आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी केरळमधील पूरग्रस्त गावाला दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आहे. संजय सिंह यांनी गावातील विकास कामासाठी खासदार निधीतून एक कोटी रुपये देणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यांनी सांगितलं की, केरळमध्ये पुरामुळे नुकसान झालेल्या एका गावाला दत्तक घेत खासदार निधीतून एक कोटी रुपये दान करेन.

याआधी संजय सिंह यांनी केरळसाठी आपला एक महिन्याचा पगार मुख्यमंत्री मदत निधीत जमा केला आहे. आम आदमी पक्ष सध्या पूरग्रस्त गावांची पाहणी करत आहे. याआधी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केरळच्या मदतीसाठी पक्षातील आमदार आणि खासदारांचा एक महिन्याचा पगार देत असल्याचं जाहीर केलं होतं.

केरळमधील महापुरात 417 जणांचा मृत्यू झाला असून सुमारे २ लाख नागरिक बेघर झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्यासोबत पूरग्रस्त भागाची हवाई पाहणी केली होती. परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर पूरातील मृतांच्या कुटुंबीयांना २ लाख रुपये तर, गंभीर जखमींना ५० हजार रुपयांच्या आर्थिक मदतीची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केली होती. याशिवाय मोदी यांनी परिस्थितीवर मात करण्यासाठी केरळला ५०० कोटी रूपयांची मदत जाहिर केली आहे. याआधी राजनाथसिंह यांनी केरळला १०० कोटींची मदत जाहिर केली होती.