भारतीय सैन्य दलाने सोमवारी काश्मीर खोऱ्यातील जैश-ए-मोहम्मदचा टॉप कमांडर कामरान ऊर्फ गाझीचा खात्मा केल्यानंतर त्याच्या जागी जैशने आता अबू बकरची कमांडर म्हणून नियुक्ती केली आहे. आजतक वृत्तवाहिनीने सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. मागच्यावर्षी जुलै महिन्यात अबू बकरने काश्मीर खोऱ्यात घुसखोरी केली.
गाझी प्रमाणे अबू बकरनेही अफगाणिस्तानमध्ये प्रशिक्षण घेतल्याची माहिती आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये जैश-ए-मोहम्मद २० पेक्षा जास्त दहशतवाद्यांना आत्मघातकी हल्ल्याचे प्रशिक्षण देत असल्याची माहिती आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसात सुरक्षा दलांसमोरील आव्हाने आणखी वाढणार आहेत.
पुलवामा हल्ल्याच्या सूत्रधारांपैकी एक असलेल्या गाझीला सैन्य दलाने सोमवारी चकमकीत संपवले. पुलवामा हल्ल्यात भारताचे ४० जवान शहीद झाल्यानंतर १०० तासांच्या आत लष्कराने गाझीला संपवले. या हल्ल्यानंतर भारतात प्रचंड संतापाचे वातावरण असून काहीही करुन पाकिस्तानला अद्दल घडवा अशी सर्वसामान्य भारतीयांची मागणी आहे.
पुलवामा दहशतवादी हल्ल्यात यश मिळाल्याने जैश-ए-मोहम्मदने यापेक्षाही मोठा आत्मघाती हल्ला करण्याची योजना आखल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे. १६ ते १७ फेब्रुवारीदरम्यान जैश-ए-मोहम्मदच्या प्रमुखांची आणि काश्मीरमधील दहशतवाद्यांमध्ये संभाषण झालं असून त्याआधारेच गुप्तचर यंत्रणांनी हा इशारा दिला आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 21, 2019 1:51 pm