस्त्यांवर पाणी साचल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे.