देशभरात दहशतवादी कारवायांसंदर्भात होत असलेल्या प्रत्येक हालचालींवर नजर ठेवण्यासाठी केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रीय गृहखात्याने नव्या टेरर मॉनिटरिंग ग्रुपची (टीएमजी) स्थापना केली आहे. एएनआयने सुत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. त्यामुळे आता दहशतवादाविरोधात सरकारने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केल्याचे म्हटले जात आहे.

एएनआयच्या सुत्रांच्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीरच्या गुन्हे अन्वेशन शाखेचे अतिरिक्त पोलीस उपमहासंचालक यांच्या अध्यक्षतेखाली या नव्या टेरर मॉनिटरिंग ग्रुपची (टीएमजी) स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये गुप्तचर यंत्रणा (IB), राष्ट्रीय तपास पथक (NIA), केंद्रीय तपास यंत्रणा (CBI), अंमलबजावणी संचालनालय (ED), सेन्ट्रल बोर्ड ऑफ टॅक्स अँड कस्टम्स (CBIC), सेन्ट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (CBDT) या संस्थांचे प्रतिनिधी हे या ग्रुपचे सदस्य असणार आहेत.

त्यामुळे आता टीएमजी अधिकच सक्षम होणार असून काश्मीर खोऱ्यासह देशभरात दहशतवादी कारवायांसाठी पैसा पुरवणाऱ्यांवर त्यांना थेट कारवाई करता येणार आहे.