05 April 2020

News Flash

आचार्य अत्र्यांचे बाबासाहेबांवरील ते अजरामर भाषण

भारतात असा युगपुरुष शतकाशतकांत तरी होणार नाही. झंझावाताला मागे सारणारा, महासागराच्या लाटांसारखा त्यांचा अवखळ स्वभाव होता.

आचार्य प्र. के. अत्रे

मराठी पत्रकार व लेखक यांच्या वतीने भारतातील एका महान विभूतीला मी आदरांजली अर्पण करण्यास उभा आहे. या महान नेत्याच्या मृत्यूने मृत्यूला मृत्यूचीच कीव वाटू लागली आहे. मरणानेच आज आपले हसू करून घेतले आहे. मृत्यूला काय दुसरी माणसे दिसली नाहीत? मग त्याने इतिहास निर्माण करणाऱ्या इतिहासाच्या या पर्वावरच का झडप घातली?

महापुरुषांचे जीवन पाहू नये असे म्हणतात. पण त्यांचे मरण आपण पाहत आहोत. भारतात असा युगपुरुष शतकाशतकांत तरी होणार नाही. झंझावाताला मागे सारणारा, महासागराच्या लाटांसारखा त्यांचा अवखळ स्वभाव होता. असा शूरवीर, बहाद्दर पुरुष आज मृत्यूच्या चिरनिद्रेच्या मांडीवर कायमचा विसावा घेत आहे. त्यांचे वर्णन करण्यास शब्द नाहीत. अशी एकही गोष्ट नाही की, त्याविरुद्ध ‘बाबां’नी बंड पुकारले नाही. अन्याय जुलूम ,जबरदस्ती, विषमता जेथे दिसली तेथे त्या वीराने आपली गदा उगारली . महात्मा गांधीना वाचविण्यासाठी आपल्या लाखो अस्पृश्य बांधवांचे कायमचे नुकसान करूनही, त्यांनी पुणे करारावर सही केली. ते कच्चा गुरुचे चेले नव्हते . बुद्ध, कबीर, फुले हे त्यांचे गुरू होते. अस्पृश्यता जाळा असे म्हणणारा हा पुरुष स्वतंत्र भारताच्या घटनेचा शिल्पकार बनला. त्यांना आम्ही छळले—-सरकारने छळले. अशा परिस्थितीत मी हिंदू म्हणून जन्मलो तरी मरतांना हिंदू म्हणून मरणार नाही. हे त्यांनी खरे करून दाखविले. कारण आपल्याला ठाऊकच आहे की बाबासाहेबांनी बौद्ध धम्म स्वीकारला होता. शोक करणे त्यांना आवडणार नाही. आज त्यांचा प्राण त्यांच्या कुडीतून बाहेर पडून सात कोटींच्या शरीरात शिरला आहे. त्यांचे चारित्र्य, निर्भयपणा व दुसरे गुण अंगी बाणवून आपण त्यांचे कार्य पूर्ण केले पाहिजे. हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.

महामानवास त्रिवार अभिवादन .

जयभीम! जयभारत! नमो बुद्धाय!

(बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर आचार्य प्र. के. अत्रे यांनी केलेले भाषण)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 14, 2018 7:45 am

Web Title: acharya atre speech on babasaheb ambedkar
Next Stories
1 तत्त्वज्ञ बाबासाहेब!
2 बुद्धधर्माची क्रांती आणि त्यास हटविणारी प्रतिक्रांती यांची बाबासाहेबांची मांडणी
3 मान्यवरांच्या नजरेतून पुस्तकांमध्ये साकारलेले बाबासाहेब
Just Now!
X