नरेंद्र मोदी यांच्या राजकारणामुळे आपला पराभव होऊ नये, म्हणून लोकसभेसाठी भोपाळमधून उमेदवारी देण्याची भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणींची मागणी फेटाळत भाजपने त्यांना गुजरातमधील गांधीनगरमधूनच उमेदवारी दिली. त्यामुळे अडवाणी नाराज असून ‘अन्य नेते सुरक्षित वा पसंतीचा मतदारसंघ निवडत असताना आपल्या मताला मात्र महत्त्व नाही,’ अशा शब्दांत त्यांनी पक्षाध्यक्ष राजनाथ सिंह यांच्याकडे राग व्यक्त केला.
८६ वर्षीय अडवाणी गांधीनगरमधून पाचवेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत. मात्र, यावेळी आपल्याला भोपाळमधून उमेदवारी दिली जावी, अशी इच्छा त्यांनी भाजप अध्यक्ष राजनाथ सिंह यांच्याकडे व्यक्त केली होती. यामागे मोदींशी बिघडलेले संबंध कारणीभूत असल्याचे बोलले जाते. आपल्याला गांधीनगरमधून लढण्यास हरकत नाही. मात्र, भोपाळ सुरक्षित मतदारसंघ असल्याने तेथून उमेदवारी द्यावी, अशी त्यांची मागणी होती. मोदींकडून दगाफटका होऊन पराभव होण्याची भीती असल्यानेच अडवाणींनी भोपाळची मागणी केल्याचे समजते. मात्र, त्यांना गांधीनगरमधूनच उमेदवारी देण्यावर मोदी ठाम होते.
या पाश्र्वभूमीवर, लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार ठरवण्यासाठी झालेल्या भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीस अडवाणींनी दांडी मारली. मात्र, दिवसभर चाललेल्या या बैठकीतही अडवाणींना गांधीनगरमधूनच उमेदवारी देण्याचे निश्चित करण्यात आले. गांधीनगरऐवजी भोपाळमधून उमेदवारी दिल्यास जनतेत आणि कार्यकर्त्यांत पक्षाबाबत नकारात्मक संदेश जाईल, अशी भूमिका मोदींनी बैठकीत मांडल्याचे समजते. याला पक्षाध्यक्ष राजनाथ सिंह यांनीही अनुकूलता दर्शवली.

मनधरणी सुरू
हा निर्णय जाहीर झाल्यानंतर अध्र्या तासातच अडवाणी नाराज असल्याचे वृत्त माध्यमांमध्ये पसरले. त्यामुळे अडवाणींना राजी करण्यासाठी सुषमा स्वराज, अरुण जेटली यांच्यासह माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांनी रात्री उशीरा अडवाणींच्या निवासस्थानी धाव घेतली. तर नरेंद्र मोदी यांनी मात्र नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात जाऊन सरसंघचालक मोहन भागवत यांच्याशी चर्चा केली. 

मोदींना वडोदराही
नरेंद्र मोदी यांना भाजपने वाराणसीपाठोपाठ गुजरातमधील वडोदरा येथूनही उमेदवारी दिली आहे. मोदींना गुजरातमधून उमेदवारी देण्याची मागणी तेथील भाजप कार्यकर्त्यांनी केली होती.