केंद्र सरकार चीन सीमेवरील भारतीय हद्दीतील गावकऱयांना लष्करी प्रशिक्षण देण्याची योजना आखत आहे. चीनकडून होणारी घुसखोरी आणि अरुणाचल प्रदेशातील काही भाग आमचाच असल्याचा त्यांचा दावा याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी केंद्र सरकार सीमेलगतच्या गावकऱयांनाच लष्करी प्रशिक्षण देण्याचा विचार करत असल्याची माहिती केंद्रातील वरिष्ठ अधिकाऱयांनी इंडियन एक्स्प्रेसला दिली आहे.
अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार, “सीमावर्ती भागातील नागरिकांना भारत सरकार लष्करी प्रशिक्षण देणार आहे आणि वेळ पडल्यास त्यांचा उपयोग अर्धसैनिक बलाप्रमाणे करता येईल. तसेच सीमे लगतच्या एक किलोमीटर अंतरावरील गावकरी यासाठी योग्य असल्याचे म्हटले जात आहे. लष्करी प्रशिक्षण मिळाल्यानंतर हे गावकरी विशेषत: ज्या ठिकाणी सीमारेषेवरून वाद सुरू आहे तिथे घुसखोरांवर लक्ष ठेवतील.”
यासोबतच सीमावर्ती भागातील नागरिकांसाठी एनडीए सरकारने आखलेल्या योजनेत मुलभूत सेवा सुविधांचा विकास हा देखील महत्वाचा मुद्दा आहे. सीमावर्ती भागातील सामन्यांचे दळणवळण सोपे व्हावे यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. तसेच केंद्रीय गृहमंत्रालयाने अरुणाचल प्रदेशमधील चीन लगतच्या सीमावर्ती भागासाठी याआधीच ५५०० कोटी रुपयांची योजना आखली आहे.